नागालॅन्ड या इशान्येकडील राज्याची राजधानी दिमापूरमधली घटना तमाम भारतीयांच्या डोळ्यात अंजन घालणारी अशीच आहे. अर्थात असे आपण नेहमी म्हणतो. पण अंजन ज्या डोळ्यात घातले जाते, ते उघडे असले तरच त्याचा परिणाम शक्य असतो. ते डोळेच बंद असले, तर अंजनाचा काहीच उपयोग होत नाही. गुरूवारी देशभरातले बुद्धीमंत बीबीसी या परदेशी वाहिनीने निर्भया कांडाच्या संदर्भात तयार केलेला माहितीपट प्रदर्शित करण्यावरून उठलेल्या वादळात गुरफ़टले होते. तसे दोन दिवस आधीपासून तो विषय घोंगावत होता. पण गुरूवारी बीबीसीने त्याचे प्रक्षेपण केल्याने चर्चेला उधाण आलेले होते. त्यामध्ये बलात्कारातला एक आरोपी मुकेशसिंग याची मुलाखत असल्याने चर्चेचा पारा चढलेला होता. अधिक स्त्रीविषयक मानसिकतेचा आडोसा घेऊनही पांडित्य सांगण्याची स्पर्धाच चाललेली होती. त्यातून आपल्याला पिडीत मुली महिलांविषयी असलेल्या आस्था व सहानुभूतीचे प्रदर्शन मांडण्याची जणू चढाओढच चालली होती. पण त्यातला आवेश कितीही जोशपुर्ण असला, तरी प्रेरणा मात्र अंतरात्म्यातून आल्यापेक्षा निष्क्रीय बुद्धीवादाचीच होती. त्याला कृतीची जोड देण्याबद्दलची आजवरची उदासिनता कुठेच लपलेली नव्हती. नेमक्या अशा पार्श्वभूमीवर दिमापूरची घटना घडलेली आहे. तिथे एका संशयित बलात्कार्याला जमावाने तुरूंगातून काढून ठार मारले व त्याच्या मृतदेहाचीही विटंबना केली. अंगावर शहारे आणणारी अशीच ही अत्यंत हिंस्त्र व रानटी वास्तविकता आहे.
बांगलादेशी असलेल्या सय्यद फ़रीदखान नावाच्या या इसमाने एका नागा मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप होता. त्याविषयी पोलिस शांत बसलेले नव्हते. त्याला अटक करून तुरूंगात डांबलेले होते. मग लोकांनी असे अमानुष कृत्य कशाला करावे? एका बाजूला देशात लोकांचे, पिडित महिलांचे व न्याय अन्यायाचे इतके उदबोधक चर्वण तमाम माध्यमातून चालले असतानाच, दिमापूरच्या लोकांचा धीर असा का सुटला? दोन्हीत तसा काही थेट संबंध जोडता येणार नाही. पण जी घटना घडली, ती जमावाकडून झालेली कृती आहे आणि जमावाची विवेकबुद्धी नेहमी शून्याचा खालीच असते. म्हणूनच समाज म्हणतात त्या लोकसंख्येला जमावात रुपंतरीत होऊ द्यायचे नाही, याचे समाजातील जाणत्यांनी भान ठेवायचे असते. कारण जमाव-झुंड कधी कायदे वा त्याच्या कठोरतेला दाद देत नसतात. किंबहूना झुंड ही त्या कायदा व्यवस्थेलाच आव्हान देण्यासाठी उभी रहात असते. एकेकटा माणूस कायद्याला वचकून असतो. पण कायद्याच्या निष्क्रीयतेने तोच माणूस अस्वस्थ होऊन जातो तेव्हाच त्याला आपण काही करावेसे वाटू लागते. तशी हिंमत त्याच्यात नसते, तोवर कायद्याचा वरचष्मा असतो. जिथे अशा वैतागल्या वैफ़ल्यग्रस्त व्यक्तींचा जमाव तयार होतो, तिथे मग कायद्याची धडगत नसते. तर त्याच्याच कब्जात वा संरक्षणात असलेल्यांना झुंडीपासून कोण वाचवू शकतो? दिमापूरमध्ये तेच झाले. बलात्काराची ही एकमेव घटना तिथे घडलेली नसणार आणि आधीपासूनचा प्रकरणात कुठले समाधानकारक उत्तर सापडले नाही, म्हणूनच वैफ़ल्याचे रुपांतर झुंडीत झालेले असणार.
