Monday, March 30, 2015

एक सुंदर कथा आणि काही शंका (लेखांक पहिला)(‎Marathi Facebooker's(फेसबुक वरील मराठी माणसासाठी) च्या सौजन्याने
 Sakshi Saptsagar
4 hrs · Mumbai · Edited
१९९२-९३ चा काळ ..नऊ-दहा वर्षाची असेन मी.. त्यावेळी आमचे वास्तव्य लालबागच्या बावला कंपाउंडमध्ये होते.. (माझ्या दहावीनंतर मग आम्ही बांद्राला शिफ्ट झालो).. गणेश टोकीज मागचे आमचे बावला कंपाउंड म्हंजे सगळी कामगार वस्ती.. खासकरून कोकणातील लोक जास्त. सकाळ झाली कि रेडिओवरील गाण्यांबरोबर "फटकी इली तुझ्या तोंडावर..मायझया.. निम्बार चडला तरी अजून उतानो पडलास " या शब्दांनी परब काकूंच्या तोंडाचा पट्टा चालू व्हायचा. आमच्या ३ मजली बिल्डींगसमोर ( बिल्डींग कसली चाळच ती) परबांचे बैठे कौलारू घर होते..३ बिर्हाड होती घरात, त्यामुळे नेहमी भांडणे तर चालूच असायची. मन्याचेहि (मनोहर परब) त्यातील एक बिर्हाड. २ काका-काकू, त्यांची पोरे आणि मन्याची आई (वडील वारलेले) असे १०-१२ जण एकत्र रहायचे. मन्या तसा चुणचुणीत तरुण ..साधारण २५-२६ वर्षे वय असेल त्याचे त्या वेळी.. अभ्यास सोडून बाकी सगळ्या गोष्टींत पारंगत. ..भोवरे..गोट्या..पतंग..हुतुतू..काही-काही म्हणू नका..मन्याचा हात कोणीच धरूच शकणार नाही. क्रिकेट म्हणजे तर त्याचा जीव कि प्राण .. आमच्या लाल मैदानातील क्रिकेटचा तो अनभिषक्त सम्राटच होता.. असे म्हणत कि, मन्या ब्याटिंगला आला कि समोरच्याच सद्गुरु-सदन मधील पोरी मन्याला पहायला खिडक्यांवर येवून थांबत. मन्याने फटकावलेल्या प्रत्येक चेन्डूनजीक त्या घायाळ होवून जात.
पण, मला मन्या आठवतो तो दर रविवारी लाल मैदानात सकाळच्या संघाच्या प्रार्थनेला जाणारया वेशात.. त्यावेळी आमच्या लाल मैदानात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शाखा लागायची (आता ती बंद पडली बहुतेक).. परिसरातील अनेक शाळा-महाविद्यालयातील तरुण शाखेत जायचे.. मन्याहि जायचा .. संघाचा तो सफेद रंगाचा शर्ट.. खाकी हाफ नीकर (चड्डी), डोक्यावर काळी टोपी..हातात दंड. त्या वेशात मन्या अगदी युद्धावर चाललेल्या जवानासारखाच भासे मला.. अशी काय गोष्ट आहे कि हे मन्यासारखे अनेकजण त्या लाल मैदानातील शाखेत जातात याचे नेहमीच कुतूहल माझ्या बालमनाला वाटे..कधीतरी आपणही तेथे जावे..शाखा काय असते ते पहावे असेही वाटे. पण, शाखेत सर्व पुरुषच मंडळी दिसत असल्याने माझी तशी कधी हिम्मत झाली नाही.
मन्या मात्र नियमित जायचा ..शाखेत जावून आल्यावर तर त्याचा जोश काही आगळाच.. तिन्हीसांज झाली कि आम्हा दहा-बारा लहान मुलांना बिल्डींगच्या जिन्यांवर जमवून काही-बाही बौद्धिक देत असे. लोकमान्य टिळक, साने गुरुजी, छत्रपती शिवराय, बाजीराव पेशवे आदी इतिहासपुरुषांवर भरभरून बोलत बसे... "नमस्ते सदा वत्सले मातृभूमे त्वया हिन्दुभूमे सुखं वर्धितोहम् । महामङ्गले पुण्यभूमे त्वदर्थे पतत्वेष कायो नमस्ते नमस्ते ।। " संघाची हि देशभक्तीने ओतप्रोत भरलेली प्रार्थना त्याने आमच्या कडून घोकून-घोकून पाठ करवून घेतली होती. आम्हीही पुढे पुढे त्याला मनोहर शिक्षक असे गमतीने म्हणू लागलो होतो... तोहि त्याला हसून दाद देई.
१९९२-९३ चा तो काळ .. मुंबईमध्ये हिंदू-मुस्लिम दंगलीला सुरुवात झाली होती. मुंबई पेटायला लागलेली. इथून-तिथून काही बाही बातम्या यायच्या ..आज इथे दंगल पेटली..उद्या तिथे जाळपोळ झाली. वर्तमानपत्रेही रक्तरंजित बातम्यांनी सजू लागली होती..आमचे आई वडील आम्हाला दोन दोन -तीन तीन दिवस बाहेर जायलाही मज्जाव करत.. कधी मधी सर्व शांत झाले कि पुन्हा शाळा सुरु होई..त्यानंतर पुन्हा मधेच दंगे.. पुन्हा काही दिवस शांतता..मग पुन्हा शाळा, हे असे काही दिवस सुरूच होते.
