Friday, July 8, 2016

शिवसेनाप्रमुख आणि पक्षप्रमुख



सत्तेसाठी आपण लाचार नाही. कोणापुढे वाडगा घेऊन फ़िरणार नाही, असे बोलणार्‍या शिवसेनेचे पक्षप्रमुख आपल्याच दोन राज्यमंत्र्यांच्या शपथविधीकडे फ़िरकत नाहीत, ही बाब काय सांगते? केंद्रातील मंत्रिमंडळात शिवसेनेचा दुसरा कोणी मंत्री समाविष्ट करण्यात आला नाही आणि पाठोपाठ राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेला कुठलेही नवे कॅबिनेट मंतत्रीपद देण्यात आले नाही. त्यामुळे शिवसेना व भाजपा यांच्यातली ‘नैसर्गिक मैत्री’ सिद्ध झाली. अर्थात कुठल्याही बोलाचालीशिवाय हे पार पडले असते, तर त्यावर चर्चा करण्याचे कारण नव्हते. कारण शिवसेनेला आरंभीच ठरलेली दोन राज्यमंत्रीपदे मिळायचीच होती. ती़च शुक्रवारी झालेल्या समारंभातून मिळालेली आहेत. त्याविषयी रागलोभाचे काहीही कारण नव्हते. पण त्याआधी शिवसेनेच्या गोटातून ज्या गोष्टी बोलल्या गेल्या, किंवा डरकाळ्या फ़ोडल्या गेल्याचे म्हटले जाते, त्यामुळे या चर्चेला कारण मिळाले आहे. वाडगा घेऊन सेना फ़िरत नव्हती, तर हक्काचे घेण्यात लाज कुठली होती? जे पक्षप्रमुख वृक्षसंगोपन कार्यक्रमात देवेंद्र फ़डणवीस यांच्या सोबत हजेरी लावतात, त्यांनी आपल्याच दोन राज्यमंत्र्याच्या शपथविधीवर बहिष्कार कशाला घातला? त्याला नेहमीच्या व्यवहारी भाषेत रुसवेफ़ुगवे म्हणतात. राज्याच्या सत्तेचे राजकारण करणार्‍यांना असले खेळ करून चालत नाही. कारण मतांचे निवडणूकीतले राजकारण भावनांचा खेळ असला, तरी सत्तेची साठमारी निष्ठूर व्यवहार असतो. तिथे रुसुन बसण्याने काहीही साध्य होत नाही. पल्लेदार भाषेचे बुडबुडे कामाचे नसतात. कृती दणकेबाज असायला हवी. म्हणूनच एकही आमदार गाठीशी नसताना बाळासाहेब अवघी राज्यसत्ता हादरवू शकत होते. त्यांचे शिवसेनाप्रमुख पद हे नुसते पक्षप्रमुख पद नव्हते की पक्षप्रमुख म्हणून कोणी त्यांना वचकून नसायचा. सगळा दबदबा शिवसेनाप्रमुख पदाचा होता.

