
राजकारणात बेशरमपणा ही एक गुंतवणूक असते. आम आदमी पक्ष म्हणून जो काही गोतावळा अलिकडल्या जमान्यात राजकीय क्षेत्रात आला, त्यांच्यापाशी बेशरमीचे मोठे गोदाम असावे. कारण त्यांनी कसलीही लाजलज्जा शिल्लक ठेवलेली नाही. उलट त्याविषयी प्रश्न विचारले तर ते आणखी निर्लज्जपणा बिनदिक्कत करू शकतात. कारण बेशरमपणा म्हणजेच इज्जत, अशी त्यांची नवी व्याख्या आहे. त्याचीच प्रचिती सातत्याने येऊ लागली आहे. राजकारण हा चिखल आहे असे अण्णा हजारे सतत सांगायचे आणि त्यांचा चेला म्हणून जी मंडळी लोकपाल आंदोलनाचा बुरखा पांघरून सार्वजनिक जीवनात आली, त्यांनी चिखलालाही लाजवील अशी घाण करण्याचे नवनवे विक्रम चालविले आहेत. राजकीय परिस्थितीचा व लोकभावनेचा धुर्तपणे लाभ उठवण्यात हे लोक वाकबगार आहेत. क्षणात या बोटावरची थुंकी त्या बोटावर फ़िरवण्याइतके समर्थ आहेत. आपल्याला राजकारणात जायचे नाही अशा आणाभाका घेतलेल्या या टोळीने, अण्णांनाच टांग मारून पक्ष स्थापन केला व अण्णांच्या त्या आंदोलनाची पुण्याई वापरून निवडणूका जिंकण्याचे कारस्थान यशस्वी केले. कुठल्याही चोरांच्या टोळीत जसे लुट वाटून घेण्य़ावरून वाद भांडणे होतात, तशी आपच्या टोळीत विवाद उफ़ाळले. त्यात केजरीवाल हाच निर्विवाद टोळीप्रमुख असल्याचे सिद्ध झाले. त्याला आव्हान देऊ शकेल असा टोळीत आता कोणी उरलेला नाही. अशी ही माणसे नितीमत्ता व लाजलज्जेची गोष्ट बोलतात, तेव्हा कोणी चारित्र्यसंपन्न माणसालाही भिती वाटेल. अशी नाटके काही काळ चालतात आणि हळुहळू त्याची पापे चव्हाट्यावर येतातच. मात्र त्यामुळे घाबरून जाण्याइतके केजरीवाल बावळट किंवा सभ्य नाहीत. म्हणूनच ते अधिक भितीदायक पात्र आहे. तसे नसते तर हा माणूस गुजरातच्या उना येथील दलितांपाशी अश्रू गाळायला गेला नसता.
उना गुजरात येथे काही दिवसांपुर्वी दलित कुटुंबातील तरूणांना गोरक्षक म्हणून मिरवणार्यांनी पकडले आणि हाणामारी केली. ती घटना अमानुष होती व आहे. त्यासाठी भाजपाचे वाचाळवीर जबाबदार आहेत यातही शंका नाही. पण त्यांच्याविषयी केजरीवाल टोळीला उमाळा येण्याचे कारण काय? त्यांना माणसाचे हाल अत्याचार किवा हिंसेविषयी कळवळा कधीपासून आला? अडीच वर्षापुर्वी लोकसभा निवडणूकीचा कार्यक्रम आयोगाने जाहिर केला, तेव्हाही केजरीवाल गुजरात दौर्यावर होते आणि नाटकेही यथेच्छ चालू होती. आचारसंहिता लागू झाल्याने त्यांच्या मोटारींचा ताफ़ा पोलिसांनी अडवला. तर ही टोळी खवळली. मोदींच्याच आदेशावरून आपल्या गाडीवर पोलिसांनी दगडफ़ेक केली, असा आरोप करून तमाशा सुरू झाला होता. मग त्यांच्या दिल्लीतील गुंडांनी त्यासाठी भाजपाच्या मुख्यालयावर चाल करून प्रचंड दगडफ़ेक केलेली होतॊ. उना येथील गोरक्षकांनी कुणाला मेलेल्या गायीसाठी जबाबदार धरून हाणामारी करणे आणि गुजरातच्या पोलिसी कारवाईसाठी दिल्लीतल्या केजरी टोळीने भाजपाच्या मुख्यालयावर हिंसक हल्ला करणे; यात नेमका कोणता गुणात्मक फ़रक असतो? की केजरीवाल टोळीतले गुंड म्हणजे स्वयंसेवक असतात. कारण त्यांच्या डोक्यावर टोपी असते आणि उनाचे मारेकरी बिनाटोपीचे असतात, म्हणून गुंड ठरतात काय? किती बेशरमपणा असावा? उठसूट केजरीवाल व त्यांच्या सहकार्यांवर शाईफ़ेक वा तोंड काळे करणारे हल्ले होत राहिले आणि तपासानंतर आरोपी त्यांचेच सहकारी अनुयायी असल्याचे निष्पन्न होत राहिले. कधी अशा खोटारडेपणासाठी या आपनेत्यांनी क्षमा मागितली होती काय? अशी माणसे कुणाचे सांत्वन करणार म्हणजे काय? पावलापावलावर खोटेपणाशिवाय ज्यांचे पान हलत नाही, त्यांनी राजा हरिश्चंद्राचा अवतार असल्याचा टेंभा किती काळ मिरवावा?
