Wednesday, July 6, 2016

राक्षस, बाटली आणि महापालिका (पुर्वार्ध)



प्रतीक्षा संपली आणि शुक्रवारी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल लागले आहेत. त्यात सर्वाचे लक्ष ज्या मुंबई महापालिका निवडणुकीकडे लागले होते तिथे पुन्हा एकदा शिवसेनेने आपला भगवा फडकावला आहे. त्याचे श्रेय कुणाला, यावर शुक्रवारी दुपारपासूनच वाहिन्यांवर चर्चा रंगली होती. त्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतील भांडणापासून उद्धव ठाकरे यांच्या सर्व गोष्टींचे कौतुक चालले होते. पण कोणालाही या भगव्या यशाच्या खर्‍या मानकर्‍याची आठवण राहिली नाही, हे पाहून मला तरी फार दु:ख झाले. मुंबईतील सेनेच्या यशाचा खरा मानकरी राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हेच आहेत. त्यांच्या एका वाक्याने जी मदत शिवसेनेला केली तेवढी कोणी केली नव्हती. निवडणूक प्रचार अखेरच्या टप्प्यात आला असताना काँग्रेसचे प्रमुख प्रचारक म्हणून पृथ्वीराज चव्हाण मैदानात उतरले आणि त्यांनी कारण नसताना सेनेवर तोफ डागण्याचा आव आणला, तोच काँग्रेसला महागात पडला. कारण आधीच मरगळलेल्या शिवसेनेला आणि तिच्या निराश सहानुभूतीदाराला त्या एका डिवचणा?र्‍या वाक्याने नवी ऊर्जा दिली. खरे सांगायचे तर त्याच एका वाक्याने मुंबईच्या निवडणूक प्रचाराला अखेरच्या टप्प्यात जोश आणला आणि निर्णायक वळण दिले. काय म्हणाले होते पृथ्वीराज चव्हाण?

'शिवसेनेला मुंबई पालिकेतून मिळणारी रसद तोडायची आहे. आम्ही ते काम करणार आहोत. या निवडणुकीनंतर सेनेचे मुंबईत नामोनिशाण शिल्लक उरणार नाही.'

कायम दिल्लीत राहिलेले आणि महाराष्ट्राच्या प्रादेशिक राजकारणाचा गंधही नसलेल्या चव्हाणांना इथल्या मराठी माणसाच्या भावनांचा थांगपत्ता नाही, म्हणूनच ते असे बोलू शकले. कुठलाही राजकीय नेता किंवा कार्यकर्ता, मग तो कुठल्याही पक्षातला असो किंवा मतदार असो, तो मराठी असेल तर असे बोलायला धजावणार नाही. अगदी शरद पवार यांच्यासारखा नेतासुद्धा असे कधी बोललेला नाही. त्याचे कारण राजकीयच आहे. 105 हुतात्मे देऊन मुंबई मिळवणा?र्‍या मराठी माणसाच्या भावना मुंबई इतक्याच शिवसेनेशी जुळलेल्या आहेत. सतत मुंबईत येणा?र्‍या बाहेरच्या परप्रांतीय लोंढय़ांबद्दल इतर पक्षांतले मराठी नेते बोलत नसले तरी त्याच कारणास्तव त्यांना ठाकरे बोलतात, त्याबद्दल सहानुभूती असते. तेच मुंबईतल्या मराठी माणसाचे आहे. त्यामुळेच मराठी म्हणजेच शिवसेना आणि शिवसेना म्हणजेच ठाकरे, असे समीकरण तयार झालेले आहे. साहजिकच सेना संपवणे म्हणजे मुंबईतील ठाकरे यांचा आवाज संपवणे. पर्यायाने मराठी माणूस संपवणे, असा लावला जात असतो. जेव्हा अशी भीती निर्माण केली जाते किंवा संभ्रम निर्माण केला जातो, तेव्हा शिवसेनेच्या पाठीशी तमाम मराठी जनता एकदिलाने उभी राहते, असा इतिहास आहे. 1985 पासूनचे आकडे त्याची साक्ष देतात. याची गंधवार्ता नसलेले मुख्यमंत्री कॉंग्रेसचे स्टार प्रचारक म्हणून मुंबईत उतरले तेव्हाच सेनेच्या यशाची खूणगाठ बांधली गेली होती.

