Tuesday, March 10, 2015

जात्यातले आणि सुपातले, सगळे ‘आप’लेच



इन्व्हेस्टीगेशन डिस्कव्हरी नावाची एक नवी वाहिनी हल्ली भारतात बघायला मिळते. त्यात अमेरिकेतल्या विविध पद्धतीच्या गुन्ह्यांचा पोलिसांनी कसून केलेला तपास किंवा अनुत्तरीत राहिलेल्या अनेक गुन्ह्यांचे रहस्य उलगडण्याचा प्रयास केलेला असतो. कुठलीही भूमिका न घेता, अगदी तटस्थपणे तपास कसा करावा आणि कुठे कसा तपास फ़सतो, याचे उदबोधक कथन त्यात बघायला मिळते. याला पकडा, त्याला उचला, अशा मागण्या करणार्‍या उतावळ्यांनी कधीतरी त्या वाहिनीचे कार्यक्रम बघायला हरकत नाही. त्यामुळे गुन्हेतपास व गुन्हा सिद्ध करण्यातले कष्ट त्यांच्या लक्षात येऊ शकतील. त्याच्या विविध मालिकांची जाहिरातही होत असते. अशा एका जाहिरातीतले शब्द लक्ष वेधून घेणारे व तपासाचे सुत्र सांगणारे असेच आहेत. ‘घटनास्थळी कुठेतरी दडी मारून बसलेले पुरावे तुमच्याकडे बघत असतात. पण तुम्ही त्या पुराव्यांना बघू शकता काय?’ असे ते शब्द आहेत. खरेच डोळ्यांना सहज दिसणारे अनेकदा आपण बघू शकत नाही. कारण आपले समोर लक्षच नसते आणि आपल्या मनातील विचारांच्या आहारी जाऊन आपण, समोरच्या घटना बघत वा त्यांचा विचार करत असतो. म्हणूनच समोर असलेले पुरावेही आपल्याला दिसू शकत नाहीत, कारण आपण त्यांच्याकडे ढुंकून बघायलाही राजी नसतो. गेल्या काही दिवसात त्याच विधानाची व शब्दांची वारंवर प्रचिती येते आहे. आम आदमी पक्षातला गदारोळ त्याचेच स्मरण करून देणारा आहे. त्या घटना सर्वच पक्षात सत्तेमुळे घडतात असे सर्वसाधारण मत होणे चुकीचे नाही. पण केजरीवाल यांच्याच भोवती फ़िरणारी लोकपाल चळवळ आणि पुढल्या आम आदमी पक्षातल्या घटना बघितल्यास, त्यामागे एक सुसंगती आढळते. केजरीवाल यांची एकेक विरोधकाला खड्यासारखा बाजूला करण्याची एक मोडस ऑपरेंडी त्यातून बघायला मिळते.

