साक्षी सप्तसागर यांच्या एका सत्यकथनाच्या पोस्ट संबंधी मी आधीच काही शंका घेतल्या आहेत, तशा त्यांच्या पोस्टवरही टाकल्या होत्या. त्याचे उत्तर मिळाले नाही. मात्र आधीच तिथे साक्षीताईंची जी टिंगल टवाळी चालली होती त्याला माझ्या आक्षेपांनी जोर चढला. फ़ेसबुक व सोशल माध्यमातून अशी हमरातुमरी आता नित्याचीच बाब झाली आहे. तिथल्या लिखाणाचे गंभीर वाचन होत नाही, की त्यावरचे आक्षेपही गंभीरपणे मांडले जात नाहीत. एका बाजूचे वा ठराविक भूमिकेतले सदस्य दुसर्या भूमिकेवर तुटून पडतात. कधी काही लोक मुलभूत मुद्दे उपस्थितही करतात, पण त्याचे कोणी उत्तरही देत नाही. बहुतांशी उखाळ्यापाखाळ्या काढण्याचाच प्रकार चालतो. त्यासाठी फ़ेसबुकर्सना दोष देणे मला रास्त वाटत नाही. समाजातील प्रतिष्ठीत व मान्यवर लोक जसे वागतात, त्याचे बाकीची लोकसंख्या अनुकरण करत असते. टिव्हीच्या वाहिन्या व तिथल्या चर्चा बघितल्या, तर सोशल माध्यमातील उखाळ्यापाखाळ्यांचा आदर्श कुठून आला, त्याचा अंदाज येऊ शकतो. प्रस्थापित माध्यमात बुद्धीमान लोक तेच करतात. त्याचे थोडे विस्कळीत स्वरूप इथे आढळते. पण त्यात विचार, विषय व आशय मारला जातो. परिणामी चर्चा वा विषयांची अधिकच घसरगुंडी होते आहे. त्यासाठी कोणा एकाला दोष मी देणार नाही. पण जे आपली शक्ती, वेळ व बुद्धी अशा उखाळ्यापाखाळ्य़ांसाठी खर्च करतात, त्यांना आपल्या होणार्या नुकसानाची जाणिव व्हावी असे वाटले, म्हणून ह्या एका पोस्ट संदर्भात अधिक लिहावेसे वाटले. तसे मागल्या ब्लॉगमध्ये मी सूचित केले होते. पण तात्काळ अनेकांनी मलाच उर्जा वाया घालवू नये असा सल्ला दिला. कारण त्यांच्या मते सदरहू साक्षी सप्तसागर ही प्रोफ़ाईल बोगस आहे. असेलही, पण तसेच असेल, तर बाकीच्यांनी त्या प्रोफ़ाईलकडून लिहिल्या जाणार्या विषयावर इतके खवळून विरोधात वा बाजूने कशाला लिहावे? म्हणूनच मला ज्यांनी सल्ला दिला त्यांच्या सदिच्छा मी नाकारत नाही. पण माझा हेतू त्यांच्या लक्षात आलेला दिसत नाही. माझा हेतू वाचकांची जाण व सजगता यांच्याशी संबंधित आहे. कारण खरे वा खोट्या प्रोफ़ाईलच्या लोकांकडून असे काही मुद्दाम डिवचणारे लिहीले जाते, तेव्हा त्याच्यावर तुटून पडण्यापेक्षा आधी ते बारकाईने वाचले जावे. त्यातला खरेखोटेपणा डोळसपणे समोर आणावा. तो आणला गेला तरच अशा लिखाणाला आळा घातला जाऊ शकेल. खोटे असेल तर त्याची विश्वासार्हता निर्विवाद संपवणे अगत्याचे आहे. जर वाचक डोळस, चिकित्सक व चोखंदळ झाला, तरच अशा लिखाणाला प्रतिसाद मिळणार नाही आणि त्याला पायबंद घातला जाऊ शकेल. त्यासाठीच नमूना म्हणून ह्या पोस्टची मी निवड केली आहे. साक्षी सप्तसागर यांच्यावर तुटून पडलेल्या वा त्यांचेही समर्थन करणार्या किती लोकांनी ती पोस्ट गंभीरपणे बारकाईने वाचली आहे? असेल तर त्यात प्रत्येक वाक्यागणिक व ओळीगणिक असलेला विरोधाभास ओळखता आला पाहिजे होता आणि त्यावर झोड उठवली गेली पाहिजे होती. समर्थकांनी शंकास्पद ठरवल्या गेलेल्या मुद्दे व विषयावर भक्कम पुरावे द्यायला हवे होते. त्याचा दोन्हीकडून अभावच दिसला.
