Saturday, July 9, 2016

ढाका घातपाताच्या निमीत्ताने




“The whole problem with the world is that fools and fanatics are always so certain of themselves, and wise people so full of doubts.” -Bertrand Russell



डॉ. झाकीर नाईक हे वादग्रस्त व्यक्तीमत्व आहे. हा माणूस सर्व धर्माच्या पवित्र ग्रंथांचा ज्ञानकोष असल्यासारखी प्रवचने करतो आणि ती ऐकून त्याचे श्रोते भारावून जातात, असा अनुभव आहे. म्हणजे असे, की त्याच्या समोर फ़क्त त्याचे भक्त किंवा मुस्लिम श्रद्धाळूच जमलेले नसतात. अनेकदा त्याने विविध धर्माच्या पंडितांना परिसंवादात बोलावून लिलया पराभूत केल्याचीही अनेक चित्रणे सोशल मीडियात उपलब्ध आहेत. त्यात अनेक बिगर मुस्लिम शहाण्यांचीही उपस्थिती असल्याचे अगत्याने प्रदर्शित केलेले असते. हा अर्थातच प्रचाराचा भाग आहे. त्यात महाभारत, भगवत गीता किंवा कुराणासह बायबलच्याही अनेक श्लोकाचे उल्लेख नाईक करतात. इतक्या फ़टाफ़ट हा विषय पुढे सरकत असतो, की त्यांनी उधृत केलेले श्लोक वा ओळी खरोखर त्या त्या धर्मग्रंथात आहेत किंवा नाही, याची छाननीही होत नाही. त्याची गरजही नसते. कुठल्याही अशा जमावात भारावून टाकणारा कोणी कलावंत आवश्यक असतो आणि डॉ. नाईक तेच करत असतात. त्यांना अडचणीचे प्रश्न विचारले, मग ते टांग मारून अशा प्रश्नांना माझे चेलेही उत्तर देतील म्हणत पळ काढतात. किंवा तर्कदुष्ट युक्तिवाद करून टांग मारतात. तसे अनेक युक्तीवाद वापरून त्यांचेही दावे खोडून काढता येतील. पण त्याचा उपयोग नाही. सभोवती त्यांनीच जमवलेली गर्दी असते आणि हा सगळा उद्योग चालवण्यासाठी नाईक यांना प्रचंड प्रमाणात भलतीकडून पैसा उपलब्ध होत असतो. कुठल्याही कायद्याच्या कचाट्यात न अडकता चिथावण्या देण्याचे कौशल्य त्यांनी आत्मसात केलेले आहे. म्हणून आता बांगलादेश सरकारने त्यांच्याविषयी संशय घेतला म्हणून त्यात त्यांना गुंतवता येईल, अशी कोणी खात्री देऊ शकत नाही. त्यातली अडचण समजून घेतली पाहिजे. त्यासाठी नाईक यांचेच तर्कशास्त्र वापरावे लागेल.