नेमके असेच काही वर्षापुर्वी आपल्या महाराष्ट्रात नागपूरला घडलेले होते. कस्तुरबानगर नामक झोपडपट्टीत अक्कू यादव नावाचा गुन्हेगार थैमान घालत होता. कुठलीही मुलगी महिला यांच्या घरात घुसून वा त्याचे अपहरण करून बलात्कार करत होता. दिड डझन असे गुन्हे त्याच्यावर नोंदलेले असतानाही त्याची तिथली दहशत मोठी होती. कारण प्रत्येकवेळी तो जामीनावर सुटून यायचा आणि तक्रार देणारे व साक्षीदार यांना भयभीत करत होता. अशा लोकांनी एकदा धीर केला आणि कोर्टातच अक्कूला गाठला. तिथे त्याची पुरती खांडोळी करून टाकली. जवळपास शंभरावर महिला मुले वृद्ध लोकांना त्यात हल्लेखोर म्हणून आरोपी बनवले गेले आणि अखेरीस त्यांना निर्दोष सोडावेही लागले. मुद्दा इतकाच, की १९ बलात्कार करूनही अक्कू मोकाट कशामुळे राहू शकला आणि पुन्हा तशीच दहशत का माजवू शकला? त्यावर काही उपाय, कायदा वा देशातले मान्यवर प्रतिष्ठीत देऊ शकले असते, तर नागपूरात तेव्हा तशी झुंड निर्माण झाली असती काय? अक्कूच्या दहशतीला भयभीत करून सोडणारी दहशत माजवावी, अशा समान विचारानेच हा जमाव उभा राहिला होता. मग त्याच्याकडून ते अमानुष कृत्य घडले होते. समाजाचे धुरीणत्व करणार्यांनी योग्य मुदतीत अक्कू किंवा तत्सम गुन्हेगारांना कायद्याची दहशत कृतीने घालून रोखले असते, तर पुढला प्रकार घडलाच नसता. सामान्य माणूस अशा झुंडीत तेव्हा रुपांतरीत होतो, जेव्हा प्रचलीत कायदा व प्रशासन आपले संरक्षण करण्यास नालायक आहे, अशी त्याची खात्री पटत असते. त्यावर बौद्धीक चर्चा व तात्विक उहापोह हा उपाय नसतो. ती साळसूद पळवाट असते. नाकर्तेपणावरचे ते पांघरूण असते.
कायद्याच्या निर्दय निष्ठूरतेनेच गुन्हेगारी व समाजातील विकृतीला लगाम लावला जात असतो, बौद्धीक युक्तीवादाने ते शक्य नसते. कारण गुन्हा करणारा एकेकट्या भयभीत लोकांच्या मनातील भितीमुळेच शूर झालेला असतो. ते एकत्रित होऊन अंगावर येणार नाहीत, याची खात्री त्याचे खरे बळ असते. पोलिस वा गणवेशातील सरकारी प्रतिनिधी वा कायदा हेच जेव्हा खर्या अर्थाने समाजाचे एकत्रित बळ असल्याची खात्री त्याला असते, तेव्हाच गुन्हेगार कायदालाही घाबरतो. आज आपल्या देशात कायदा तेच स्थान गमावून बसला आहे. त्यामु्ळे गुन्हेगारांची हिंमत वाढली आहे आणि कायद्याचे राज्य व प्रशासन मुठभर विचारवंतांच्या युक्तीवादाला घाबरणारे केवळ बुजगावणे झाले आहे. त्यामुळे सोकावलेल्या गुन्हेगाराला आपणच लगाम लावावा, धडा शिकवावा, अशी सामुहिक झुंडवृत्ती लोकांमध्ये वाढते आहे. त्यातला धोका इतकाच असतो, की आज गुन्हेगाराला वेसण घालायला उफ़ाळून येणारी ही सामुहिक झुंडशाही बेफ़ाम असल्याने, पोलिस यंत्रणाही तिच्यापुढे निकामी होऊन जाते. पण तो दुबळेपणा त्या झुंडीच्या लक्षात आला, मग सगळीकडे झुंडीचेच राज्य प्रस्थापित व्हायला वेळ लागणार नाही. हेच अफ़गाण, इराक वा पाकिस्तानात होताना दिसते आहे. तिथल्या विविध नावाच्या झुंडीही मुळात अशाच सामुहिक न्यायाचा मुखवटा चढवून अस्तित्वात आल्या. जेव्हा शासन व्यवस्थाच निकामी होऊन गेली. तिथे त्यांनी आपली निर्दयी सत्ता प्रस्थापित केली आणि आता तिथे कुणाला बुद्धीवाद व युक्तिवाद करण्याचीही सोय उरलेली नाही. मुद्दा इतकाच, की प्रचलित शासन व्यवस्था व कायदे गुन्हेगारांनी निकामी केलेतच. त्यावर आणखी घाव घालून बुद्धीवादाचे समाधान नक्की मिळू शकेल. पण तीही व्यवस्था आणखी खिळखिळी होऊन गेल्यास, येऊ शकणार्या तालीबानी व्यवस्थेत बुद्धीवादाचे स्थान कोणते असेल? जाणत्यांनी समाजाला झुंडशाहीच्या किती आहारी जाऊ द्यायचे, त्याचा विचार करावा की देशाचे नागपूर व दिमापूर होऊ द्यायचे? पांडित्य सोडून आपण सामान्य जनतेपासून किती दुरावलोत, याचा हे जाणते विचार करणार की नाही?
प्रसारमाध्यमांकडून गुन्हेगारांचे उदात्तीकरण केले जाणे नवीन नाही. संजय दत्त च्या बाबत हे सतत बघायला मिळाले. संजय दत्तच्या खटल्याच्या २००७ मधे वेळी मी स्वतः न्यायाल्यात अर्ज करून प्रोबेशन ऑफ ऑफेंडर्स ऍक्ट मधे त्याची सुटका केली जऊ नये म्हणून अर्ज केला तसेच राज्य सरकार या खटल्यात बरोबर काम करत नाही म्हणून बीबीसी-१ खटल्यात लोकहितार्थ मला एक पक्षकार म्हणून प्रवेश मिळावा अशीही मी प्रार्थना अर्जात केली होती ,सरकारी वकीलांच्या भूमिकेवरही मी आक्षेप घेतला होता. मात्र सदर अर्ज मी व्यक्तिगत दुश्मनी मुळे केला असे संजय दत्तच्या वकिलांनी त्याची बाजू मांडताना सांगितले. सरकारी वकील्र उज्ज्वल निकम माझ्या अर्जाला विरोधच करणार हे गृहीत होते कारण माझा अर्ज मान्य होणे म्हणजे सरकारची प्रतिमा मलीन होणे. त्या मुळे माझा अर्ज फेटाळला गेला. संजय दत्तला माफी देऊ नये ही माझी प्रार्थना मान्य झाली पुढे संजय द्त्त ला शिक्षा झाली.