केवळ याच हेतूने मूळ पोस्टवर मी शंका नोंदवल्या होत्या आणि सदरहू पोस्ट लिहीणार्याला त्याचा प्रतिवाद करता आला नाही. उलट उत्तर देण्यापेक्षा धन्यवाद मानावे तशी प्रतिक्रिया आली. हे असे केवळ सोशल मीडियातच चालते का? रोजची वर्तमानपत्रे वा वाहिन्यांवरच्या बातम्या चर्चा यातला खोटेपणा वा थापेबाजी आपण किती ओळखू शकतो? नुसती कुणाला पेडन्युज वा विकावू पत्रकारिता असे म्हणून आपली सुटका होऊ शकते का? मग त्या थापा मारणारे वा दिशाभूल करणारे आणि त्याचे विरोधक यांच्यात कुठला फ़रक उरला? एखादा लेख वा पोस्ट आपल्या ठरलेल्या भूमिकेला छेद देणारी आहे, म्हणून आरोप वा प्रत्यारोप केल्याने आपण खरे ठरत नाही वा समोरचा खोटा पडत नाही. आपल्याप्रमाणे ठोस शब्दात लिहू बोलू न शकणारा प्रचंड वर्ग व लोकसंख्या आपल्या समाजात आहे. मात्र ती लोकसंख्या अशी दिशाभूल करणार्यांना वाटते तितकी मुर्ख वा बेअक्कल नाही. मागल्या लोकसभा निकालांनीच त्याची ग्वाही दिलेली आहे. नुसत्या माध्यमातील खोट्या गदारोळाने जनता फ़सत असती, तर माध्यमातल्या सेक्युलरांची बारा वर्षाची अपप्रचाराची मोदीविरोधी तपस्या अशी निष्फ़ळ झाली असती काय? उलट इथे साक्षी सप्तसागर वा इतरत्र सेक्युलर पत्रकार यांनी संघाच्या विरोधात काहूर माजवून जितकी संघाची खरीखोटी ओळख देशाच्या कानाकोपर्यात नेली, तितके काम संघाचे प्रचारक पन्नास वर्षात करू शकले नव्हते. कुठलाही प्रचार वा अपप्रचार काही प्रमाणात हानिकारक वा लाभदायक असतो. पण त्याचा अतिरेक उलटे परिणाम देणारा असतो. संघाच्या विरोधातल्या अतिरेकी प्रचाराने लोकांच्या मनात त्याविषयी कुतूहल निर्माण झाले नसते तर त्याच्याविषयी खरेखोटे तपासायचा प्रयत्नही झाला नसता. खोटा प्रचार झाला आणि प्रत्यक्षात संघ लोकांच्या सान्निध्यात आला, तो उपकारक असल्याचे जाणवल्यानेच मागल्या तीनचार दशकात संघाचा पसारा वाढत गेलेला आहे. नुसत्या प्रचारकांकडून इतका विस्तार संघाला शक्य झालाच नसता. म्हणूनच जे कोणी संघाचा खोटा बागुलबुवा करतात, त्यांचे संघानेही आभारी राहिले पाहिजे. संघ समर्थकांनीही ॠणी राहिले पाहिजे. मुळात संघाचे नावच ठाऊक नसेल, तर पहिल्यापासुन आपली ओळख करून द्यावी लागते ना?
