Thursday, March 19, 2015

रिबेरो साहेब तुमचा ‘धर्म’ कुठला?



वास्तवाशी नाळ तुटली मग माणसे किती भरकटत जातात ना? मुंबईचे धाडसी पोलिस आयुक्त आणि पुढे पंजाबचा दहशतवाद मोडून काढण्यासाठी ओळखले जाणारे ज्युलिओ रिबेरो यांच्या ताज्या लेखाने काहीशी तशीच स्थिती निर्माण केली आहे. कोलकात्यामध्ये एका वयोवृद्ध ख्रिश्चन साध्वीवर अन्याय अत्याचार झाले आणि पाठोपाठ हरयाणात एका चर्चच्या बांधकामाची मोडतोड झाली. दिल्लीतल्या काही चर्चवर हल्ले झाले, असा बातम्या आल्या आणि एकदम रिबेरो यांना आपणही हल्लेखोर माथेफ़िरूंच्या हिटलिस्टवर असल्याची स्वप्ने पडू लागली आहेत. त्यासाठी आपली भिती व्यक्त करणारा लेख त्यांनी इंडीयन एक्सप्रेस या इंग्रजी दैनिकात लिहिला. मग त्यावरून काहूर तर माजणारच. विनाविलंब रिबेरोंचा आडोसा करून मोदी, भाजपा, संघ आणि हिंदूत्वाचा देशाला कसा धोका आहे, त्यावरून प्रचचनांचे फ़ड सुरू झाले नसते, तरच नवल होते. रिबेरो यांच्यासारख्या प्रतिष्ठीत व्यक्तीने आपले शब्द किती जपून वापरायचे असतात, त्याचे भान सोडले तर मग कुणा साध्वी वा महंताने ताळतंत्र ठेवण्याचा आग्रह धरता येईल काय? दिल्ली वा हिस्सारमध्ये किरकोळ घटनांच्या बातम्यांनी रिबेरो यांची झोप उडालेली असेल, तर मग पोलिस खात्यात इतकी वर्षे त्यानी काय चोख कायदा व्यवस्थेच्या बातम्या ऐकण्यात खर्ची घातली होती काय? या लेखाच्या आरंभीच आपण पंजाबचे पोलिस प्रमुख म्हणून खलीस्तानी हिंसेचा बंदोबस्त करायला गेल्याची रसभरीत कहाणी रिबेरो यांनी कथन केलेली आहे. त्यात रा. स्व. संघाचे २५ स्वयंसेवक कसे नुसते कवायत करताना निर्घॄणपणे ठार मारले गेले, त्याचा उल्लेख केलेला आहे. त्यानंतर कुणा संघवाल्याने आपण मायदेशातच परके झाल्याचे भय व्यक्त केले होते काय? आपणही हिटलिस्टवर असल्याचा गवगवा केला होता काय? देशातल्या कुणा हिंदू अधिकार्‍याने जीव धोक्यात आल्याची आवई ठोकली होती काय?

पंजाबचा खलीस्तानी दहशतवाद संपतासंपता काश्मिरात जिहादी दहशतवाद बोकाळला. त्यातून काही लाख हिंदू पंडीत आपल्या जन्मभूमीत परागंदा होऊन जगत आहेत. त्याला आता पाव शतकाचा कालखंड उलटून गेला आहे. रिबेरो नुसत्या कल्पनेतलल्या गोष्टी बोलत आहेत आणि काश्मिरी पंडित त्या अनुभवातून मागली पंचवीस वर्षे जात आहेत. त्यांच्या वेदना, यातना व अत्याचार लक्षात घेऊन कुणा हिंदू अधिकारी वा नेत्याने आपल्याला मायभूमीतच परके झाल्यासारखी भिती वाटते, अशी बोंब ठोकली आहे काय? ज्या घटनांनी रिबेरो इतके विचलीत झालेत, त्या घटना स्वातंत्र्योत्तर काळात, मागल्या सहा दशकांपासून अखंड अव्याहत घडत आलेल्या आहेत. त्यात कधी मुस्लिमांना, कधी ख्रिश्चनांना तर कधी हिंदूंना हिंसेच्या झळा पोहोचल्या आहेत. आणि अगदी आकड्यातच जायचे असेल, तर प्रामुख्याने हिंदूंनाच त्याचे चटके अधिक बसलेले दिसतील. रिबेरो यांनी तेव्हा कधी वेदना-यातना भिती व्यक्त केली होती काय? आज अकस्मात त्यांना आपण ख्रिश्चन असल्याचा साखात्कार झाला काय? त्यासाठी मग विविध ख्रिश्चन धार्मिक संस्था व संघटना कोणती समाजोपयोगी कामे करतात, त्याची जंत्री रिबेरो यांनी दिली आहे आणि त्याच्या तुलनेत नगण्य कोणी मिशनरी धर्मांतराचा आगावूपणा करीत असतील असेही म्हटले आहे. अशीच तुलना करायची तर संघातर्फ़े जी विविध समाजसेवी कामे चालतात, त्याची माहिती घेण्याचा प्रयत्न तरी रिबेरो यांनी केला आहे काय? तुलना केल्यास साध्वी वा महंत बोलतात, त्याच्या हजारो पटीने संघाचे सेवाभावी काम अहोरात्र चालू असते. जशी धर्मांतराची प्रकरणे नगण्य वाटत असतील, तर साध्वी महंतांची बडबडही नगण्यच आहे. पण चुका मोठ्या करून दाखवायच्या आणि चांगल्या गोष्टी लपवून ठेवायच्या, याला स्युडो सेक्युलॅरिझम म्हणतात. रिबेरो तेच करत आहेत.