आज केजरीवाल यांना उना गुजरातच्या दलितांचा उमाळा आला आहे. कारण त्यांना त्याचा लाभ भाजपा विरोधात राजकारण खेळण्यासाठी होतो आहे. नशीब अजून त्यांनी उनाच्या दलितांना मोदींच्याच आदेशावरून मारहाण झाल्याचा आरोप केलेला नाही. अन्यथा केजरीवाल यांच्या आयुष्यातल्या तमाम समस्यांना मोदीच जबाबदार असतात. काही वेळा असे वाटते, की या माणसाच्या आईवडीलांचा विवाह हे सुद्धा मोदींचेच कारस्थान असावे. ते यशस्वी झाले म्हणून केजरीवाल यांच्या जन्माची शक्यता निर्माण झाली. तो जन्म झालाच नसता तर केजरीवाल जन्माला आले नसते आणि त्यांना कुठल्या समस्या प्रश्नाने सतावलेही नसते. माणूस किती बेताल बोलू शकतो, याचा अजब नमूना म्हणून केजरीवाल यांचा दाखला देता येईल. सव्वा वर्षापुर्वी जमिन अधिग्रहण कायद्याला विरोध करण्यासाठी त्यांनी आपल्या पक्षातर्फ़े जंतरमंतर येथे मेळावा भरवला होता. यांची भाषणे जोरात चालू होती आणि त्यांचाच एक कार्यकर्ता तिथल्या झाडाला गळफ़ास लावून मरण पावला. गळफ़ास आवळला गेल्याने तो लटकून तडफ़डत होता आणि भोवतालच्या गर्दीतला कोणी मायका लाल केजरी समर्थक त्याला वाचवण्यासाठी पुढे सरसावला नाही. उलट पोलिस धावले त्यांना गजेंद्रपर्यंत पोहोचू देण्यात आले नाही. स्टेजवरून ती तडफ़ड दिसत असतानाही केजरीसह तमाम नेते शांतपणे भाषणे करीत राहिले. अशा हृदयशून्य टोळीस चाळीस पन्नास पावलावरची तडफ़ड दिसत नाही, त्यांना दूर गुजरातच्या उनामधील दलितांच्या वेदना कशा समजू शकतील? पण रडण्याचे, हसण्याचे, खोकण्याचे अथवा मौन उपोषणाचे नाटकच रंगवण्यात ज्यांनी कौशल्य प्राप्त केले आहे, त्यांच्याकडून यापेक्षा अन्य कुठली अपेक्षा बाळगता येऊ शकते? मेलेल्या टाळूवरचे लोणी खाण्याचा बेशरमपणा यापेक्षा वेगळा असतो काय?
तेव्हा जंतरमंतरवर बळी पडलेल्या गजेंद्र सिंग याच्या कुटुंबाला काही लाखाची भरपाई देण्याचे औदार्य केजरीवाल यांनी दाखवले होते. त्यांना त्यांची औकात गजेंद्राच्या भगिनीने दाखवून दिली होती. पैशाने कुटुंबातल्या वेदना दु:खाची भरपाई होते, असे समजणार्या केजरीवालना गजेंद्राच्या भगिनीने आव्हान दिले होते. ‘तुम्ही जितके लाख रुपये भरपाई देत आहात, त्याच्या दुप्पट रक्कम तुम्हाला देते, जरा गळफ़ास लावून घ्या.’ अजून ते आव्हान केजरीवाल पेलू शकलेले नाहीत. त्यांना मागल्या पंधरा महिन्यात राजस्थानला गजेंद्रच्या कुटुंबाला भेटायची हिंमत झालेली नाही, की सवड झालेली नाही. कारण त्या व्याकुळ भगिनीला भेटण्याचे साहस केजरीवाल यांच्यापाशी नाही. सच्चाई इतकी भीषण असते आणि पोकळ पुरूषार्थाला अशीच विवस्त्र करीत असते. केजरीवाल खरा प्रामाणिक कार्यकर्ता असता किंवा निष्कलंक नेता असता, तर त्याने राजस्थानला जाऊन गजेंद्राच्या भगिनीचे शिव्याशाप ऐकण्याची हिंमत दाखवली असती. राजघाटावर गांधी स्मारकासमोर काही मिनीटे शांत बसून कोणी गांधीवादी होत नाही की प्रामाणिक होत नाही. मग तो उना येथे जाऊन कुणाचे सांत्वन करू शकणार आहे? आपल्या बेशरमीचे आणखी एक प्रदर्शन, अधिक काहीही नाही. सुवर्ण मंदिरात भांडी घासण्याची नामुष्की त्यातूनच आलेली आहे. कारण तिथे शिखांचा पवित्र स्थानाची अवहेलना झाली, त्याचे प्रायश्चित्त मतातून मोजावे लागण्याचे भय या माणसाला अमृतसरला घेऊन गेले. तो प्रामाणिकपण नव्हता तर मते गमावण्याची अगतिकता त्याचे कारण होती. म्हणून तर तिथे भांडी घासून ओले झालेले हात सुकण्यापुर्वी बेशरमपणे माणूस उना गुजरातला धावला. मोठमोठे मुरब्बी बनेल राजकारणी झक मारले इतके हे नवे गांधीवादी केजरीवाल व त्यांची पिलावळ भामटे आहेत. ज्यांच्यासमोर बेशरमपणाही लाजेने मान खाली घालेल.
भाऊ उकिरडा यांचे घर आहे हे या खांग्रेसचे अनौरस आपत्तय आहेत यांचे कडुन दुसरी काय अपेक्षा?
ReplyDelete