Sunday, March 1, 2015

पानसरे नावाचे विचार आणि हत्यार

Swami Laxmananda Saraswati

जेव्हा आपल्याकडे कुठल्याही प्रश्नाची उत्तरे नसतात, तेव्हा चलाख व लबाड माणसे मूळ प्रश्नच बदलण्याची केविलवाणी धडपड करू लागतात. कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येनंतर त्या कृत्याचा तात्काळ निषेध सर्वांनीच केला होता. कुठल्याही हिंसक हत्येचा व हिंसाचाराचा निषेध व्हायलाच हवा. पण मग त्याचवरून चर्चा होताना दोन तट पडायचे कारण काय? जेव्हा निषेधकर्त्यातला एक गट दुसर्‍या निषेधकर्त्यालाच खुनी वा हल्लेखोर ठरवू लागतो, तेव्हा हत्येचा विषय बाजूला पडून आरोपबाजीला सुरूवात होत असते. कुठल्याही गुन्हा वा हत्येचा तपास हे सामान्य माणसाचे काम नसते. ते पोलिसांचे कर्तव्य असते. अशावेळी कोणाकडे त्यासंबंधी पुरावा वा साक्षीदार असेल तर त्याला पोलिसांकडे घेऊन जाणे किंवा तपासात मदत करणे; हे त्याचे कर्तव्य असते. त्याऐवजी कोणी भलत्याच कोणावर बिनबुडाचे आरोप करू लागला आणि त्यासाठी जुने संदर्भ देऊ लागला, तर काय करायचे? त्यातला खरेखोटेपणा तपासायचा नाही काय? दाभोळकर असोत की पानसरे असोत, त्यांच्या हत्येनंतर विनाविलंब हल्ल्याचा आरोप हिंदूत्ववाद्यांवर सुरू झाला. अशा आरोपानंतर पोलिसांनीही त्या दिशेने तपास केला, आरोप झालेल्यांना ताब्यात घेऊन चौकश्या केल्या. पण कुठलाही पुरावा सापडू शकलेला नाही. आरोप करणार्‍यांनीही त्यासाठी कोणी पुरावा आणुन देण्याचे कष्ट घेतलेले नाहीत. सहाजिकच त्यापैकी कोणाला पानसरे वा दाभोळकरांच्या हत्येचे महत्व वाटत नसल्याचे स्पष्ट होते. त्यापेक्षा झालेल्या हत्येचा राजकीय लाभ उठवण्याचा अश्लाघ्य हेतू मात्र अशा आरोपबाजीतून स्पष्ट समोर येतो. एका निष्पाप व्यक्तीच्या हत्येचा गुन्हा जितका निषेधार्ह असतो, तितकाच त्याच्या हत्येपासून राजकीय लाभ उठवण्याचा हेतूही निषाधार्ह असतो. म्हणूनच त्या निषेधाच्या मुखवट्याआड लपलेल्या विकृत प्रवृत्तीचा बुरखा फ़ाडणे अगत्याचे होऊन जाते.

