अविष्कार स्वातंत्र्य, लेखन स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य असे विविधप्रकारचे स्वातंत्र्य आपण उपभोगत असतो. म्हणजे निदान त्याबद्दल नित्यनेमाने बोलत असतो. पण अशी स्वातंत्र्ये आपल्याला दिलीत कोणी? अर्थात अशा प्रश्नाला एक ठाशीव उत्तर आपल्याकडे तयार असते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलीत. त्यांनी राज्यघटनेत तशा नागरी स्वातंत्र्याची तरतुद केलीय, म्हणून ही स्वातंत्र्ये आपल्याला मिळाली आहेत. जगाच्या पाठीवर अनेक देशात अशी स्वातंत्र्ये नागरिकांना मिळाली आहेत व त्याचाही अंतर्भाव तिथल्या राज्यघटनेत आहे. पण काही देश असे आहेत, जिथे अशा स्वातंत्र्याचा अभाव आहे. तिथले नागरिक त्या स्वातंत्र्याला वंचित आहेत. त्यांनाही असे स्वातंत्र्य असायला हवे, म्हणून इतर देशातले स्वातंत्र्यवीर मागण्या करीत असतात. पण जी काही नागरी स्वातंत्र्ये आहेत, ती आपण किती अनुभवतो? डॉ. नरेंद्र दाभोळकर किंवा कॉम्रेड गोविंद पानसरे यांनाही ती स्वातंत्र्ये होतीच ना? बाकीची सोडा, पण साधे जगण्याचे स्वातंत्र्य तरी त्यांना उपभोगता आले काय? कोणीही उठतो आणि एखाद्या व्यक्तीचा खुन पाडतो, त्याचा जीव घेतो. तेव्हा त्याचे जगण्याचे, जीवंत रहाण्याचेही अधिकार नाकारत असतो ना? तेव्हा मग ती राज्यघटना वा ग्रंथात बंदिस्त झालेला हो शाब्दिक कायदा, कुठे उपयोगी पडतो? हातात कायद्याचे पुस्तक घेऊन आपण आपला बचाव करू शकत नाही. मग आपल्या स्वातंत्र्याचा उपयोगच काय? तर त्या स्वातंत्र्याचे संरक्षण करण्यासाठी घटनेने कायदेशीर सत्ता उभी केलेली असते. ज्याला सरकार म्हणतात आणि त्या सरकारचे कोणी अधिकारी वा मंत्री आपल्या स्वातंत्र्याचे रक्षण करीत नसतात. त्यांच्या आदेश इशार्यावर काम करणारी प्रशासन नावाची यंत्रणा त्यासाठी उभी असते. त्यात पोलिस, सैनिक, सशस्त्र दल अशा लोकांचा समावेश होतो. ती जिवंत माणसांचीच यंत्रणा असते. त्यांनी आपल्या स्वातंत्र्य व अधिकाराचे रक्षण करावे ही अपेक्षा असते. कारण त्यासाठीच त्यांची योजना असते. ते संरक्षण करायचे म्हणजे तरी त्यांनी काय करायचे असते? त्यांनी त्यांचे जीव धोक्यात घालून तुमचे-आमचे जीव व स्वातंत्र्ये जपायची असतात.
थोडक्यात कुणीतरी तुमच्या-आमच्या स्वातंत्र्यासाठी त्यांचे प्राण पणाला लावायचे असतात. मुंबईत कसाब टोळी बेछूट गोळ्या घालत कोणाचाही जीव घेत होती, तेव्हा त्याला सामोरे जायला कोण पुढे सरसावलेले होते? ज्यांना आपण शहीद म्हणतो किंवा जे प्रतिकार करताना जखमी जायबंदी झाले, अशा सैनिकांनीच ते काम केलेले होते ना? मग आपण ज्याला विविध स्वातंत्र्ये म्हणतो, ती देणारा कायदा महत्वाचा नसून त्यांची जपणूक करणारा तो सैनिक महत्वाचा असतो. त्या घटनेसाठी, तिच्यात समाविष्ट असलेल्या तत्व व स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची बाजी लावणार्यामुळे ही स्वातंत्र्ये अबाधित असतात. कधीतरी आपण त्यांना सन्मानाने वागवतो काय? शहीद म्हणून पुतळे उभारले वा श्रद्धांजली वाहिली, की आपले कर्तव्य संपून जाते. मुंबई-महाराष्ट्र वा आणखी कुठे आसाम तामिळनाडूचे घर कुटुंब सोडुन जम्मू काश्मिरच्या सीमेवर थंडीवार्यात दहशतवादी देशात घुसेल म्हणून डोळ्यात तेल घालून पहारा देणार्या त्या माणसांच्या कष्टाचे मोल आपल्याला वाटले आहे काय? तेव्हा २६/११ च्या घटनेत केरळच्या उन्नीकृष्णनने आपले प्राण पणाला लावले, तो आपल्याला स्वातंत्र्य देत असतो. कारण तोच आपल्या स्वातंत्र्यासाठी त्याचे प्राण पणाला लावत असतो. पण त्याचाच दुसरा अर्थ असा, की ज्या आपल्या स्वातंत्र्यासाठी आपणच काहीही पणाला लावायला सज्ज नसतो, त्यासाठी अशी माणसे निर्भेळ मनाने त्यांचे सर्वस्व पणाला लावत असतात. म्हणूनच आपण जे स्वातंत्र्य उपभोगतो, त्याचे खरे दाते असेच लोक असतात. आपल्याला त्याची किती कदर असते? आपण त्याविषयी किती कृतज्ञ असतो? जे स्वातंत्र्य व सुरक्षितता आपण कायद्याने गृहीत धरलेली आहे, ती कोणामुळे उपभोगता येते, त्याची साधी जाणिव तरी आपल्यामध्ये असते काय? उलट असे आपल्या स्वातंत्र्याचे दाते वा रक्षक केवळ मरण्यासाठीच जन्माला आलेत, इतकी तटस्थता आपल्यात मुरलेली नाही काय? ज्यांनी त्यांचे जीव पणाला लावण्यावर आपले जगणे वा स्वातंत्र्य अवलंबून आहे, त्याच्या एखाद्या चुकीला पोटात घालण्याचे तरी औदार्य आपण दाखवतो काय?
