Saturday, March 14, 2015

इनकी बेशर्मीपर थोडा तो भरोसा करो



“Behind every successful fortune;There is Crime.” ― Mario Puzo, The Godfather

सव्वा वर्षापुर्वी चार विधानसभांचे निकाल लागले, तेव्हा दिल्लीत वेगळा निकाल लागला होता. बाकी तीन राज्यात भाजपाने अभूतपुर्व विजय संपादन केला असताना, दिल्लीत मात्र त्याला साधे बहूमतही मिळवता आलेले नव्हते. पण दुसरीकडे कॉग्रेस पक्षही कुठल्या कुठे फ़ेकला गेला होता. दुसर्‍या क्रमांकाची मते व जागा जिंकणार्‍या आम आदमी पक्षाचा उदय झालेला होता आणि देशात प्रथमच प्रामाणिक इमानदार राजकीय पक्षाचा जन्म झाल्याची ग्वाही त्याचे नेते सातत्याने देत होते. भाजपाचे बहूमत हुकले होते आणि कॉग्रेसने त्याला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आम आदमी पक्षाला परस्पर पाठींबा जाहिर केला होता. तेव्हा केजरीवाल यांनी आपल्या मुलांची शपथ घेऊन कुणाच्याही पाठींब्याने सरकार स्थापन करणार नसल्याची हमी दिलेली होती. पण कॉग्रेसने पाठींबा दिल्यावर केजरीवाल डळमळले आणि त्यांनी जनतेचा कौल घेण्याची पळवाट शोधली, दोनशेहून अधिक कोपरा सभा घेऊन लोकमत आजमावले आणि सत्ता बळकावण्यासाठी कॉग्रेसचा पाठींबा घेतला. पण मणूस किती टोकाचा बेशरम असतो आणि तरी इतरांना बेधडक बेशरम कसे म्हणू शकतो, त्याचा वस्तुपाठच केजरीवाल यांनी तेव्हापासून सादर करण्याचा चंग बांधला. खोटेपणा व निर्लज्जपणाचा कळस करण्यात त्यांनी कसली कसूर ठेवली नाही. तेव्हा निकालानंतर आयबीएन वाहिनीतर्फ़े राजदीप सरदेसाईंनी केजरीवालच्या घरी जाऊन मुलाखत घेतली होती. त्यात सरकार स्थापनेचा विषय निघाला होता. त्यावर केजरीवालचे उत्तर थक्क करून सोडणारे होते. आपण कोणाच्या पाठींब्याने सरकार बनवणार नाही, पण भाजपा कॉग्रेसच एकमेकांच्या मदतीने सरकार बनवतील असे त्यांनी म्हटले होते. ते बोलताना केजरीवाल म्हणाले होते. ‘इन दोनोकी बेशर्मीपर थोडा तो भरोसा करो.’ मात्र तो बेशरमपणा महिन्याभरात स्वत: केजरीवाल यांनीच करून दाखवला.

तिथून जी निर्लज्जपणाची सुरूवात झाली, ती वाटचाल अजून थांबलेली नाही. आपण आम आदमी आहोत आणि राजकारणात आपली औकातच काय, असे केजरीवाल त्या काळात सतत बोलायचे. पण असे शब्द सोयीनुसार बोलायचे व विसरायचे असतात, असा त्यांचा खाक्या राहिला. लोकसभा प्रचारासाठी गुजरातला गेलेले असताना त्यांनी अकस्मात मंत्रालयाकडे मोर्चा वळवला आणि मुख्यमंत्री मोदींची भेट मागितली. ती आधी ठरलेली नसल्याने पोलिसांनी रोखले, तेव्हा केजरीवालांचा युक्तीवाद काय होता? माजी मुख्यमंत्र्याला इतके अपमानित केले. म्हणजे सोयीचे असेल तेव्हा केजरीवाल आम आदमी असतात आणि सोयीचे असेल तेव्हा ते आपली औकात वाढवून माजी मुख्यमंत्री होतात. मागल्या वेळी मुख्यमंत्रीपद सोडण्यासाठी त्यांनी जनलोकपाल हे निमीत्त बनवले होते. अवैध मार्गाने विधानसभेत ते विधेयक आणून, ते फ़ेटाळण्याचा आरोप भाजपावर करीत त्यांनी राजिनामा फ़ेकला होता. इतकेच नाही, तर जनलोकपालसाठी हजार मुख्यमंत्रीपदाच्या खुर्च्यावर लाथ मारू, अशीही शेखी त्यांनी सतत मिरवली. पण लोकसभेत पराभव झाल्यानंतर पुन्हा तेच मुख्यमंत्रीपद मिळण्यासाठी कुठलीही तोडफ़ोड-तडजोड करायला केजरीवाल कसे लांड्यालबाड्या करत होते, त्याचे किस्से आता बाघेर येत आहेत. ह्याला बेशरमी नाही तर काय सन्मान्य वर्तन म्हणायचे? ज्याच्यासाठी मुख्यमंत्री पदावर लाथ मारल्याचे ढोलताशे तेव्हा वाजवले होते, त्या जनलोकपालचा यावेळच्या निवडणूकीत मुद्दाच नव्हता व नाही. कुठूनही सत्तेपर्यंत पोहोचणे, यापेक्षा केजरीवाल यांना कशाशी कर्तव्य नाही, हेच आता स्पष्ट झाले आहे. पण ते करताना त्यांनी आपल्या बेशरमपणाचे इतके नमूने पेश करून ठेवलेत, की लालू मुलायमनीही लाजेने मान खाली घालावी. आजवरचे भ्रष्ट राजकारणी बरे म्हणायची पाळी यांनी आणली, असेच म्हणायला हवे.