कुठल्या तरी एका चर्चेत कोणी नाईक यांना प्रश्न विचारला गेला, की धर्माविषयी स्वातंत्र्य असेल तर सौदी अरेबिया इस्लामखेरीज अन्य धर्मांवर निर्बंध कशाला घालून बसला आहे? त्या देशात इस्लाम सोडून अन्य धर्माच्या आचरणाला कशाला बंदी आहे? ती बंदी आहे म्हणजे धर्माविषयी सौदी अरेबिया असहिष्णू आहे, इतकाच साधा सरळ अर्थ निघू शकतो. पण त्याच खुलासा नाईक कसा करतात? समजा तुमची एक शाळा आहे आणि तिथे गणिताचा शिक्षक नेमायचा आहे. त्याला दोन अधिक दोन चार इतके आले म्हणजे झाले. त्यापेक्षा वेगळे सत्य असू शकत नाही. म्हणूनच त्यापेक्षा भिन्न गाणित शिकवणार्‍याला तुम्ही आपल्या शाळेत घेणार नाही. तसे भलतेसलते गणित शिकवणार्‍यांवर तुम्ही निर्बंधच घालणार ना? पण ज्यांना दोन अधिक दोन चार हे सत्य ठाऊक नाही किंवा आपल्या गणिताविषयीच शंका आहे, तेच भलत्यासलत्या शिक्षकाला त्यासाठी नेमू शकतात. तसाच इस्लाम हा परिपुर्ण धर्म आहे याविषयी सौदी अरेबियाला खात्री आहे. त्या देशात अन्य धर्माची गरज नाही, अशी सौदीला खात्री असेल तर त्यांनी अन्य धर्माला मोकळीक कशाला द्यायची? मग तुम्ही तोच प्रश्न उलटा करून त्यांना विचारा. असेच असेल, तर अन्य देशात जिथे मुस्लिम सत्ता नाही आणि अन्य धर्माचे राज्य असेल तिथे इस्लामला मोकळीक मिळावी, म्हणून मुस्लिम आग्रही कशाला? सौदीप्रमाणेच तिथेही अन्य धर्मावर निर्बंध घालावे काय? त्यावर नाईक यांचे तर्कशास्त्र काय? अशा देशात मुस्लिमांचा आपल्या धर्मासाठी आग्रह आहे, कारण तिथली राजसत्ता व कायदे तशी मुभा देतात. ते देश तशी मुभा देतात, कारण त्यांच्या देशातला प्रस्थापित धर्म परिपुर्ण असल्याची त्यांनाच खात्री नाही. म्हणुन तिथे इस्लामला मुभा आहे. पण मुस्लिमांना व मुस्लिम सत्तेला आपल्या धर्मातच अंतिम सत्य असल्याची खात्री आहे.

याचा साधा सरळ अर्थ काय होतो? जिथे इस्लामची सत्ता आहे किंवा बहुसंख्या आहे, तिथे अन्य धर्मांना मोकळीक मिळणार नाही. निर्बंधच असतील. थोडक्यात इस्लाम अन्य कुठल्या धर्माला स्वातंत्र्य देणार नाही. अन्य धर्माची गळचेपी करील. मात्र जिथे इस्लामची सत्ता नाही, तिथे सहिष्णुतेचा आग्रह धरून अन्य धर्मांशी स्पर्धा करण्यासाठीही आग्रही राहिल. परिणाम काय असू शकतो? अशा रितीने तिथे मुस्लिम बहूमत सिद्ध करायचे आणि आपोआप मुस्लिम राष्ट्र म्हणून अन्य धर्मांवर निर्बंध घालायचा. ही रणनिती नाही काय? सहिष्णुता कशासाठी हवी? तर असहिष्णूता प्रस्थापित करण्यासाठी! हे किती सोप्या भाषेत झाकीर नाईक सांगतात ना? हेच तर्कशास्त्र मग भारतातील विविध धार्मिक समस्यांच्या बाबतीत लावून बघा. इथे भारतात आमचा इस्लाम धर्म आचरण करायला राज्यघटनेने आम्हाला अधिकार दिलेला आहे. राज्यघटनेची महत्ता तिथेच येऊन संपते. कारण घटनेतील इतकाच मुद्दा सोयीचा असतो. पण जी घटना कुणालाही कुठल्याही धर्माचे आचरण करायचे स्वातंत्र्य देते, तीच घटना भारतीय संसदेला नवनवे कायदे करण्याचाही अधिकार देते, त्याचे काय? तीच घटना भारतीय न्यायालयांना विविध वादात निवाडा करण्याचा अधिकार देते, त्याचे काय? तिथे पुन्हा घटनेची महत्ता शुन्यवत होऊन जाते. मुस्लिम धर्मविषयक वा समाजविषयक जो कायदा आहे, त्यात कोर्टाने वा संसदेने ढवळाढवळ करता कामा नये. म्हणजे ज्या राज्यघटनेने धर्माचे स्वातंत्र्य दिले, तेच घेऊन त्याच्याच आधारावर घटना व कायद्याचे राज्य झुगारून लावायचे. डॉ. झाकीर नाईक यांचे तर्कशास्त्र केवळ इस्लामपुरते किंवा जिहाद, घातपात, ओसामापुरते मर्यादित नाही. ते भारतीय राज्यघटनेलाही आव्हान देणारे आहे. पण त्यावर देशातला कोणी पुरोगामी वा संविधानवादी तोंड उघडायची हिंमत करणार नाही.

