पानसरे यांच्या हत्येला सोमवारी महिना पूर्ण झाला. १६ फेब्रुवारीला सकाळी साडेनऊच्या सुमारास पानसरे दाम्पत्यावर खुनी हल्ला झाला होता. या प्रकरणी उमा पानसरे प्रत्यक्षदर्शी असल्याने त्यांचा जबाब महत्त्वाचा होता; पण प्रकृती अस्वास्थामुळे डॉक्टरांनी पोलिसांना परवानगी दिली नव्हती. रविवारी सकाळी साडेनऊ वाजता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार गोयल यांनी कुटुंबातील सदस्यांच्या उपस्थितीत पानसरे यांच्या घरी जाऊन माहिती घेतली. 'हल्ला झालेल्या दिवशी सकाळी बंगल्यासमोर मी स्वच्छता करत असताना दोन तरुण मोटारसायकलसह थांबले होते. त्यांनी मास्क घातला नव्हता,' असे पानसरे यांनी स्पष्ट केले. त्यानंतर पानसरे यांना व्हील चेअरवरून घटनास्थळी नेण्यात आले. 'फिरून परतताना घराच्या परिसरात थांबलेल्या त्या दोनपैकी एका तरुणाने गोविंदराव पानसरे यांना मोरे कुठे राहतात, असे विचारले. मोरे इथे राहात नाहीत, असे उत्तर पानसरेंनी दिल्यावर मागे बसलेला तरुण छद्मी हसला आणि त्याने गोळीबार केला,' असे उमा पानसरे यांनी सांगितले. 'हल्लेखोर समोरून आले की मागून आले हे आठवत नाही. गोळ्या कुठून व कशा झाडल्या, हे आठवत नसल्याचे त्यांनी सांगितले.
सोमवारच्या वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेली ही बातमी अतिशय गंभीर आहे. कारण प्रथमच कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्याकांडाच्या तपासकामात पहिले पाऊल पुढे पडले आहे. त्यात एक प्रत्यक्षदर्शी साक्षिदार पोलिसांना मिळाला आहे. घटनाक्रम ज्याने साक्षात अनुभवला, असा तो साक्षिदार खुद्द पानसरे यांच्या पत्नीच आहेत. त्यांनी तिथे येऊन पोलिसांना दिलेली माहिती अत्यंत महत्वाची असून, त्याची पोलिसांनी अशी जाहिर वाच्यता करणे अनुचित म्हणायला हवे. कारण त्यामुळे हल्लेखोरांना ओळखू शकणारा हा साक्षिदार धोक्यात येऊ शकतो. अशी माहिती गुन्हेतपासात गोपनीय राखणे आवश्यक असते. तपासात गुन्हेगारांना गाफ़ील ठेवण्याला प्राधान्य असते. त्याचा अभाव यातून दिसतो. पण तेही सध्या बाजूला ठेवल्यास, ह्या हत्येमागची मोडस ऑपरेन्डी लक्षात येऊ शकते. उपरोक्त बातमीतील उमा पानसरेंची विधाने काळजीपुर्वक अभ्यासण्यासारखी आहेत. बंगल्यासमोर त्या स्वच्छता करत होत्या, तेव्हा दोन्ही हल्लेखोर मोटरबाईकवर तिथे थांबलेले होते आणि त्यांचे चेहरे उमाताईंनी बघितलेले आहेत. त्यापैकी कोणी चेहरा लपवलेला नव्हता, त्यासाठी चेहर्यावर कुठले आवरण घातलेले नव्हते. ते कुणाची तरी प्रतिक्षा करत होते. त्यांनी उमा पानसरे यांना काही विचारले नाही, की बातचित केली नाही. पुढे तिथे गोविंद पानसरे येऊन पोहोचले. तोवर हे तरूण गप्प होते. पानसरे फ़ेरफ़टका मारून परतले, तेव्हा त्यांना एका तरूणाने प्रश्न केला, की ‘मोरे कुठे रहातात?’ हाच प्रश्न त्यांना उमा पानसरे यांनाही विचारता आला असता. पण त्यांनी विचारला नाही, ही बाब चमत्कारिक नाही काय? पण पानसरे आल्यावर त्यातल्या एकाने त्यांना प्रश्न विचारला आणि उत्तर ऐकल्यावर त्याचा जोडीदार छद्मीपणाने हसला. त्यानेच मग गोळ्या झाडल्या असा उमा पानसरे यांचा दावा आहे. तोच प्रश्न गोळ्या झाडणार्याने विचारला नाही. किंवा प्रश्न उमा पानसरे यांना न विचारता हे तरूण थांबले होते कशाला? मागच्यानेच हसून गोळ्या झाडण्याचे कारण काय? ह्याची उत्तरे महत्वाची ठरतात.