एक दिवस आम्ही शाळेत असतानाच आमचे शेजारी सुर्वे काका अचानक शाळेत आले.. त्यांचा अमितही आमच्याच शाळेत शिकायचा.. दंगल पुन्हा उसळली होती..सुर्वे काका त्यांच्या अमितबरोबर मलाही घरी न्यायला आले... म्हणाले, "तुझ्या आईने तुलाही घरी आणायला सांगितलेय, चल घरी". आम्ही वर्गशिक्षिकेची परवानगी घेवून घराकडे ट्याक्सीने निघालो.. गणेश टोकीजचा रस्ता पोलिसांनी आधीच बंद करून ठेवलेला त्यामुळे आम्हाला पुढून रंगारी बदक चाळीच्या समोरून यु टर्न मारून ट्याक्सी घ्यावी लागली.. यु टर्न मारून रंगारी बदक चाळीसमोर असलेल्या मस्जिदिसमोर येवून ट्याक्सीवाल्याने ट्याक्सी थांबवली, म्हणाला" साहब, इधरसे आप चलके जाव, मै अंदर नही आता".
तिथे उतरण्यावाचून पर्याय नव्हता ..आम्ही उतरलो आणि पाहतो तर काय, चक्क मन्या आणि त्याच्यासह इतर काही पोरे त्या मस्जिदिच्या शिखरावर हातात भगवे झेंडे घेवून चढली होती..आरोळ्या ठोकत होती, ' मंदिर वही बनायेंगे'..जय श्री राम...हमसे जो टकरायेगा...'
मी सुर्वे काकांना बोट दाखवत म्हटले, " काका, तो पहा मन्यादादा वरती चढलाय " .. काकांनी क्षणभर वर पहिले आणि 'चल घरी' असे खेकसत मला घरी घेवून गेले.. मी घरी गेले तरी रात्रभर तो मस्जिदिवर चढलेला मन्या काही डोक्यातून जातच नव्हता ..काय करत होता तो तिथे ?..कशाला चढला होता तो वर? ..अनेक प्रश्न माझ्या बालमनाला पडत होते.
दोनेक महिन्यांपूर्वी पुन्हा लालबागला जाण्याचा योग आला होता .. तशी मी अधून मधून तेथून पास होतच असते पण यावेळी तेथूनच जवळ असलेल्या महाजन वाडीत एका कस्टमरकडे गेले होते. काम संपल्यावर तशीच पायी-पायी निघाले आणि नजीकच असलेल्या त्याच मस्जीदिपाशी येवून थांबले.. मस्जीदीलाच लागूनच आता एक 'अगरवाल' हलवायाचे दुकान झाले आहे.. हलवायाने गरम गरम समोसे आणि स्वीट कचोरया काढल्या होत्या. न राहवून मी दुकानापाशी गेले व म्हणाले," भैया २ समोसे आणि २ कचोरी पार्सल देना..चटणी एक्स्ट्रा"..पैसे काढण्यासाठी हातातील ब्यागमधील पर्स चाचपू लागले तोच, कानावर पाठीमागून आवाज पडला " आपा, अल्लाह के नाम पे कुछ दे दो..आपा !!!" मस्जिदिच्या भिंतीला खेटून बसलेल्या भिकारयांतील एक जण उठला होता..माझ्याकडे हात पसरून पैसे मागत होता. अचानक पाठीमागून आलेल्या आवाजाने मी दचकले अन मागे वळून पहिले.. रात्रीच्या वेळी रिकाम्या फलाटावरून जोरात भोंगा मारत जाणाऱ्या मालगाडीच्या आवाजाने जो अचानक धक्का बसतो तसा धक्का मला मागे वळताच बसला.. मी स्तब्ध झाले.. "होय, तो मन्याच होता..आमचा मन्या .. आमच्या कंपाउंडचा हिरो" ..काय हि त्याची हालत आज.. वाढलेली खुजी दाढी, मातीने बरबटलेले कपडे, डोक्यावर सफेद रंगाची फाटकी गोल टोपी,पायात स्लीपर अन तोंडाला येत असलेला दारूचा दर्प ... तो हात फैलावून माझ्याकडे पाहत होता.. अल्लाह च्या नावाने नावाने भिक मागत होता. त्याने पुन्हा एकदा विचारले "आपा ..मदद ".. क्षणभरासाठी मी भानावर आले.. हातातील हलवायाने परत दिलेले उरले पैसे त्याच्या हातावर नकळत ठेवले... त्याने मन भरून दुवा दिली आणि पुन्हा खाली बसला. त्याच्याकडे वळून पाहतच मी तेथून पाउल उचलले.. क्षणभरासाठीच वर मस्जिदिच्या घुमटाकडे पाहिले.. चांदतारा अधिकच डौलाने फडकत होता.
...मान खाली घालून बस-स्टोपच्या दिशेने मी निघाले.. कानात एकच ओळ घुमत होती .. "नमस्ते सदा वत्सले मातृभूमे त्वया हिन्दुभूमे .....माझ्या काही किरकोळ शंका