पानसरे यांच्या हत्याकांडानंतर तेच घडत गेले. म्हणून अशा प्रकरणांचा व त्यात गुंतलेल्या लबाड प्रवृत्तीचा पर्दाफ़ाश करणे अगत्याचे झाले. किंबहूना तेच तर पत्रकारितेचे कर्तव्य असते. आजवर बहुतांश वेळी पुरोगामी मुखवटे लावूनच वावरणार्‍या बहुतेक पत्रकार, विचारवंतांनी त्यात नेहमीच कसूर केली आहे. म्हणूनच कॉम्रेड पानसरे हयात असताना त्यांच्या विचारावर कधी वाहिनीवर चर्चा झाल्या नाहीत की कुठल्या वृत्तपत्राने त्यावर सांगोपांग चर्चा घडवण्याचा प्रयासही केला नाही. पण त्यांची निर्घॄण हत्या झाल्यावर मात्र या तमाम पुरोगामी माध्यमांना पानसरेंच्या वैचारिक लढाईचा पुळका आला. कारण त्यांच्यासाठी एक निर्घॄण हत्येला महत्व नव्हते, त्यापेक्षा हिंदूत्ववादी संघटनांना झोडण्यासाठी अशी हत्या हे धारदार हत्यार म्हणून हाती लागले होते. सहाजिकच त्या प्रयत्नाला खिळ घालणारा कोणी लेखक पत्रकार असेल, तर त्याचे लेख अशा हत्याराची धार बोथट करत असतात. म्हणून पानसरे हत्येच्या निमीत्ताने इथे जो पुरोगामी वा कम्युनिस्ट हिंसाचाराच्या जुन्या इतिहासाचा पाढा वाचण्याचा प्रयत्न झाला, त्यामुळे अनेक सेक्युलर पुरोगामी पत्रकार कार्यकर्ते विचलीत झाले तर नवल नाही. कारण त्यांनी सातत्याने सत्य लपवून ठेवत ज्या खोट्या आभासांना सत्य ठरवण्य़ाची कसरत चालविली होती, तिलाच अशा लिखाणाने तडा जात असते. हे कसे नित्यनेमाने चालू असते, त्याची शेकडो उदाहरणे आहेत. त्यातला एक आक्षेप असा की वैचारिक भूमिका वेगळी आणि एका ऐंशी वर्षाच्या म्हातार्‍याची निर्घृण हत्या वेगळी. खरेच आहे. पण मग अशी हत्या झालेले पानसरे पहिलेच आहेत काय? अशी करूणा इतर म्हातार्‍यांच्या हत्येनंतर पुरोगाम्यांनी कधी व किती दाखवली? ओरिसा राज्यात फ़ादर स्टेन्स नामक धर्मोदेशकाची निर्घृण हत्या दारासिंग नावाच्या हिंदूत्ववादी गुंडाने केली. याचा दिर्घकाळ गवगवा माध्यमातून झाला होता. पण ती ओरीसातली एकमेव हत्या होती?

त्याच ओरीसात त्यानंतर लक्षमणानंद सरस्वती नावाच्या म्हातार्‍याची हत्या झालेली होती. कधी कोणी त्याचा उहापोह माध्यमातून केला होता काय? आज पानसरेंसाठी गळा काढणार्‍यांना फ़ादर स्टेन्सचा खुनी दारासिंग लगेच आठवेल. पण लक्ष्मणानंद नावाच्या म्हातार्‍याचा खुनी आठवणार नाही. कसा आठवेल? त्याच्या बातम्याच द्यायच्या नाही. सव्यसाचि पंडा नावाच्या नक्षलवादी नेत्यावरही त्या हत्येचे अरोप होते. कधी यापैकी कोणा पुरोगाम्याने पंडाचे नाव सांगून गळा काढला? कशाला काढला नाही? त्यावर माध्यमातून उहापोह कशाला झाला नाही? खुनाची प्रवृत्ती हिंदूत्ववादी असते, तशीच मार्क्सवादी व पुरोगामी सुद्धा असते. पण त्यात हिंदूत्ववादी मारला गेला, मग सगळे पुरोगामी मौनीबाबा होऊन जातात. कशाला मौनी होतात? लक्ष्मणानंद म्हातारा नव्हता? रहात्या आश्रमात त्याच्या शरीराची खांडोळी करून त्याला ठार मारण्यात आले, तेव्हा ज्यांच्या तोंडी निषेधाचे चार शब्द उमटले नाहीत, त्यांनी हिंसेच्या विरोधात आरोळ्या ठोकण्यात अर्थ असतो काय? आज त्यांनी म्हातार्‍याच्या हत्येनंतर इतिहास कशाला उगाळता म्हणणे, बदमाशी नसते काय? सगळीकडून बघितल्यास हे लोक पक्के बदमाश असल्याचे पुरावे मिळू शकतात. मग आपली बदमाशी लपवण्यासाठी त्यांना अपवादात्मक उदाहरणे हवी असतात. त्यामुळेच मग पानसरे यांच्यासारख्या प्रामाणिक अहिंसक माणसाच्या हत्येचे भांडवल करायला हे बदमाश लोक हिरीरीने पुढे येतात. त्यांना पानसरेंच्या विचार विवेकाशी अजिबात कर्तव्य नसते. म्हणूनच त्यांनी आपापल्या हाती असलेल्या विविध साधनांचा उपयोग कधीच पानसरे यांच्या विचारांना प्रोत्साहन करण्यासाठी होऊ दिलेला नाही. मारले जाईपर्यंत अशा पुरोगाम्यांनी कितीदा वा कुठे कुठे पानसरे यांच्या पुस्तके व विचारांचा उल्लेख केला होता?