सामान्य शिवसैनिक आणि सेना नेत्यांनीही काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. शिवसेना वा तिच्या प्रमुखांचा दबदबा नुसता राजकीय पक्ष म्हणून नव्हता, तर अन्य कुठल्याही पक्षापेक्षा शिवसेना वेगळी व तिचा नेता अजब असल्याने, त्या चार शब्दांचा दबदबा होता. त्यांनी कधीही राजकारणातून संपुर्ण माघार घ्यायला मागेपुढे बघितले नाही. तर बेधडक आपल्या कुवतीवर मैदानात उतरतांना काही गमावण्याला तो माणूस घाबरला नाही. जय-पराजयाच्या गणित समिकरणाच्या पलिकडे जाण्याचे धाडस हा शिवसेनाप्रमुख पदाचा वचक होता. कुणाच्या स्वप्नात नसताना एके दिवशी आशिष चेंबुरकर नावाच्या शिवसैनिकाच्या हाती पत्र देऊन त्यांनी वर्षा बंगल्यावर पाठवून दिले. काही तासात मुख्यमंत्र्याने राज्यपालांना राजिनामा नेवून दिलेला होता. कुठे त्याची चर्चा झालेली नव्हती किंवा गवगवा झालेला नव्हता. ठाण्याच्या महापालिकेत दोनदा महापौर निवडणूकीत गद्दारी झाली आणि त्यांनी सर्व नगरसेवकांचे राजिनामे घेऊन तीन वर्षे पालिकेकडे पाठ फ़िरवली होती. सुधीर जोशींना महापौर करताना मुस्लिम लीगला एकही कुठले पद न देताही, त्याचा पाठींबा मिळवला होता. शिवसेनाप्रमुख हा म्हणून दबदबा होता. तेव्हा त्या माणसाच्या मागे किती आमदार, मंत्री-खासदार किंवा नगरसेवक उभे आहेत, याची मोजदाद होत नव्हती. कारण त्यांच्या मागे शिवसैनिक उभा आहे हे गृहीत होते. बाळासाहेबांना पक्षाचा प्रमुख म्हणून लोक वचकत नव्हते. तर जे शिवसैनिक कुठल्याही सत्तापदावर नाहीत, अशांच्या निष्ठेचा मानबिंदू म्हणून तो धाक जगाला होता. आजच्या शिवसेनेने व नेतृत्वाने काहीही बोलताना किंवा वागताना, आधी बाळासाहेब समजून घ्यावेत. त्यांची नक्कल करून भागणार नाही. आर. के. लक्ष्मण सारख्या प्रतिभावंत व्यंगचित्रकाराने रंगवलेला शिवसेनाप्रमुख जरा नव्या पिढीनेही समजून घेतला पाहिजे.



नुसते कमळाबाई म्हणून भाजपाला हिणवण्य़ाने भागणार नाही. लोकसभेत सोबत आलेल्या भाजपाने किरकोळ जागा तरी पदरात पडाव्या, म्हणून शरद पवारांशी १९८५ सालात हातमिळवणी केली. तेव्हा बाळासाहेबांनी त्या पक्षाला कमळाबाई म्हणून हिणवले होते. त्याचा अर्थ सामान्य माणसाला कळत होता, तितकाच भाजपालाही कळला होता. आज कोणी उठून कमळाबाई वा निजाम-अफ़जल असली मुक्ताफ़ळे उधळतो, त्याला आपलेच शब्द तरी उमजलेले असतात काय? १९९९ सालात युतीचे बहुमत हुकले तेव्हा भाजपाचे मुंडे-महाजन राष्ट्रवादीला सोबत घेण्यासाठी अडून बसले होते. तर बाळासाहेबांनी सत्ता टिकवण्यासाठी ती तडजोड केली नाही आणि सत्तेवर पाणी सोडले होते. त्यामुळे मध्यंतरीची १५ वर्षे सत्तेबाहेर बसावे लागले. म्हणून मातोश्रीवर येणार्‍यांची रीघ संपलेली नव्हती. शिवसेनाप्रमुख ह्या पदाची ती शान होती. सत्ता त्या पदासमोर नतमस्तक होती. मग कुठल्याही पक्षाचा म्होरक्या वा मुख्यमंत्री असला, म्हणून फ़रक पडत नव्हता. ती शान रस्तावर उतरू शकणार्‍या शिवसैनिक व गल्लीबोळातल्या शिवसेना शाखेमुळे प्राप्त झालेली होती. याचे भान आजच्या शिवसेनेला किंवा पक्ष नेतृत्वाला उरलेले नाही. म्हणून त्यांची अवस्था संभ्रमित राहुल गांधींसारखी होताना दिसते आहे. राजीव गांधींच्या थाटात बोलतात. पण पित्याच्या मागे इंदिराजींची अफ़ाट प्रतिमा उभी होती, ही वस्तुस्थिती विसरून जातात. शिवसेना जितक्या लौकर हे ओळखू शकेल, तितके सेनेचे भवितव्य उज्ज्वल असेल. मंत्रिमंडळात किती जागा मिळणार, यापेक्षा पुन्हा स्वबळावर लढताना शिवसेना मुंबई ठाण्यातली सत्ता किती संख्येने मतांनी जिंकणार; याला प्राधान्य असायला हवे. कारण बाळासाहेबांनी त्याचाच धडा १९८५ सालात घालून दिलेला आहे. आज त्याचे स्मरण किती शिवसेना नेत्यांना उरलेले आहे?

