आपल्या वाढदिवसाच्या निमीत्ताने किंवा पालिका निवडणूकांच्या तयारीच्या दिशेने असेल, उद्धव ठाकरे यांची प्रसिद्ध झालेली प्रदिर्घ मुलाखत चर्चेचा विषय झाली आहे. अनेकदा बाळासाहेब अशी मुलाखत देऊन विविध विषयांवरील आपले व्यापक मतप्रदर्शन करीत असत. याचे कारण नेहमीचा ‘सामना’ अग्रलेख बाळासाहेब लिहीत नाहीत हे सर्वश्रुत होते. म्हणून अशा भूमिका वेळोवेळी मांडण्याची त्यांना गरज भासत असे. पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे तोच वारसा पुढे चालवित आहेत. ताज्या मुलाखतीने म्हणूनच काहीसा गदारोळ केला आहे. त्यात बाकीचे विवादचे मुद्दे बाजूला ठेवले, तरी युतीविषयक उद्धव यांनी व्यक्त केलेले मत एक स्पष्ट संकेत देत आहे. यापुढे भाजपाशी निवडणूकपुर्व युती करणार नाही, असा त्यातला संदेश आहे. ‘पंचविस वर्षे युतीत शिवसेना सडली’, या विधानातला गर्भितार्थ लक्षात घेण्यापेक्षा त्यातले शब्द धरून अर्थ लावायचा प्रयत्न केल्यास मनोरंजन खुप होईल., पण साध्य काहीच होणार नाही. हल्ली सोशल मीडियामुळे अशा गावगप्पांना जोर आला आहे. म्हणून अशा शब्द व विधानावर प्रचंड मल्लीनाथी होत असते. तशीच या सडलेल्या विधानाने झाली तर नवल नाही. पण त्यातून एका महत्वाच्या पक्षाचा प्रमुख, युतीचे युग संपले असे सुचवतो आहे, याची गांभिर्याने दखल घेतली गेली नाही. दुर्दैवाने सोशल मीडियाच्याच आहारी गेलेल्या मुख्यप्रवाहातील माध्यमातही तोच उथळपणा आला असल्याने, खुसखुशीत चर्चेलाच प्राधान्य मिळते. तर त्यातला स्पष्ट संदेश मात्र नजरेआड राहिला आहे. पण त्याने शिवसेनेला फ़ारसा फ़रक पडणार नाही. फ़रक ज्यांना पडू शकतो, त्यांनी याचा विचार करायला हवा आहे. पण तेही मल्लीनाथी करण्यातच रमले आहेत. त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात, तेव्हा जाग येते. पण खुप उशीर झालेला असतो. जसा दिल्ली बिहारमध्ये झाला.
युतीत शिवसेना सडली याचा अर्थ बाळासाहेबांना राजकारण कळत नव्हते काय? त्यांच्या चतुराईवर त्यांचाच वारस शंका घेतोय, इथपर्यंत भल्याबुर्या अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत. बाळासाहेबांना राजकारणातली चतुराई जमली असती, तर त्यांनी भाजपाशी १९८८ सालात युती नक्कीच केली नसती. आणि केलीच असती, तर ममता बानर्जी, मायावती किंवा नितीशकुमार यांच्यासारखी केली असती. या दोन्ही नेत्यांनी आपल्या गरजेनुसार भाजपाशी युती केली. पण गरज संपताच किंवा भाजपा जास्त लाभ उठवतो दिसताच, मैत्रीला तिलांजली दिली होती. मैत्री वा युतीत राजकीय लाभ उठवित मैत्री टिकवण्याचे डाव बाळासाहेबांना खेळता आले नाहीत. म्हणून युतीतली पंचवीस वर्षे शिवसेना मागे पडत गेली, असा उद्धव यांच्या बोलण्याचा अर्थ आहे. युती किंवा आघाडी होते, तेव्हा त्यावर प्रभावी नेत्याचे वर्चस्व असते. १९८० नंतरच्या काळात कॉग्रेस सोडून विरोधात आलेल्या शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पुलोद आकाराला आली. तेव्हा पवार अवघे २२ आमदार घेऊन आले होते. पण मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी १०० आमदारांच्या जनता पक्षाला दुय्यम केले. पुढे त्यातून जनता पक्ष व भाजपा असे दोन गट झाले. त्यांच्याशी निवडणूकपुर्व युती न करता पवारांनी आपले बळ वाढवत नेले. १९८० ते १९८६ पर्यंत हे बाकीचे पक्ष पवारांच्या इतके आहारी गेले होते, की आपले वेगळे अस्तित्वही विसरून बसले. म्हणूनच पवार माघारी कॉग्रेस पक्षात परतल्यावर शेकाप, जनता, भाजपा यांना आपले अस्तित्व शोधण्यासाठी चाचपडावे लागले होते. त्याच दरम्यान पवारांनी सोडलेली पोकळी भरून काढत शिवसेना महाराष्ट्रव्यापी पक्ष म्हणून उदयास आली. त्यात आपला हिंदूत्ववादी चेहराही गमावत चाललेल्या भाजपाला सेनेच्या आश्रयाला यावे लागले होते. बाळासाहेब चतूर असते, तर त्यांनी पवारांनी दिला त्यापेक्षा अधिक वाटा भाजपा दिलाच नसता.
पार्ले विधानसभा पोटनिवडणूकीत भाजपाने सेनेच्या हिंदूत्वाला विरोध करीत जनता पक्षीय प्राणलाल व्होरांचे समर्थन केले होते. तरी अमराठी बहुल भागातून रमेश प्रभू स्वबळावर जिंकले. औरंगाबाद नगरपालिकेत भाजपा दुसर्या क्रमांकाचा पक्ष होता. शिवसेनेचा मागमूस नव्हता. तिची महापालिका झाली आणि प्रथमच तिथे निवडणूक लढवताना सेनेने सर्वात मोठा पक्ष होत, ६० पैकी २७ जागा जिंकल्या होत्या. पण त्यालाही महत्व नाही. तिथे भाजपाचा तेव्हा एकही उमेदवार निवडून येऊ शकला नाही. त्यानंतरच भाजपाला सेनेशी युती करायची उपरती झालेली होती. थोडक्यात आपले महाराष्ट्रातील अस्तित्व टिकवण्यासाठी व वाढवण्यासाठी शिवसेनेची मदत भाजपाला आवश्यक वाटली. म्हणून युतीचा प्रस्ताव घेऊन मुंडे-महाजन मातोश्रीवर पोहोचले होते. बाळासाहेबांचा भोळेपणा व तात्कालीन सेनानेतृत्वाचे ग्रामिण महाराष्ट्राविषयीचे अज्ञान; त्या युतीत सेनेचे नुकसान करून गेले. कारण सेना दिवसागणिक खेड्यापाड्यात पसरत होती आणि बिगरकॉग्रेसी मतदार कार्यकर्ता तिच्यामागे धावत होता. पण त्याचे नेमके भान मुंबईस्थित सेना नेत्यांना नव्हते. मुंबई ठाण्यापलिकडे कधी निवडणुका न लढवलेल्या शिवसेनेला, मग अवघ्या दिड वर्षात लोकसभा निवडणूकीला सामोरे जाण्याचा प्रसंग होता. त्याचा ग्रामीण महाराष्ट्रात पसरलेल्या भाजपाला लाभ होऊ शकणार होता. दिल्लीच्या राजकारणात रस नसलेल्या बाळासाहेब वा सेना नेतृत्वाने म्हणूनच लोकसभेच्या बहुतांश जागा भाजपाला देऊन टाकल्या होत्या. बदल्यात विधानसभेच्या बहुतांश जागा सेनेला असा सौदा झाला होता. पण विधानसभेचे पडघम वाजू लागल्यावर जागावाटपाचे वाद सुरू झाले. सेनेच्या मदतीने १० खासदार आल्याने भाजपा विधानसभेतही जादा जागांवर तेव्हाही दावा करत होता. त्याला बाळासाहेबांची चतुराई नव्हेतर भोळेपणा युतीला कारणीभूत होता. तर चतुराई मुंडे-महाजनांनी केली होती.अ