१) रंगारी बदक चाळी समोर मशीद आहे. पण तिथे कुठला य़ूटर्न आहे? पुर्वी ट्राम आणि नंतरच्या काळात डिव्हायडर. तिथून कुठे आणि कसे वळणार? काळाचौकी नाका सोडून रंगारी बदक चाळीपर्यंत जायचेच कशाला? सिग्नलपाशी राईट टर्न घेऊन दत्ताराम लाड पथावरून बावला कंपाऊंडकडे जाता येते. मात्र तिथे मशीद लागत नाही.
२) लाल मैदानात संघाच्या शाखेत कधी कोणी गणवेशात आलेला तरूण लालबागकराने कित्येक वर्षात बघितला नाही.
३) कोकाटे मास्तरांचा मंडप डेकोरेटरचा व्यवसाय त्याच कंपाऊंडमधला. त्यांच्याकडून तोंडी मन्याचे नाव कधी आले नाही.
४) १९६० पासून लाल मैदानात अनंत मालवणकर क्रिकेटचे सामने भरवायचा, पण तिथल्या चाळीतल्या पोरींनी कधी क्रिकेट बघितलेले आठवत नाही. सदगुरू सदनमध्येच कृष्णा देसाई हत्याकांडातला एकमेव आयविटनेस प्रकाश पाटकर वास्तव्य करत होता. त्याच्याही तोंडी कधी मन्याचे नाव आले नाही.
५) नवहिंद बाल मित्र मंडळ हे प्रसिद्ध नाट्यमंडळ त्याच बावला कंपाऊंडमधले. मधू आंगचेकर, बागवे अशा कामगार कलावंतांनी कधी मन्याची गोष्ट सांगितली नाही.
६) नेमक्या कुठल्या शाळेतून सुर्वेकाका मुलांना घेऊन आले? दंगलीत टॅक्सी मात्र छानपैकी फ़िरत होत्या आणि रंगारी बदक चाळीच्या पुढेच जायला घाबरत होत्या? पुढे असला काय धोका होता?
७) जगभरच्या मशिदीला घुमट असतात. शिखर असलेली बहुधा पहिलीच मशीद असावी ही जगातली.
८) बहुतेक मशिदीपाशी भिकारी नेहमीच असतात. पण या मशीदीच्या दारातच एक (घासवाला) दुधाचे दुकान साठ वर्षे आहे. तिथे कधीच भिकारी बसलेला दिसणार नाही. कारण अन्य मशीदीलगत असतात, तसे भटारखान्याचे हॉटेल तिथे कधीच नव्हते.
ता.क. -आता मुद्दाम हा ‘आपा’कडे भिक मागणारा मन्या शोधायला उद्याच मशिदीला भेट देईन. बावला कंपाऊंडमध्येही परब-सुर्व्यांचा शोध घ्यायची अतीव इच्छा जागी झालीय.
=============================


