Sunday, July 3, 2016

ढाक्याची मलमल‘हे कसले मुस्लिम? रमझानच्या पवित्र महिन्यात नमाज पढायचा असतो आणि हे निरपराधांचे मुडदे पडत आहेत !’

एका धाडसी महिलेचे हे शब्द आहेत. तिचे नाव हसिना वाजेद! आज जागतिक नेत्यांमध्ये त्यांचा समावेश होत नसेल, पण आशियातील सर्वात धाडसी महिला राजकीय नेता, अशीच तिची ओळख करून द्यावी लागेल. कारण जगातल्या दुसर्‍या क्रमांकाची सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेल्या देशाचे नेतृत्व ही महिला करीत असुन अतिशय हिंमतीने तिने आपल्या देशातील जिहादी हिंसाचार मोडण्याचा चंग बांधला आहे. चक्क १९७१ सालच्या बांगला युद्धातील देशद्रोही व दंगलखोरांना फ़ासावर लटकवण्यापासून त्यांची पिलावळ ठेचून काढण्याचा निर्धार ती महिला कृतीतून व्यक्त करीत आहेत. म्हणूनच तिच्या शब्दांना महत्व आहे. अर्थात ज्याचे जळते त्यालाच कळते, ह्या अनुभवातून गेल्या असल्याने हसिना वाजेद इतक्या खंबीर भूमिका घेऊ शकतात. नुसत्या अनुभवाची गोष्ट नाही, या आपल्या जगण्याशी आणि बोलण्याशीही प्रामाणिक आहेत. कारण निव्वळ इश्वरीकृपा म्हणूनच त्या जिहादी मृत्यूच्या जबड्यातून बवाचलेल्या आहेत. १९७१ सालात पाकिस्तान विरोधात बांगला भाषिकांनी बंड पुकारले, त्याचे नेतृत्व हसिनाच्या पित्याने केले होते आणि त्यात स्वकियांशी गद्दारी करणार्‍यांनीच मग दबा धरून १९७५ सालात वंगबंधू शेख मुजीबूर रहमान यांच्या खानदानाचा नि:पात केला होता. कुटुंबातल्या एकेकाला ठार मारणार्‍यांच्या हातून सुखरूप सुटलेल्या हसिना वाजेद तेव्हा मायदेशी नव्हत्या, तर अतीदूर ब्रिटनमध्ये होत्या, म्हणून बचावल्या. जिहादी मानसिकतेच्या सैतानाच्या तावडीतून सुटण्याची जणू परतफ़ेड ही महिला करते आहे. म्हणूनच त्यांनी सत्ता हाती आल्यावर बांगला देशातील जिहादी मानसिकतेच्या मुळावर घाव घालणारी पावले उचलली. आज त्या ‘हे कसले मुस्लिम’ म्हणतात, त्याला म्हणूनच महत्व आहे. कारण तेच सत्य बोलण्याची हिंमत आज जगातल्या कुठल्याही नेत्यामध्ये उरलेली नाही.

भारतातल्या नेत्यांना काश्मिरातील हिंदूंना परागंदा व्हावे लागले, त्याचे सत्य बोलायची हिंमत नाही. अमेरिकेला मायभूमीवर हल्ला होऊन इस्लामी दहशतवादावर खडेबोल ऐकवण्याचे साहस नाही. युरोप तर मुस्लिम दहशतवादाचा कधीच गुलाम झाला आहे. अशा कालखंडात दहशतवाद म्हणून ज्या जिहादी मानसिकतेवर पांघरूण घालण्याचे उद्योग चालतात, ते झुगारण्याची हिंमत खुप मोठी असते. दहशतवादाला धर्म नसतो, ही पोपटपंची सोडून हसिना म्हणतात, हे कसले मुस्लिम? त्याचा अर्थ इतकाच, की जे काही ढाक्यामध्ये घडले वा घडवले गेले, त्यामागे निश्चीतपणे मुस्लिम धर्मांधतेची प्रेरणा आहे. हे त्यांनी ठामपणे बोलून दाखवले आहे. त्यात इसिसचा हात आहे, की स्थानिक हुजी वा पाक तोयबांचा हस्तक्षेप आहे, त्याचा तपास करण्याची हसिना बेगमना गरज वाटलेली नाही. आज जगभर जे काही असे हिंसक हल्ले व घातपात होत आहेत, त्यात अपवाद केल्यास प्रत्येक हिंसाचारात मुस्लिम गुंतला आहे. हे निव्वळ वास्तव आहे. पण ते बोलायचे धाडसही कोणा जागतिक नेत्यामध्ये उरलेले नाही. मग तपास चालू आहे. इसिसचा हात असावा किंवा अल कायदाशी संबंध आहे काय? अशा वायफ़ळ चर्चा चालतात. पण जे आहे आणि समोर धडधडीत दिसते आहे, तेच बोलायची कुणामध्ये हिंमत नाही. मग नवर्‍याचे नाव घेऊ नये म्हणून उखाण्यात बोलावे, तसे जगभरचे नेते बोलत असतात. हसिना यांनी तशी कुठलीही पळवाट शोधली नाही, तर सरळसरळ हा हल्ला मुस्लिमांनीच केला आहे, असा स्पष्ट आरोप केला आहे. हे इस्लामच्या नावाने जे काही करीत आहेत, तो धर्म नव्हे आणि म्हणूनच हे कसले मुस्लिम, असा सवाल हसिनांनी केला आहे. पण करणारे मुस्लिम आहेत आणि त्यांनी धर्माच्याच नावाखाली असा हिंसाचार केलेला आहे, असे विनाविलंब स्पष्ट करायला त्या कचरलेल्या नाहीत. म्हणून त्या अभिनंदनास पात्र आहेत.