गेल्या आठवडाभरात प्रशांत भूषण व योगेंद्र यादव यांना खड्यासारखे बाजूला करताना केजरीवाल त्यापासून कटाक्षाने दूर राहिले. चालले आहे त्याचा आपल्याला खुप मनस्ताप होतो असेही नाटक त्यांनी झकास रंगवले. पण मुंबईचे त्यांच्या पक्षाचे नेते मयंक गांधी यांनी केजरीवाल यांचा मुखवटा टरटरा फ़ाडून टाकला. कारण राष्ट्रीय कार्यकारीणीच्या बैठकीपुर्वीच केजरीवाल यांनी ठराविक सदस्यांना विश्वासात घेऊन भूषण यादा्व या दोघांच्या विरोधात फ़ुस लावल्याचा खुलासा गांधी यांनी एला ब्लॉगद्वारे करून टाकला. हे दोघे राजकीय समितीत असले तर संयोजक म्हणून आपल्याला काम करणे शक्य नाही, असे केजरीवाल यांनी त्या सदस्यांना आधीपासून स्पष्ट केले होते. म्हणजे़च आपण संयोजक म्हणून हवे असू, तर त्या दोघांना हाकला असाच संदेश दिलेला होता आणि तसेच झाले आहे. केजरीवाल यांचा राजिनामा नामंजूर करण्यात आला आणि राजिनामे द्यायला तयार असलेल्या दोन नेत्यांना अपमानित करून हाकलण्यात आले. ज्याला प्रस्तावात बाजूला करण्यात आले म्हटले आहे. पण संयोजक रहाण्यासाठी केजरीवाल यांची ती अट होती, हेच उघड झाले. अर्थात प्रत्येक पक्षात तसेच होते. पण केजरीवाल यांच्याबाबतीत पक्षाच्या स्थापनेपुर्वी सुद्धा असेच घडत आलेले आहे. त्याचा आरंभ अण्णा टीम असताना स्वामी अग्नीवेश यांच्यापासून झाला. कुणा कॉग्रेस मंत्र्याशी चोरून फ़ोनवर बोलणारे अग्नीवेश यांचा व्हिडीओ प्रसिद्ध झाला आणि हजारो कार्यकर्त्यांनी त्यांना गद्दार ठरवून पळायची वेळ आणली. मग तसाच काहीसा प्रयोग एका मौलवी सदस्यावर झाला. बैठकीत मोबाईलवर चित्रण करत असल्याचा आरोप ठेवून त्यांना बाजूला करण्यात आलेले होते. इतके झाल्यावर एका तटस्थ व्यक्तीने केजरीवाल यांच्यावर ब्लॅकमेलचा आरोप केला होता. पण कोणी त्याची दखल घेतली नाही.

राजू परुळेकर हे रामलिला आंदोलनानंतर अण्णांचा ब्लॉग लिहीत होते. त्यात अण्णा कोअर टीमची फ़ेररचना करणार असल्याचा मजकूर प्रसिद्ध झाला. त्यावरून काहुर माजले होते. अण्णांनी त्या फ़ेरबदलाचा साफ़ इन्कार केला आणि परूळेकर हे वाटेल ते लिहीतात, त्याच्याशी आपला संबंध नाही, असाही दावा केला होता. मात्र परूळेकर यांनी अण्णांच्या हस्ताक्षरातील टिपणेही पुराव्यादाखल दिली होती. पण परूळेकर यांची गच्छंती झाली व त्यांचा आवाज क्षीण केला गेला. आज त्यांच्या आरोपाचे स्मरण होते. अण्णा हजारे यांचेही स्टींग चित्रण केजरीवाल यांच्याकडे असून त्याच्याच बळावर ते अण्णांना ब्लॅकमेल करतात, असा परुळेकरांचा आरोप होता. पुढल्या काळात केजरीवाल यांनी आपल्या जुन्या सहकार्‍यांना खड्यासारखे बाजूला करताना प्रत्येकवेळी असेच बदनाम करणारे पुरावे किंवा अफ़वा समोर आणून त्यांचा काटा काढलेला दिसतो. किंबहूना बदनाम करणारे पुरावे, तशी संभाषणे किंवा चित्रण याच बळावर केजरीवाल आपल्या प्रतिस्पर्ध्यांना गारद करत आल्याचे आढळून येते. आताही योगेंद्र यादव किंवा प्रशांत भूषण यांच्या विरोधात असेच पुरावे समोर आणून त्यांना बदनाम करण्याचा मार्ग पत्करला गेलेला आहे. जणू केजरीवाल हे बदनामीच्या पुराव्यावर आधारीत राजकारणाचे डाव खेळतात, असा नियम होताना दिसतो आहे. योगायोगाने आज त्यांच्या भोवताली वावरणारे विश्वासू सहकारी, त्यातले वाकबगार कलावंत आहेत. लोकसभेपुर्वी मोदी, अमित शहांना बदनाम करायची एक मोठी मोहिम आखली गेली. स्नुपगेट असे ते प्रकरण चोरट्या संभाषणाचे मुद्रण होते आणि त्याचा जनक आशिष खेतान नावाचा पत्रकार मग केजरीवाल यांच्य कृपेने नवीदिल्लीत आम आदमी पक्षाचा उमेदवार झाला होता. तोच आता भूषण व यादव यांच्यावर आरोप करण्यात आघाडीवर आहे. आणि यादव विरोधातला पुरावा नेमका स्नुपगेटसारखा संभाषणाचे मुद्रण आहे.