(‎Marathi Facebooker's या ग्रुपवर Sakshi Saptsagar यांची उपरोक्त अत्यंत ‘मन’नीय सत्यकथा वाचनात आली. मात्र माझ्या आयुष्यातील अर्धशतकाचा काळ त्यातील घटनास्थळाच्या परिसरात गेलेला असल्याने खुप गोष्टी खटकल्या आणि त्याविषयी शंकासमाधान व्हावे म्हणून त्याची तपशीलवार कॉमेन्ट त्यांच्या पोस्टवर टाकली. पण माझ्या शंकांचे निरसन साक्षीताईंनी केले नाही. उलट त्यांना दखल घेतल्याचेच कौतुक वाटले. त्यांची आलेली प्रतिक्रीया पुढील प्रमाणे

Sakshi Saptsagar भाऊंच्या लेखणीचा स्पर्श माझ्या पोस्ट ला झाला - धन्य जाहले आज मी !

साक्षीताईंना माझ्या कॉमेन्टचे वाटलेले कौतुक बाजूला ठेवून त्यांची कथा विचार करणार्‍या प्रत्येक विवेकी फ़ेसबुकरने वाचावी असे माझे प्रामाणिक मत आहे. उत्तम चिकित्सक वाचक निर्माण होण्याच्या दिशेने टाकलेले ते पाऊल असेल. म्हणूनच मूळ लेखासह माझ्या कॉमेन्टला ब्लॉगरुप दिले आहे

=====================================

यानिमीत्ताने एकूण त्यांचा लेख पुन्हा वाचला आणि मी सुद्धा किती वेंधळा वाचक आहे त्याची जाणीव झाली. त्याबद्दलचा तपशीलवार खुलासा नंतर करीन. पण असे काही संदर्भहीन लिखाण अलिकडल्या पिढीतली पत्रकार वा बुद्धीमान झालेली पिढी का करते, त्याची चिंता वाटली. म्हणूनच या निमीत्ताने अधिक काही लिहायचा विचार आहे. विविध सेक्युलर माध्यमे आणि समर खडस यासारखे भुंकणारे प्रतिष्ठीत झाल्याचा तर हा दुष्परिणाम नसेल? खरेच पत्रकार, माध्यमकर्मी, विश्लेषक व जाणता वाचक अशा सर्वांनीच गंभीरपणे विचार करण्याची ही परिथिती नाही काय? साक्षीताई नक्कीच महाराष्ट्र टाईम्स गंभीरपणे वाचत आणि त्यातल्या लिखाणाचे अनुकरण करत असाव्यात अशी शंका येते. म्हणूनच त्याबद्दल अधिक तपशीलात शिरणे अगत्याचे झाले आहे.

4 comments:

 1. Marathi Facebooker's(फेसबुक वरील मराठी माणसासाठी ) Link -
  https://www.facebook.com/groups/kaustubhsgroup/

  क्लोज्ड ग्रुप आहे.सर्च मध्ये नाही सापडला तर मला रिक्वेस्ट टाका. माझ्या फ्रेंडलिस्ट मध्ये आलात कि add केले जाईल --Admin Marathi FB

  ReplyDelete
 2. Dear Bhau
  Ya bhakad kathecha chada nakki lavach...
  Asalya sandarbh-hin likhanatun kiti chukicha message jato he kadhi kalayach kay mahit.
  Asalya bhakakathancha group na join kelelech bar.

