Sunday, July 24, 2016

इन्डॉक्ट्रीनेशन म्हणजे काय?



गेल्या काही दिवसात केरळातून इसिसमध्ये काही तरूण मुले भरती झाल्याच्या बातमीने धुमाकुळ घातला आहे. या मुलांच्या पालकांनाही आपल्या घरात व कुटुंबात काय घडामोडी घडत होत्या, त्याचा थांगपत्ता लागला नाही. कारण ही बहुतांश मुले मदरशातील नाहीत तर उच्चशिक्षण घेणारी होती. त्यामुळेच अंधश्रद्धा वा धर्मवेडेपणा त्यांना प्रभावित करू शकेल, अशी पालकांना शक्यताही वाटलेली नव्हती. त्यात पुन्हा काही मुस्लिम तरूणांनी अन्यधर्मिय मुलींना प्रेमबंधनात गुरफ़टून धर्मांतराच्या मार्गाने मुस्लिम केल्याचाही दावा आहे. पण पुढे त्या मुलीही अशा जिहादी मानसिकतेमध्ये गेल्याने, मोठी खळबळ माजली आहे. एका बाजूला मुस्लिम घरातील पालक चिंतेत आहेत आणि दुसरीकडे धर्मांतरीत मुलींच्या पालकांना हा धक्कादायक प्रकार कसा घडू शकला, त्याचाही अंदाज येत नाही. पण कुठल्याही बातम्या वा चर्चेमध्ये याविषयी कुठला तपशीलवार उहापोह होऊ शकला नाही. त्यापेक्षा इन्डॉक्ट्रीनेशन आणि रॅडीकलायहेशन अशा शब्दांचा सरसकट वापर मात्र खुप झाला आणि होत असतो. पण हे इन्डॉक्ट्रीनेशन म्हणजे काय? ते कसे होते किंवा कसे केले जाते, त्याचा कुठलाही खुलासा कोणी करीत नाही. त्यामुळे हे शब्द फ़सवे ठरतात. सामान्य माणसाला त्याचा अर्थ लागत नाही, की परिणाम कळत नाही. याचे मुख्य कारण या विषयात लोकांचे प्रबोधन करण्यापेक्षा लोकांना संभ्रमित करण्याचीच स्पर्धा चालते. किंबहूना ज्यांना यातले थोडेफ़ार काही कळते, त्यांनाही त्याचे गांभिर्य समजलेले नसावे, किंवा सामान्य माणसाला समजू नये, याची फ़िकीर सतावत असावी. म्हणून मग दहशतवादाला धर्म नसतो किंवा इन्डॉक्ट्रीनेशन असे फ़सवे शब्द दिशाभूल करण्यासाठी सरसकट वापरले जातात. म्हणूनच ह्याला जिहादपेक्षा मोठा धोका म्हणावे लागते. त्यावरचा उत्तम उपाय म्हणजे त्या शब्दांचा वास्तविक अर्थ समजून घेणे हाच आहे.

उकिरड्यावर किंवा कचर्‍याच्या ढिगावर उभे राहून कचर्‍याला दुर्गंध नसते असे कोणी म्हणत असेल, तर तो शहाणा आहे असे कोणी सामान्य बुद्धीचा माणूसही मान्य करणार नाही. पण जेव्हा तसा डंका पिटला जातो, तेव्हा सामान्य माणसाचे भान सुटत जाते. डंका पिटणे म्हणजे शुद्ध जाहिरातबाजी असते. ती जाहिरातबाजी इतक्या आवेशात व जोशात केली जाते, की त्यातून प्रथम तुमचे भान हरपले पाहिजे. तुमची विचारशक्ती व तारतम्य निष्क्रीय झाले पाहिजे. एकदा तशा संमोहनाच्या प्रभावाखाली तुम्ही आलात, मग समोरचा जे विचार तुमच्या डोक्यात घालत जाईल, ते विचार तुम्हालाही आपलेच वाटू लागतात आणि तुम्ही बिनदिक्कत तसे बोलू वागू लागता. किंबहूना ते विचार तुमचे नाहीत, वा तुम्ही तसे नाहीत हे म्हटले तरी तुमचा संताप होऊ लागतो. अशा स्थितीला इन्डॉक्ट्रीनेशन असे म्हणतात. झाकीर नाईक वा त्याची इस्लामीक रिसर्च फ़ौंडेशन संस्था जे काम करीत आहे, त्याला इन्डॉक्ट्रीनेशन म्हणतात. त्याचा अर्थ समजून घेण्यासाठी जाहिरातबाजीचा प्रभाव समजून घेतला पाहिजे. तुमच्या घरात कुटुंबात लहान मुलांना जाहिरातीमध्ये लक्ष्य केलेले असते. घराघरात जाऊन पोहोचलेल्या टिव्ही व वाहिन्यांवर अशा जाहिरातींचा अहोरात्र वर्षाव चालू असतो. सहसा लोक त्या जाहिराती आल्या मग चॅनेल बदलतात. पण तशी कितीही कसरत केली, तरी त्यापैकी कुठल्या तरी दोनचार जाहिराती तुम्हाला बघाव्याच लागतात. प्रामुख्याने अशा जाहिराती लहान मुलांना आवडतात. कारण त्या झटपट आटोपत असतात आणि त्यातून नेमका संदेश मुलांच्या मनाचा कब्जा घेत असतो. ‘डब्बा है रे डब्बा, अंकल का टिव्ही डब्बा’, हे त्याचे सर्वोत्तम उदाहरण आहे. मुलांनी सहज गुणगुणावी अशी ही जाहिरात मुलांच्या खेळण्याचा एक भाग बनून जाते. मग त्या कंपनीचा तो टिव्ही विकण्य़ासाठी घरातच एक विक्रेता तयार होत असतो.