जनलोकपाल आंदोलनापासून परवाच्या विधानसभा निवडणूकीपर्यंत केजरीवाल यांच्या बहुतांश खेळी बघितल्या तर बदनामी व आरोपांची सरबत्ती इतकाच राहिला आहे. त्यात आपल्यापाशी पुरावे असल्याचे सांगून कोणालाही धमकावणे, हे एकमेव सुत्र राहिले आहे. सोकावलेले शिकारी जनावर शेवटी आपल्याच लोकांवर हल्ला करू लागते, त्यातलाच हा प्रकार नाही काय? इथे राजू परूळेकर यांना श्रेय द्यावे लागेल (मी सुद्धा त्यांच्यावर विश्वास ठेवला नव्हता. उलट परूळेकरांवर तेव्हा मी शंका घेतल्या होत्या. त्याबद्दल आज खेद व्यक्त करणेही माझे कर्तव्य आहे). त्यांनी ह्या भामटेगिरीचा पर्दाफ़ाश तीन वर्षापुर्वी करण्याचा आटापिटा केलेला होता. परंतु त्यांच्यावर कोणी विश्वास ठेवायला तयार नव्हता. पुरावे समोर असतात आणि तुमच्याकडे बघतही असतात. प्रश्न इतकाच, की तुम्ही त्यांना बघू शकता की नाही, यावर सर्वकाही अवलंबून असते. भूषण यांनी पक्षाकडे येणार्‍या शंकास्पद निधी देणग्यांवर प्रश्नचिन्ह लावले होते. यादव यांनी पक्षात वाढत चाललेल्या एकाधिकारशाही वृत्तीला प्रश्न विचारला होता. त्या दोन्ही प्रश्नांची उत्तरे दिली गेली नाहीत. पण केजरीवाल यांच्या सत्तेला व हुकूमतीला आव्हान देणार्‍यांना खड्यासारखे बाजूला करण्यात आले, बाजूला करताना त्यांनाच बदनाम करण्याच्या मोहिमा चालवण्यात आल्या आहेत. शाझिया इल्मी वा इतर लोकांना बाजूला करताना केजरीवाल यांनी बाजूला राहून ते काम यादव-भूषण यांच्याकडून करून घेतले होते. आताही त्याच दोघांचा काटा काढण्याचे काम त्यांनी आशुतोष-खेतान, संजय सिंग यांच्याकडुन करून घेतले आहे. उद्या त्यांची पाळी येईल, तेव्हा केजरीवाल कोणाचा हत्याराप्रमाणे वापर करून घेतील? काल सुपात होते ते आज जात्यात आहेत. एकूणच या पक्षाची व केजरीवाल यांची वाटचाल एखाद्या माफ़िया टोळीसारखी आहे. तिथे बॉसला उलटा प्रश्न विचारणार्‍यांची खैर नसते. प्रश्न कोणता याला महत्व नाही, प्रश्न विचारणेच गुन्हा असतो. मग अशा पक्षाला राजकारणात कितीकाळ भवितव्य असेल?

3 comments:

  1. हम्म, सत्य आहे . यांच्या नाडी लागलेल्या लोकांचे अवघड आहे .

    ReplyDelete
  2. भाऊराव,

    परूळेकरांनी अण्णांच्या हस्ताक्षरातील टिपणेही पुराव्यादाखल दिली होती त्याचा दुवा इथे आहे :

    https://rajuparulekar.wordpress.com/2011/11/14/appeal-from-a-traitor-annajis-conviction-and-action/

    आपला नम्र,
    -गामा पैलवान

    ReplyDelete