Tuesday, July 26, 2016

गुलाम आणि ‘सुलतान’कायदा आणि न्याय यांच्याविषयी काय बोलायचे अशी शंका अधूनमधून येत असते. कारण नुकताच बॉलीवुड सुपरस्टार सलमान खान जोधपूर प्रकरणातून निर्दोष सुटलेला आहे. हायकोर्टाने त्याचे अपील मान्य करून त्याला खालच्या कोर्टाने दिलेली शिक्षा रद्दबातल ठरवली आहे. काही वर्षापुर्वी एका चित्रीकरणासाठी जोधपूरला गेलेल्या सलमान खानने आपल्या मित्र सहकार्‍यांना घेऊन एक पिकनिक केलेली होती. त्यात हा शिकारीचा खेळ झाला होता. स्थानिक रहिवाशी काळवीटाला देवासम मानतात. म्हणूनच ही माहिती कळल्यावर राहिवाश्यांमध्ये संतापाची लाट उसळली होती. त्यांनी स्थानिक पातळीवर आवाज उठवला आणि त्याला राष्ट्रीय पातळीवर माध्यमांची साथ मिळाल्याने खुप उशिरा सलमान टोळीवर गुन्हा दाखल झाला होता. काळवीट हा दुर्मिळ होत चाललेला प्राणी असल्याने कायद्याने त्याच्या शिकारीला प्रतिबंध घालण्यात आलेला आहे. म्हणूनच अन्य काही आक्षेपांसह काळवीट शिकारीचा गुन्हा सलमानवर दाखल झाला होता. आपल्या देशात कासवापेक्षाही संथगतीने चालणार्‍या तपास व न्यायप्रक्रीयेमुळे त्याचा निकाल व्हायला कित्येक वर्षे खर्च झाली. अखेरीस स्थानिक सत्र न्यायालयाने सलमानला दोषी ठरवून शिक्षा फ़र्मावली होती. पण अशा शिक्षा भोगायला सलमान ‘सामान्य नागरिक’ थोडाच आहे? त्याने कनिष्ठ कोर्टाच्या त्या निवाड्याला उच्च न्यायालयात आव्हान दिले आणि सरकारही प्राणीप्रेमींच्या आग्रहास्तव अपीलात गेलेले होते. त्यात सलमानने आपल्यावरील आरोप नाकारून निवाडा रद्द करण्याची मागणी केली होती. तर प्राणीप्रेमींनी अधिकच कठोर शिक्षा देण्यासाठी अपील केले होते. त्याच निकालात सलमान निर्दोष सुटला आहे. पण हा विषय फ़क्त कायदे व त्यातल्या शब्दांपुरता मर्यादित आहे काय? जर सलमान सुपस्टार म्हणून नामवंत असेल, तर त्याला सामान्य नागरिक म्हणून वागवणे न्याय्य आहे काय?

कायदा सर्वांना समान असतो, असे नेहमी कानीकपाळी ओरडून सांगितले जाते. पण खरोखरच कायदा नियम सर्वांना समान वागणूक देतात हे दिसावेही लागते. सलमान किंवा अन्य कुठल्या अशा गाजणार्‍या प्रकरणात त्याची कधी प्रचिती येते काय? संजय दत्त ह्या अन्य बॉलिवुड सुपरस्टारच्या बाबतीत हेच झालेले होते. मुंबई स्फ़ोट खटल्यात त्यालाही पाठीशी घालण्याचा प्रयत्न झाला. मोठमोठे वकील युक्तीवाद करायला उभे करण्यात आले. पण तो निसटू शकला नाही. दिर्घकाळ खटले लढवूनही त्याला शिक्षा भोगावीच लागली. पण शिक्षा भोगताना त्याला मिळालेली वागणूक व अन्य सामान्य दोषींना मिळालेली वागणूक; यात जमिन अस्मानाचा फ़रक दिसलाच. सलमानचे प्रकरण वेगळे नाही. मुंबईत भरधाव गाडी हाकताना त्याने दोन लोकांचा जीव घेतल्याचे प्रकरण जुने झालेले नाही. त्यातही खुप गवगवा झाल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. पण त्यातून त्याला निर्दोष ठरवण्यासाठी वकीलांची फ़ौज उभी करण्यात आली. अखेर खालच्या कोर्टाने त्याला दोषी मानून शिक्षा फ़र्मावली. तेव्हा कायद्याच्या किती कसरती करण्यात आल्या? निकालपत्राची प्रत हाती येण्यापुर्वी सलमानचे वकील हायकोर्टात हजर झाले आणि संपणार्‍या जामिनाची मुदत वाढवून घेतली गेली. इतकी ‘समान’ वागणूक सामान्य माणसाला मिळते काय? त्याच्यामागे मोठ्या वकीलांची फ़ौज नसते आणि वेळोवेळी त्याला न्याय व कायद्याचे चटके सोसावेच लागत असतात. पण नामवंत प्रतिष्ठीत व्यक्ती असल्या म्हणजे तोच कठोर कायदा कमालीचा लवचिक होऊन जातो. म्हणजेच सामान्य माणसासाठीचा कायदा आणि प्रतिष्ठीत नामवंतांसाठीचा कायदा, यांच्या अंमलात फ़रक असतो. शब्दात कायदा तोच असतो. पण त्याच्या अंमलबजावणीत जमिन अस्मानाचा फ़रक पडलेला असतो. म्हणून सलमानला सामान्य नागरिक म्हणून न्यायासमोर समान वागणूक मिळणे विषमता होऊन जाते.