जगाच्या कुठल्याही देशात वा शहरात सतत होणार्‍या हल्ले व घातपातामध्ये मुस्लिमांचा समावेश आहे. अधिक त्यांनी सतत धर्माच्याच नावाने हिंसा केलेली आहे. पण ते कोणी मान्य करणार नसेल, तर त्या संकटाचा बंदोबस्त व्हायचा कसा? बेल्जम, फ़्रान्स वा ब्रिटीश युरोपियन देशात जे घातपात झालेत, त्यात तिथेच जन्मलेले काही मुस्लिम कारण झाले आहेत आणि त्यांनी धर्माचाच जयजयकार करीत तशा घटना घडवल्या आहेत. मग त्याच्याशी धर्माचा संबंध नाही, असा युक्तीवाद लपवाछपवी नाही काय? धर्माचा काही लोकांनी गैरवापर चालविला आहे. किंवा धर्माचा गैरलागू अर्थ लावून हिंसाचार चालू आहे, असे म्हणणे नाकारता येणार नाही. पण धर्माचा संबंध नाही, ही शुद्ध फ़सवणूक आहे. धर्माचा म्हणजे इस्लामचा जिहादशी संबंध आहे आणि छातीठोकपणे त्यात गुंतलेले त्याचा हवाला देत असतात. अशावेळी मुस्लिम समाजाच्या मनात त्यांनी जो गोंधळ माजवलेला असतो, त्यापासून बहुसंख्य मुस्लिमांना वेगळे काढायला हवे. त्यासाठी त्यांच्या धर्माचा कसा गैरलागू कृत्यांशी संबंध जोडला जातो, याविषयी संताप निर्माण करण्याची गरज आहे. पण धर्माचा संबंध नाही, म्हटले की सामान्य मुस्लिमाचीही दिशाभूल होते. उलट हिंसा करणारे धर्माची काही शिकवण व धर्मग्रंथाचे काही उतारे देऊन आपले कृत्य पवित्र असल्याचे लोकांसमोर मांडतात आणि त्यालाच सामान्य मुस्लिम मान डोलावत असतो. त्यातून ही भयंकर स्थिती निर्माण झाली आहे. म्हणून अशा हिंसक जिहादी मानसिकतेपासून सामान्य मुस्लिमाला बाजूला करताना, त्याचा धर्म अशा कृत्यातून विटाळला जातोय, हे पटवून देण्याची गरज आहे. जे काम कुणीही पुरोगामी वा विचारवंत नेताही करायला धजावत नाही. हसिना वाजेद यांनी तेच धाडसी पाऊल उचलले आहे. म्हणूनच त्यांचे कौतुक होण्याची गरज आहे.

‘हे कसले मुस्लिम?’ असे हसिना म्हणतात, तेव्हा अशा मुस्लिमांची वा ते मुस्लिम असण्याची आपल्या शरम वाटते, असेच सुचवित असतात. आपणच नव्हेतर कुणाही मुस्लिमाला अशा कृत्याची शरम वाटली पाहिजे. जे कोणी असे कृत्य इस्लामच्या नावाने करतात, त्याचा प्रत्येक मुस्लिमाला संताप आला पाहिजे, असेच हसिना वाजेद स्पष्टोक्तीतून सांगत आहेत. जे कोणी प्रामाणिकपणे इस्लामचे आचरण करतात, त्यांना तर अशा कृत्याची खास लाज वाटायला हवी. कारण रमजानच्या पवित्र महिन्यात युद्ध वा हिंसा टाळण्याचा उपदेश धर्मग्रंथानेच केलेला आहे. म्हणूनच त्याच महिन्यात अल्लाची प्रार्थना करण्याऐवजी त्याच्याच आज्ञा झुगारून हत्याकांड करतात, ‘ते कसले मुस्लिम’, असा सवाल त्यांनी केला आहे. खरे तर आजवर अनेकदा अशा घटना ऐन रमझान वा तत्सम कालखंडात घडलेल्या आहेत. तेव्हा कोणीही जागतिक वा कुठलाही राष्ट्रीय नेता असा सवाल करू शकला असता. पण कोणीही तितका ‘पुरूषार्थ’ दाखवलेला नाही. उलट घडलेल्या हिंसेशी धर्माचा संबंध नाही, किंवा दहशतवादाला धर्म नसतो, अशीच पोपटपंची केलेली होती. अशा सर्व जागतिक नेत्यांचे हसिनांनी अवघ्या तीन शब्दांतून वस्त्रहरण केलेले आहे. अवघ्या जगातले राजकीय अभ्यासक यात धर्माचा संबंध नसल्याचे सांगत आपली पुरोगामी ‘मळमळ’ व्यक्त करत असताना, या महिलेने इतिहासजमा झालेली ढाक्याची मलमल नव्याने जगाला दाखवली आहे. अतिशय तलम अशा धागा व त्यापासून विणलेल्या वस्त्राला ‘ढाक्याची मलमल’ म्हणून जग ओळखायचे. तितके तलम व पारदर्शक सत्य उघड बोलण्याचे धाडस दाखवणार्‍या या महिलेला म्हणूनच त्रिवार प्रणिपात करायला हवा. जिहादची पुरोगामी मळमळ ऐकून कंटाळलेल्या कानांना हसिनाची ढाक्याची मलमल कमालीचा सुखद धक्का देणारीच आहे. त्यातून जगातले नेते काही शिकू शकले तर!

1 comment: