Sunday, July 31, 2016

मुलायम, मायावती आणि उद्धवअर्थातच लोकसभा जिंकल्यापासून भाजपाचे हसण्याचे दिवस आहेत आणि त्यांनी पराभूत कॉग्रेससह अन्य पक्षांना मिळेल त्या विषयावरून हिणवणेही समजू शकते. पण ती लोकसभा जिंकताना भाजपाला एकट्याच्या बळावर तितके यश मिळालेले नव्हते आणि मिळणारही नाही. त्यासाठी जितके कष्ट मोदींनी अहोरात्र प्रचार करून उचलले, तितकाच त्या यशाला मित्र पक्षांचा हातभार लागला होता. २००४ च्या लोकसभा निवडणूकीत कॉग्रेसला असेच यश मिळाले आणि त्यात मित्र पक्षांचे असलेले योगदान कॉग्रेस विसरून गेली. तरीही समोर आव्हान नसल्याने २००९ सालात कॉग्रेसला पुन्हा सत्ता मिळाली आणि जागाही वाढल्या होत्या. त्यामुळे इतकी मस्ती चढली, की अल्पमताचे सरकार असूनही कॉग्रेस एकहाती निर्णय घेत गेली. मित्रपक्षांना चार मंत्रीपदे देऊन सर्व निर्णय एकट्याने घेण्याची मुजोरी अनेक मित्रांना कॉग्रेसपासून दूर घेऊन जात होती. त्याचेच प्रतिबिंब नंतर २०१४ च्या निकालात पडले. कॉग्रेसच्या इतक्या दारूण अपयशाला त्या पक्षाचे नेतृत्व जबाबदार होते, तितकेच मित्रांनी दुरावणेही कारण झाले. विरोधी पक्ष म्हणून मान्यता मिळवण्याइतक्याही जागा कॉग्रेसला मिळू शकल्या नाहीत. कारण त्यांना कोणी मित्र उरले नव्हते. पण ते निकाल समोर येईपर्यंतचे कॉग्रेस नेते प्रवक्त्यांचे चेहरे आणि भाषा आठवा. त्यातून ओतप्रोत मस्तवालपणा पाझरत होता. आज त्याचीच नक्कल भाजपाकडून होत असेल तर नवल नाही. त्यालाच यशाची नशा म्हणतात. कारण त्याचे परिणाम तात्काळ दिसत नसतात. काही महिने-वर्षे जावी लागतात. ते परिणाम दिल्ली विधानसभेच्या मध्यावधीमध्ये आणि बिहारच्या मतदानात दिसले. लोकसभेत मिळालेली मतेही टिकवता आली नाहीत. त्याला मोदींची लोकप्रियता घटली हे कारण नव्हते, तर भाजपा नेत्यांच्या मस्तवालपणाला बसलेला तो दणका होता. जेव्हा मनस्थिती अशी असते, तेव्हा टिका आणि विरोध यातला फ़रक उमजणे अशक्य होते.

महाराष्ट्रात युती म्हणून एक राजकीय आकार मागली पंचवीस वर्षे अस्तित्वात होता. हिंदूत्व ही त्यामागचे सुत्र होते. पण अधिक जागा व सत्तासुत्रे आपल्या हाती घेण्याचा मोह त्याला तडा देऊन गेला. त्यामुळे अधिक जागांची मागणी करीत भाजपाने युती तोडली. यात शिवसेना दिर्घकाळ आपले वेगळे अस्तित्व विसरून भाजपाशी एकच राजकीय आकार म्हणून काम करत राहिली. पर्यायाने जिथे भाजपाची जागा तिथे सेनेने आपले स्थानिक नेतृत्व उभे करण्यात हयगय केली. दुसरी गोष्ट म्हणजे पहिल्यापासून युतीत राहिल्याने वाढलेल्या शिवसेनेची मुंबईबाहेर कुठे बलस्थाने आहेत; याचा थांगपत्ता कधी सेना नेतृत्वाला लागला नव्हता. किंबहूना युती करून महाजन-मुंडे यांनी तो सेनेला त्याचा थांग लागू दिलेला नव्हता. परिणामी सेनेला महाराष्ट्रातले आपले प्रभावक्षेत्र किंवा बालेकिल्ले कधी नेमके समजू शकले नाहीत. कारण तिने कधी सर्वच्या सर्व जागा लढवल्याच नव्हत्या. मागल्या विधानसभेत तशी वेळ सेनेवर आणली गेली आणि त्यातून कुठे आपल्याला अजिबात स्थान नाही, किंवा कुठे आपले निर्विवाद बळ आहे, त्याचा आराखडाच सेनेच्या हाती आला. २८८ जागांपैकी दोनशे जागा अशा आहेत, की जिथे सेना आपला उमेदवार लढवू शकते. कारण तिथे सेनेला पहिल्या तीन क्रमांकाची मते मिळालेली आहेत. अगदी मोदी लाटेत ही मते मिळाली असल्याने त्याला सेनेचे तिथले किमान बळ असे म्हणता येते. त्याचा दुसरा अर्थ असा, की त्यात अजून खुप वाढ होण्यास वाव आहे. मात्र मोदी लाटेवर स्वार झालेल्या भाजपाला अन्य पक्षातून उमेदवार आणूनही मिळालेली मते व जागा, त्यांच्यासाठी कमाल मर्यादा सिद्ध करणार्‍या आहेत. यातले उसने उमेदवार माघारी गेले तर त्यात घट होणार ते वेगळेच. मात्र प्रतिकुल काळात लढताना सेनेने संपादन केलेली मते व निश्चीत केलेल्या जागा, त्यांच्यासाठी पुढील निवडणूकीतला पाया आहे.