या जागावाटपात आपल्या प्रभावक्षेत्राची ओळखही नसलेल्या मुंबईकर सेनानेत्यांनी ज्या जागा भाजपाला सोडून दिल्या, त्या बहुतांश बिगर कॉग्रेसी प्राबल्याच्या होत्या. तर सेनेच्या वाट्याला आलेल्या बहुतांश जागा पश्चीम महाराष्ट्रातल्या किंवा भक्कम कॉग्रेसी बालेकिल्ले असलेल्या म्हणून अवघड होत्या. ही चतुराई भाजपाची होती, तर सेनेचा मुर्खपणा होता. जेव्हा असे जागावाटप होते तिथे मित्रपक्षाला गेलेल्या जागी पक्षाची वाढ होऊ शकत नाही. कारण तिथे पक्षाची पाळेमुळे रुजवणारा झुंजार कार्यकर्ता नेता उभा राहू शकत नाही. कारण त्या जागी आपण उमेदवारीचा दावा करू शकत नाही, याची खात्री असल्याने त्याने मेहनत करून उपयोग नसतो. करायची असेल तर दुसर्या कुठल्या पक्षात जाण्याचा पर्याय शोधावा लागतो. थोडक्यात जिथे १९८६ नंतर सेनेचा प्रभाव वाढला होता, अशा बिगर कॉग्रेसी सुपिक जमिनीत युतीमुळे सेनेला आपली पाळेमुळे घट्ट रोवून उभे रहाणे शक्य झाले नाही आणि पक्षाची वाढ खुंटली. हे वास्तव उद्धवनी अप्रत्यक्ष शब्दात मांडले आहे. किंबहूना शिवसेना महाराष्ट्रव्यापी झाल्यावर यापुर्वी ग्रामीण महाराष्ट्रात एकही निवडणूक स्वबळावर लढलीच नसल्याने, तिला आपली प्रभावक्षेत्रे कधी अनुभवाने शोधता आली नाहीत. मागल्या विधानसभेनंतर सेनेला तशा जागा प्रथमच उमजल्या आहेत. २८८ पैकी १९९ जागी सेनेचा उमेदवार पहिल्या, दुसर्या किंवा तिसर्या क्रमांकाची मते मिळवू शकला आहे. ह्या जागा सेनेला प्रयत्न करून लढवणे व त्यातल्या बहुतांश जिंकणे शक्य होईल. ज्या जागा युती तुटण्यापर्यंत शिवसेनेला कधी माहितही नव्हत्या. काहीअंशी भाजपाचेही तसेच झालेले असु शकते. पण युतीत सडल्याची भाषा अशा वेगळ्या अंगाने समजून घेतली, तर त्याचा अर्थ लागू शकतो. नुसताच उथळपणा करायचा असेल, तर गोष्ट वेगळी. म्हणूनच असे पाय रोवायचे असल्याने यापुढे निवडणूकपुर्व युती होणार नाही, असेच उद्धव स्पष्टपणे सुचवत आहेत.
छान भाऊ मस्तच
ReplyDeleteBhau,
ReplyDeleteka konas thavuk pan tumhi jevha Sene vishayi lihita tevha kahisa ekangi waatat.
sahaj sangav waatala.
भाऊ!
ReplyDeleteवेगळा विचार देणारा हा लेख आहे.
कदाचित या पूर्वी युती नसती तर भाजपा-सेनेत मत विभागणी होऊन,त्याचा फायदा काँग्रेसला मिळाला असता.
मला नाही, तुला नाही, घाल कु्त्र्याला, अशी अवस्था झाली असती ही शक्यता अनुलक्षीता येत नाही.