ही झाली एक बाजू. दुसरी बाजू आहे माध्यमांची. या निवडणुकांचे वारे वाहू लागल्यापासून माध्यमांनी कधीच काँग्रेससमोर किती मोठे आव्हान आहे हे सांगण्याचा प्रयत्नही केला नाही. उलट जागावाटप आणि पक्षांतर्गत हाणामा?र्यांना खूप प्रसिद्धी दिली. तेवढेच नाही तर 2007 सालच्या निकालांचे आकडे देऊन दोन्ही काँग्रेस एकत्र लढल्या तर कशी सेना-भाजपाची सत्ता संपुष्टात येईल याचे चित्र रंगवण्याचा उद्योग चालला होता. अशा बेरजा आणि समीकरणे किती व कशी फसवी असतात याची झाडाझडती मी तेव्हाच म्हणजे 15 जानेवारीच्या दै. 'पुण्य नगरी'मधल्या लेखातून घेतली होती. किंबहुना मनसेचा धोका सेनेपेक्षा काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला संभवतो, हे स्पष्ट केलेले होते. आज तेच खरे ठरले आहे. जेव्हा तमाम माध्यमे जागावाटपाचे व त्यातल्या मारामा?र्यांचे रसभरीत वर्णन करत होती तेव्हा मी 'राजकारणातील बदलती समीकरणे' या शीर्षकाचा तो लेख लिहिला होता. तेव्हा कोणी मनसेला हिशोबात घ्यायलाही तयार नव्हते. कारण तो सेनेची मते फोडणारा पक्ष इतकीच जाणकारांची मती कुंठीत झाली होती. समोरचे सत्य बघण्याऐवजी हे शहाणे 2007 च्या निवडणुकीतले काँग्रेस-राष्ट्रवादीचे आकडे जोडण्यात धन्यता मानत होते. त्यांचेही पितळ आता उघडे पडले आहे.
आतासुद्धा वाहिन्यांवर जे विश्लेषण चालले आहे, त्याचा वास्तवाशी संबंध फारसा नाही. कारण तिथे फक्त निवडून आलेल्या जागांचे हिशोब मांडले जात आहेत आणि त्यातून कोणाचा महापौर होईल, कोणाला सत्तेचे गणित जुळवता येईल, अशीच चर्चा चालू आहे. म्हणूनच मनसेने किती जागा जिंकल्या तेवढय़ाच विचारत घेतल्या जात आहेत. मनसे कोणाला पाठिंबा देणार याची भाकिते केली जात आहेत. पण मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे या महानगरांत मनसेने किती मते मिळवली याची कोणाला फिकीर दिसत नाही. याला विश्लेषण म्हणत नाहीत, तर रंगल्या तोंडाचे मुके घेणे म्हणतात किंवा उगवत्या सूर्याला नमस्कार म्हणतात. आपली ताकद ओळखून या निवडणुकीत उतरलेल्या राज ठाकरे यांना कुठेही एकहाती सत्ता मिळण्याची अपेक्षा अजिबात नव्हती. फार तर नाशिकमध्ये बहुमतापर्यंत पोहोचू, अशी अपेक्षा त्यांनी केली असावी. म्हणूनच शेवटच्या क्षणापर्यंत ते शांत होते. निकाल आल्यावरही त्यांची वृत्ती खेळकर होती. आपण पुढल्या लढाईचे मैदान तयार करतो आहोत, याच भावनेने तो तरुण नेता मैदानात होता आणि निकाल त्याच्या एकूण रणनीतीप्रमाणे लागले असल्याने तो खूश दिसत होता. त्याने काय मिळवले हे त्याला पक्के ठाऊक आहे आणि त्याने धूर्तपणे पहिल्या फटक्यात ते माध्यमांना सांगायचे टाळले आहे. दुर्दैव इतकेच की वाहिन्यांवरच्या थोर अभ्यासकांना त्याचा