  ReplyDelete
 3. भाऊराव,

  रास्व संघात गेलेला शेवटी भिकेला लागतो हेच सांगायचंय या भाकडकथेतून !

  आता एक खरी कथा सांगतो. तुम्ही कदाचित ऐकली असेल याअगोदर. माहीमला मुस्लिम वस्तीपाशी मकरंद सहनिवास नावाचं मराठी लोकांचं संकुल (= हाऊसिंग सोसायटी) आहे. शिवाजी पार्कावरून समुद्रकाठच्या वीर सावरकर मार्गाने जसजसे उत्तरेस सरकावे तसतशी हिंदू (बरीचशी मराठी) वस्ती कमीकमी होत जाते आणि कापडबाजारानजीकची मुस्लिम वस्ती वाढू लागते. तर मकरंद संकुल हे हिंदू वस्तीचं शेवटचं टोक. त्यापुढे सगळी मुस्लिम वस्ती आणि तिच्या मधोमध माहिमचा दर्गा आहे. हा दर्गा अतिशय सुप्रसिद्ध आहे. पाकिस्तानी क्रिकेटपटू मुंबईत असले की आवर्जून तिथे हजेरी लावायचे.

  १९९२-९३ च्या दंगलींत मुस्लिमांनी मकरंदवर हल्ल्याचा प्रयत्न केला. तिथल्या लोकांनी लोखंडी गेट बंद करून आतून दगडांची रास रचली. तसेच क्रिकेटच्या ब्याटी, हॉकी स्टिक्स, ट्यूबलायटी वगैरे गोळा करून ठेवल्या होत्या. पण मुस्लिमांकडे मनुष्यबळ बरंच होतं. दंगेखोरांना परतून लावणं हळूहळू कठीण पडत चाललं होतं. हे सारं पोलिसांच्या डोळ्यासमोर झालं. त्या वेळेस आपले माननीय मुख्यमंत्री हे तत्कालीन आयुक्त बापट यांच्या बदलीत गुंतले होते.

  मकरंद संकुल उघड्यावर पडलं होतंच. आता दंगेखोर त्या छोट्याश्या गेटवरून उडी मारून आत यायचा अवकाश होता. मग त्यांना संकुलातल्या पाचही इमारतींचा घास घेता येणार होता. इतक्यात संध्याकाळ झाली आणि संचारबंदी लागू झाली. निरुपायाने मुस्लिम मागे हटले. दुसऱ्या दिवशी सकाळी वचपा काढायचे बेत शिजू लागले. मुस्लीम वस्तीच्या पुढे उत्तरेस भाई बंदरकरांची कोळी वसाहत होती. तिथून हा संग्राम दिसत होता.

  रात्री ऐन संचारबंदीत त्या शूर कोळ्यांनी उघडपणे मुस्लिम वस्तीवर आक्रमण केलं आणि धमकी दिली. जर मकरंदला हात लावलात तर दर्गा जाळून टाकू. या निश्चयाची खात्री पटवण्यासाठी म्हणून एका मुस्लिम मालकाची लाकडाची वखार जाळून टाकली. ती त्या दंगलीत मुंबईत लागलेली सर्वात मोठी आग होती. दुसऱ्या दिवशी सकाळी तिचा धूर म्हणे अंधेरीवरूनही दिसत होता.

  मुस्लिमांना शिक्षा झाल्यामुळेच मकरंद संकुल आणि त्यातल्या १२० कुटुंबांच्या अब्रूचं रक्षण झालं. एव्हढा बोध पुरेसा आहे.

  आपला नम्र,
  -गामा पैलवान

  ReplyDelete
 4. शेवटी दंगली या वाईटच . राम मंदीर हा काय एवढा इंपॉसिबल विषय नाही आहे . सामोपचाराने होउन जाईल राममंदीर . पण दगडांसाठी माणसांचे जीव जाणे योग्य नाही .

  ReplyDelete