समजा उद्या कुठे चित्रण असेल किंवा कार्यक्रमाला हजेरी लावण्यासाठी सलमान येणार असेल, तर तिथे वावरणार्‍या अन्य नागरिकांसारखे त्याला वागवले जाते काय? तिथे प्रवेशाची रांग असेल किंवा झडती घेतली जात असेल, तर सलमानला त्याच मुशीतून जावे लागत नाही. अवघी सुरक्षा यंत्रणा त्यांना खास मार्गाने अपेक्षित जागी घेऊन जाते. म्हणजेच तिथे नियम कायदे गुंडाळून नामवंत म्हणून खास वागणूक दिली जाते. तेव्हा नियम कायदे लवचिक होतात. पण तिथेच वावरणार्‍या नागरिकांना तशी कुठलीही लवचिकता कायदा वा प्रशासन दाखवत नाही. म्हणजेच कायदा समान असला तरी त्याची अंमलबजावणी व्यक्तीनुसार बदलत असते. सलमानला अन्यत्र कायदा समान वागवत नसेल व झुकते माप देत असेल, तर न्यायाच्या दरबारात त्याला समान वागणूकीची अपेक्षा करता येईल काय? कारण त्याने नामवंत म्हणून तो समान वागणूकीचा हक्क गमावलेला असतो. म्हणूनच न्यायाच्या दारात त्याच्यासाठी कायदा अधिक कठोर व्हायला हवा. कारण अशी नामवंत माणसे आपल्या वागण्याने समाज मनावर प्रभाव पाडत असतात आणि म्हणूनच कायद्यावरील लोकांची श्रद्धा वाढवण्यास त्यांनी हातभार लावणे आवश्यक असते. तीच सवलतीच्या बदल्यात त्यांच्यावर येऊन पडणारी नैतिक जबाबदारी असते. कितीही त्रासदायक जाचक असले तरी कायदे आपण पाळतो, असे या लोकांनी कृतीतून दाखवून दिले तरच कायद्याच्या राज्याचे बळ वाढत असते. म्हणून मग अशा लोकांची न्यायाच्या दारात प्रतिष्ठीत म्हणून अधिक क्ठोर अग्नीपरिक्षा घेतली जाणे आवश्यक आहे. सामान्य माणसाला न्यायदानामध्ये ज्या सवलती वा मुभा आहेत, त्या नामवंतांना असता कामा नयेत. कारण कारण नामवंत हेच कायद्याला प्रतिष्ठीत करू शकणारे असतात. त्यांनाच सवलती मिळाल्या, तर सामान्य माणसालाही कायद्याच्या प्रामाणिकपणाविषयी शंका निर्माण होतात.

