चार महिने पुर्ण होण्याआधीच नव्या विधानसभेचे दोन सदस्य दिवंगत झाले. माजी गृहमंत्री आर. आर. आबा पाटिल आणि शिवसेनेचे प्रकाश सावंत अशा दोन आमदाराचे गेल्या काही दिवसात निधन झाले. सहाजिकच त्या दोन जागा भरण्यासाठी तिथे पोटनिवडणूक घोषित होणे स्वाभाविक होते. यापैकी सांगलीतील तासगावची जागा ही आबांच्या कर्तबगारीमुळे महत्वाची आहे, तर बांद्रा-पुर्व येथील शिवसेनेची जागा तिथेच मातोश्री वसली असल्याने महत्वाची आहे. त्यापैकी तासगावच्या जागी आबांच्या स्मृत्यर्थ बिनविरोध त्यांच्या पत्नीला निवडून द्यावे, असे आवाहन राष्ट्रवादीने केले आहे. ते कितपत मानले जाते हे दिसेलच. पण बांद्रा-पुर्व किंवा खेरवाडी ह्या जागेवर रणकंदन माजण्याची शक्यता आहे. कारण तिथे कॉग्रेसने आपले आक्रमक नेते व माजी शिवसैनिक नारायण राणे यांना आखाड्यात उतरवण्याचा पवित्रा घेतला आहे. त्यामागचे राजकारण शोधले जात आहे. पहिली गोष्ट म्हणजे काही लोकांना हा बळी देण्याचा प्रकार वाटतो. तेव्हा शिवसेनेला खिळखिळी करण्यासाठी राणेंना कॉग्रेस पक्षात सन्मानपुर्वक आणले गेले. मात्र सेनेचा कोकणातील बालेकिल्ला ढासळल्यावर कॉग्रेसने राणेंना दिलेला शब्द पाळला नाही. सहाजिकच आपल्या तापट स्वभावाला बळी पडून राणे यांनी वेळोवेळी कॉग्रेस श्रेष्ठींवरही तोफ़ा डागल्या होत्या. म्हणूनच आताही प्रदेशाध्यक्ष पदावर त्यांना संधी नाकारून पुन्हा अशोक चव्हाण यांनाच आणले गेले. वास्तविक तेव्हा म्हणजे २००८ सालात विलासराव देशमुखांना बाजूला करण्याची वेळ आली, त्यावेळी राणेंना मुख्यमंत्री व्हायचे डोहाळे लागले होते. पण त्यांच्या तोंडाला पाने पुसून अशोक चव्हाण यांनाच संधी देण्यात आली आणि त्यांनाही जावे लागल्यावर पृथ्वीराज चव्हाण यांना आणले गेले. पण राणे यांना संधी नाकारली गेली होती. मग आता पोटनिवडणूक ही संधी आहे की बळीचा बकरा आहे?
राणे यांना बळीचा बकरा बनवले जात आहे, असे म्हणणार्यांचे एक गृहीत असे आहे, की बांद्रा-पुर्व हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. तिथे राणेंना उभे करणे म्हणजे मुद्दाम त्यांना लागोपाठ दुसर्या पराभवाला सामोरे पाठवून तोंडघशी पाडायचा बेत आहे. कदाचित कॉग्रेसचा तसा डाव असू शकेल. पण त्यासाठी बांद्रा-पुर्व ह्या जागेला शिवसेनेचा बालेकिल्ला ठरवणे अतिशयोक्ती आहे. तिथे मातोश्री हे शिवसेनाप्रमुखांचे निवासस्थान असले, तरी हा मतदारसंघ कधीच सेनेचा बालेकिल्ला नव्हता. फ़ार कशाला तिथे शिवसेनेला कधीच सहजगत्या आपला उमेदवार जिंकून आणता आलेला नाही. आणि ही बाब केवळ विधानसभेची नाही, अगदी महापालिकेच्या निवडणूकीत देखील शिवसेनेला मातोश्री परिसरातील निवडणूक सहजगत्या जिंकता आलेली नाही. मग हा सेनेचा बालेकिल्ला कसा असू शकतो? १९६८ सालात शिवसेनेने सर्वप्रथम महापालिका निवडणूका लढवल्या, तेव्हा तिथून मधुकर सरपोतदार हे सेनेचे उमेदवार होते. पण पुढे सेनेचे वरीष्ठ नेता झालेले सरपोतदारही तिथून पालिका विधानसभा अशा निवडणूका जिंकू शकलेले नाहीत. तेवढेच नव्हेतर अन्य उमेदवारही दोन दशके तिथे यश मिळवू शकलेला नव्हता. सर्वप्रथम १९८५ सालात सेनेने स्वबळावर पालिका जिंकली, तेव्हा श्रीकांत सरमळकर हा शाखाप्रमुख सेनेचा नगरसेवक म्हणून त्तिथून निवडून आला. राणे यांनी सेना सोडली, तेव्हा हाच सरमळकर त्यांच्या सोबत कॉग्रेस पक्षात गेला होता. मग सेनेत येऊन पुन्हा राष्ट्रवादी पक्षात गेला. अशी ही विधानसभेची जागा सेनेचा बालेकिल्ला कधी़च नव्हती. तो कायम कॉग्रेसचाच बालेकिल्ला राहिला आहे. त्याला खिंडार पाडण्यात यश मिळवले ते सेनेने नव्हेतर तिथल्या प्रकाश बाळा सावंत या शाखाप्रमुखाने. पक्षापेक्षा या कार्यकर्त्याच्या अथक प्रयत्नाने तिथे शिवसेनेला यश संपादन करता आले आणि तेही विपरीत स्थितीत.
मधूकर सरपोतदार सतत तिथून विधानसभा हरले होते. पण १९८५ सालात सेनेने पालिका जिंकली आणि पुढे हिंदूत्वाचे वारे वाहू लागले. तेव्हा १९९० सालात सरपोतदार प्रथम तिथून आमदार झाले. मग १९९५ सालातही त्यांनी जागा राखली. पण तेव्हा मुंबईभर हिंदूत्वाची लाट होती आणि कॉग्रेसची धुळधाण उडालेली होती. सरपोतदार १९९६ सालात लोकसभेवर निवडून गेले आणि तेव्हाच्या पोटनिवडणूकीत श्रीकांत सरमळकर आमदार होऊन गेले. मात्र १९९९ सालात ती जागा त्यांना राखता आली नाही आणि जनार्दन चांदुरकर हा फ़ारसे नाव नसलेला कॉग्रेस उमेदवार तिथून सहज जिंकला होता. त्यांनीच २००४ साली तिथे बाजी मारली. सेनेला पुन्हा अपयशी व्हावे लागले. दरम्यान तिथे नगरसेवकही सेनेला जिंकून आणता आलेला नव्हता. अशा स्थितीत दिर्घकाळ शाखाप्रमुख म्हणून काम केलेला निष्ठावान शिवसैनिक प्रकाश बाळा सावंत याला २००२ मध्ये पालिका लढवण्याची संधी मिळाली आणि त्याने आपल्या कर्तबगारीने त्यात यश मिळवले. मग २००९ च्या विधानसभा निवडणूकीत त्यालाच तिथून विधानसभेला उभे करण्यात आले आणि त्याने विपरीत स्थितीत बांद्रा-पुर्व हा गड सेनेला जिंकून दिला. विपरीत इतक्यासाठी म्हणायचे, की त्या निवडणुका सेनेला खच्ची करणार्या होत्या. अवघे चार आमदार सेनेला मुंबईत निवडून आणता आले. त्यात दादर लालबाग अशा बालेकिल्ल्यात सेना पराभूत झाली असताना बांद्रा-पुर्व ही नवी जागा प्रकाश सावंत याने जिंकून दाखवली होती. तेवढेच नाही, तर चार महिन्यापुर्वी भाजपाही साथ सोडून गेल्यावर सावंत यांनी पुन्हा आमदार होऊन दाखवले. त्याचे श्रेय त्या कार्यकर्त्याला होते. त्यानेच हा बालेकिल्ला बनवला. अगदी बेहरामपाडा या मुस्लिम वस्तीत त्याला मते देणारा वर्ग त्याचे कारण होता. सावंत याने सततच्या लोकसंपर्कातून मिळवलेले ते यश होते.
आताही बांद्रा-पुर्व येथे लाखभर मुस्लिम मते आहेत आणि म्हणूनच तिथे कॉग्रेसचे पारडे जड असल्याचे म्हटले जाते. पण तसे बोलणार्या लोकांना प्रकाश बाळा सावंत याची मुस्लिम वस्तीतली लोकप्रियता ठाऊक नाही. शिवसेनेने तिथे अन्य कार्यकर्त्यापेक्षा प्रकाशच्या पत्नीला उभे करण्याचा घेतलेला निर्णय भावनेपेक्षा राजकीय डाव जास्त आहे. बाळा सावंत अखंड लोकसंपर्कातला कार्यकर्ता असायचा आणि त्याच्या चाळीखाली अवेळीही लोकांची गर्दी दिसायची. त्यात टोपीवाले मुस्लिम व बुरखाधारी महिलाही नेहमी दिसत होत्या. अशा लोकांचा संपर्क त्याच्या पत्नीशीही सतत असायचा. म्हणूनच शिवसेनेचा मतदार धनुष्यबाणाला मत देईलच. पण ज्याचा संपर्क घरात होता, असा मतदार पक्षापेक्षा बाळा सावंतच्या पत्नीला मत द्यायला पुढे येईल. ती सेनेसाठी बोनस मते होती व असतील. थोडक्यात बांद्रा-पुर्व शिवसेनेचा बालेकिल्ला नव्हता व नाही. पण तिथे बाळा सावंत याची पुण्याई मोठी आहे आणि तीच सेनेसाठी यशाचा मार्ग असू शकतो. राणे यांना तिथून सहजासहज यश मिळणे अवघडच आहे. मात्र बालेकिल्ला फ़ोडायचे आव्हान भासवले जाते तसेही नाही. उद्धव ठाकरे यांच्याशी व्यक्तीगत रागलोभामुळे राणे यांच्यासाठी ही लढत अटीतटीची असू शकते. तितकी झुंज कदाचित दुसरा कोणी कॉग्रेसी उमेदवार देणार नाही. कारण मातोश्रीला तिच्या परिसरात येऊन धक्का देण्याची खुमखुमी असलेला उमेदवार कॉग्रेसला यश नाही तरी प्रेरणा देऊ शकेल. म्हणून कॉग्रेसने तो डाव खेळलेला असू शकतो. त्यात राणेंना तोंडघशी पाडण्य़ाचा हेतू असेल असे वाटत नाही. पण सेनेचा बालेकिल्ला वा मातोश्री आहे म्हणून त्या मतदारसंघाला चढवलेले मुलामे निव्वळ फ़सवे आहेत. त्यात तथ्य नाही. जितकी तासगावची जागा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे, तितकाही हा बांद्रा-पुर्व सेनेचा हक्काचा मतदारसंघ नाही.
No comments:
Post a Comment