हल्लेखोर व मारेकरी नुसत्या देहाची हत्या करतात, त्यापेक्षा भयंकर हे लोक असतात, जे विचारांची हत्या करतात. पानसरेंच्या बाबतीत असे दिसेल, की आज त्यांच्या विचारांसाठी गळा काढणार्‍यांनी सहसा पानसरेंच्या विचारांना आपले तयार व्यासपीठ कधी उपलब्ध करून दिलेले नव्हते. पानसरे यांचे विचार इतके प्रगल्भ असताना त्यांना किती वाहिन्यांनी देशातल्या विविध घडामोडींसाठी वेळोवेळी आपल्या कार्यक्रमात सहभागी करून घेतले? तसे केले असते, तर पानसरे यांचे प्रगल्भ विचार शेकडो नाही तर लाखो लोकांपर्यंत सहजासहजी पोहोचू शकले असते. कुठल्या छछोर अभिनेत्री वा अभिनेत्याच्या मुलाखतीवर कित्येक तास वा वृत्तपत्राचे रकाने खर्च करणार्‍यांनी पानसरे यांना किती स्पेस दिला होता? फ़ेसबुक वा तत्सम सोशल माध्यमात किती लोकांनी आजवर पानसरे यांच्या विविध मतांवर भूमिकांवर मतप्रदर्शन केले होते? हिंसेसाठी त्यांना लक्ष्मणानंद या वृद्धाच्या हत्येचा राग येत नाही, तर पानसरेंच्य हत्याकांडाची चिड कशाला येईल? त्यांच्यासाठी पानसरेंची हत्या ही एक राजकीय संधी असते. आणि हीच अतिशय संतापजनक हिणकस प्रवॄत्ती आहे. कारण पानसरे यांच्या विचारापेक्षा त्यांना पानसरेंच्या हत्येचे अप्रुप असते. यापैकी कितीजणांनी पानसरेंचे विचार वाचले व त्याचे मनन केले आहे, याचीच शंका आहे. तसे केले असते तर पानसरे इतिहास नव्याने उलगडून सांगत होते हे लक्षात येईल आणि म्हणूनच इतिहासाचे महत्व या बोंबल्यांना उमगले असते. मग त्यांना राजकीय इतिहासातील हिंसाचाराचे स्मरण का महत्वाचे आहे, त्याचाही साक्षात्कार झाला असता. पण त्याची यांना गरजच काय? ज्यांना जिवंत पानसरे यांच्यापेक्षा त्यांच्या हत्येचे भांडवल करायचे असते. त्यांना त्यांच्या विचारांशी कुठले कर्तव्य असणार? त्यांना पानसरे नावाचे हत्यार हवे असते, विचार नकोच असतात.

3 comments:

