Tuesday, March 3, 2015

ओंकारेश्वराचा कावळा



गेल्या गुरूवारी माझ्या भिंतीवर कधी नव्हे ती कावळ्यांची भलतीच कावकाव चालू होती. त्या कलकलाटाने कंटाळा आला होता. म्हणून भिंतीवरून त्यांना उडवावे, असा विचार डोक्यात आला. पण मग ते काय म्हणतात, तेही ऐकायचे ठरवले. त्यातली एक कावळी दुसरीला म्हणते कशी? आमची प्रतिभा आहे ना, ती कुठेही शी करते आणि सारवून चाटतेही. किती गोड दिसते ना? म्हणून आम्ही कुणाच्या थुंकीला तोंडही लावत नाही. तर दुसरी कावळी म्हणाली, साठी बुद्धी नाठी ग. आता पहिली कावळी चकीत होऊन बघू लागली. तर दुसरी कावळी म्हणाली, आमच्यात दर दहा महिन्यांनी डोके बदलतात. त्यामुळे माझ्या धडावर सध्या ‘सातवं डोकं’ आहे. कारण आमच्यात डोकं वापरण्य़ाला मोकळीक नाही ग. इतक्यात तिथे आणखी एक डोमकावळा येऊन आणखीनच कर्कश आवाजात ओरडू लागला. म्हणतो कसा, भाऊ भाऊ बाप आठव, नाहीतर श्राद्ध घाल. मला त्याची गंमतच वाटली. म्हणालो बाबा माझं सोड तुला तुझा बाप आठवतो कारे? तर म्हणाला आमच्यात कुणालाच कुणाचा बाप माहितच नसतो, तर आठवायचा कुठला बाप? माझी प्रश्नार्थक नजर बघून त्याने अधिक खुलासा केला. आमच्या घरट्यात कोकीळही अंडी घालतात ना? मग त्यातून कोणी कुठल्या बापाची खात्री द्यायची? त्याला म्हटले, ओरडण्यातला मंजूळ आणि कर्कश आवाज तरी बदलत असेल ना? तर तो कावळा म्हणाला, संसर्गाने व संगतीने सगळेच कर्कश ओरडू लागतात. कोकीळ असून काय उपयोग? पण खुप भूक लागलीय बाप आठवा आणि श्राद्ध घाला.

च्यायला, माझा बाप मरून झाली आता पस्तीस वर्षे. कधी त्याचे श्राद्ध घातले नाही की पुण्यतिथी नाही. कारण मी असल्या अंधश्रद्धेवर जगणार्‍या कावळ्यांना पोसायचा मक्ता घेतलेला नाही. म्हणून त्याला म्हटले चालता हो. मला बाप ठाऊक आहे, आठवतो सुद्धा. पण श्राद्ध घालणार नाही की पुण्यतिथीही करणार नाही. तर म्हणाला खुप भुक लागलीय. पाच दिवसाची उपासमार झालीय. तेव्हा कुठे डोक्यात प्रकाश पडला. त्याला म्हटले तूच का तो ओंकारेश्वराचा कावळा. होय म्हणला. पण अंनिसवाला म्हणून तिथल्या जातीयवादी कावळ्यांनी कुठल्या पिंडाला शिवू दिले नाही आणि उपासमारीची वेळ आलीय. तेव्हा मेहरबानी करून श्राद्ध घाला. त्यावर त्याला म्हटले, माझा बाप बाजूला ठेव, तुझा बाप कोण त्याची कथा सांगतो. मग इंटरनेटवर जाऊन ‘दिव्य मराठी’ दैनिकात तब्बल दीड वर्षापुर्वी छापलेला लेख काढून त्यातला उताराच या कावळ्याच्या तोंडावर फ़ेकला. डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येनंतर दत्तप्रसाद दाभोळकर (बंधू) यांनी लिहीलेला तो लेख खुपच उदबोधक आहे. पण अशा कावळ्यांनी कधी वाचलेले नसते की समजून घेतलेले नसते. बाप म्हणजे जन्मदाता संसार थाटतो आणि त्यात पत्नीसह समजूतदारीने संसार करतो, म्हणून बाप होऊ शकतो. हे अशा भरकटणार्‍या प्राण्यांना कसे कळावे. त्यात अंधश्रद्धा वा विज्ञाननिष्ठा कशा एकत्र नांदू शकतात आणि संसारही करू शकतात, त्याचे अभूतपुर्व वर्णनच आलेले आहे. नरेंद्र दाभोळकर यांच्या जन्मदात्यांची ती कहाणी आहे. तो उतारा असा,