आपल्या घरात हाय डेफ़ीनेशन टिव्ही नाही, म्हणजे आपण अगदीच फ़ालतू हलक्या दर्जाचे कोणी आहोत, असा न्युनगंड बालकाच्या मनात निर्माण केला जातो. मग बालकच पालकांच्या गळी तो टिव्ही मारण्यासाठी अखंड हटवादी बनत जाते. तशीच कुठल्या तरी फ़्रीजची जाहिरात आहे. लहान मुले खेळताना आपसात आपल्या घरच्या गोष्टी सांगत असतात. एका घरातला तो नवा फ़्रीज बघायला मुले येतात आणि आंटी त्यांना त्याची महानता समजावते. मग त्यातला डोक्यावर बुचडा असलेला शीख मुलगा म्हणते, ‘ओह तेरे’. अशा कोवळ्या बालकांना त्या वस्तू वा तिच्या उपयुक्ततेबद्दल काडीची अक्कल नसते. पण तशी वस्तु आपल्या घरात असणे, ही त्यांच्यासाठी एकदम प्रतिष्ठेची गोष्ट बनून जाते. सहाजिकच पालक ती वस्तु आणत्त नसतील तर पालक व आपल्या घरातील तशीच वस्तु त्या मुलांना अपमानकारक वाटू लागते. थोडक्यात त्या वस्तु आपल्यापाशी नाहीत, याविषयी त्या मुलांमध्ये एकप्रकारचा न्युनगंड तयार होत जातो. त्यांना आपण जे कोणी आहोत, त्याची लाज वाटू लागते. किंवा आपण कोण नाही आहोत तसे होण्यासाठी त्यांच्या मनात आकर्षण निर्माण होते. तसे होण्याची ओढ त्यांना खुणावू लागते. पर्यायाने अशी मुले वा त्याच प्रभावाखाली असलेली व्यक्ती कमालीची न्युनगंडाने वेढली जाते. त्याला इन्डॉक्ट्रीनेशन म्हणतात. कुठलेही वास्तविक व्यवहारी कारण नसताना तुमच्या मनात न्युनगंड निर्माण करायचा आणि अन्य कशासाठी तरी तुमच्या मनात अभिमानाची धारणा जन्माला घालायची, याचा अर्थ इन्डॉक्ट्रीनेशन होय. आपल्या प्रत्येकाच्या घराघरात हे काम नित्यनेमाने जाहिराती करीत असतात आणि आपण त्याबाबतीत संपुर्णपणे अनभिज्ञ असतो. आपल्या मुलांमध्ये ही भावना समजूत कुठून आली, त्याचा आपल्याला थांग लागत नाही. मात्र त्याच्याच परिणामी आपले मुल पालकापासून दुरावत जात असते.

सामान्यत: ग्राहकाच्या बाबतीत जे होते, तेच अन्य बाबतीतही होत असते. अमूक बाब हाताशी उपलब्ध असणे म्हणजे श्रीमंती, प्रतिष्ठा किंवा अमूक पद्धतीने विचार करणे म्हणजे बुद्धीमान; अशा समजूती माणसाला प्रथमत: संभ्रमित करत असतात. त्याच्याभोवती असे माहोल उभे केले जाते, की त्याला तारतम्याने विचारही करता येऊ नये. किंबहूना त्याला अशा समजूतीत ओढताना आधी त्याच्या श्रद्धा भावना व समजुतींना सुरूंग लावायचा असतो. फ़्रिज वा टिव्ही या घरातल्या सुविधा आहेत. त्याचा मानवी जगण्यातल्या प्रतिष्ठा वा सन्मानाशी काडीमात्र संबंध नाही. पण इतक्या सहज त्याविषयी तुमच्या हळव्या मनाशी खेळ केला जातो, की त्या वस्तु तुमची प्रतिष्ठा बनून जातात. त्या मिळवण्यासाठी काहीही करण्यापर्यंत तुमची मजल जाऊ शकते. इतक्या थराला तुमचे विचार घेऊन जाण्याला इन्डॉक्ट्रीनेशन म्हणतात. मग मुले भारावल्यासारखी पालकाकडे त्या वस्तु मागू लागतात. आपले उत्पन्न वा परिस्थिती तुम्ही मुलाला विश्वासात घेऊन पटवू शकलात, तरी त्याच्या मनातली ओढ कमी होत नाही. पण तडजोड म्हणून अनेक मुले वस्तुस्थिती स्विकारतात. काही मुलांच्या बाबतीत ती ओढ कमालीची आग्रही असते. अशी मुले ते मिळवण्यास उतावळी होऊन जातात. त्यानंतरच रॅडिकलायझेशन होऊ शकते. अशी मुले मागणी मान्य होण्यासाठी हट्टी होणे, उचापती करणे किंवा पालकांशी हुज्जत भांडण करण्यापर्यंत जाऊ लागतात. पण त्यांचे इन्डॉक्ट्रीनेशन झाले आहे, ही बाब आपल्या डोक्यात कधीही शिरत नाही. कारण आपण ज्यांना टिव्हीवरच्या साध्या जाहिराती समजून दुर्लक्ष करीत असतो, ते व्यवहारातील इन्डॉक्ट्रीनेशन असते. साध्या भाषेत जाळ्यात ओढणे असते. झाकीर नाईक काय करतात त्याचा अर्थ असा सोपा व सरळ आहे. पण तो आपल्याला कोणी समजावला आहे काय? इन्डॉक्ट्रीनेशन सारखा फ़सवा शब्द तोंडावर फ़ेकून आपली दिशाभुल केली जात असते. (अपुर्ण)

