Monday, March 23, 2015

कोल्हापूर ते कोलार: संशयकल्लोळकोलार या कर्नाटकच्या जिल्ह्यात कलेक्टरनेच आत्महत्या केली आणि लोकांचा संताप त्यांना रस्त्यावर घेऊन आला. सर्वसाधारणपणे आपल्या देशात प्रशासन आणि सरकारी अधिकार्‍याविषयी लोकांमध्ये राग असतो, नाराजी असते. सरकारी खात्यातला माणुस म्हणजे भ्रष्टाचारी, अशी एक ठाम समजूत होऊन बसली आहे. त्याच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकच्या कोलार येथील जिल्ह्याधिकार्‍याच्या आत्महत्येने लोक इतके विचलीत व क्षुब्ध व्हावेत, हे नवल म्हणायला हवे. नुसते नाराज झालेले नाहीत, तर कुठल्याही पक्ष वा संघटनेच्या पुढाकाराशिवाय ते लोक रस्त्यावर आले आणि त्यांनी ही आत्महत्या स्विकारायला नकार दिला आहे. त्यामागे कुठले तरी षडयंत्र असल्याचा राग लोकांना अस्वस्थ करून गेला आहे. एक अत्यंत कर्तव्यदक्ष धाडसी अधिकारी आत्महत्या करील, हेच लोकांना पटलेले नाही. म्हणूनच मग त्या मृत्यूचे कारण आत्महत्या असल्याचे पोलिसांनी बोलून दाखवताच, लोकांच्या संयमाचा बांध फ़ुटला आणि हजारोच्या संख्येने लोक रस्त्यावर उतरले. मात्र लोकांच्या भावनांचा आदर करून कर्नाटकच्या सरकारने त्याचा तपास सीबीआयकडे द्यायला हवा होता. कारण असा संशय व लोकक्षोभ सिंहासने उध्वस्त करतो, याचे इतक्या लौकर राजकारण्यांना विस्मरण झाले आहे. तीन वर्षापुर्वी अशाच एका प्रक्षोभाने दिल्लीला वेठीस धरलेले होते. एका सामुहिक बलात्काराच्या घटनेने लोकांना रस्त्यावर आणले आणि त्याचे नेतृत्व कुणा राजकीय पक्ष वा संघटनेने केलेले नव्हते. त्यातूनच दिल्लीसह देशात कॉग्रेसला देशोधडीला लागायची वेळ आली. आताही कर्नाटकात त्याच पक्षाचा उन्मत्त मुख्यमंत्री लोकभावनेला पायदळी तुडवत मस्तवालपणा दाखवतो आहे. त्याचे परिणाम नजिकच्या काळात दिसतीलच. पण पुन्हा एकदा या अधिकार्‍याच्या मृत्यूने तेच प्रश्नचिन्ह अधिक मोठे करून समोर आणले आहे.

महाराष्ट्रामध्ये लागोपाठ अशा काही हत्या झाल्या आणि त्याच्याही पुर्वी अन्य राज्यात अशा हत्या वा संशयास्पद मृत्यू झालेले आहेत. त्यामागे खेळले गेलेले राजकारण बाजूला ठेवले, तरी त्यातून निर्माण झालेल्या भयंकर प्रश्नांची उत्तरे शोधणे भाग आहे. अशा प्रत्येक हत्येमागे काही एक अस्पष्ट प्रवृत्ती साकार होते आहे. यातल्या बहुतेक हत्या वा मृत्यूमागे कुठल्या ना कुठल्या पैसेवाल्या मस्तवालपणाचा हात दिसतो आहे. आपण सत्ता व पैशाच्या बळावर काहीही करू शकतो, अशा समजूतीमध्ये वागणार्‍या प्रवृत्तीचा हा उद्दामपणा आहे. महाराष्ट्रामध्ये सतिश शेट्टी याने गैरलागू मार्गाने टोलवसुली करण्याच्या घोटाळ्याला हात घालण्याची हिंमत केली होती, तर कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी कोल्हापुरातील भरमसाट टोलवसुलीच्या अन्याय्य सक्तीच्या विरोधात आंदोलनाचा एल्गार छेडलेला होता. कोलारचा जिल्हाधिकारी डी. के. रवी त्याच मार्गाने चाललेला होता. तो कार्यकर्ता वा आंदोलक नव्हता इतकेच. पण त्याने निवडलेली दिशा नेमकी तशीच होती. जनतेच्या पैशाची व संपत्तीची मोकाट लूट करण्याच्या प्रवृत्तीला त्याने आपल्या प्रशासकीय अधिकारात आव्हान देण्याची हिंमत केलेली होती. काही बिल्डर व विकासक म्हणून जे सत्तेसह पैशाचे मस्तवाल थैमान चालू आहे, त्याला रोखण्याची हिंमत रवीने केलेली होती. त्याने निर्धास्तपणे चाललेल्या या लूटमारीला रोखण्यासाठी कायद्याने दिलेला अधिकार वापरण्याची हिंमत केली होती. मुद्दा सगळीकडे तोच आहे. सत्ता आणि पैसा असलेल्यांना कोणी रोखण्याचे धाडस करू नये. तसे करायला गेलात, तर वाटेल त्या पद्धतीने तुमचे निर्दालन केले जाईल. गोळ्या घातल्या जातील किंवा अन्य मार्गाने काटा काढला जाईल. मावळमध्ये अतिरिक्त पाणी पळवण्याच्या प्रयत्नांना रोखणार्‍यांना पोलिसांनीच गोळ्या घातल्या होत्या. पानसरेंना अज्ञात मारेकर्‍याने गोळ्या घातल्या.