जनरल मुशर्रफ़ यांनी लष्करप्रमुख म्हणून सत्ता बळकावल्यानंतर देशाची घटनाच गुंडाळून ठेवली आणि तिथल्या कोर्टालाही त्यांच्यापुढे शरणागत व्हावे लागले. जगातल्या अनेक देशातल्या हुकूमशाहीपुढे तिथल्या बुद्धीमत्तेसह कायदेशीर स्वातंत्र्यालाही शरणागत व्हावे लागते. कारण त्यांच्या सुरक्षेला शस्त्र हाती घेऊन प्राण पणाला लावणारा कोणीच उभा नसतो. तिथे अशा तमाम स्वातंत्र्यांची राजरोस पायमल्ली होते. आपल्या देशात होऊ शकत नाही, कारण इथे त्याच स्वातंत्र्याच्या जपणूकीसाठी आपापले जीव पणाला लावणारा सैनिक आहे. पोलिस वा रक्षक दले सज्ज आहेत. त्यांच्यावर कुठलेही आरोप आपण करतो आणि त्यांच्या इवल्या चुकीचेही गुन्हेगारासारखे तपास करतो. तो अधिकार आपल्याला त्यांनीच दिलेला असतो. कारण ते सैनिक, पोलिस त्यांचे जीव ज्या झेंड्यासाठी, कायद्यासाठी पणाला लावतात, त्यातून कायद्याचे राज्य उभे रहात असते. मग जेव्हा त्यांच्यावरच आरोपांची सरबत्ती होते आणि त्यांचे मनोधैर्य खच्ची होते, तेव्हा प्रत्यक्षात तो सैनिक वा पोलिस निकम्मा होत नसतो. आपल्याला सुरक्षा व स्वातंत्र्य बहाल करणारी इर्षा व उर्जाच निकामी होऊन जात असते. कायदे नियमांच्या शब्दावर बोट ठेवून आपण जेव्हा अशा लोकांना आरोपीच्या पिंजर्यात उभे करतो, तेव्हा आपण कोणावर हल्ला करत असतो? आपल्याच स्वातंत्र्याच्या बळावर, शक्तीवर हल्ला करून तिलाच क्षीण करत नसतो का? पोलिस-सैनिक वा कायद्याची अंमलबजावणी करणारी जी यंत्रणा उभी आहे, तेच लोकशाही म्हणून आपले बलस्थान असते. मग तिच्यावरच उठसुट होणारे आरोप व बदनामीतून आपण आपल्याच बलस्थानावर हल्ला चढवित नसतो काय? पर्यायाने आपण कोणाचे हात बळकट करीत असतो? खोट्या चकमकी वा अन्य आरोपतून कोणाचे हात बळकट होतात आणि कोणाचे मनोधैर्य खच्ची होते? याचा विचारच होत नाही, तिथली कुठलीही स्वातंत्र्ये अबाधित राहू शकतील काय? आपल्या स्वातंत्र्याचे रक्षणकर्ते असतात, त्यांच्यावरच मागून आपणच हल्ले करणार असू, तर समोरच्या शत्रूशी त्यांनी लढावे कसे?
कायदा व राज्यघटनेने आपल्याला विविध स्वातंत्र्ये जरूर दिली आहेत. पण त्यांचे रक्षणकर्ते त्यांचे प्राण पणाला लावत असतील, तोपर्यंतच आपण त्या स्वातंत्र्याचा उपभोग घेऊ शकू. कारण वास्तवात तेच आपल्याला स्वातंत्र्ये उपभोगू देत असतात. अगदी त्यांनाच अपमानित करायचे, त्यांच्यावर दगडधोंडे मारण्यापासून त्यांच्यावरच खटले भरण्याचाही अधिकार त्यांच्यामुळेच आपल्याला मिळालेला असतो. काही लोक जीवावर उदार झालेत, म्हणून आपण स्वातंत्र्य उपभोगू शकतो. अन्यथा अराजकात आपण सर्वच अधिकारांना वंचित होत असतो. कधीतरी असा विचार सुरू होईल का? की आपल्या स्वातंत्र्यासाठीच मरायला जन्म घेतलेले ते आपले गुलाम असतात, अशी आपली समजूत आहे?
(खुसपट) मी मराठी (२१/३/२०१५)
Bhau Please see this video -
ReplyDeletehttps://www.youtube.com/watch?v=rUrf6Qg4T4E