दिल्लीच्या पाठोपाठ मुंबईत म्हणजे महाराष्ट्र सरकारमध्येही मंत्रिमंडळ विस्तार झाला. त्याबद्दल मित्रपक्षात धुसफ़ुस चालू आहे. पण एकदिलाने भाजपाचे मंत्री काम करतात काय? अजून सत्तास्थापनेला दोन वर्षे पुर्ण होत नाहीत, तर विसंवादाचे धुमारे फ़ुटू लागलेले आहेत. आधी ज्येष्ठ नेते व मंत्री एकनाथराव खडसे यांना बाहेरचा रस्ता दाखवावा लागला. आता अन्य दोन मंत्री नाराज असल्याचे बोलले जात आहे. त्यात शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि ग्रामिणविकास मंत्री पंकजा मुंडे यांची नावे आहेत. मंत्रिमंडळ विस्तारानंतर जे खातेपालट किंवा खातेवाटप झाले, त्यातून ही धुसफ़ुस सुरू झाल्याच्या बातम्या आहेत. कोणाला त्याची जागा मुख्यमंत्र्यांनी दाखवून दिली, असली भाषा वर्तमानपत्रात असतेच. त्यखेरीज बातमी खुसखुशीत होत नसते. पण अशा बातम्यांना दुजोरा देणारे आवाज पक्षाच्या आतल्या गोटातून येऊ लागले, की अशा बेबनावात तथ्य असल्याचे लक्षात येऊ लागते. पंकजा मुंडे यांच्याकडून जलसंधारण खाते काढून घेण्यात आल्याच्या बातम्या होत्या. त्याच दरम्यान त्यांना सिंगापूर येथे जागतिक जलपरिषदेला उपस्थित रहायचे होते. कारण महाराष्ट्रात त्या जलविषयक खात्याच्या मंत्री होत्या. दोन दिवसानंतर आपण जल परिषदेला जाणार हे पंकजाताईंना ठाऊक नव्हते, की त्यांच्याकडून तेच खाते काढून घेतले जाणार याची त्यांना कल्पना नव्हती? ती असती तर त्यांनी शपथविधी व खातेवाटप होतानाच सिंगापूरचा विषय मुख्यमंत्र्याच्या कानी घातला असता. पण तसे न करता त्या सिंगापूरच्या तयारीत गुंतल्या आणि इकडे त्यांचे खातेच काढून घेण्यात आले. त्यामुळे आता कुठल्या अधिकारात सिंगापूर परिषदेला हजर रहावे, तेच पांकजाताईला उमजेना. सहाजिकच त्यांनी ट्वीटरच्या माध्यमातून जनतेकडेच मार्गदर्शनाची मागणी केली. मात्र जनतेच्या वतीने ट्वीटरवरून मुख्यमंत्र्यांनीच त्यांचे शंकानिरसन केले.