याहीवेळी त्यांनी शपथविधी उरकताच लोकांना आवाहन केले होते. भ्रष्टाचार रोखण्यासाठी स्टींग करा. म्हणजे फ़ोन वा कॅमेराचा उपयोग करून लाच मागणार्‍यांच्या विरुद्ध पुरावे गोळा करा. आपण त्यांना शिक्षा करू असे आवाहन केजरीवाल यांनी केले होते. पण आज त्यांच्याच विरोधात त्यांच्याच सहकार्‍यांनी कित्येक पुरावे समोर आणलेत, त्यांना मात्र केजरीवाल यांचा पक्ष ब्लॅकमेलर म्हणतो आहे. कॉग्रेसचे आमदार फ़ोडा, असे म्हणणे सदाचार असतो काय? मग आम आदमी पक्षाचे आमदारही भाजपा फ़ोडत असेल, तर आगपाखड कशाला चालली होती? प्रत्यक्षात तो उद्योग केजरीवाल करत होते आणि त्याचवेळी आपल्या ट्वीटर माध्यमातून उलटा तसा आरोप भाजपावर करीत होते. म्हणजे चोरी आपण करायची आणि ती करत असतानाच दुसर्‍यांच्या नावाने बोंब ठोकायची. अट्टल गुन्हेगारांची अशी मोडस ऑपरेन्डी असते. आधीच पोलिसात जाऊन अन्य कुणाच्या नावाने धमक्या दिल्याबद्दल अदखलपात्र तक्रार केली जाते. मग त्यालाच जाऊन हा गुंड ठोकतो. पुढे तो मार खाणारा तशा जखमी अवस्थेत पोलिस ठाण्यात जातो, तेव्हा आधीच्या तक्रारीनुसार त्यालाच अटक होते. केजरीवाल यांची शैली नेमकी त्याच सराईत गुन्हेगारांसारखी असावी काय? किती विचित्र आहे ना? सतत आपल्या इमानदारीच्या साक्षी द्यायच्या आणि डाव उलटू लागले, मग मात्र तोंड लपवून बसायचे. कोर्टात गैरहजर रहायचे आणि कोर्टाने समन्स काढले, मग अटक होऊ द्यायची व जामीन नाकारायचा. त्यातून आपल्यावर अन्याय झाल्याचा देखावा उभा करायचा. ह्या नाटकात आजवर योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांनीही साथ दिली. त्याच कर्माची फ़ळे त्यांना आज भोगावी लागत आहेत. भूषण वरीष्ठ वकील आहेत, त्यांनी तेव्हाच केजरीवाल यांचे काम उपटले असते, तर त्यांच्यावर आज असे खोटे पडायची वेळ कशाला आली असती?

आपण आरोप केला म्हणजे नितीन गडकरी भ्रष्ट. त्यांनी बदनामीचा खटला भरला, तर पुरावे द्यायचे नाहीत, कोर्टात हजर व्हायचे नाही आणि जामीन मागितला, तर आपण निर्दोष असताना जामीन मागतात हाच अन्याय असल्याचा कांगावा करायचा. हे लाड कोर्टाने जुमानले नाहीत. पण ज्यांनी पोसले, त्यांनाच आता केजरीवालनी धडा शिकवला आहे. गुन्हेगाराची वकीली करणार्‍यांना कधीकधी गुन्हेगारच धडा शिकवतो, तशी भूषण यांची आता फ़जिती झाली आहे. कारण आजवर केजरीवाल यांच्या गुन्ह्यावर पांघरूण घालण्याची चुक ज्यांनी केली. त्यांनीच त्याला शिकारी बनवले आहे आणि रक्ताला चटावलेले जनावर आपला-परका बघत नाही. अशीच आता आम आदमी पक्षातल्या अन्य नेते कार्यकर्त्यांची अवस्था झालेली आहे. ज्यांनी हा भस्मासूर उभा केला, तोच आता त्यांचे भस्म करायला निघाला आहे. मात्र असे गुन्हेगार कधीकधी आपल्याच जाळ्यात फ़सत असतात. केजरीवाल त्याला अपवाद नाहीत. आताही त्यांनी जो स्टींगचा उपाय इतरांना सांगितला, तोच त्यांच्या विरोधात उफ़ाळून पुढे आलेला आहे. जो पुरावा इतरांच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात भक्कम पुरावा असतो, तोच केजरीवाल यांच्या बाबतीत असू शकतो ना? त्यांचेच सहकारी आता आपल्या या इमानदार नेत्याच्या विरोधात रोजच्या रोज भामटेगिरीचे एकाहून एक पुरावे समोर आणात आहेत. पण प्रामाणिकपणाचा हा पुतळा गायब आहे. ज्यांनी त्याचे थोतांड माजवण्यास हातभार लावला, तेच हैराण आहेत. मात्र असे फ़ार काळ चालत नसते. लोक काही काळ फ़सतात आणि थोडे लोक सर्वकाळ फ़सलेले राहू शकतात. पण सर्वांना सर्वकाळ फ़सवता येत नाही. केजरीवालांचा बुडबुडा फ़ुटायला आता अधिक काळ लागणार नाही. भारतीय राजकारणाने असे कित्येक भामटे इतिहासजमा केलेत. शिकारी स्वत:च शिकार झाल्याचेही नमूने कमी नाहीत.

1 comment:

  1. सत्तेची खुर्ची मनुष्याला आंधळे बणवते हे वैश्विक सत्य केजरीवालच्या बाबतीत तंतोतंत खरे ठरले आहे, यात काडीमात्र शंका नाही.

    ReplyDelete