ReplyDeleteहे सर्व मी सांगितले कारण भावनात्मक घोषणाबाजी व आवाहने काही कामाची नाहीत. अलीकडेच दीमापूर मधे एका मुस्लीम आरोपीला केवळ बलात्काराचा आरोप आहे म्हणून नग्न करून, कुत्र्या प्रमाणे शहरात फरफट्वून, भर चौकात फासावर लटकवले. **प्रत्येक आरोपी हा सिध्द दोष गुन्हेगार नसतो.** त्याचा गुन्हा सिध्द व्हावा लागतो व हे काम लोकांच्या बहुमताने व झुंडशाहीने नाही तर न्यायालयातच झाले पाहिजे. ( माझा भारतीय न्यायालयांवर फक्त ५०% विश्वास आहे. **पण त्याचे कारण वेगळे आहे.**)
कसाब सारखा नरसंहार करणारा आतिरेकी त्यालाही स्वतःला निर्दोष सिध्द करण्याची पूर्ण संधी आपल्या सरकारने दिली. अगदी पाकिस्तान सरकारला त्याच्या साठी वकील द्यावा असे सांगितले होते. आता सवाल हा आहे की दीमापूर मधील बलात्कार खटल्याचा आरोपी हा कसाब पेक्षा खतर नाक होता काय ? किंवा अगदी बलात्कार सिध्द् झालेला एखादा गुन्हेगारही कसाब पेक्षा जास्त पापी व खतरनाक असतो काय ? केवळ बलात्काराचा आरोप हेच कारण जर पुरावा मानले जाऊ लगले तर मग “Every Man is a potential rapist” हे विधान मान्य करून समस्त पुरुष जातीला बलात्कारी म्हणून फासावर द्यावे लागेल.
२०१२ पासून निर्भया प्रकरणामुळे जनमत प्रसार माध्यमांनीच प्रक्षोभित केले त्याचाच परिणाम आहे दीमापूर मधील भारतीय लोकांनी केलेले कृत्य जे तालिबानी किंवा इसीस च्या पध्दतीचे व मानसिकतेचे आहे फक्त कारणे वेगळी आहेत इतकेच.
प्रत्येक गुन्ह्याला जातीय वळण देऊन कोणी तरी मागासवर्गी माणासाचा बळी जात आहे असे दखावण्याचे फॅड खैरलांजी प्रकरणा पासून वाढलेले दिसत आहे. यात काही राजकीय पक्षांचा थोडा-फार हात आहेच. दीमापूर मधेदेखील नागा(आदिवासी) मुलीवर बलात्कार झाला अशी बतावणी झाल्याने जनमत प्रक्षोभित झाले. दिल्लीत निर्भया प्रकरणात हे असे खेळ झालेच होते.
जनक्षोभाच्या या अश्या दबावामुळे राजकीय पक्ष पोलीसांवर दबाव आणतात व पोलीस कोणाला तरी पुन्हा बकरा बनवतात जो आपल्यातलाच कुणी तरी असतो. अशावेळी फक्त आपल्या घराला आग लागत नाही म्हणून आपण गप्प असतो. पिडीतापेक्षा बळीचा बकरा जास्त पीडीत असतो कारण त्याच्या माथ्यावर त्याने न केलेल्या गुन्ह्याचा आरोप असतो. क्षण भर असे गृहीत धरावे की – कोणी तरी काही वाईट हेतूने एखाद्या बाईची छेड काढली म्हणून आपणाविरोधात खोटी तक्रार केली व पुढे अटक होउन आपणावर केस झाली. तर…. तर ? तर ? तर ? तर ? तर ? तर ? नुस्त्या कल्पनेने डोके सुन्न होईल.
बातमी नुसार दीमापूर मधील आरोपी बांगलादेशी नव्हता तर भारतीयच होता त्याचा भाऊ १९९९ मधे कारगीलच्या लढाईमधे शहीद झाला होता. याची चौकशी होईल तेव्हा सत्य कळेल अशी आपण इच्छा करू. पण खरेच असे असले तर काय ? नसेल तर ठीक आहे की- मेला तो गुन्हेगार होता व बांगलादेशी घुसखोर होता. खरे तर एकमेव आरोपीच्या मृत्यू नंतर खटला बंद केला जातो, पण माझा अंदाज आहे की यावेळी हा खटला चालवावा लागेल कारण न्याय व्यवस्थेच्या विश्वासार्हतेचा प्रशन आहे. पाहू काय होते ते.
अभिमन्यू यशवंत अळतेकर
भाऊ मला आपल्या ब्लॉगवर लिखाण करण्याचा बहुमान दिलात - धन्यवाद
ReplyDelete-
अभिमन्यू यशवंत अळतेकर