आम आदमी पक्षात जे रणकंदन सध्या माजलेले आहे, त्यावर इतका गदारोळ व्हायचे काही कारण नाही. उलट त्यांचेही नेते राजकारणात मुरले म्हणून स्वागतच करायला हवे. आजवर प्रत्येक राजकीय पक्ष त्याच पद्धतीने पुढे आला आणि त्याच मार्गाने गेलेला आहे. ‘आप’ त्याच चाकोरीत शिरला असेल तर उगाच शंका काढण्याचे काहीच कारण नाही. देशातील भ्रष्टाचाराचे निर्मूलन करण्यासाठी आजवर शेकडो लहानमोठ्या चळवळी व आंदोलने झालेली आहेत. त्यात गुजरातच्या नवनिर्माणपासून आसामच्या गणपरिषदेपर्यंत अनेकांचा समावेश होतो. त्यातून एक नवी पिढी राजकारणात प्रवेश करत असते. जे आहे ते नासलेले-सडलेले म्हणूनच अपायकारक असल्याचे सांगत भेदरलेल्या जनतेला विश्वासात घेत, अशा चळवळी आंदोलने उभी रहातात. राजकारण व राजकीय नेते-पक्ष यांना शिव्याशाप देत आपली उजळ प्रतिमा असे लोक जनमानसात उभी करून घेतात. मग शेवटी उपाय म्हणून जुन्यांना हाकलून राजकारणाची शुद्धी करायला स्वत:च राजकारणात उतरतात. त्यांची भाषा नवी अजिबात नसते. तर ती ऐकणारे नवे असतात. फ़सणारे नवे असतात. फ़सवणारेही नवे असतात. जगात असे शतकानुशतके चालत आलेले आहे. सवाल त्यांच्या हाती सत्तेची सुत्रे येण्यापर्यंतचा असतो. ती सत्ता व अधिकार हाती आले, मग तेही त्याच जुन्याजाणत्या व तथाकथित भ्रष्ट राजकारण्यांच्याच पावलावर पाऊल टाकून पुढे चालू लागतात. मग त्यांच्या भुलभुलैयाला फ़सलेल्यांची मात्र हालत होत असते. अशा प्रक्रियेतून जशी नवी नेत्यांची एक पिढी राजकारणात पदार्पण करते, तशीच वैफ़ल्यग्रस्त होणारी जनतेचीही एक नवी पिढी उदयास येत असते. स्वातंत्र्य चळवळीपासून आजपर्यंत भारताने व त्यातल्या विविध राज्यांनी अशा अनेक उलथापालथी बघितल्या व अनुभवल्या आहेत. पण प्रत्येक नव्या पिढीला आता क्रांती व आमुलाग्र बदल होणार, अशी आशा काही सुटलेली नाही.
शेकडो पिढ्या व कित्येक दशकात प्रत्येकाने तरूणपणी प्रेम केले आहे आणि लग्नही केलेले असते. पण त्याने केलेला हनिमून त्याच्या कल्पनाविश्वात जगातला पहिलाच नसतो का? तशीच ही राजकीय व सार्वजनिक जीवनातील हनिमूनची कहाणी आहे. प्रेमात पडल्यावर सर्वकाही सोपे असते. दिवसातले काही तास चोरून भेटावे आणि नंतर आपापल्या घरी जावे, असे दिवस खुप स्वप्नाळू असतात. पण जेव्हा त्यातून लग्नापर्यंत मजल जाते आणि स्वप्न संपून संसाराचा व्यवहार सुरू होतो, तेव्हा कल्पनाविलास संपलेला असतो. त्यापेक्षा आज ‘आप’ची अवस्था वेगळी नाही. तसे यातही काही नवे नाही. मागल्या खेपेस मोठे यश मिळवल्यानंतर मंत्रीपदासाठी मोठी झोंबाझोंबी सुरू झाली होती. विनोदकुमार बिन्नी नामक आमदाराच्या नाराजीवर पांघरूण घालण्यासाठी हेच योगेंद्र यादव बिन्नीच्या घरी जाउन मध्यरात्रीपर्यंत त्याची समजूत काढत बसले होते. तिथून