Saturday, March 28, 2015

चार दिवस रडून घ्यागुरूवारी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत उपांत्य फ़ेरीचा दुसरा सामना भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला गेला. त्यात अर्थातच भारताचा विजय होणार ,अशी क्रिकेटप्रेमींची समजूत होती. तशी समजूत असण्यात गैर काहीच नाही. कारण ज्यांना त्या खेळातले काही कळत नाही, त्यांच्यासाठी जय-पराजय इतकीच बाब महत्वाची असते. मग त्यांना आपला देश वा आपला संघ जिंकण्याचा हव्यास असला, तर नवल कुठले? सहाजिकच खेळाची शैली वा उत्तम खेळ, याच्याशी त्यांना कुठले कर्तव्य असायचे? अशी मनस्थिती वा श्रद्धा असली, मग जिंकण्य़ाला महत्व असते. जो जिंकतो तोच शिकंदर, अशी ती मानसिकता असते. त्यात घोडा जिंकणाराच असावा लागतो. जोवर असा घोडा जिंकतो, तोवरच त्याचे कौतुक चालते आणि त्याने पराभूत होण्याची चुक केली, मग तेच चहाते त्याच्यावर शिवीगाळीचा वर्षाव करत असतात. गुरूवारी भारताचा त्या उपांत्य फ़ेरीत तसाच पराभव झाला आणि कौतुक बाजूला ठेवून त्याच लाडक्या खेळाडूंवर जो शिव्यांचा वर्षाव सुरू झाला, त्याचे हेच कारण आहे. क्रिकेट वा त्याची महता कोणाला होती? कारण आपल्या देशात क्रिकेट हा धर्म आहे असे म्हणतात आणि धर्म म्हटला, की जाण वा बुद्धी दुय्यम व श्रद्धा निर्णायक होते. इथेही तीच स्थिती आहे. अर्थात अशा क्रिकेट भक्तांना उत्तम खेळ बघायची मनोवृत्ती असून कसे चालेल? तसे जाणते चहाते असतील, तर गल्ला भरणार कसा? जो सोहळा गल्ला भरण्यासाठी असतो, तिथे भक्तांचा मेळा भरवायला लागतो. मग तिथे बाबांनी चमत्कार दाखवावा लागतो. तो खरा नसला तरी चालतो, पण तसा आभास तरी व्हायला लागतो. इथे दोन्ही गोष्टींचा अभाव असला, मग दिवाळे वाजणारच ना?

पण त्याची दुसरी बाजूही आहे. पापभिरू भक्तांना नुसत्या चमत्काराची गरज नसते. त्यांना आपल्या आयुष्यातील नाकर्तेपणा, पोकळपणा वा वैफ़ल्याला झाकण्यासाठी अशा कुठल्यातरी नशेची, समजुतीची गरज असते. ती आसाराम वा अन्य कुठल्या बापू फ़कीरापाशी मिळणार नसेल, तर दुसर्‍या मार्गाने मिळवावीच लागते. कधी अशी झिंग क्रांतीच्या, चळवळी, आंदोलनाच्या रुपाने मिळत असते; तर कधी खेळातल्या अटीतटीच्या सामन्यातून मिळत असते. आपले कर्तृत्वहीन कर्तव्यशून्य जीवन झाकून ठेवण्याची पळवाट खुप आवश्यक असते. गेल्या दोन दशकात जी आर्थिक सुबत्ता तळागाळापर्यंत पोहोचली आहे, त्यातून मोठ्या लोकसंख्येला ही पळवाट खुप आवश्यक होत चालली आहे. जी मागणी असते ती पुरवणारे व्यापारी दुकानदार मग दुकान थाटणारच. भारतात तीन दशकापुर्वी जगमोहन डालमियांनी ती बाजारपेठ प्रथम ओळखली आणि त्यातून हा नवा बाजार उभा राहिला. १९८३ सालपर्यंत भारतात कोणा सामान्य माणसाला क्रिकेट माहित असले व आवडत असले, तरी विश्वचषक म्हणजे काय तेही ठाऊक नव्हते. पण त्यावर्षी तिसर्‍या स्पर्धेत कपील देवच्या संघाने जो उलटफ़ेर केला आणि प्रथमच बाद फ़ेरी गाठली; तेव्हा हे खुळ देशात पसरू लागले. दूरदर्शन हीच एक वाहिनी होती आणि अंतिम सामन्यात पोहोचलेल्या भारताचा सामना दाखवायलाही उपग्रह दुवा मिळू शकला नव्हता. अशा देशात आज क्रिकेट अब्जावधीच उलाढाल करणारा बिझीनेस झालाय, ते उगाच? इंग्लंडच्या प्रुडेन्शीयल कंपनीने पुढल्या स्पर्धेला प्रायोजित करणार नसल्याचे सांगून टाकले, तर डालमियांनी त्याचे यजमानपद मागून घेतले. पाकिस्तान श्रीलंकेच्या मदतीने आयोजन करताना त्यांनी हा खेळ किती अफ़ाट कमाई करून देऊ शकतो, याचे प्रात्यक्षिक घडवले आणि भारत क्रिकेटवेडा देश होऊन गेला. आज जगातल्या क्रिकेटमध्ये पैशाच्या नाड्या भारताच्या हाती आहेत, इतके खुळ खेडोपाडी पसरले आहे.