एकूण प्रकार बघितला, तर त्यामागे विकास व बांधकाम व्यवसायात, खाणी व उपसा अशा कामात गुंतलेल्या कंपन्या व व्यावसायिकांचे हितसंबंध गुंतलेले लपून रहात नाहीत. अवैध स्वरूपाची जी झटपट कमाई चालू झाली आहे, त्याला नियम-कायदे वा अन्याय म्हणून कोणी रोखू बघणार असेल, तर त्याची खैर नाही. अ़साच संदेश त्यातून दिला जात आहे. अशा वेळी त्यामागचे हात शोधून खरे सुत्रधार समोर आणणे अगत्याचे आहे. उपरोक्त अधिकार्‍याने ज्यांच्या विकासकामाला जाब विचारण्याचे धाडस केले, त्यातून त्याचा बळी घेतला गेला. असेच लोकांना वाटते आहे. रवी याने ज्यांना चाप लावला होता, त्यात अनेक राजकीय नेते व त्यांचे आप्तस्वकीय गुंतलेले आहेत. कर्नाटकचे गृहमंत्री ज्या कंपनीशी संबंधित आहेत, तिलाच रवीने रोखलेले होते. ज्या कंपनीला वाळू उपसा थांबवायचे आदेश दिले, तिच्या मालकीणीचा पिताच कॉग्रेसचा लोकसभेतील गटनेता आहे. अशावेळी रवीच्या आत्महत्येचे रहस्य किती लपू शकते? ज्याच्या कारवायांनी भरभरून वहाणार्‍या तिजोर्‍यांना टाळे ठोकले जाते, त्यांच्यावर आत्महत्येची पाळी येऊ शकते. असे टाळे ठोकणार्‍याने आत्महत्या कशाला करावी? याचे पुर्ण भान स्थानिक जनतेला आहे, म्हणूनच नुसत्या कोलार जिल्ह्यातच नव्हे, तर संपुर्ण कर्नाटकात या अधिकार्‍याच्या मृत्यूने संतापाची लाट उसळली आहे. याचे कारण स्पष्ट आहे. त्यामागचे कारस्थान वा लबाड्या लोकांना समजू शकल्या आहेत. त्यामागची खुनी प्रवृत्ती लोकांना उमगली आहे. तसेच रहस्य शेट्टी वा पानसरे यांच्या हत्येमागे असल्याचे लोकांना समजावणे शक्य झाले असते, तर इथेही त्यापेक्षा सौम्य प्रतिक्रिया उमटली नसती. कोल्हापुरातच नव्हेतर राज्यभरच्या टोलवसुलीच्या घोटाळ्याला पानसरे आव्हान होऊन उभे राहिले होते. त्यांचा तिथला लढा यशस्वी झाला असता, तर सगळ्याच टोलवसुलीला लगाम लागला असता.

जसे रवीच्या मृत्यूला कोलारचे काही व्यावसायिक वाळू माफ़िया कारण आहेत, तसेच पानसरे यांच्या हत्येमागेही तशीच कारणे असू शकतात. पण पहिल्या दिवसापासून या हत्याकांडाला राजकीय रंग चढवून त्यामागच्या खर्‍या हिडिस चेहर्‍यांना झाकण्याचे पाप झालेले आहे. म्हणूनच चार वर्षे उलटून गेल्यावरही सतिश शेट्टीच्या हत्येचा सुगावा लागलेला नाही. तशीच पानसरे यांची हत्या रहस्य बनत चालली आहे. त्याविषयी जितका सार्वत्रिक प्रक्षोभ दिसायला हवा होता, तसा होऊच शकला नाही. त्याला सरकार नव्हेतर काही मोजके मतलबी राजकारणी जबाबदार आहेत. आपापले क्षुल्लक राजकीय डाव साधण्यासाठी अशा हत्येचे राजकारण करण्यात आले आणि त्यामागे असलेल्या खर्‍या मतलबावर पांघरूण घातले गेले आहे. एका समर्पित व्यक्तीमत्वाचे जीवन उखडून टाकण्यात आले आहे. त्यातून राजकीय डावपेच खेळण्याला अर्थच नाही. तो त्या व्यक्ती इतकाच समाजावर अन्याय आहे. रवी याच्या मृत्यूनंतर संतप्त होऊन लोक रस्त्यावर कशाला उतरले? आपल्या वतीने तो माणुस एका हेतूने लढत होता, याची जाणिव लोकांना होती. तीच जाणिव कोल्हापूरकरांसह महाराष्ट्रातल्या सामान्य जनतेलाही नव्हती, असे कोणाला म्हणायचे आहे काय? कोल्हापूरला टोलमुक्त करण्यात पानसरे यशस्वी झाले असते, तर उर्वरीत महाराष्ट्रालाही त्याचा पुढल्या काळात लाभ झाला असता. पण त्यासाठी त्यांची हत्या झालीच नाही, असा तर्क मांडला गेल्यावर लोकांनी काय समजावे? दुसरा रवी मिळणे दुरापास्त असल्याने लोक रस्त्यावर येतात, तसेच आपल्यासाठी लढणारा दुसरा पानसरे नसल्याच्या जाणिवेने इथेही काहुर माजले असते. पण मुठभर राजकारण्यांनी ते होऊ दिले नाही आणि पानसरेंचे हौतात्म्य राजकीय वेदीवरचा बळी होऊन गेले. एक रहस्य होऊन बसले. यासारखा त्या समर्पित जीवनावर अन्य कुठला भीषण अन्याय आजवर झालेला नसेल.

No comments:

Post a Comment