बाहेर पडल्यावर त्यांनी किती सराईतपणे माध्यमांसमोर थाप ठोकली होती? कोणाला आठवते का? बिन्नीची पत्नी स्वादिष्ट खीर बनवते आणि तीच खीर खायला त्याच्या घरी आलेलो होतो, असे त्यांनी सांगितले होते. मध्यरात्री वा अपरात्री कोणी सभ्य माणूस मित्राच्या घरी खीर खायला जातो काय? अशी माणसे कितीही साळसूदपणे प्रामाणिकपणाचा आव आणत असली, तरी अस्सल राजकीय असतात. मुद्दा इतकाच की केजरीवाल वा यादव दोघेही अट्टल राजकीय नेते आहेत. त्यामुळे त्यांचा सच्चाईचा मुखवटा बाजूला करून बघितले, तर आपण नवे काहीच अनुभवत नाही, याची खात्री पटू शकते. जोपर्यंत सहकार्यांच्या मदतीची गरज असते, तोवर त्यांना संभाळून घ्यावेच लागते. ती गरज संपली मग असे अडचण होऊ शकणारे मित्र निर्दयपणे बाजूला करावे लागतात. केजरीवाल यांनी त्याबाबतीतले आपले कसब खुप आधीपासून दाखवले आहे. आपण बघू शकलो नसू, तर तो त्यांचा गुन्हा म्हणता येणार नाही.
जेव्हा त्यांना मोठ्या प्रमाणात सार्वजनिक जीवनात प्रवेश करायचा होता, तेव्हा त्यांनी कधी रामदेव बाबांची कास धरली, तर कधी अण्णांना हाताशी शरून आपली एक प्रतिमा जनमानसात ठसवून घेतली. पुढे स्वयंभू झाल्याची खात्री पटल्यावर अण्णा वा रामदेव यांची गरज उरलेली नव्हती. मग योगेंद्र यादव, प्रशांत भूषण, शाझीया इल्मी, इत्यादींचा उपयोग होता. त्यात सगळा प्रकाशझोत आपल्याकडे रहावा याची त्यांनी काळजी घेतली आणि त्याचा लाभ दाखवून या इतरांनाही मस्तपैकी वापरून घेतले. आता त्यातल्या कोणाची गरज राहिलेली नाही. म्हणूनच सर्व समान या भूमिकेत गर्क असलेल्यांना त्यांची जागा दाखवून देणे आवश्यक होते. त्यासाठी केजरीवाल यांनी नेमका मुहूर्त शोधला होता. पण माध्यमांना तो ओळखताही आलेला मव्हता. दुसर्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यावर केजरीवाल यांनी त्याच त्या व्यासपीठावरून यादव इत्यादींना जाहिर इशारा दिला होता. दिल्ली सोडुन अन्य राज्यात निवडणूका लढवायच्या गमजा करू नका. तो तुमचा अहंकार आहे. त्यापासून दूर रहा. हा इशारा खाजगी बैठकीतही केजरीवाल आपल्या या वरीष्ठ सहकार्यांना देऊ शकले असते. पण त्यांनी जाहिरपणे त्यांचे कान उपटून कोण खरा निर्णयाधिकारी व सर्वाधिकारी आहे, त्याची ग्वाही दिलेली होती. तिथेच आपली उपयुक्तता संपली हे भूषण व यादव यांच्या लक्षात यायला हवे होते. त्यांनी आपला गाशा गुंडाळला असता, तर आज त्यांना असे हिडीसफ़िडीस करून हाकलण्याची वेळ केजरीवाल यांच्यावर तरी कशाला आली असती? यापुर्वी अग्नीवेश, कोणी एक मौलवी यांच्यावरही अशीच वेळ आलेली होती. पण जुने हातपाय आपटत असताना नवे मुर्ख अशा लबाड नेत्याला धार्जिणे असतात. सहाजिकच मुर्खांची जगात कमतरता नसते, यावरच अशा डावपेच व राजकारणाच्या इमारती उभ्या रहात असतात.