  1. "माझा नथुराम” । जीव घेत नाही ॥
    जीव देत नाही । “जीव खातो” ---- ॥१॥

    बंद करायला । “बापूंची दुकाने” ॥
    “गोडसे” नव्याने । येतो आहे. ---- ॥२॥

    नक्कीच होणार । केव्हा तरी बंड ॥
    होणारच थंड । गांधीवाद ---- ॥३॥

    कुणी झाले ”बापू” । कुणी झाले “चाचा” ॥
    जनतेने वाचा । बंद केली ---- ॥४॥

    बोचती जगाला । युध्दाचेच काटे ॥
    रोज टाळ्या पिटे । अमेरिका ---- ॥५॥

    आरपार म्हणे । करुया लढाई ॥
    मारली बढाई । म्हातार्‍याने ---- ॥६॥

    कधी सोडले हो । अतिरेकी त्याने ॥
    मित्रत्वाची जाणे । व्याख्या तोच ---- ॥७॥

    नोबेल शांतीचे । हवे होते त्याला ॥
    डोई जड झाला । त्याचा शौक ---- ॥८॥

    बारबाला छान । कमावती पैसे ॥
    कापुनिया खिसे । जनतेचे ---- ॥९॥

    जरा कुठे थोडा । लागताच डोळा
    रंगला सोहळा । ढेकणांचा ---- ॥१०॥

    कुणी मंत्री म्हणे । “नको बार बाला” ॥
    दगड मरिला । पोळ्यावरी ---- ॥११॥

    स्टाईलीत मोठया । झुरके मारतो ॥
    मागून खोकतो । तासंतास ---- ॥१२॥

    कारसेवकांना । बंदुकीची गोळी ॥
    नेत्यांसाठी पोळी । पुरणाची ---- ॥१३॥

    रामाचे मंदीर । हवे हो कशाला ? ॥
    हवा फक्त “त्याला” । मालपोवा ---- ॥१४॥

    खरोखरी त्यांचा । वेळ नाही जात ॥
    घेती ‘गुजराथ’ । रवंथाला ---- ॥१५॥

    गुद्गुल्या झाल्या । पुन्हा म्हध्य-राती ॥
    झुरळे भलती ॥ प्रमेळ हो ---- ॥१६॥

    “घर-वापसी” ची । झोंबे “त्यांना” मिर्ची ॥
    बुडा खाली खुर्ची । तापली हो !! ॥ ---- ॥१७॥

    श्वानाच्या शेपटा । बांधून फटाके ।
    “फंटर गली के” । झाले “भाई” ---- ॥१८॥

    “मुन्ना-भाई त्यांचा” । निरागस आहे ॥
    आतिरेकी आहे । यादगार …. ---- ॥१९॥

    - यादगार

    ReplyDelete
  2. पानसरे यांनी यांनी शिवकाळाची मांडणी त्यांच्या सोयीनुसार केली, यामध्ये आश्‍चर्य नाही. भारताच्या स्वातंत्र्यापासूनच हा प्रकार घडत आला आहे. इस्लामची चिकित्सा कोणत्याही परिस्थितीत टाळणे हा तर या स्वघोषित बुद्धिप्रामाण्य वाद्यांचा अत्यंत आवडता छंद आहे. कारण वस्तुनिष्ठता व परखड बुद्धिवाद यांच्या आधाराने केलेल्या इस्लामच्या चिकित्सेमधून येणारी उत्तरे समाजवाद्यांच्या सैद्धांतिक भूमिकेस सोयीची नाहीत. परंतु खरी समस्या दुसरीच आहे. डाव्या परंपरेमधून निर्माण करण्यात आलेल्या इतिहासाच्या दांभिक मांडणीचा शास्त्रशुद्ध प्रतिवाद करणे, काही सन्माननीय अपवाद वगळता स्वत:स हिंदुत्ववादी म्हणवून घेणाऱ्या विचारवंतांस जमलेले नाही. शिवाय त्यांच्या मांडणीमध्येही खास हिंदु मानसिकतेमधील काही पूर्वग्रह आहेत. शिवाय, डाव्या इतिहासकारांच्या तुलनेमध्ये उजवे मानले जाणाऱ्या इतिहासकारांनीही इस्लाम वा मध्ययुगीन इतिहासासाठी आवश्‍यक असलेल्या अस्सल साधनांचा अभ्यास किती केला आहे, याविषयी शंका आहेच. यामुळेच भारताच्या इतिहासाविषयी परकीयांनी लिहिलेली पुस्तके, ग्रंथ अधिक विश्‍वासार्ह मानले जातात. कारण त्यामध्ये संपूर्ण वस्तुनिष्ठता असते, असे नव्हे; तर अभ्यासाच्या दृष्टीने ते हिंदुत्ववाद्यांच्या तुलनेत अधिक परिपूर्ण असतात. तेव्हा पानसरे यांच्यासारख्या डाव्या विचारवंतांची विचारसरणीच देशाचा अधिकृत इतिहास मानण्याच्या घडलेल्या प्रक्रियेस हिंदुत्ववादी म्हणवून घेणारेही तितकेच जबाबदार आहेत, हे बाब ध्यानी घ्यावयास हवी.

    ReplyDelete