कुठलाही पैसेवाला, गर्भश्रीमंतांची मुले किंवा राजकीय नेते मंत्र्यांची मुले अरेरावी करतात, त्याची मानसिकता यातूनच आलेली असते. सलमान किंवा संजयदत्त यांच्यासह विजय मल्या यांच्याविषयीच्या घडामोडी लोकांना काय शिकवत असतात? पैसे मिळवा, कुठल्याही भल्याबुर्‍या मार्गाने प्रचंड संपत्ती मिळवा. नामवंत व्हा, बदनाम झालात म्हनून बिघडत नाही. कायदा व न्याय-नियम पैशाच्या शक्तीसमोर नतमस्तक असतात. हाच धडा त्यातून मिळत असतो. कायद्याला धाब्यावर बसवण्याची वाढणारी प्रवृत्ती त्यातूनच शिरजोर झालेली आहे. त्यापासून मुक्ती मिळू शकली तर कायद्याचे न्यायाचे राज्य बलवान होऊ शकेल. त्यासाठी नवनवे किंवा आणखी कठोर कायदे बनवण्याची गरज नाही. असलेल्या कायद्यांच्या कठोर अंमलातून आदर्श धडे निर्माण करण्याची गरज आहे. असे धडे संजय दत्त किंवा सलमान खान यांच्या खटल्यातून उभे राहू शकतील. इतका मोठा नावाजेलला माणूस, हाताशी प्रचंड पैसा असूनही कायद्याला झुकवू शकत नाही. न्यायाची दिशाभूल करू शकत नाही, अशा अनुभवातून जेव्हा समाज सातत्याने जाऊ लागेल, तेव्हा कायद्याचा व न्यायाचा धाक निर्माण होऊ शकतो. म्हणूनच सलमान, संजयदत्त यांच्या खटल्याला सामान्य माणसावरील आरोपासारखे हाताळले जाता कामा नये. त्यांना अधिक कठोर पद्धतीने अडकवण्याचा प्रयत्न शासन प्रशासनांनी केला पाहिजे. त्यातून निसटण्याची तारांबळ करताना हे लोक लोकांना दिसतील, तेव्हाच कायदा अधिक प्रभावी व कृतीशिल असल्याची प्रचिती येऊ शकेल. म्हणून सलमानवर एक व्यक्ती म्हणून खटला चालवला जाणे चुकीचे आहे. त्याकडे सामाजिक विकृतीचा खटला म्हणून बघण्याची गरज आहे. तशी दृष्टी असेल, तर न्याय अधिक प्रभावी होतो आणि लोकांचा न्यायावरील विश्वास दृढमूल होऊ शकतो. सलमानचा खटला सामान्य नागरिकाच्या न्यायाने, कायद्याने लढवणे म्हणूनच मुलभूत चुक आहे.

9 comments:

 1. भाऊ सलमान खान ला शिक्षा झाली असती तर पैसा भगवान नही पर भगवानसे कम नहीं यावरचा विश्वास उठला असता

  ReplyDelete
 2. आपल्या विचारांशी पूर्णपणे सहमत आहे.
  कायद्याची कठोरता शब्दात न दिसता अंमलबजावणीतूनच दिसायला हवी.

  ReplyDelete
 3. त्यादिवशी वाघाच्या तोंडी जाण्याची पाळी त्या काळवीटाची होती. पण, वाघाची शिकार होण्यापेक्षा आपला जीव स्व:ताच संपविण्याचा निर्णय त्याने घेतला. त्या काळवीटाने स्वतःवर गोळी झाडून घेतली. पण आत्महत्येचा गुन्हा दाखल होऊ नये म्हणून त्याने ती बंदूक सलमानकडे फेकली. निरागस सलमानाने ती झेलली आणि सलमान फसला. त्याच्यावर गुन्हा दाखल झाला. एका निष्पाप जीवाला अडकवले.
  एखाद्या सिनेमाला लाजवेल असे हे थरारनाट्य होते.खटला काही वर्ष सुरु राहिला. खोट्या गुन्हात अड़कलेला सलमान सहीसलामत सुटला. अर्थात, विजय "सत्याचा"(?) होतो.सलमानच्या बाजूने त्या वाघाने साक्ष दिली.

  ReplyDelete
 4. Dear Bhau,
  I am happy that Salman is acquitted in both cases but cannot be proud of failure of law and order.
  In 1950 ,approx 87% Indians were illiterate in their own mother tongue.At that time these Indians accept laws and order (constitution)which was written in English. I think this is main reason behind failure of democracy in India.

  ReplyDelete
 5. Most people don't look at loopholes of system instead blame money power of accused.

  ReplyDelete
 6. पण भारतामध्ये सामान्य लोकांनीच सलमान संजय दत्त यांच्यासारख्या लोकांना डोक्यावर चढवुन ठेवलंय
  लोकंसुद्धा मूर्खासारखी त्याना 'देव' असल्याप्रमाणे वागवत असतील तर त्यांचं फावणारच आहे.....
  जनताच त्यांना खतपाणी घालते...

  ReplyDelete
 7. राजकारणी लोक अशा लोकांना उचलुन धरतात कारण त्यांना सामान्य लोकांवरचा त्यांचा प्रभाव माहीत असतो.....
  लोकंच अक्कलशून्य आहेत..
  जेव्हा आपला समाज प्रगल्भपणे या उपटसुंभाना उचलून धरणे बंद करेल तेव्हा सगळे सुतासारखे सरळ येतील...

  ReplyDelete
 8. कायदे असे आहेत की पळवाटा खुप आहेत पण पैसा वापरून या वाटांचे १० lane हायवे झालेत

  ReplyDelete