लोकसभा व विधानसभा अशा लागोपाठच्या दोन निवडणूकात भूईसपाट झालेल्या शिवसेनेला कोणी मित्र नव्हता. गिरणगावाच्या बालेकिल्ल्यात दत्ता सामंतांनी मुसंडी मारलेली. अशा स्थितीत सगळ्या जागा स्वबळावर लढवताना बाळासाहेबांनी बिनदिक्कत सर्व शाखाप्रमुखांना उमेदवार करून टाकले. रावतेपासून नारायण राणेपर्यंत आजचे अनेक सेनानेते त्यातूनच निवडणूकीच्या राजकारणात आले. तेव्हा शिवसेना संपली, म्हणून संपादकीय वा राजकीय भाष्य करणार्‍यांना शिवसेनाप्रमुखाने दिलेले उत्तर, मतदाराच्या कौलाचे होते. कारण तो पक्षप्रमुख नव्हता, तर शिवसैनिकांचा प्रमुख होता. त्याचा विश्वास राजकीय भाष्यकारांपेक्षा शिवसैनिकांवर शाखांवर आणि त्या जागी बसून पक्षाचा पाया भक्कम करणार्‍या अनुयायांवर होता. दत्ता सामंतांनी बालेकिल्ल्यातच संपवलेल्या शिवसेनेचा रुद्रावतार, मग तिला राज्यव्यापी पक्ष बनवून गेला. मग पळून गेलेली कमळाबाई १९८७ सालात पुन्हा बाळासाहेबांकडे परतली. त्यांनी तिची हेटाळणी करण्यात पुरूषार्थ मानला नव्हता. भाजपाला तेव्हा सोबत घेऊन पुढे जाण्याचा मोठेपणा दाखवला होता. अशा कुठल्याही स्थितीत शिवसेना टिकून राहिली आणि विस्तारली. त्याला आत्मविश्वास हे एकमेव बळ होते. त्यावरच आजकालच्या नेत्यांचा विश्वास नसेल, तर शिवसेना नावाच्या पक्षाला भवितव्य असू शकत नाही. पण शिवसेना नावाची चळवळ संपणारी नाही. ती संपवणे कोणालाच शक्य नाही. ती नवे रुप व नाव घेऊन नव्या अवतारात अवतिर्ण होणारच. सवाल आज सेनेचे नेतृत्व करतात त्यांचा आहे. त्यांना सत्तापदे टिकवायची आहेत, की शिवसेना टिकवायची आहे? कुणीतरी दिलेले फ़ायबरचे वाघ जमवून उपयोग नाही. गल्लीबोळातले गावखेड्यातले हक्काचे निष्ठावान वाघ शिवसेनेला साकार करतात. त्यांच्यावर स्वार होऊन संघटना चालवतो, तो शिवसेनाप्रमुख. आमदार नेत्यांवर विसंबणार्‍याला पक्षप्रमुख म्हणतात.

7 comments:

  1. खूपच छान विश्लेषण आहे आणि अगदी "मार्मिक". उधोजी यांनी हा लेख एकदा तरी वाचावा. केवळ राऊत लिहितात ते लेख वाचणे म्हणजे निव्वळ दिशाभूल ठरेल.