7 comments:

  1. मस्तच भाऊ यावर लोकांनी जोरात काम करणे गरजेचे आहे

    ReplyDelete
  2. फार अवघड होत चाललाय हे सगळे !! हे सगळं ऐकून काही सुचेनासे होते
    चांगल्या विचाराचा प्रभावाखाली आजची पिढी येण्यासाठी काय करावं लागेल

    ReplyDelete
  3. हे सगळं होताय ते असं होऊ नये यासाठी काहीतरी कृती करायला हवी नाही का ? आपल्याला काय वाटतं भाऊ ?

    ReplyDelete
  4. अशी जबरदस्त as a miracal कृती पाहिजे ना की हे असं कधी घडवायची कोणाची हिंमत होणार नाही

    ReplyDelete
  5. इन्डॉक्ट्रीनेशन चा अर्थ इतक्या सोप्या पद्धतीने तुम्हीच सांगु शकता भाऊ ! खुप समर्पक !!

    ReplyDelete
  6. भाऊ एकदम सही जेव्हा पासून इलेक्ट्रॉनीक मिडिया प्रभावी झाला तेंव्हा पासून या काँन्सटंट हॅमरिंग करुन भारतीय नागरिकांना प्रामुख्याने अनेक विदेशी वस्तू, सेवां, परंपरा (व्हॅलंटाइन डे, न्यू इयर ई.), सारेगमप, असंख्य टीव्ही मालिका यांच्या मोहपाशात अडकवले गेले आहे. व भारतीय वस्तू/ सेवा यांच्या गुणवत्ते बद्दल न्युनगंड निर्माण केला आहे. विदेशी गाड्या बाबत भारतीयांची/ चीमुरड्या मुलांची लोकप्रियता व त्या बाबतीत असलेले चिमुरड्यांचे ज्ञान उत्तम उदाहरण आहे. त्यामुळे भारतीयांची प्रचंड लुट या विदेशी कंपन्या करत आहेत. (सुझुकी ला त्यांचे स्पेअर्स केवळ त्यांच्या अथोराईझड डिलर्स विकण्याचे फरमान मोनापाॅली आयोगाने दंड ठोठावला तेव्हा थांबले ). यामुळे प्रचंड पैसा भारतातुन विदेशात जात आहे. व अशा गाड्यांची किंमत दोन वर्षांत वीकायला गेले तर निम्मी पण येत नाही. व नविन माॅडेल घ्यायला भाग पाडुन लाखो रुपयांचा चुराडा होत आहे. भारतीय कार निर्मिती कंपन्यांना प्रचंड तोटा होत आहे. तर भारतातुन या विदेशी कंपन्या प्रचंड नफा विदेशात नेत आहेत. उत्कृष्ट काॅलीटी असुन सुद्धा मिडिया जाहिरातीतुन विदेशी वस्तूंचे मोहजाल मुळे करोडो रुपये फेकले जात आहेत.
    अनेक एमबीए काॅलेज मधुन अॅटिट्युड ठासुन भरले जाते व हजारो मधुन एकदोन विद्यार्थ्याला लाखोंचे पॅकेज देऊन बाकिच्यांत न्युनगंड निर्माण केला जातो. अधार्मितकतेचा प्रचार मुळ धर्मा पासुन दुर जाण्यासाठी केला जातो व एकदा का धर्म, देव व पालक यांचा धाक संपला की जसे अनेक न्युज चॅनेल अँकर देशविघातक प्रचार/आघात जनसामान्यावर करत आहेत तसेच उच्च शिक्षित तरुण करत आहेत. हेच प्रकार धार्मिक भावनांना हात घालून इसिस च्या भरतीतुन होत आहेत.
    भाऊ तुम्ही एका अत्यंत गंभीर विषयावर लेख लिहिला आहे.
    धन्यवाद.
    अमुल

    ReplyDelete
  7. भाऊ तुम्ही आमचे डोळे उघडलेत. तुम्हाला साष्टांग दंडवत.

    ReplyDelete