उद्धव ठाकरे स्वबळावर लढायची व बहुमताने आपलेच सरकार आणायची भाषा बोलतात, त्याचा असा आधार आहे. तो नाकारण्यात दोन वर्षे आधीच गेलेली आहेत आणि पुढली तीन वर्षे केव्हा जातील त्याचा पत्ताही लागणार नाही. पण युती तुटण्याचा अनुभव घेतल्यानंतर शिवसेनेत तो कडवेपणा आलेला आहे. त्यामुळे यापुढल्या कुठल्याही निवडणूकीत पडते घेऊन, युती करण्याची सेनेतली मानसिकता संपलेली आहे. पण दुसरीकडे आपण कुठे लढू शकतो, त्या जागा मात्र सेनेला उमजल्या आहेत. यातली गंमत अशी, की पहिल्या तीन क्रमांकाची मते मिळवलेल्या जागा सेनेला हक्काने लढवता येतील. उरलेल्या ८८ जागा हरायला किंवा कोणी सोबत येऊ इच्छित असलेल्या मित्रपक्षांना वाटून द्यायला सेना मोकळी आहे. बदल्यात अशा किरकोळ पक्षांनी उर्वरीत जागी दोनतीन हजार मतांची भर टाकली, तरी सेनेला काही दुबळ्या जागा जिंकायला हातभार लागू शकतो. हे गणित उद्धव ठाकरे किंवा सेनेच्या नेतृत्वाच्या डोक्यात असेल, तर त्यांच्या स्वबळाच्या डरकाळ्या पोकळ मानता येणार नाहीत. कारण सेना व भाजपा यांच्या विधानसभेत मिळालेल्या मतांच्या टक्केवारीत अवघा साडेसात टक्के इतकाच फ़रक आहे. तो फ़रक मोदी लाटेतला आहे. मोदी लाट हे भाजपाचे वजन होते. तेच पुढल्या वेळी शिल्लक राहिलेले असेल असे होत नाही. दिल्ली-बिहार त्याची ग्वाही देतात. आसाममध्ये सत्ता हाती आली तरी त्यासाठी दोन अन्य पक्षांच्या कुबड्या भाजपाला घ्याव्या लागल्या आणि मतांमध्ये आजही भाजपा कॉग्रेसच्या मागेच आहे. जिंकलेल्या जागा मुदतीत संपतात. खरी ताकद मतांची टक्केवारी सांगत असते. त्या टक्केवारीशी महाराष्ट्रातील भाजपाचा मस्तवालपणा जुळणारा नाही, म्हणूनच तो आत्मघाताला आमंत्रण देणारा आहे. म्हणून आज उद्धव किंवा सेनेची टवाळी सोपी असेल. पण त्याची मोठी किंमत उद्या मोजावी लागेल.

विधानसभेला दोन्ही कॉग्रेसनी मिळवलेल्या मतांची बेरीज केल्यास ती भाजपापेक्षा आठ टक्के अधिक आहे. त्यामुळे मिळालेल्या १२३ जागा मोदी लाटेपेक्षा शरद पवार यांची कृपा अधिक आहे. कारण त्यांनीच ऐनवेळी आघाडी मोडून भाजपाचे स्वबळाचे काम सुकर केले होते. ती पुढल्या खेपेस कायम राहिल अशी शक्यता कितपत आहे? उत्तरप्रदेशात आपल्या बळावर लढताना युत्या आघाड्य़ा टाळून मायावती व मुलायम यांनी आपले बस्तान बसवले. परिणामी भाजपा कॉग्रेस यासारखे राष्ट्रीय बलदंड पक्ष त्या मोठ्या राज्यात पुरते नामोहरम होऊन गेले. शिवसेनेला स्वबळावर मिळवता आलेली २० टक्के (लाटेविरुद्धची) मते, ६३ आमदारांपेक्षा महत्वाची आहेत. कारण त्यात स्वबळावर सत्ता मिळवण्याची क्षमता दडलेली आहे. संपलेल्या कॉग्रेसला सोनियांनी जीवदान देऊन दोनदा सत्ता काबीज करून दाखवली, ती हक्काची २० टक्केहून जास्त मते पारंपारीक असल्याने. आज दुर्दैवी पराभवातही कॉग्रेसने १७ टक्के मते टिकवलेली आहेत. एकुणच महाराष्ट्राची लढत आता उत्तर प्रदेशप्रमाणे चौरंगी झाली आहे. त्यात आज २७-२८ टक्के मते मिळवणारा राजा असतो आणि २०-२२ टक्के मिळवणारा त्याच्यासाठी पुढल्या वेळचा आव्हानवीर असतो. मायावतींनी दिड टक्का मते व सत्ता गमावली, तर मुलायमच्या समाजवादी पक्षाने साडेचार टक्के मते वाढवून स्वबळावर सत्ता पादाक्रांत केली. मायावतींनी अपवाद सोडल्यास निवडणूकपुर्व युती आघाडी नाही केली आणि आपला मतांचा टक्का वाढवत नेला. आपल्या हत्ती चिन्हावर शिक्का मारणार्‍यांना मित्र पक्षाचे चिन्हही कळू दिले नाही. स्वबळावर लढण्याची किमया अशी असते. दिड वर्षासाठीचे मुख्यमंत्रीपद भोगून झाल्यावर पक्षाचा पाठींबा कल्याणसिंग सरकारला देणार्‍या मायावती, नंतर सतत भाजपाला लक्ष्य करत राहिल्या. त्याचे फ़ळ त्यांना व भाजपाला काय मिळाले होते? उद्धव काय करीत आहे, त्याचे उत्तर त्या उत्तरप्रदेशी इतिहासात सापडू शकेल.

1 comment: