Thursday, March 26, 2015

निकम यांनी ‘शिजवलेली’ मटन बिर्यानीमागल्या दोनचार दिवसात विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्यावर माध्यमांनी झोड उठवली आहे आणि त्याबद्दल कोणाला दोष देता येणार नाही. जयपूर येथे जी आंतरराष्ट्रीय दहशतवाद विरोधी परिषद चालू आहे, तिथे पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा करताना निकम यांनी केलेले विधान त्यांना गोत्यात घेऊन गेले आहे. वास्तविक आजकालची माध्यमे एक अजेंडा घेऊन चाललेली असतात. सहाजिकच तुम्ही किती महत्वाचे वा उपयुक्त बोलता, त्यापेक्षा विवादास्पद काय होईल; यावरच अशा माध्यमांचा डोळा असतो. म्हणूनच अशा पत्रकार वार्ताहरांशी खुप बोलावे, पण त्यांच्या हाती काहीच लागू नये, याची काळजी घ्यायची असते. फ़ार मोजक्या नेते व मान्यवरांना ती कला साधली आहे. पण उज्वल निकम त्यापैकी नाहीत आणि सेक्युलर अजेंडामध्ये बसणारे नसल्याने, ते माध्यमांचे नावडते वकील आहेत. सहाजिकच त्यांना कचाट्यात पकडण्याची प्रत्येक संधी शोधली जाणार; हे त्यांनी क्षणभरही विसरता कामा नये. आजवर निकम त्याचे भान ठेवून होते. जयपूरला त्यांना विस्मरण झाले असावे. अन्यथा त्यांनी स्वत:च माध्यमांच्या सापळ्यात अडकणारे विधान कशाला केले असते? आजवर कित्येक मोठ्या महत्वाच्या खटल्यात सरकारची जनतेची बाजू लढवताना आपली कुशाग्र बुद्धी पणाला लावणार्‍या ह्या वकीलाला आज माध्यमे ज्याप्रकारे झोडपून काढत आहेत, त्यांना अशाच आणखी एका मान्यवराकडे वळून बघायला ढुंकून वेळ मिळालेला नाही. याच आठवड्यात गुजरात दंगलीचा तेजीत धंदा करणार्‍या तीस्ता सेटलवाड यांच्यावर असलेल्या आरोपांची छाननी सुरू आहे. त्यात त्यांना अफ़रातफ़रीच्या गुन्ह्याखाली अटक करण्याचा विषय सर्वोच्च न्यायालयापुढे आलेला होता. त्याबद्दल कितीशी चर्चा झाली? दंगलग्रस्त पिडितांसाठी देणगी रुपाने जमवलेल्या पैशाचा अपहार केल्याचा हा आरोप, अतिशय गंभीर नाही का?

गुजरातच्या गुलमर्ग सोसायटीत जिथे एका माजी खासदाराला जिंवंत जाळले गेल्याचा चारपाच वर्षे गाजावाजा करीत, खालच्या कोर्टापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत ढोल वाजवला गेला, त्याच सोसायटीतल्या दंगलपिडीतांनी पुराव्यासह तीस्तावर हा गुन्हा दाखल केला आहे. तेव्हा तीस्ताच्या लढ्याचे कोडकौतुक करण्यात आणि गुलमर्गच्या रहिवाश्यांसाठी आक्रोश करण्यात अहोरात्र रमलेल्या माध्यमांना, आज त्यांच्याच नावाने जमवलेल्या पैशाच्या अपहाराविषयी काडीमात्र आस्था नसावी का? असती तर कोणी तीस्तावरचे आरोप कोणते आणि त्याचा पुरावा कोणता, यावर अर्ध्या तासाची तरी चर्चा नक्कीच केली असती. दंगलपिडीतांच्या पुनर्वसनासाठी जमवलेल्या पैशाचा आपल्या चैन छानछोकी जगण्यासाठी वापर करण्याचा आरोप अनुल्लेखाने मारण्याइतका फ़डतूस असतो काय? शिवाय ज्याचे व्यवहारी कागदोपत्री पुरावे उपलब्ध आहेत, त्याकडे डोळेझाक करण्याची वृती सत्यशोधनाची व सत्यकथनाची असू शकते काय? त्याकडे चार ओळीपेक्षा माध्यमांना अधिक सवड व जागा नाही. पण निकम यांच्या नगण्य पोरकट विधानावर काहूर माजवायला भरपूर वेळ व रकाने उपलब्ध आहेत. यातच माध्यमातल्या हस्तकांचा अजेंडा लक्षात येतो. त्यांना निकम याच्या विधानाचे काहूर माजवून तीस्ताच्या अपहारावर पांघरूण घालायचे असणार. अन्यथा एका फ़डतूस विधानाचा इतका गवगवा कशाला? तीस्ता हा वेगळा मांडायचा विषय आहे. पण संदर्भासाठी इथे माध्यमांच्या खोटेपणासाठी उल्लेख करावा लागला. निकम यांचे विधान कशासाठी आहे व त्यातून ते काय सांगू इच्छितात, याची दखल माध्यमांनी घेतली आहे काय? नसेल, तर त्यावर काहूर कशाला माजवलेले आहे? कसाबने मटन बिर्यानी मागितलीच नव्हती. आपणच तशी वावडी उठवली, असे निकम म्हणालेत, हे खरे. पण तसे का म्हणालो, त्याच्या खुलाश्यावर कोणी बोलायचे?

एकदा कोर्टात कसाबचे डोळे ओलावले आणि तो दिवस राखीपौर्णिमेचा होता. ते पाहून त्याला आपल्या बहिणीचे स्मरण झाल्याचा मातम माध्यमातून सुरू झाला होता. ज्या क्रुरकर्म्याला शेकडो निरपराध लोकांवर हकनाक गोळ्या झाडताना क्षणभर आपलेच नातेगोतेही आठवले नाहीत, त्याच्या भावनांचे उदात्तीकरण माध्यमे करू लागली होती. थोडक्यात एका सैतानाविषयी जनमानसात सहानुभूती निर्माण करण्याचा अजेंडा माध्यमांनी हाती घेतला होता. मग त्याला छेद देण्यासाठी आपण ‘मटन बिर्यानीचा शिजवली’ असे निकम यांनी सांगितलेले आहे. त्यांच्या संपुर्ण विधानावर झोड उठलीच पाहिजे. पण त्याच विधानाचा पुर्वार्ध दुर्लक्षित करून चालेल काय? माध्यमांनी ओलावलेले डोळे व बहिणीची आठवण, असल्या गावगप्पा पसरवून कोणता प्रामाणिकपणा चालविला होता? त्यात कितीसे सत्यकथन होते? कसाबच्या डोळ्यात पाणी आले, म्हणजे त्याला बहिणीच्या राखीची आठवण आली, हे माध्यमांना कसे उमगले होते? माध्यमांनी ती पिकवलेली कंडी नव्हती काय? त्याचा खुलासा वा स्पष्टीकरण कोणी करायचे? त्याविषयी माध्यमांना जाब कोणी विचारायचा? की कंड्या पिकवण्याचा आपला राखीव अधिकार आहे आणि निकम यांनी परस्पर कंड्या कशाला पिकवल्या, असा आज बोंबा ठोकणार्‍यांचा दावा आहे? बरे निकम खोटेच बोलले असतील, तर त्याचा इतका बिनबुडाचा गदारोळ करणारी माध्यमेही खोटी नाहीत काय? आपण कोणत्याही थापेबाजीला बिनाचौकशी प्रसिद्धी देतो, याचीच ही कबुली नाही काय? निकम यांनी माध्यमांना मुर्ख बनवलेही असेल, पण जे त्यामध्ये मुर्ख बनले, त्यांचे काय? तेव्हा निकम खोटे बोलले असतील, तर आज खरे बोलतात, याची तरी माध्यमांनी कोणती खातरजमा करून घेतली आहे? की अलिकडला कुत्रा भुंकला म्हणून पलिकडला भुंकत गावभर गलका करण्याला माध्यमकर्म म्हणायचे?

मुद्दा निकम यांच्या तेव्हाच्या व आजच्या विधानांचा नाही. कोणीही कुठेही काहीही बकवास करतो आणि त्यावर माध्यमे बेताल गदारोळ सुरू करतात, हा गंभीर विषय आहे. आधी कसाबच्या ओल्या डोळ्यांवर आक्रोश करणारी माध्यमे, दुसर्‍या दिवशी त्याच्या मस्तवाल बिर्यानी मागणीविषयी चर्चा करू लागली; असेही निकम म्हणतात. हा कसला पुरावा आहे? माध्यमे किती बेअक्कल व बेजबाबदार, त्याची साक्षच निकम यांनी अशा विधानातून दिलेली आहे. काल कसाबच्या ओल्या डोळ्यावर अश्रू ढाळणारे, आज त्याच्या बिर्यानी मागण्याला मग्रुरी म्हणू लागतात, अशा विधानातून निकम यांनी एकूणच भारतीय माध्यमांच्या निर्बुद्धतेवर बोट ठेवले आहे. माध्यमात कोंणाला तरी त्याची फ़िकीर आहे काय? निकम तेव्हा किंवा आज काय बोलले, तो त्यांच्या वकिली पेशाचा विषय आहे. वकीलवर्गाने त्याचा उहापोह करावा. पण त्या निमीत्ताने माध्यमांच्या मुर्खपणा व बेतालपणाचा पुरावा समोर आला आहे; यावर कोणी चर्चा करायची? त्या बेजबाबदारपणाला कोणी लगाम लावायचा? आज माध्यमाचा पसारा खुप वाढला आहे. पण त्याची विश्वासार्हता पुरती रसातळाला गेलेली आहे. त्याचे हेच कारण आहे. निकम यांना आरोपीच्या पिंजर्‍या उभे केले, म्हणजे आपला मुर्खपणा झाकला जातो असे कोणाला वाटत असेल, तर तो मुर्खाच्या नंदनवनात वावरतो म्हणावे लागेल. कारण आता मुख्यप्रवाहातील प्रस्थापित माध्यमांपेक्षा सोशल माध्यमे अधिक विश्वासार्ह व झपाट्याने सत्य लोकांपर्यंत पोहोचवू लागली आहेत. त्यामुळे पत्रकारी कांगावखोरीला बाजारात किंमत उरलेली नाही. म्हणूनच निकम यांच्याकडे लोक संशयाने बघण्यापेक्षा, त्यांना सवाल करणार्‍या माध्यमांकडे लोक शंकेने बघत आहेत. याचे कारण तीस्ताविषयी मौन धारण करणार्‍यांचे निकम आख्यान सामान्य माणसाला पचनी पडलेले नाही. लोका सांगे ब्रह्मज्ञान दुसरे काय?

2 comments:

  1. गल्लीतला एक कुत्रा भूकायला लागला कि दुसरा पण सुरु होतो …………. कि लगेच तिसर्या गल्लीतला जोर वाढवतो…………
    एकदम समर्पक उदाहरण दिले भाऊ तुम्ही आपल्या माध्यमांचे…………. कय्बियन वरचा कुत्रा भूकायला लागल कि लगेच माझा वरचा पण सुरु होतो …………

    ReplyDelete
  2. पीत पत्रकारांची गल्लीतल्या कुत्र्यांशी केलेली तुलना योग्य आहे.

    ReplyDelete