चव्हाण यांनी असे बोलण्याचे काही प्रयोजन नव्हते. अगदी लोकशाहीत कुठलाही पक्ष अशी भाषा वापरत नाही. सेनेला पराभूत करण्याची भाषा समजू शकते. पण नामशेष करण्याची भाषा? त्या एका वाक्याने मराठी मतदाराला खडबडून जागे केले. हेच 1985 साली झाले होते. विधान परिषदेत महाडिक व नवलकर या सेनेच्या दोन आमदारांनी, मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव काय, असा प्रश्न विचारला होता, तर मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी ते सहन केले जाणार नाही, असे बाणेदार उत्तर दिले होते. तेव्हा त्यांना मुंबईवर सत्ता गाजवू बघणा?र्‍या मुरली देवरा यांच्या आगाऊपणाला शह द्यायचा होता आणि झालेही तसेच. तोच मुद्दा सेनेने उचलला. 'मराठी माणसा जागा हो' अशी गर्जना सेनेने तेव्हा केली होती. परिणामी याच प्रकारे तेव्हा काँग्रेसचा धुव्वा उडाला होता. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत मुंबईत जबरदस्त यश मिळवणा?र्‍या काँग्रेसला सेनेने एकाकी लढत देऊन धूळ चारली होती. म्हणूनच मुंबई हा मराठी माणसाचा जिव्हाळ्याचा विषय आहे, याचे भान सर्व पक्षांचे नेते ठेवतात. त्याच वेळी बाळासाहेब ठाकरे आणि सेनेला त्या मराठीपणाचे प्रतीक मानले जाते. त्या दुख?र्‍या बाजूला हात न लावता इथले राजकारण करावे लागते. पण कायम दिल्लीच्या राजकारणात राहिलेल्या मुख्यमंर्त्यांना त्याबद्दल काहीही ठाऊक नसावे. अन्यथा त्यांच्यासारख्या नेमस्त पुढा?र्‍याकडून अशी चूक झालीच नसती.

तसे पाहिल्यास लोकसभा, विधानसभा निवडणुकीतल्या पराभवाने सेना खचली होती. शिवाय मनसे व राज ठाकरे यांच्या आक्रमक पविर्त्याने सेनेच्या नेत्यांसमोर नवे आव्हान उभे केले होते. त्याचा फायदा मागच्या दोन निवडणुकांत काँग्रेसला झाला होता. त्याचेही भान काँग्रेसला उरलेले दिसले नाही. आधीचे यश पक्षाच्या संघटनेचे नव्हे, तर सेनेच्या विभागलेल्या मतांमुळे म्ळिालेले होते. त्याला मनसे जबाबदार होती. हे खरे असले तरी त्यावरच जगायचा आणि जिंकायचा मनसुबा राखणे ही आत्महत्या होती. कारण त्याला आता दोन अडीच वर्षाचा काळ उलटून गेला आहे. दरम्यान, कल्याण-डोंबिवली पालिकेच्या निवडणुका झाल्या होत्या. त्यातून नवा मतप्रवाह समोर आलेला होता. तिथे यश मिळवताना मनसेने सेना नव्हे, तर राष्ट्रवादी व भाजपाचे बालेकिल्ले उद्ध्वस्त केले होते. म्हणजेच मनसे आता आपले स्वतंत्र स्थान निर्माण करते आहे आणि तसे करताना आपल्या मातृपक्षाप्रमाणेच इतर पक्षांची मते खाते आहे, हे उघडपणे दिसून आले होते. तिथे भाजपा राष्ट्रवादीची मते घेतली, कारण तिथे तेच प्रभावी पक्ष होते. मुंबईत ती पाळी कॉंग्रेसवर येऊ शकते, हे आधीच ओळखायला हवे होते. ते कृपाप्रसादानेच पक्षनेतृत्व मिळवलेल्यांना कसे कळावे?

मुंबईत काँग्रेस नेहमी अमराठी माणसांच्या बाजूने उभी राहते हा सेनेचा 45 वर्षे जुना आरोप आहे. 1968 साली पहिल्यांदा पालिका निवडणूक लढवतानादेखील सेनेने तत्कालीन मुंबई काँग्रेस अध्यक्ष हफिजका यांच्यावरच तोफा डागल्या होत्या. आज उघडपणे कृपाशंकर सेनेवर हल्ला करत असतील तर त्यांच्या तोडक्या मोडक्या मराठी बोलण्याने फरक पडणार नव्हता. उलट त्यांच्या नादाला मुख्यमंत्री लागले तिथेच सेनेचे काम सोपे होऊन गेले होते. त्यांनीच चव्हाण यांना तोंडघशी पाडले, असे आता म्हणायला हरकत नसावी. कारण याच माणसाने नुसती सेनेला संपवण्याची भाषा केली नाही, तर काँग्रेस पक्षातील मराठी माणसांना पक्षविरोधी बंड करण्याची पाळीसुद्धा आणली. त्याचा एकत्रित परिणाम मराठी मतांवर झाला. निवडून आलेल्या जागा पाहिल्या तरी त्याची साक्ष मिळते. मनसेने सेनेच्या जागा जिंकल्या आहेत, तर सेनेला आपल्या जागा टिकवण्यासाठी काँग्रेसच्या जागा घ्याव्या लागल्या आहेत. म्हणजेच काँग्रेस नेतृत्वानेच सेनेचे काम सोपे केले आहे.  (अपुर्ण)

3 comments:

  1. भाऊ, कृपाशंकर आणि सेना यांच्या अनैतिक संबंधावर प्रकाश पडला पाहीजे...

    ReplyDelete
  2. Shelar retaliates without effect. If any, its adverse.

    ReplyDelete