रामदेव अण्णांना टांग मारल्यावर योगेंद्र यादवसारखे सहकारी हाताशी आले. त्याचा लाभ उठवून निवडणूकीत यश मिळवल्यानंतर आशुतोष, आशिष खेतान यासारखे सहकारी मिळालेले आहेत. उद्या त्यांचीही गत यापेक्षा वेगळी नसेल. कारण पक्ष वा संस्था संघटना एका कुटील धुर्त व निर्दयी नेत्याच्या लोकप्रियतेच्या बळावर चालत असतात. त्यात हमाली करण्यासाठी मुठभर हुशार बुद्धीमान लोकांची गरज असते. हे शहाणे मोठ्या अभिमानाने ते ओझे उचलून भारवाही होतात. त्यांना वाटत असते की आपल्याला हवे तिकडे आपण गाडी घेऊन जात आहोत. पण ते नुसते जोखड ओढत असतात आणि खरा लगाम त्यांच्यावर स्वार झालेल्याच्या हाती असतो. गरज व उपयोग संपला, की स्वार घोडा वा गाडी बदलून घेतो. केजरीवाल यांनी मागल्या पाच वर्षात आपल्या पोसलेल्या काही हजार स्वयंसेवक व निष्ठावान सहकार्यांच्या मदतीने अशा अनेक शहाण्य़ांना आपली प्रतिमा उंचावण्यासाठी बेमालून वापरून घेतले. गरज संपल्यावर अलगद बाजूला केले. जुन्यांना बाजूला करण्यासाठी नव्या मुर्खांचा वापर केला आणि आताही नवेच ह्या शिकारीतले शिकारी असल्याचे दिसून येईल. हीच तर राजकारणाची गुंतागुंत असते. त्यात उद्याच्या बळींकडून आजच्यांची शिकार होत असते. बुद्धीमंतांची अशी शोकांतिका असते, की ते असल्या जाळ्यात सहजासहजी फ़सत असतात. अगदी विचारपुर्वक मुर्खपणा करीत असतात. प्रत्येक पक्षात संघटनेत व संस्थेत केजरीवाल असतात. जोपर्यंत भुषण व यादव यांच्यासारखे उपयुक्त मुर्ख समाजात मोठ्या संख्येने उपलब्ध आहेत, तोपर्यंत केजरीवालही उदयास येतच असतात. मग पक्ष नवा जुना असो किंवा कॉग्रेस-भाजपा असो. कारण तो अतिशय निर्दयी व्यवहार असतो. तिथे मैत्री, भावना वा नात्याला महत्व नसते. सत्ता हे अंतिम उद्दीष्ट असते. ज्यांना ते उमगत नाही ते फ़सतात व शिकार होतात. नव्या राजकारणाला शिकार करायचे तत्वज्ञान शिकवण्य़ाचा आव आणणारे भूषण यादव, यात स्वत:च शिकार झालेत आणि अजून त्यांना कुठे चुकलो तेच उमगलेले नाही.
योगेन्द्र यादव आणि प्रशान्त भूषण दोघेही केजरीवालच्या कारस्थानाला कसे बळी पडत गेले याचं नेमकं वर्णन !
ReplyDeleteकट्टर वामपंथी विचारसरणीचा यादव प्रत्यक्ष व्यवहारात ’गोडबोल्या’ असण्याचा दिखावा करण्यात इतका वहावत जातो की त्याचं वागणं हास्यास्पद दिसायला लागतं. बिन्नीच्या घरी "खीर" खायला गेलेला यादव काल ’आप’च्या सर्वोच्च मंडळातून डच्चू मिळाल्यावर सुद्धा प्रशान्त भूषणच्या घरी "मिष्टी दोई" खायला गेला होता म्हणे....! लोकांसमोर, विशेषत: मीडियासमोर स्वत:चं ’गोंडस’ व्यक्तिमत्व जपण्याच्या यादवच्या या हव्यासाचा केजरीवालनं मात्र पद्धतशीर उपयोग करून घेत याला नेहमी हरबऱ्याच्या झाडावर चढवलं आणि काम झाल्यावर फेकून दिलं...!