याचीच दुसरी बाजू अशी, की संघावर टिका करण्याला वा आक्षेप घ्यायलाही अनेक जागा आहेत. कुठलीही संघटना वा गोष्ट परिपुर्ण नसते. त्यात दोष व त्रुटी असतात. त्यावर बोट ठेवले तर बिघडत नसते. पण खोटेच आरोप केले आणि सत्य समोर आले, मग आरोप करणार्याची विश्वासार्हता संपून जात असते. माध्यमात घुसलेल्या सेक्युलर पत्रकारांनी त्याच विश्वासार्हतेला सुरूंग लावला, त्याचा लाभ मागल्या निवडणूकीत भाजपा व मोदींना सर्वाधिक मिळाला आहे. किंबहूना त्याचे मोठे श्रेय साक्षी सप्तसागर यांच्यासारख्यांना आहे. त्यांनी बिनबुडाचे लिहील्याने बोलल्याने अन्यत्रचे लोक फ़सतात. पण लालबाग-काळचौकी अशा परिसरातल्या लोकांचा विश्वास साक्षी सप्तसागर गमावून बसतात. आज लालबाग असेल, उद्या बोरीवली वा मुलूंडबद्दल असेच लिहीले जाते. क्रमाक्रमाने त्या त्या भागातील अशा लिहीणार्या बोलणार्यांची विश्वासार्हता संपुष्टात येते. आधी ती सेक्युलर पक्षांनी गमावली आणि मागल्या निवडणूकीत माध्यमांनी गमावली. म्हणून त्यांच्या लिहीण्याचा विरोध करू नये वा आक्षेप घेऊ नये, असे माझे अजिबात म्हणणे नाही. कुठल्याही बाजूने दुसर्याला खोटे पाडताना शिव्याशाप देऊन वा नुसते प्रत्यारोप करून विश्वास संपादन करता येत नाही. तुमचा युक्तीवाद, प्रतिवाद, पुरावे किंवा प्रत्यारोप, आक्षेप भक्कम व सत्याधिष्ठीत असायला हवेत. आणि त्यासाठी ज्याच्यावर हल्ला करत आहात त्याचे लिखाण काळजीपुर्वक बारकाईने वाचून समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर्काने तरी समजून घेता येते काय, त्याचाही तपास केला पाहिजे. नसेल तरच पुरावे व तर्कानेच प्रतिवाद केला पाहिजे. त्यासाठी साक्षी सप्तसागर यांची पोस्ट मला उत्तम नमूना वाटला. कारण त्याच्या इतके पाठोपाठचे विरोधाभास मला आयुष्यात कुठल्याच लेख वा लिखाणात वाचायला मिळालेले नाहीत. पहिल्या वाक्यापासून शेवटच्या वाक्यापर्यंत भाषा आकर्षक असली तरी पदोपदी शब्दागणिक त्यात परस्परविरोध ठासून भरलेला आहे. पण त्यांच्यावर तुटून पडलेल्या बहुतांश कोणीच एकाही विरोधाभासावर बोट ठेवले नाही. याचे कारण आजकाल छापून येते वा बोलले जाते त्याचे बारकाई्ने गंभीर वाचन वा परिशीलनच होत नाही. गंभीरपणे वाचावे कसे आणि त्यातले दोष वा खोटेपणा दिशाभूल ओळखावी कशी, याचा वस्तुपाठ म्हणून या पोस्टमधून देता येईल. साक्षीताईंनी लिहीलेल्या पोस्टची शब्द व वाक्यानुसार आपण छाननी पुढल्या काही भागात म्हणूनच करू. मग दोष त्यांना देण्यापेक्षा आपल्या उतावळ्या वाचनशैलीचा दोष आपल्यापैकी अनेकांच्या लक्षात येऊ शकेल. (अपुर्ण)
साक्षीताई यांची मूळ पोस्ट पुढील दुव्यावर
http://jagatapahara.blogspot.in/2015/03/blog-post_30.html
धन्यवाद भाऊ. वाचकाने डोळस, चिकित्सक व चोखंदळ असले पाहिजे याची जाणिव करून दिल्याबद्दल. आपल्यासारखे विचारी व विवेकी लेखक आणि डोळस, चिकित्सक व चोखंदळ वाचकच अंतिमतः भारतातील सेक्युलॅरिझमचा आणि सेक्युलर लोकांचा बुरखा फाडून त्यांचे खरे स्वरूप जगासमोर आणू शकेल व त्यांच्या तावडीतून भारतीयांची मुक्तता करू शकेल.
ReplyDelete