पंजाबात हिंदूंना वाचवायला आपण पोहोचलो असा इतिहास आज रिबेरो सांगतात आणि त्यातही संघाच्याच लोकांची कत्तल झाल्यावर पोहोचलो, अशी आठवणही करून देतात. ती कहाणी त्यांनी तेव्हाच ओरडून सांगायला काय हरकत होती? जितक्या पोटतिडकीने आज निव्वळ कल्पनेतल्या भयाची बोंब रिबेरो ठोकतात, तितकीच त्यांनी २५ संघ स्वयंसेवकांच्या निर्घृण कत्तलीनंतर का ठोकली नव्हती? हिंदूंना त्यांच्याच मायभूमीतून टिपून मारून टाकले जात आहे, असे जगाला ओरडून सांगण्याची तीच वेळ नव्हती काय? मागले पाव शतक रिबेरो त्याबद्दल कितीदा बोलले? आपल्या धर्मापेक्षा भारतीयत्वाचा दाखला देताना त्यांनी कधी काश्मिरातल्या हिंदूंना परागंदा व्हायला लागण्याच्या वेदनेला वाचा फ़ोडली नाही. खरेखुरे जीव घेतले जात असताना हिंदूंवरचे अन्याय वाचा फ़ोडण्यासारखे वाटले नाहीत. आणि आज नुसत्या किरकोळ घटना घडल्या, तर मुंबईत सुरक्षित जागी बसून जीव धोक्यात आल्याच्या आरोळ्या ठोकणे शोभणारे आहे काय? व्हॅटीकनचा पोप किंवा इथला प्रत्येक फ़ादर वाहिनीवर बोलताना धर्मांतर आमचा अधिकार असल्याच्या गर्जना करतो. तेव्हा त्यांना रोखण्याचे आवाहन रिबेरोंनी कधी सरकारला केल्याचे कोणी ऐकले आहे काय? तेच रिवेरो आज पंतप्रधानाला घरवापसीला वेसण घालायचे साकडे घालायला मात्र पुढे सरसावले आहेत. म्हणजे घरवापसी हे धर्मांतर अन्याय असतो आणि मिशनर्‍यांनी धर्मांतर घडवणे हा अधिकार असतो. घरवापसी म्हणजे धर्मांतर असेल, तर तोही ख्रिश्चन मिशनर्‍यांइतकाच हिंदू संघटनांचा घटनादत्त अधिकार होतो. पोपच्या गर्जनेने भारतात कुणा हिंदू अधिकारी वा संघवाल्याने जीव धोक्यात आल्याची किंकाळी ठोकलेली नाही. पण तेच नाटक रिबेरो करतात, तेव्हा त्यांच्या आजवरच्या कर्तबगारीविषयी तेच शंका निर्माण करत असतात. त्यांचा एकूण लेखच शहाजोगपणाचा नमूना आहे.