"1920 च्या सुमारास माझे वडील कोकणातील खेड्यातून आपले कर्तृत्व दाखवायला सातारला आले असणार. प्रचंड कष्ट उपसून ते त्या वेळी एल.एल.बी. झालेले. सातारा शहरात त्यांनी नामांकित फौजदारी वकील म्हणून आपला जम बसवला. त्या वेळच्या किंवा खरं तर आजच्याही रिवाजाप्रमाणे ते दत्तभक्त होते. दररोज माळावरच्या दत्ताचे दर्शन, घरी स्वत:च केलेली पूजा, वर्षातून दोनदा घरी आणि एकदा गाणगापूरला जाऊन करावयाचे पारायण. पण यात बसणार नाही, अशी आमच्या घरात एक ग्यानबाची मेख होती. माझी आई कोल्हापूरची. ती फक्त मराठी चौथीपर्यंत शिकलेली. पण चौथीच्या परीक्षेत ती कोल्हापूर राज्यात पहिली आलेली. तिच्यावरचे संस्कार राजर्षी शाहू महाराजांचे. तिचे घराणे प्रचंड बुद्धिमान. तो वारसा पण तिच्या आईकडून आलेल्या.

मात्र माझ्या आईचा रामशास्त्री बाणा जरा जादाच असणार. त्या काळात तिने मंगळसूत्र घातले नाही. कुंकू लावले नाही. आमच्या घरात कधी सत्यनारायण, हळदीकुंकू असले कार्यक्रम झाले नाहीत. आपल्याला नीटपणे न येणारे इंग्रजी ही बाई कामाला आलेल्या बायांना शिकवत बसे. या बाईने अंगावर कधी सोने घातले नाही. त्यामुळे माझ्या बहिणींच्या अंगावरही कधी सोने नव्हते. घरात सोने अजिबात नव्हते आणि मुलींच्या अंगावर सोने असते, हे मला आणि नरेंद्रला भावांची (आणि नंतर आमचीही!) लग्ने झाल्यावर काही काळापुरते समजले. हे सारे पण समजण्यासारखे आहे. वयाच्या 94व्या वर्षी या बाईने शरीर दान केलेले होते. आम्हा सर्वांना तंबी भरलेली ‘मृत्यू नंतर एका तासात माझे शरीर विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी हॉस्पिटलमध्ये जाणार. उगाच रडारड करत, धडपड करत अजिबात जमायचे नाही. शरीर गेले की शरीर संपले. त्या मेलेल्या शरीराला बघायचंय काय? सगळ्यांना सोयीची वेळ ठरवा. एकत्र जमा आणि हसतखेळत माझ्या आठवणी काढत बसा.’ खरं तर हे पण समजणारे आहे. मात्र एक गोष्ट समजावून घेणे खूप कठीण आहे, पण खूप गरजेची पण आहे. एवढे टोकाचे वैचारिक मतभेद असताना माझ्या आईवडिलांचे छोटे वादविवादसुद्धा आम्ही कधी पाहिले नाहीत. त्यांचे अगदी गुळखोबरे होते. वडिलांच्या पारायणाचे आई सर्व हसतमुखाने करायची आणि दररोज संध्याकाळी आम्हा भावंडाची जेवणे झाल्यावर दोघे अगदी निवांतपणे चुलीसमोर बसून हसतखेळत गुलूगुलू गोष्टी करायचे! विज्ञान आणि धर्म नीटपणे समजलेली माणसे समोरच्या माणसाचे अजिबात न पटणारे विचार शांतपणे ऐकून त्यांचा आदर करीत, ते समजावून घेण्याचा प्रयत्न करतात."
http://divyamarathi.bhaskar.com/article/MAG-article-te-teen-divas-of-experience-for-dattaprasad-dabholkar-4368603-NOR.html

शेवटच्या वाक्यात समाजातील सौहार्द आणि सहिष्णूता कशी उदबोधक असू शकते, त्याचे नेमके मार्गदर्शन त्यात आलेले आहे. पण संपुर्ण जीवनच कावकाव करीत फ़िरण्यात धन्यता मानणार्‍यांना त्यातला बोध कसा समजायचा? समजा अंनिसच्या बोलघेवड्या बेताल लोकांप्रमाणे तेव्हाही त्या माऊलीने आपल्या पतीच्या श्रद्धेशी वैर धरले असते, तर त्यांचा संसार होऊ शकला असता काय? तो संसारच नीट होऊ शकला नसता आणि मोडला असता, तर अंधश्रद्धा निर्मूलन समिती म्हणून आंदोलन उभे राहिले, त्याच्या जन्मदात्याचाही जन्म होऊ शकला नसता. पण हे सगळे सांगून काही उपयोग नसतो. ज्यांना आपल्या आंदोलनाच्या जनकाची जन्मकथाही ठाऊक नसते, त्यांनी इतरांनाही त्यांचे बाप आठवा म्हणून सांगण्यापलिकडे कुठली अपेक्षा बाळगता येते? जेव्हा विचार व बुद्धी संपते. तेव्हा आयमाय काढण्यापेक्षा दुसरा युक्तीवाद शिल्लक उरत नाही. मग म्हातारा, थेरडा वा बाप काढण्याला पर्याय कुठे शिल्लक रहातो?

असली भाषा वा असे अर्वाच्च लिखाण करण्याची मला गरज नाही. पण ज्यांना त्याच्यातच पुरूषार्थ व बुद्धीवाद वाटत असतो, त्यांना त्यांच्याच भाषेत समजावणे भाग असते. संवाद कुठल्या तरी एकाच भाषेत होऊ शकत असतो. ज्यांनी माझ्याबाबतीत अशी भाषा व शब्द वापरले, त्यांना समजण्यासाठी त्याच भाषेत उत्तर देणे भाग आहे. कॉम्रेड पानसरे यांच्याच भाषेत, ज्यांचे डोकेच त्यांच्या धडावर नसते, त्यांची बुद्धी तरी त्यांची कशी असणार? ते असेच बरळत जाणार. त्यांनी खुशाल बरळावे कलकलाट करावा. त्याचा त्रास मला होत असेल, तर हाकलून लावणे भाग आहे. निर्बुद्धता हाच त्यांचा गुणधर्म असतो. तो माझा पिंड नाही आणि ते कावळे असले तरी मोक्ष देण्यासाठी माझ्या ‘पिंडाला’ त्यांनी शिवण्याची अजिबात गरज नाही.

2 comments:

  1. अनिस च्या लोकांना विरोध प्रचंड झाला, होत आहे व अनिस संपेपर्यंत होत राहील. याचे कारण एकाच आहे ते असे की, अनिस वाले नास्तिक आहेत हे सगळ्यांनाच माहीत आहे. त्याबद्दल कोणाचाही आक्षेप नाही व असण्याचे कारणही नाही. पण जेंव्हा हे भ्रमिष्ट लोक प्राथमिक शाळातील अर्धवट शिक्षकांना हाताशी धरून भावी पिढी त्यांच्या विचारांची बनवण्याचा प्रयत्न करतात, गणपती विसर्जनाची प्रथा प्रदूषणाचे कारण दाखवून बंद पाडू बघतात , व इथेही महापालिका व पोलीस व कॉलेज चि मुळे वापरून घेतात. इतक्याने समाधान होत नाही म्हणून चक्क कायदा आणून बळजबरी करण्याचा प्रयत्न करतात तेंव्हा विरोध होणारच. मी तसा काही रस्त्यावर उतरणारा प्राणी नाही. माझे काम बरे व माझी माझ्या सद्गुरूंनी सांगितलेली साधना बरी. या टाईपचा मी माणूस. पण जेंव्हा कधी गणपतीत किंवा इतर प्रसंगी या अनिसवाल्यांना विरोध करण्याचा मुद्दा येतो तेंव्हा मला शक्य आहे तितके मनुष्य बळ घेऊन मी अवश्य त्यात सहभागी होतो. आम्ही जो देव देव करतो त्याचा सामाजाला त्रास होत नाही आणि आम्ही कुणाला आग्रहही करत नाही की त्यांनी आमच्यासारखे वागावे. उलट अनिस वाल्यांचा आग्रह असा की सर्व जगाने त्यांच्या सारखे भ्रमिष्ट व्हावे. लोक तसे होत नाहीत म्हणून कायदे करून शाळेत मुलांना ब्रेनवौश करून ते त्यांचा कार्यभाग साधण्याचा प्रयत्न करतात. हे भारतात तरी होऊ शकत नाही.

    ReplyDelete
  2. सश्रद्ध व अश्रद्ध व्यक्ती परस्परांचा आदर करीत सहजीवन जगणे शक्य आहे याचे ते उत्तम उदाहरण आहे.पुल किंवा बाबा आमटेंचे नास्तिक्य कुणाला कधीच खुपल नाही.कारण त्यात अतिरेक वा दुराभिमान नव्हता.पण समाजात टोकाची वा अतिरेकी भुमिका घेणारे देखील आवश्यक असतात. त्यामुळे समाज हलतो.

    ReplyDelete