Tuesday, July 12, 2016

झाकीर नाईक आगे बढो!मालेगाव स्फ़ोट किंवा तत्सम काही घडले, मग समातनच्या मागे हात धुवून लागणार्‍यांचे मौन सध्या अनेकांना खटकते आहे. त्याला एकच कारण आहे, ते म्हणजे असे ज्यांना खटकते ते बुद्धीमंत नाहीत. बुद्धीजिवी वर्गातून तुम्ही आलेले असलात, मग तुम्हाला असले प्रश्न पडत नसतात. सत्याला पारखे झाले, मग बुद्धीजिवी तयार होत असतो. म्हणूनच पानसरे दाभोळकरांच्या हत्या झाल्यावर तात्काळ सनातनवर बंदी घालण्याचा गदारोळ करणार्‍यांना, ढाक्यातील हत्याकांड किंवा काश्मिरात आगडोंब उसळल्यानंतर गाढ झोप लागलेली असते. काही वर्षापुर्वी तात्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी आपल्या निद्रानाशाचे केलेले निदान कुणाला आठवते? ग्लासगो या स्कॉटलंडच्या विमानतळावर एका मुस्लिम तरूणाने स्फ़ोटकांनी भरलेली जिप नेऊन आदळण्याचा प्रयास केला होता? त्यानंतर जगभर हाहा:कार माजला आणि त्याचे धागेदोरे शोधताना तो भारतीय असल्याचे निष्पन्न झाले होते. मात्र त्यामुळे सिंग यांची झोप उडालेली नव्हती. त्याच संदर्भात ऑस्ट्रेलियाच्या विमानतळावरून मायदेशी हैद्राबादला निघालेल्या एका भारतीय मुस्लिम तरूण डॉक्टरला तिथल्या पोलिसांनी संशयित म्हणून ताब्यात घेतले होते. त्याचा ग्लासगोच्या घातपाताशी संबंध असल्याचा संशय होता. त्या अटकेने भारतीय पंतप्रधानांना निद्रानाशाचा विकार जडला होता. आपण रात्रभर झोपलो नाही, असे त्यांनी जाहिरपणे सांगितले होते. पण भारतीय सीमारेषेवरून एका जवानाचे मुंडके कापून नेल्यावर सिंग गाढ झोपी गेलेले होते. त्याबद्दल अवाक्षर बोलण्याची त्यांना गरज वाटलेली नव्हती. असे मनमोहन सिंग बुद्धीजिवी वर्गात मोजले जातात. त्यामुळे केव्हा गाढ झोपावे आणि केव्हा निद्रानाशाची बोंब ठोकावी, यावे काही पुरोगामी बुद्धिजिवी ठोकताळे निकष आहेत. आज झाकीर नाईक अथवा काश्मिरात काही भयंकर घडले असेल, तर निर्धास्त झोपण्याची वेळ नाही काय?

झाकीर नाईक यांनी आपल्या प्रवचनातून अनेकांना भारावून टाकलेले आहे. त्यातून अनेकजण अवघ्या जगावर इस्लामचा झेंडा फ़डकावण्यासाठी प्रवृत्त झाले, तर गडबडून जाण्याचे काहीही कारण नाही. कारण जगाला जिहादचा किंवा हिंसाचारी हत्याकांडाचा धोका अजिबात नसून, पुरोगामी कल्पनेतील हिंदुत्वाचा भयंकर धोका आहे. काश्मिर वा नाईक यांच्या उद्योगांत कुठे हिंदूत्वाचा उल्लेखही नसेल, तर बुद्धिजिवी वर्गाने चिंताक्रांत होण्याचे काय कारण उरते? पण कन्हैया किंवा उमर खालीदने भारताचे तुकडे करण्याच्या घोषणा दिल्यावर त्यांना अटक झाली; तर चिंतेचा विषय असतो. देश शिल्लक उरला नाही तरी बेहतर; पण देशात अविष्कार स्वातंत्र्य अबाधित राहिले पाहिजे. पण देशच नसेल तर तिथल्या कुठल्याही स्वातंत्र्याची कल्पनाच हास्यास्पद नाही काय? असे काही बाष्कळ प्रश्न ज्यांना पडतात, त्यांना निर्बुद्ध म्हटले जाते. कारण त्यांना बुद्धीच्या कल्पनेची भरारीच कधी मारता आलेली नसते. मग त्यांनी भारतीय पुरोगामी बुद्धिजिवी वर्गाचे आज मौन कशाला, असला पोरकट प्रश्न विचारणे ग्राह्य धरायला नको काय? उलट आज तोच पुरोगामी विचारवंत झाकीर नाईक यांच्या खुल्या समर्थनाला पुढे कशाला आलेला नाही, असा प्रश्न विचारला पाहिजे. ज्यांनी भारताचे तुकडे करण्याला विचार स्वातंत्र्यन मानलेले आहे, त्यांनी नाईकची वकिली करणेच भाग नाही काय? थोडी कळ काढा! लौकरच अनेक पुरोगामी संस्था व पुरस्कार वापसीचे म्होरके त्यासाठी मैदानात येतील. झाकीर नाईक आगे बढो, हम तुम्हारे साथ है; अशा घोषणा देत समोर येऊन तुमची तोंडे बंद पाडतील. कारण काश्मिरात माणसे मेली वा मारली गेल्याने काही बिघडत नाही. हिंदूत्व नावाचा काल्पनिक धोका मात्र संभवता कामा नये. देशाला त्या भुताटकीपासून सुरक्षित राखण्याची गरज आहे, हे पुरोगामी ब्रिद आहे.