कुठल्याही सरकारचा कारभार असा चालतो काय? मंत्रिमंडळातले दोन नेते अशा रितीने जाहिरपणे कारभाराची सल्लामालत करीत असतात काय? मुख्यमंत्र्यांचे अधिकार कोणते आणि मंत्र्याचे कर्तव्य कोणते, याविषयी अशी खुलेआम चर्चा सत्तेतल्या नेत्यांची होत असेल, तर ते घटनात्मक किंवा शिष्टसंमत किती आहे? पंकजा वा देवेंद्र हे आता फ़क्त भाजपा कोअर कमिटीचे सदस्य नाहीत. घटनात्मक मार्गाने स्थापन झालेल्या महाराष्ट्र सरकारचे मंत्री मुख्यमंत्री आहेत. त्यांनी शासनाचा कारभार कसा असतो व कसा चालवावा, याची चर्चा सोशल मीडियातून करावी काय? आपण एका खात्याच्या मंत्री म्हणून परदेशी जात असताना त्याचा हेतू वा उपयोग याची चर्चा अशी जहिररित्या करणे कितपत शिष्टाचाराला धरून आहे? पण पंकजाताईंनी तो उद्योग केला. आपल्याला मंत्री म्हणून असलेल्या अधिकाराविषयी त्यांनी उघड अज्ञान प्रदर्शित करण्यात धन्यता मानलेली आहे. पण त्याचा आणखी एक अर्थ असा, की त्याखेरीज त्यांच्यासमोर पर्याय नसल्याची जाहिर बातमी त्यांनी जगाला दिलेली आहे. ज्या हेतूने परदेशी जायचे त्यात खात्याचा व सरकारचा कसा संबंध आहे, त्याचा पंकजाताई साधासरळ फ़ोन करून मुख्यमंत्र्यांकडे खुलासा मागू शकत होत्या. त्यांना त्यात कोणी अडवू शकले नसते. कारण त्या देवेंद्र सरकारच्या ज्येष्ठ मंत्री आहेत. पण त्याच दोघांमध्ये फ़ोनवर किंवा आमनेसामने थेट बोलण्या इतकाही संपर्क उरलेला नाही, असेच त्यांनी जगजाहिर केलेले नाही काय? ही बाब सोशल मीडियातून चर्चा करण्याइतकी फ़ालतू नाही. दोन मंत्री वा नेत्यांमध्ये बेबनाव व भांडण असू शकते. आजवर विविध पक्षांच्या अनेक नेत्यांमध्ये इतक्या टोकाची भांडणे राहिलेली आहेत. पण जाहिर व्यासपीठावर त्याची कोणी वाच्यता केली नाही, की प्रदर्शन मांडलेले नाही. ट्वीटरच्या माध्यमातून या दोन नेत्यांनी त्याचा गवगवा केलेला आहे.
आपल्या मंत्रिमंडळात कोणाला घ्यावे किंवा वगळावे, हा मुख्यमंत्र्याचा विशेषाधिकार आहे. कोणी मंत्री सहकारी कुठलेही खाते मंत्रालय मिळण्यासाठी आग्रही असू शकत नाही. तेव्हा पंकजाताईंचे खाते फ़डणवीसांनी बदलले असेल वा अन्य कुणाला दिले असेल, तर त्यात आक्षेपार्ह असे काहीच नाही. पण असे बदल समोरच्या सहकार्याला विश्वासात घेऊन केले जातात, अशी समजूत आहे. त्यामुळेच पंजकाताईचे खाते बदलायचे असेल तर मुख्यमंत्र्यांनी तत्संबंधी त्यांना आधीच कल्पना दिलेली असणार, हे गृहीत होते. असायलाही हवे. तसे नसेल तरी परस्पर त्याविषयी जगजाहिर बोलण्याचे कारण नाही. स्मृती इराणी यांना कसे मनुष्यबळ विकास खात्यातून हटवले, याची खुप चर्चा झाली. पण ती हसतहसत उडवून देत स्मृतीने सारवासारव केली, हे आपण अलिकडेच बघितले आहे. त्या पार्श्वभूमीवर पंकजाताईंचे ट्वीटर प्रदर्शन खटकणारे आहे. त्याहीपेक्षा त्यांना फ़ोन करून कान टोचण्यापेक्षा ट्वीटरच्याच माध्यमातून फ़डणवीसांनी दिलेले उत्तर थक्क करणारे आहे. दोन नेत्यांमध्येच नव्हेतर एकूणच देवेंद्र सरकारमध्ये किती बेबनाव विसंवाद आहे, त्याचे हे प्रदर्शन आहे. एकीकडे शिवसेनेशी मुख्यमंत्री लढत आहेत आणि दुसरीकडे त्यांचाच पक्ष त्यांच्या पाठीशी एकदिलाने उभा नाही, इतकेच यातून स्पष्ट होते. तसे नसते तर मुख्यमंत्र्यांनी ट्वीटरवर खुलासा करण्यापेक्षा फ़ोनवरून खुलासा केला असता. पण त्यांनीही ट्वीटरच्या माध्यमातून उत्तर देताना जणू पंकजाताईला तिची ‘जागा’ दाखवून देण्याचा प्रयत्न केला, असेही म्हणता येऊ शकते. इथे आणखी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. पंकजाताई वयाने कितीही लहान असो, त्या व्यवहारात मोठ्या नेता आहेत. पित्याच्या निधनानंतर त्यांचा महाराष्ट्र भाजपाच्या कोअर कमिटीत समावेश झालेला होता. त्यातले नाथाभाऊ खडसे कधीच बाजूला फ़ेकले गेले आहेत. राहिलेत कोण?
मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस यांच्याखेरीज पंकजाताई, विनोद तावडे, नाथभाऊ खडसे व आशिष शेलार अशी ही कमिटी होती. त्यातले खडसे बाजूला फ़ेकले गेलेत आणि आता तावडे-मुंडे नाराज आहेत. मग राहिले कोण? देवेंद्र आणि आशिष शेलार? तावडे-मुंडे नाराज असतील, तर त्यांनाही सरकार म्हणून पक्षात काय चालले आहे, त्याचा पत्ता नसावा. खडसेंचा पत्ता आधीच काटलेला आहे. मग हे निर्णय घेतो कोण? शेलार-फ़डणवीस? तावडे-मुंडे यांना आपलीच खाती जाणार वा बदलणार हे ठाऊक नसेल, तर अन्य कोणाला ठाऊक होते? कोण महाराष्ट्रातील भाजपाचे निर्णय घेतो आहे? कोणीही घ्यावेत. पण निदान पक्षातली दुफ़ळी अशी जाहिरपणे चव्हाट्यावर आणू नये, इतकीच लोकशाहीची अपेक्षा असते. कारभार पारदर्शक असावा यात शंका नाही. पण पारदर्शक असलेली वस्त्रेही काही भागी गडद अस्तर लावून झाकलेली असतात. कारण काही गोष्टी पारदर्शकतेपासून जपाव्या लागतात. त्याला अब्रु म्हणतात. कुठल्याही सरकार वा संघटनेचे अंतर्गत धोरण निर्णय वा भूमिका ह्या ट्वीटर आदी जाहिर व्यासपीठावरील चर्चेतून निश्चीत होत नाहीत. याचे तरी भान राखले गेले पाहिजे. भाजपातल्या हाणामार्या किंवा सरकारमधला बेबनाव गैरलागू नाही. अन्य कुठल्याही पक्षात तेच चालू असते. पण ‘देवेंद्र बच्चा आहे’, असे पत्रकारांना सांगणारा ज्येष्ठ नेता किंवा सोशल मिडीयातून नाराजी व्यक्त करणारे मंत्री, सहसा कुठल्याही पक्ष सरकारात असत नाहीत. जेव्हा असली बाष्कळ बडबड शेलार यांना करू दिली जाते, तेव्हा पंकजाला रोखण्याचे स्मरण उरत नाही आणि मुख्यमंत्रीही त्यात वहावत जाणे स्वाभाविक असते. आज सत्ता हाती असल्याने त्यावरही पडदा पाडला जाईल आणि पारदर्शकतेचा टेंभाही मिरवला जाऊ शकतो. पण सामान्य जनता म्हणजे मतदार दर पाच वर्षांनी अशा अनेक गोष्टींची झाडाझडती घेत असतो, हे विसरून टिकता येत नाही.
शाळेत असताना शिकलेल्या कवितेची ओळ सहज आठवली ती अशी :
ReplyDeleteSmall birds twitter
वर्डस्वर्थ च्या कवितेतली ही ओळ आहे . सगळे कडवे काहींना स्मरत असेल .
The cock is crowing
The stream is flowing
The small birds twitter
The lake doth glitter
कवितेचे शीर्षक ,Written In March ' असे आहे . माझ्या खाजगी स्मृतीत मी नाव बदलले :: Remembered In July . आणि Only the small birds twitter अशी सुधारणाही केली .
छान भाऊ
ReplyDelete