शोध घ्यावा, असेही वाटलेले नाही. राजचे लक्ष्य 2014 आहे. त्या वेळच्या विधानसभा निवडणुकीत मोठे यश मिळवून आपली खरी ताकद दाखवून द्यायची त्याने तयारी चालवली आहे. त्यात आताच्या पालिका निवडणुका रंगीत तालमीसारख्या त्याने वापरल्या आहेत. बाकीचे पक्ष किंवा राजकीय अभ्यासक त्याच्याकडे सेनेतून फुटलेला किंवा उद्धवला धडा शिकवू पाहणारा, रुसलेला भाऊ म्हणून बघत असले तरी राज त्या अवस्थेतून कधीच बाहेर पडला आहे. त्याने गेल्या विधानसभेनंतर महाराष्ट्रात एक सशक्त राजकीय पक्ष म्हणून स्वत:चे अस्तित्व निर्माण करण्याचे पद्धतशीर प्रयत्न चालविले आहेत. त्याला कुठलीही लहान मोठी सत्ता लगेच मिळवण्याची अजितदादांसारखी घाई, उतावळेपणा नाही. किरकोळ सत्तेसाठी कुणाच्या तरी दाढीला हात लावण्यापेक्षा स्वत:ची ताकद निर्माण करून आपल्या आश्रयाला इतर सत्तालोलूप पक्षांनी यावे आणि सत्तेसाठी त्यांना पाठिंबा देताना आपली प्रतिष्ठा वाढवावी, अशी राजची रणनीती आहे. एका बाजूला अशा रीतीने आपली प्रतिमा स्वच्छ ठेवायची आणि दुसरीकडे आपल्या पक्षाचे संघटनात्मक बळ वाढवून स्वबळावर निवडणुका जिंकायची तयारी करायची, अशी त्याची रणनीती आहे. मुंबई, नाशिक, पुणे, ठाणे अशा चार पालिकांतील त्याने एकटय़ाच्या बळावर निवडणुका लढवताना मिळवलेली मते महत्त्वाची आहेत. विशेषत: मुंबईत तोच एक पक्ष सर्व जागा लढवणारा आहे आणि त्याने किती जागा जिंकल्या त्यापेक्षा त्याने सर्व प्रभागांमध्ये मिळवलेल्या मतांची बेरीज महत्त्वाची आहे. ती बहुधा उर्वरित चार प्रमुख पक्षांपेक्षा अधिक असणार आहे. म्हणूनच मनसेच्या जागा महत्त्वाच्या नसून त्याला पडलेल्या एकूण मतांची बेरीज महत्त्वाची आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकांपेक्षा ती जास्त असेल तर कोणाचे मुंबईत बळ वाढते आहे ते लक्षात येऊ शकेल.
सलग निवडणुकांत एकाच चिन्हावर मते देणारा मतदार निष्ठावंत होत जातो. मायावतींनी याचप्रकारे 20 वर्षात उत्तर प्रदेशात बहुमतापर्यंत मजल मारली. 1991 साली 12 आमदारांचा तो पक्ष 2007 सालात स्वबळावर उत्तर प्रदेशात सत्ता का आणू शकला, त्याचा अभ्यासकांनी थोडा अभ्यास केला तरी राज ठाकरेंनी या निवडणुकीत काय मिळवले ते लक्षात येऊ शकेल. आजही मनसे एकखांबी तंबू आहे. त्यांच्याकडे सभा जिंकू शकेल, असा राजच्या तोडीचा दुसरा वक्ता नाही. त्यामुळेच अधिक जागा लढवण्यापेक्षा मर्यादित जागी आपली ताकद केंद्रित करून अधिक प्रभाव पाडण्यावर त्यांचा भर आहे. त्या यशाने इतर भागातले लोक व तरुण प्रभावित झाल्याने नजीकच्या भविष्यात तिकडे मुसंडी मारता येऊ शकते. ते ओळखून मनसेने मुंबई, पुणे, नाशिक एवढय़ाच भागावर लक्ष केंद्रित केले आणि लक्षणीय यश मिळवले आहे.