सरसंघचालक मोहन भागवत भारताला हिंदू राष्ट्र बनवायला निघालेले असतील, तर त्यांना रोखायला हवे आणि पोप वा कोणी फ़ादर त्याच भारताला ख्रिश्चन बनवायला निघाले असतील, तर त्याची फ़िकीर करायला नको, असे रिबेरो सांगतात. तेव्हा ते भारतीय म्हणून बोलत-लिहीत नसतात. त्यांच्यातला पोपचा अनुयायी बोलत असतो. आठ दशकांच्या आयुष्य़ात ज्या देशाने ख्रिश्चन असूनही रिबेरोंना एका भारतीयाप्रमाणे वागवले आणि त्यांच्या भारतीयत्वाविषयी कुठली शंका घेतली नाही, त्यांनाच आज आपल्या भारतीयत्वाची शंका येते, हा त्यांच्या मनाचा खेळ असतो. कोण काय बोलतो यापेक्षा कसा वागतो, याला महत्व आहे. भारतात रिबेरो यांनी आजवर केलेल्या कारवाया धर्माच्या आधारावर केल्याचा आक्षेप कोणी घेतला नव्हता. २००८ सालात मुंबईत कसाब टोळीने हल्ला चढवला, तेव्हा इथे पोलिस आयुक्त हसन गफ़ूर होते. त्यांच्यावर कोणी धर्माच्या आधारे शंका घेतल्या नाहीत. अगदी मोठ्या संख्येने त्यात हिंदूच मारले गेले असूनही, त्याला धर्माचा रंग लावायचे पाप कोणी केले नाही. अशा हिंदू बहुसंख्य समाजाला रिबेरो आपल्या उतारवयात काळिमा फ़ासत असतील, तर त्यांच्या निष्ठांविषयी शंका घेणे भाग आहे. आजवरच्या त्यांच्या कर्तृत्वावर शंका घेता येत नाही. पण आज त्यांना ज्या धर्मगंडाने पछाडले आहे, तिथे त्यांनी स्वत:ला संशयाच्या भोवर्‍यात झोकून दिले म्हणावे लागेल. त्यांची भिती वास्तवापेक्षा संभ्रमावस्थेचा प्रकार वाटतो. आयुष्यभर पोलिस म्हणून धर्मनिरपेक्षतेने कर्तव्य बजावलेल्या व्यक्तीलाही आज असे वाटत असेल, तर आजवरच्या त्याच्या प्रत्येक कृती व वक्तव्याकडे त्याच निकषावर बघावे लागेल. किंबहूना मागल्या काही दिवसातला घटनाक्रम आणि त्याविषयी पसरवल्या जाणार्‍या अफ़वा बघितल्या, तर यामागे काही मोठे कारस्थान असावे अशीच शंका घ्यायला जागा आहे.

6 comments:

  1. खूपच सुंदर लेख. मुसलमान आणि ख्रिश्चन यांच्या साठी धर्म हा राष्ट्रापेक्षा जास्त महत्वाचा असतो. यांना कितीही राष्ट्र प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करा शेवटी आपल्या जातीवरच जाणार.

    ReplyDelete
  2. प्रिय भाउ,

    संघातर्फ़े जी विविध समाजसेवी कामे चालतात, त्याची माहिती घेण्याचा प्रयत्न तरी रिबेरो यांनी केला आहे काय? तुलना केल्यास साध्वी वा महंत बोलतात, त्याच्या हजारो पटीने संघाचे सेवाभावी काम अहोरात्र चालू असते.

    संघाचे समाजकार्याचे काही विशेष उदाहरण द्या म्हणजे बरे होईल ....... आणि हो दिल्ली, हरयाणा, बंगालमधे जे क्रिसती लोकांवर हल्ले झाले ते नुसत्या बातम्यानसून वास्तव आहे..... ....एक पत्रकार या नात्याने MINORITIES वर च्या हल्याचे पुरस्कार जबादारीने करणे थांबवा......

    ReplyDelete
  3. भाऊ ,
    सुंदर लेख.
    दांभिक धर्मनिरपेक्षवाद हा आपल्या देशाला कुठे घेऊन जाणार आहे देव जाणे...."हिंदू" हा शब्द वापरणे इतके महाग झाले आहे का ह्या देशात....हीच दांभिक घर्मानिर्पेक्ष लोक इतर धर्मियांचे लाड पुरवण्यात आपले जीवन धन्य मानतात....
    ह्यांचा बंदोबस्त आपला देश कधी करू शकेल का भाऊ ?

    ReplyDelete
  4. रिबेरो साहेब आपल्याला माहिती आहेकाय ? नुसत्या आपल्या गोव्या मध्ये २५० कोटीच्या वर रक्कम हिंदूचे ख्रिशन धर्मांतरन करणे साठी पैसा येतो आपल्या सपूर्ण देशा मध्ये किती पैसा येतो व कसा येतो व पैसा देणारे कोण आहेत हे आपल्याला पूर्ण माहीत आहे केवळ या गोष्टीवर आपण डोळे झाक का करता? या वरुन आपल्या देशाच्या निष्टेबद्दल शंका येते. भारताचा विषय जाऊ दे मुस्लिम देशामध्ये क्रिशन लोकाची कत्तल केली जात आहे काही देशामध्ये क्रिशन हा नावाला सुद्धा राहणार नाही. या बद्दल एक तरी आपण शब्द खर्च केला काय? उलट भारतात आपण सेफ आहात म्हणून बोंबाबॉम करता सोनिया क्रिशन आहे स्विस बँकेत देशाला लुटून किती पैसा जमा आहे तो ईतका आहे की इंग्लेंडच्या राणीचीही संपत्ती कमी पडेल तिला विचारकी तुझया अक्लेपेशा जास्त पैसा कॉतून आला?या वरुन आपल्याला म्हाताराचळ लागलेला आहे आपला बोलविता धनी पोप आहे हे दिसून येते

    ReplyDelete