कुणाही माणसाला दोन गोष्टी प्रेरीत करीत असतात. प्रेम किंवा द्वेष! प्रेमाच्या आहारी गेलेला माणूस वाटेल त्या थराला जाऊन वागतो, तसाच द्वेषाने भारावलेला माणूस कुठल्याही थराला जाऊ शकतो. पुरोगामी असणे हे द्वेषावर आधारीत असेल, तर तसेच वागण्याला पर्याय नाही. जसा कुणी जिहादी धर्माच्या अतिप्रेमाने सरळ मृत्युला कवटाळण्यास प्रवृत्त झालेला असतो, तसा भारतीय पुरोगामी हिंदू शब्दाच्या द्वेषाच्या आहारी जाऊन काहीही करायला मागेपुढे बघत नसतो. त्यामुळेच झाकीर नाईक किंवा काश्मिरातील हल्लेखोर हे हिंदूत्वाच्या विरुद्ध असतील, तर आपोआपच पुरोगामी ठरतात ना? सहाजिकच इथले पुरोगामी त्यांच्या समर्थनाला पुढे आल्यास नवल कुठले? फ़रक इतकाच आहे, की त्यांच्या विरोधात बोलणारे तावातावाने आक्रस्ताळेपणाने बोलतात. पुरोगामी जन्मत: बुद्धीजिवी असल्याने पाळण्यातही रडण्यापेक्षा युक्तीवादच करणारे असतात. गुन्हा असेल तर पुरावे देऊन सिद्ध करा आणि फ़ाशी द्या. हा त्यांचा युक्तीवाद असतो. किती वास्तविक वाटणारा युक्तिवाद आहे ना? पण समोरचा आरोपीत कोणी हिंदुत्ववादी असेल, तर हा सगळा युक्तीवाद कुठल्या कुठे अस्तंगत होऊन जातो. मग पुरावे किंवा ते कोर्टात सिद्ध होण्याची अजिबात गरज नसते. विनाविलंब त्याला अटक करण्याची मागणी सुरू होते. ह्याला पुरोगामी बुद्धीवाद म्हणतात. त्यात झाकीर नाईक वा काश्मिरातील हल्लेखोर हिंदूत्ववादी नसतील, तर त्यांच्या विरोधात बोलणे कसे बसू शकते? हेच लोक सतत पुरोहित वा साध्वीचे दाखले देत असतात. पण आठ वर्षानंतरही त्यांच्या विरोधात एकही पुरावा समोर आणला गेला नाही, त्याबद्दल मौन पाळतात ना? त्यांनाही पुराव्याअभावी कशाला डांबून ठेवले आहे, असे शब्द कुणा पुरोगाम्याकडून कधी ऐकलेत काय? पण झाकीर नाईकला हात लावण्यापुर्वी पक्के पुरावे आवश्यक असतात.

हा फ़रक लक्षात घेतला तर कोणी पुरोगाम्यांचे मौन कशाला, म्हणून आगावूपणे प्रश्न विचारणार नाही. पुर्वी्च्या काळात कुणा दलिताना अस्पृष्याने कुठला गुन्हा करण्याची गरज नसायची. त्याच्या गुन्ह्याचे पुरावे कधी मागितले जात नसायचे. केवळ तो अस्पृष्य आहे इतकेच पुरेसे असायचे. तो त्याच्यावरचा आरोपच पुरावा असे आणि म्हणूनच त्याच्यावरचा गुन्हा आपोआप सिद्ध झाला, असे मानले जात असे. आज जमाना बदलला आहे. चातुर्वर्ण संपुष्टात आला असून, पुरोगामी नियम लागू झाले आहेत. त्यात हिंदू असणे किंवा हिंदू चालिरिती पाळणे बेकायदा निर्बुदध मानले गेलेले आहे. त्यामुळे कशातही हिंदू शब्द आला, मग आपोआप गुन्हा घडून जात असतो. त्यासाठी कुठल्या पुराव्याची किंवा खटल्याची गरज नाही. पर्यायाने ज्यात काहीही हिंदू असे नाही, ते आपोआप निर्दोष मानले जात असते. हे नवे निकष व बुद्धीवाद लक्षात घेतला; तर झाकीर नाईकचा काय गुन्हा शिल्लक उरतो सांगा? तो कोण बुर्‍हान वाणी हिंसा करीत असेल, निरपराधांचे जीव घेत असेल. पण हिंदूत्वाचा झेंडा त्याने खांद्यावर घेतलेला नाही ना? तो हिंदू नाही ना? त्याने हिंदू धर्माचे नाव घेऊन कुणाचा गळा घोटलेला नाही ना? मग त्याच्या कुठल्याही कृतीला गुन्हा कसे मानता येईल? झाकीर नाईक हिंदूचे ग्रंथ वा चालिरितीची हेटाळणी करतो, मग तो आपोआप पुरोगामी होत नाही काय? हे समजून घेतले, तर आपल्या देशातल्या सांप्रत बुद्धीवादाचे आकलन होऊ शकते. मग त्यात मोदींना शिव्या कशाला घातल्या जातात, संघावर दुगण्या कशापायी सोडल्या जातात, ते लक्षात येऊ शकेल. दिवसात पाच वेळा ‘प्रार्थना’ करावी, तसे हे पुरोगामी ‘इमान’ आहे. हिंदूंच्या हत्येचा जिहादी मुलभूत हक्क असल्याचे आकलन होऊ शकते. कल्पनाविश्वात रममाण झाल्यावर सगळ्या गोष्टी सहजसोप्या होऊन जातात. विवेकबुद्धी गहाण टाकण्याचे थोडे धाडस तुमच्यात हवे. मग बुद्धीजिवी व्हाल आणि छाती फ़ुगवून तुम्हीही गर्जना कराल,

झाकीर नाईक आगे बढो, बुर्‍हान वाणी आगे बढो.........

2 comments:

 1. भाऊ अत्यंत उपरोधिक रास्त लेख. हिंदू धर्मात जन्म घेणे हा एक मागील जन्मातील पापाचे प्रायश्चीत्य आहे अशी भावना निर्माण झाली आहे.
  मिडिया ट्रायल मध्ये हिंदू धर्माच्या प्रवक्ते व भाजप / संघ यांचा नेहमीच पाणउतारा सर्वच म्हणजे आर्णव गोस्वामी च्या तथाकथित फेमस न्युज आवर मध्ये आणी निखिल वागळे च्या शो मध्ये गेली पाच वर्ष पहायला मिळाला आहे. मी त्याचे रेकॉर्डिंग ठेवले आहे. यात गमंत नाही पण चिड येणारी गोष्ट म्हणजे जेंव्हा भाजप विरोधी पक्षात होता तेंव्हा आशा अनेक घटना मध्य युपीए सरकार असल्या मुळे त्याला कव्हर आॅपरेशन देत पुरावे हेच अँकर मागत होते व आता सत्तेत असताना त्वरित कारवाई करावी म्हणून हेच अँकर व पुरोगामी अत्यंत अॅग्रेसिव्हली भाजपा व संघा च्या प्रवक्त्याचा पाणउतारा करत आहेत.
  हे किती लोकांच्या लक्षात येत आहे?
  यामुळे आपण आतंकवादी कारवायांना बढावा देत आहोत याचे भान असुन सुद्धा मुद्दाम भाजप सरकार कारवाई करण्यात ढिलाई करते आहे असे दुरगामी परिणाम करणारे चित्र मतदारांत निर्माण करत आहे. यातून सुध्दा जर भाजप सरकारने परत 2019 च्या निवडणुका जिंकल्या तर जादूच झाली अशी सामान्य माणसाची भावना आहे.
  हे अँकर नेमताना जे नावाने हिंदू धर्माचेच आहेत परंतु कोणताही धर्म न मानणारे आसे सरळ सरळ बोलतात परंतु हिंदू धर्माचे आतुन कट्टर विरोधक असतात. व देव धर्म न मानणारे असल्याने पापभिरू वृत्ती पण नसते व कसाई पेक्षा हि कृर असतात आणि देश विरोधक होतात. हेच शतकानुशतके भारतात चालु आहे. त्यामुळे विदेशी शक्ती भारतावर सहज राज्य करत आल्या आहेत.
  न्यायाधीश नेमणुक व प्रमोशन दशकानुदशके एकच पक्षाचे सरकारनी केल्या मुळे न्यायाची अपेक्षा ठेवणे अशक्य आहे (आठवा घाटकोपर प्रकरणात अतिरेक्यांना पकडणाऱ्या पोलीसांना डिसमिस करणारे न्यायालय व रिबेरो ना जनयाचीका दाखल केल्याबाबत दंड ठोठावणे) हे सर्व दुरगामी /डीप आघात करणारे आहे.
  म्हणून सामान्य माणसाला नियती वरच भरोसा ठेवायला हवा.
  अमुल

  ReplyDelete
 2. भाऊ सोप आहे आपणही सगळेच जनाब झालो की विषयच मिटेल

  ReplyDelete