असो. मुद्दा इतकाच, की उपांत्य फ़ेरीतील भारताच्या पराभवाने फ़ारसे बिघडलेले नाही. म्हणूनच अनेक जाणत्या समालोचक व टिकाकारांनीही भारतीय संघाचे पराभवानंतरही कौतुकच केले. कारण याच संघाने सलग सात सामने जिंकून भारतीयांना आनंद दिलेला होता. प्रत्येक सामना जिंकणे शक्य नसते आणि जय-पराजय हे खेळाचे अविभाज्य अंग असतात. पण ज्यांना त्यातले काहीच कळत नाही, त्यांच्यासाठी जय-पराजय निर्णायक महत्वाचा असतो. म्हणूनच मग आता पराभवाची मिमांसा चालू आहे. आक्रोश व मातम चालू आहे. कारण आज भारतातले क्रिकेटवेडे हे त्या खेळाचे चहाते-रसिक नाहीत. त्यांच्यासाठी भारतीय संघ म्हणजे रजनीकांत असतो. त्याला काहीच अशक्य नसते आणि सर्व शक्य असलेच पाहिजे. म्हणूनच आता रविवारी अंतिम सामना न्युझिलंड व ऑस्ट्रेलिया यांच्यात होऊन गेल्यावरही भारतात उपांत्य फ़ेरीचे सुतक चालूच राहिल. दोन आठवड्यात आयपीएलचा मोसम सुरू झाला, मग यातल्या कोणाला उपांत्य फ़ेरी आठवणार नाही. उलट त्याच ऑस्ट्रेलियाचा कोणी खेळाडू मुंबई वा कोलकाता संघातून चौके-छक्के मारील, त्यावर उड्या पडू लागतील. कारण जे कोणी मैदानात खेळतात ती माणसे कुठे असतात? ते कोंबड्याची वा बैलाची झुंज असते, त्यातले मोहरे असतात. त्यांच्या एकमेकांना रक्तबंबाळ करणार्‍या आक्रमकतेतून येणार्‍या उन्मादाला आपण क्रिकेटप्रेम समजून बसलो आहोत आणि त्या झुंजी आयोजित करणार्‍यांना क्रिकेटचे व्यवस्थापन म्हणून आपण मान्यता दिलेली आहे.

आपला देश आणि समाज किती चमत्कारिक आहे ना? इथे कोंबड्याच्या झुंजीत रक्तबंबाळ होण्याने विव्हळणारे रडतात आणि बैलाच्या शर्यतीत त्या मुक्या प्राण्याला दारू पाजून झिंग आणून झुंजायला लावले जाते, म्हणून गळा काढणारेही आपल्यातच आहेत. पण लाखो कोट्यावधी रुपयांची पुडकी देऊन साक्षात क्रिकेटपटू नामक मनुष्य प्राण्याला अमानुष खेळ करायला रिंगणात उतरवले जाते; त्याचे आपल्याला भान उरलेले नाही. एका सामन्यानंतर दुसर्‍या सामन्याला हजेरी लावताना खेळ, झोप आणि विश्रांतीचे शारिरीक घड्याळ बिघडून जाते, अशी तक्रार धोनीनेच केली. त्यावर साधी चर्चा तरी झाली कुठे? कोण चेंडू छातीवर आपटून मैदानातच गतप्राण झाला, त्ती घटना त्याच ऑस्ट्रेलियातली ना? तेव्हा संघातल्या इतर खेळाडूंच्या डोळ्यात ओघळलेल्या अश्रूंचे किती कौतुक झाले होते? दोन महिन्यात त्याच कांगारू वा अन्य देशातील खेळाडूंपैकी कोणाला त्या गतप्राण झालेल्याचे नाव तरी आठवले काय? त्याला खांदा देणारेच गुरूवारी छाती फ़ुगवून मैदा्नात नाचत होते आणि सात सामन्यात अजिंक्य राहिले, ते एका पराभवाने माना खाली घालून माघारी निघाले होते. भोवतालच्या कोट्यवधी लोकांच्या भावनात कुठेतरी ओलावा होता काय? एका बाजूला विजयाचा उन्माद होता आणि दुसर्‍या बाजूला पराभवाने डिवचलेली सूडाची भावना प्रज्वलीत झाली होती. तिचाही निचरा आठवड्याभरात होईल. श्वापदाने आपल्यातल्या एका जीवाला उचलून नेल्यानंतर तटस्थपणे काही क्षण त्याच्या तडफ़डीकडे बघणार्‍या व पुन्हा निमूट चरायला लागणार्‍या कळपापेक्षा आपल्या सामुहिक भावना तरी किती वेगळ्या आहेत? तेव्हा चार दिवस काय ते रडून घ्या. दोन आठवड्यांनी आयपीएलचा धिंगाणा घालायचा आहे ना?

No comments:

Post a Comment