आताच बघा ना? बांगला देशने याच नाईक विरोधात शंका व्यक्त केली आहे. कारण ढाक्यातील घातपाती हल्ल्यानंतर त्यातला नाईक यांचा दुवा उघडकीस आलेला आहे. आपल्या तर्कशास्त्राच्या आधारे केलेल्या युक्तीवादातून त्यांनी या मुलांना चिथावण्या दिल्याचा दावा आहे. हा दावा नवा नाही. यापुर्वीच अमेरिका, ब्रिटन यासारख्या देशांनी नाईक यांना आपल्या भूमीवर येऊन इस्लामवरील प्रवचने करण्यास बंदी घातली आहे. अर्थात त्यांच्यावर बिगरमुस्लिम किंवा ख्रिश्चन देश म्हणून आक्षेप घेतला जाऊ शकतो. पण इंडोनेशिया हा जगातील सर्वात मोठ्या मुस्लिम लोकसंख्येचा देश आहे, तर मलेशिया जगातला सर्वात पुढारलेला मुस्लिम देश आहे. त्यांनीही डॉ. झाकीर नाईक यांच्या इस्लामविषयक प्रवचनांना आपल्या देशात बंदी घातली आहे. पण त्याच्या विरोधात भारतातल्या कुणाही पुरोगाम्याने तोंड उघडलेले नाही. सतत आदित्यनाथ, साध्वी किंवा साक्षी महाराज यांच्या किरकोळ विधानांवरून गदारोळ करणार्‍या कुठल्या वाहिनी वा माध्यमाने इतकी गंघीर चर्चा नाईक यांच्या प्रवचन वा चिथावणीखोर वक्तव्यांवर चर्चा तरी केली आहे काय? बंदीची मागणी खुप दुरची गोष्ट झाली. अशाच चिथावणीखोर प्रचाराने २०१२ साली मुंबईत रझा अकादमीच्या गुंडांनी हैदोस घातला होता. त्यात पोलिसांच्या व वाहिन्यांच्य गाड्या जाळल्या. महिला पोलिसांची विटंबना केली. पण कुणा पुरोगाम्याची दातखिळी उघडली होती काय? कारण आता डॉ. झाकीर नाईक यांचे जे तर्कशास्त्र आहे, तेच पुरोगामी तत्वज्ञान झालेले आहे. दहशतवादी इस्लाम आणि पुरोगामीत्व यात किंचीतही भेदभाव उरलेला नाही. जी भूमिका नाईक इस्लामच्या नावाने मांडतात, तीच पुरोगामी शहाणे वैचारिक युक्तीवाद म्हणून मांडत असतात. इस्लाम परिपुर्ण असल्याचा त्यांचा दावा तमाम भारतीय पुरोगाम्यांनी मानला नसता, तर सनातन वा अन्य कुठल्या हिंदू संघटनेच्या बरोबरीने झाकीर नाईक यांच्यावरही बंदीचा आग्रह पुरोगाम्यांनी धरला नसता का?

5 comments:

  1. भाऊ हे पुरोगामी इस्लाम कबूल केलेले आहेत हे नालायक इस्लाम साठी कुणाचाही सौदा करतील

    ReplyDelete
  2. हा विडियो अवश्य पाहणे. Rudy Dutschke आणि गॅंग ने 1967 साली इस्लाम ची साथ देण्याचे का ठरवले त्याचा उल्लेख मिळेल

    ReplyDelete
  3. https://www.youtube.com/watch?v=G8pPbrbJJQs

    ReplyDelete
    Replies
    1. Thanks. Video fb ani WhatsApp var share kela ahi

      Delete
  4. I have been attended his one of the lecture in pune. His practice is same you mentioned. No contradicte his any of the statements, public around him is own. Its true what ever he priching in public there is no reason to check what is correct? .

    ReplyDelete