    ReplyDelete
  2. खरं आहे. पण बाळासाहेब एकमेव होते. आता राजकारण बदललं आहे. अर्थात बाळासाहेब असते तर कोणाची हिम्मत झाली नसती. पण काही निरीक्षण पटत नाहीत. खालील link वर मी माझं निरीक्षण नोंदवलं आहे. http://latenightedition.in/wp/2016/07/09/%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%b8%e0%a5%87%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%95%e0%a5%80-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%9a%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%80/

    ReplyDelete
  3. Your are truly sainik.
    Udhav to understand this, he may his political sence giving him some other sign. You rightly state after his loose talk,he is loosing his creadibility on top of this his sainik also non reative to shelar somayya ect. Our Shivsenapramukh n his sainik it self different . so that RK laxman created first cartoon.

    ReplyDelete
  4. प्रभुदेसाईजी, मराठा समाज अत्यंत संयम, शांततेने शिस्तबद्ध अभूतपूर्व लाखोंचे मोर्चे काढत असताना आपल्यासारख्या ज्येष्ठ व्यंगचित्रकाराने परिस्थितीचे गांभिर्य लक्षात न घेता काढलेल्या चित्राने आपल्यासह सर्वांची फसगत केली. यात विशेषतः जे काही वाचक जाणीवपूर्वक सामना वाचत होते त्यांची फार मोठी फसगत केली आहे कारण शिवसेनेलाही आत्तापर्यंत कधी संयम शांतीने असे तुफान भगवे मोर्चे काढणे जमले नव्हते ते भगवे आंदोलन जनमनात निर्माण केले ते खरे तर शिवसेनेच्या एकहाती राज्य मिळवण्याच्या स्वप्नाला पोषक ठरले असते हे अगदी शिवसेना विरोधकही मान्य करतील त्यामुळे या मराठा मोर्च्यात राज्यभरातील शिवसेनेच्या धडाडीच्या कार्यकर्ते- नेतृत्वाची सगळी स्वप्ने धुळीस मिळवली आहेत, त्यांची झालेली अपरिमित हानी शिवसेना कधीही भरून काढू शकणार नाही. वास्तविक डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि स्व बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नातील सामाजिक समतेचे, ऐक्याचे अतुलनीय स्वप्न या मोर्च्यातून साकार झाले असते मात्र त्यालाच हरताळ फासण्याचा प्रयत्न ह्यातून झाला आहे. विशेष म्हणजे अश्या परिस्थितीत, ज्या भयंकर अत्याचाराच्या कारणाने या मोर्चांना सुरुवात झाली त्याच प्रकारची गंभीर चेष्टा व्हावी हे सामनासारख्या समाजमन घडवू पाहणाऱ्या ज्येष्ठ संपादकाला लक्षात येऊ नये ह्यापेक्षा मान खाली घालायला लावणारा अपराध तो कोणता ? वास्तविक चूक लक्षात आल्यावर त्यांनी त्वरित माफी मागून प्रश्न मिटवायला हवा होता. कारण हे वर्तमानपत्र स्व. बाळासाहेबांचे आहे आणि ते असते तर त्यांनी अश्या प्रसंगी काय विनोद करावा हे सर्वांना शिकवून दिले असते पण देशाचे दुर्दैव्यच म्हणायचे बाकी काय ? मराठा समाजातील सर्वसामान्य आणि त्यास पाठिंबा इतर समाजातील नागरिकांचा अव्दितीय मोर्चा जगाला डोळे फाडून बघायला लावत आहे. तेव्हा अश्या प्रसंगी विचलित न होता न्यायाच्या लढ्यासाठी आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करायला हवे. उद्या शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे योग्य ती भूमिका घेतीलच असा विश्वास अजूनही वाटतो पण त्यास उशीर लावू नये हा नेतृत्वाचाही कस लागणार आहे.

    ReplyDelete
  5. bhau you are great journalist ever !

    ReplyDelete
  6. nice and cheerful article udhav thakre must read this to save my shivsena

    ReplyDelete