सुपारीबाज हल्लेखोर वा मारेकरी असतात, त्यांच्या माफ़िया पद्धतीमध्ये अनेकदा मारेकर्याला शिकार कोण तेच ठाऊक नसते. कोणीतरी त्याला बोट दाखवतो आणि मग तो नेमबाज गोळ्या घालतो. जो बोट दाखवतो, त्याला पॉईंटसमन म्हणतात. त्याने इशारा करायचा आणि मारेकर्याने काम उरकायचे. इथे ते दोघे पानसरे यांच्या बंगल्यासमोर येऊन थांबले असले, तरी मारेकर्याला पानसरे कोण ते ठाऊक नव्हते आणि प्रश्न विचारणार्याला पानसरे यांचा चेहरा ठाऊक असणार. म्हणूनच त्याने फ़क्त प्रश्न विचारायचा आणि त्यावर उत्तर देईल तीच व्यक्ती शिकार आहे, हा मारेकर्यासाठी इशारा होता. मोरे तिथे रहात नाहीत असे पानसरे यांनी त्याला उत्रर दिले. त्यालाही वेगळ्या उत्तराची अपेक्षाच नव्हती. कारण मोरेंशी त्याचे काही काम नव्हते. तर ज्याला प्रश्न विचारतोय तीच शिकार आहे, एवढेच पहिल्याला सुचवायचे होते. ही माफ़िया सिस्टीम असते. दुसर्या दिवशी बातम्यातून त्या गोळ्या झाडणार्याला उमगले असेल, आपण काल कोणावर गोळ्या झाडल्या. मारेकरी त्या भागातला नसतो की शिकारीला ओळखतही नसतो. इशारा केला जाईल तिथे गोळ्या झाडून निघून जायचे, इतकेच त्याचे काम असते. त्याची तिथपर्यंत येण्याची व तिथून निसटून जाण्याची संपुर्ण सज्जता सुपारी घेणार्यांनी आधीपासून केलेली असते. तिथे आणणारा पुढे ठराविक जागी नेऊन सोडतो आणि तिथून परक्या राज्यात वा शहरात नेऊन सोडणारी व्यवस्था वेगळी केलेली असते. असे मारेकरी आजकाल एका राज्यातून दुसर्या राज्यात कंत्राट घेऊन स्पेशालिस्ट म्हणून येऊन काम उरकून सुखरूप निघूनही जातात. त्याचे धागेदोरे पोलिसांना मिळेपर्यंत खुनी हजारो मैल दुसरीकडे पोहोचलेला असतो. उमा पानसरेंची साक्ष त्याचीच ग्वाही देते. त्यातला मारेकरी मराठी भाषिकही नसू शकेल. तो नुसता छद्मीपणाने हसला, याचा अर्थच साफ़ आहे. त्याला उत्तरही कळले नाही की प्रश्नही कळलेला नसावा. फ़क्त शिकार कोण त्याचा उलगडा झालेला होता आणि त्याने ठरल्याप्रमाणे गोळ्या झाडल्या.
जेव्हा अशाप्रकारच्या हत्या वा गुन्हे होतात, तेव्हा त्याचा तपास अतिशय नेमकेपणाने करावा लागतो. त्यात भावनांना स्थान नसते. मोडस ऑपरेन्डीचा वेध घेत जायचे असते. ही हत्या सुपारीबाज माफ़िया पद्धतीने झालेली आहे आणि त्यामागे कुणाचे स्वार्थ असू शकतात, त्याला म्हणूनच महत्व आहे. दाभोळकर वा पानसरे यांच्यावर माफ़िया लोक हल्ले करू शकत नाहीत. पण झालेले हल्ले माफ़िया मारेकर्यांनी केलेत, याविषयी मनात शंका येण्याचे कारणच नाही, इतकी सफ़ाई त्यात दिसते. म्हणून उद्देश व लाभार्थी हे दोन शब्द तपासात मोलाचे असतात. अशा व्यक्तींच्या हत्येचा हेतू कोणापाशी असू शकतो आणि त्याचा लाभार्थी कोण, हे बघणे अगत्याचे असते. राजकीय लाभासाठी कोणी माथेफ़िरू हल्ले करतात, पण त्यांच्यात इतकी सफ़ाई असू शकत नाही. ते सहजगत्या मिळू शकणारे पुरावे=साक्षीदार मागे ठेवू शकतात. इथे दोन्ही तरूण कुठलाही मुखवटा न लावता, तिथे काहीकाळ पानसरे यांची प्रतिक्षा करत थांबलेले होते. उमा पानसरे आपले चेहरे लक्षात ठेवतील, अशी भिती त्यांना वाटली नाही. गोळ्या झाडून ते सहजगत्या तिथून निसटले. म्हणजेच दोघेही तिथले ओळखू येणारे चेहरे नाहीत. त्यांना तिथून नजिकच कुठे तरी सज्ज असलेल्या दुसर्या गाडीने निसटण्याची सोय आधीच केलेली असू शकते. गोळ्या कुठून आल्या तेच समजले नाही, असेही उमाताई म्हणतात. याचा अर्थच मारेकरी किती कुशल नेमबाज असावा, याचा अंदाज करता येतो. अशा बाबतीत उमाताईंची विधाने पोलिसांनी प्रसिद्ध होऊ देणे म्हणूनच गैरलागू आहे. त्यात गोपनीयता राखून चित्रकारामार्फ़त चेहरे स्मरणात असतील तसे रेखाटून शोध घेणे उपकारक ठरले असते. जे काही प्रसिद्ध झाले आहे ते मारेकर्यांपर्यंत पोहोचले, तर ते असतील तिथून आपला चेहरामोहरा बदलण्याची काळजी घेतील. म्हणजेच अशा बातमीने तपासकामात अडथळा मात्र निर्माण झाला. आता यात लाभार्थी कोण व कसा त्याचाच शोध पोलिसांनी कसून घेतला तर धागेदोरे सापडू शकतील. महिना उलटला आणि ज्या आंदोलनाचे रान पानसरे यांनी उठवले होते, तो टोलविरोधी लढा थंडावला असेल, तर यातला लाभार्थी कोण असू शकतो, याचा उलगडा अवघड आहे काय?
अत्यंत महत्वाचे ...
ReplyDeleteभाऊ,
ReplyDeleteआपण म्हणता तेच खरे असेल कारण पानसरे कोल्हापूरच्या टोललढ्यात अग्रेसर होते. तेच कारण असावे त्यांच्या खुनाला. असाच तळेगावचे आरटीआय
कार्यकर्ते शट्टींचा खून टोलच्या प्रश्नातून झाला आहे.
आपले विश्लेषण योग्य आहे.