आज मुंबईत बाजी मारली ती शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांनी. लोक विसरले असतील आणि सेनेचे सेक्युलर विरोधक आणि पत्रकारसुद्धा एक ऐतिहासिक घटना विसरून गेलेले आहेत. नारायण राणे यांनी सेना सोडून काँग्रेस उमेदवार म्हणून मालवण येथून पोटनिवडणूक लढवली तेव्हा त्यांच्या झंझावातासमोर बाळासाहेबांनीदेखील हात टेकले होते. तेव्हा मालवणात कशाबशा घेतलेल्या प्रचारसभेत बाळासाहेबांनी केलेल्या भाषणात आपण पुन्हा मते मागायला येणार नाही, असे सांगितले होते. त्यांनी तो शब्द कालपर्यंत पाळला. मात्र यावेळी ते पुन्हा मैदानात उतरले. हे काम उद्धवला जमणारे नाही, हे ओळखूनच ते रणांगणात उतरले. ठाणे, मुंबई अशा दोन सभा अधिक त्यांनी तीन वाहिन्यांना दीर्घ मुलाखती दिल्या. त्यातून परिस्थिती आटोक्यात येऊ शकली. पण अगदी साहेब मैदानात उतरले तरी राजने आपली छाप या निवडणुकीवर उठवली, हे लक्षात घेण्यासारखे आहे. याचवेळी दोन भावांत स्वतंत्रपणे उभे राहण्याची व नेतृत्व करण्याची क्षमता कोणात आहे, याचेही प्रात्यक्षिक जगाला मिळाले आहे. शिवाय आपण महाराष्ट्राच्या आगामी राजकारणात सर्वात उत्तम तरुण नेते आहोत, याचा साक्षात्कार मराठी माणसाला घडवताना राजने फक्त उद्धवच नव्हे, तर अजितदादा यांनाही मागे टाकले आहे. मुंबई हे महाराष्ट्राचे नाक आहे. तीनशे वर्षापूर्वी पोर्तुगालच्या राजकन्येच्या विवाहात ब्रिटिशांना आंदण दिलेल्या या मुंबई बेटाचा ताबा इथला पोर्तुगीज सेनापती द्यायला तयार नव्हता, त्यावरून युरोपातील त्या दोन देशांमध्ये युद्ध छेडले जाण्याची वेळ आली होती. त्या नकाराचे कारण त्या पोर्तुगीज अधिका?र्याने नेमके दिले होते. आज मुंबई बेट ब्रिटिशांना दिले, तर ते संपूर्ण हिंदुस्थान सहज काबीज करतील, असे त्याचे भाकीत होते. आज इतक्या वर्षानीसुद्धा तेच भाकीत खरे आहे. राजकीय मंचावर दोन भाऊ त्या मुंबईवर ताबा मिळवायची लढाई लढत आहेत. दुसरीकडे राज्याचा शक्तिमान मुख्यमंत्री त्याच लढाईत मुंबईवर कब्जा मिळवण्यासाठी सर्वस्व पणाला लावून पराभूत झाला आहे. आगामी राजकारणात आपण लंबी रेस का घोडा आहोत, हे राजने दाखवून दिले आहे. मात्र या दोन भावांच्या लढाईत अकारण पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारख्या नेमस्त पुढार्याचा नादाला लागून बळी गेला आहे. (संपुर्ण)
भाऊ मनसेला सध्या लागलेली उतरती कळा यावरही तुमच्या दृष्टिकोनातून प्रकाश टाकावा ही विनंती.
ReplyDeleteहो भाऊ,
Deleteतुमच्यासारख्या चाणाक्ष पत्रकााचया द्रुष्टिने मनसेच्षा सद्यस्थितीचं विश्लेषण वाचायला नक्की आवडेल अन्यथा पुरोगामी बाजारबसवे पत्रकार आहेतच। राजला शिव्या द्यायला....
पण भाऊ मनसेला गळती लागलेली आहे याबाबत काय?
Deleteनक्कीच राज यांच्याकडे उद्धव यांच्यापेक्षा प्रचंड क्षमता आहे. पण नको त्या गोष्टीत नको त्या माणसांबरोबर स्पर्धा केल्याने त्यांनी पांडवांप्रमाणे वनवासात जाण्याची वेळ ओढवून घेतली आहे. आणि इथे श्रीकृष्णाचे काम करणारा कोणीच हितचिंतक कींवा मुत्सद्दी पाठीशी उभा नाही. तरी आपण यावर उत्तम लिहू शकता. धन्यवाद.
ReplyDeleteMns kaal aaj ani udya....???
ReplyDelete