बुधवारी दिल्लीत आम आदमी पक्षातली रणधुमाळी शिगेला पोहोचली असताना पक्षाचे राष्ट्रीय संयोजक, म्हणजे अन्य पक्षांच्या भाषेतले श्रेष्ठी अरविंद केजरीवाल मात्र आपल्या घरी होते. पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची सभा होती आणि त्यात अत्यंत महत्वाचे निर्णय घेतले जाणार होते. पण त्यापासून श्रेष्ठीच दूर होते. देशभरच्या वाहिन्या त्याचे थेट प्रक्षेपण करीत होत्या आणि काय अघटित घडणार यावर काहुर माजवण्यात आलेले होते. वास्तविक अघटित काहीच घडणार नव्हते. कारण अशी नाटके यापुर्वी अनेकदा अनेक राजकीय पक्षाच्या श्रेष्ठींनी यशस्वीरित्या पार पाडलेली होती. हा त्याच नाटकाचा नव्या संचातला प्रयोग होता. त्याची सुरूवात जशी खळबळजनक होती, तसाच त्याचा शेवटही ठरलेला होता. एकूण प्रक्रियेपासून खुद्द केजरीवाल पुर्णपणे दूर होते. पण त्यांचे खास विश्वासू संजय सिंग त्यांच्या वतीने दोन दिवस किल्ला लढवत होते आणि प्रशांत भूषण व योगेंद्र यादव यांच्यावर तो्फ़ाच डागत होते. त्यांचा सूर बघितला तर त्या दोन्ही मोठ्या नेत्यांनी पक्षाची शिस्त मोडलेली होती. त्यामुळे आता त्यांना पक्षात स्थान असू शकत नाही, हाच संजय सिंग यांचा सूर होता. अगदी कमीअधिक प्रमाणात दिलीप पाडे नामक दुसर्या नेत्याचाही सूर त्यापेक्षा वेगळा नव्हता. त्यानेच लेखी पत्र पाठवून या दोन्ही नेत्यांवर कारवाईची मागणी केलेली होती. थोडक्यात जे काही चालले होते, त्यापासून केजरीवाल संपुर्ण दूर होते. पण त्यात आपला कुठलाही हात नसल्याचे सिद्ध करण्यासाठी ट्वीट करून केजरीवाल यांनी आपण दु:खी असल्याची जाहिरातही करून टाकलेली होती. पर्यायाने कोणी त्यांच्यावर कारस्थानाचा आरोप करू शकत नव्हते. पण त्या दोन्ही नेत्यांना पक्षातून संपवण्याची योजनाच मुळात केजरीवाल यांची होती आणि त्याचे सूतोवाच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच केजरीवाल यांनी केलेले होते.
शपथविधी नंतर केलेल्या जाहिर भाषणात केजरीवाल यांनी खुलेआम योगेंद्र यादव यांना कानपिचक्या दिलेल्या होत्या. माध्यमातून आपला पक्ष विविध राज्यांच्या निवडणूका लढवील अशा घोषणा ऐकू येतात. ती अहंकाराची बाधा आहे आणि त्याच अहंकारामुळे लोकसभेत दाणदाण उडाली असे केजरीवाल यांनी सांगण्याची कोणती गरज होती? कारण दिल्लीच्या निकालानंतर योगेंद्र यादव याच एका नेत्याने तशी भाषा केलेली होती. किंबहूना लोकसभेनंतर विविध राज्याच्या विधानसभा लढवाव्या अशीच यादव यांची मागणीही होती. लोकसभेचा आग्रहही त्यांनीच धरला होता. केजरीवाल त्यामागे फ़रफ़टले आणि दिल्लीचीही सत्ता गमावून बसले होते. त्यामुळेच लोकसभेच्य पराभवानंतर त्यांनी फ़क्त पुन्हा दिल्लीची सत्ता मिळवण्याचा चंग बांधला आणि त्यासाठी अन्य राज्याच्या विधानसभा न लढवण्याचा निर्णयही घोषित करून टाकला होता. तिथेच न थांबता कुठल्या राज्य शाखेला लढायचे असेल, तर त्यांना दिल्लीकडून कुठली मदत मिळणार नाही, असेही बजावले होते. चारच महिन्यात दोन राज्यांच्या निवडणूका होत्या आणि त्यात यादव यांच्या हरयाणाचा समावेश होता. पण त्यांची मागणी नाकारून केजरीवाल यांनी आपली सर्व शक्ती दिल्लीत केंद्रीत केली आणि त्याचे फ़ळही मिळवले. मात्र त्यात हरयाणाच्या राजकारणात आपले स्थान निर्माण करायची संधी यादव यांना नाकारली गेली. तिथपासून त्या दोघांमध्ये बेबनाव सुरू झाला होता. मात्र धुर्त केजरीवाल यांनी दिल्लीचे निकाल हाती येईपर्यंत त्याचा गाजावाजा होऊ दिला नाही. अगदी यादव खेळत असलेला घातपाताचा डाव माहित असूनही केजरीवाल यांनी त्याची जाहिर वाच्यता होऊ दिली नाही. ते शिकार्याप्रमाणे योग्य संधीची वाट बघत बसले. म्हणूनच आता यादव यांच्यावर आरोपही आहे, तो दिल्ली मतदानाच्या पुर्वीचा. आणि निकालानंतर तात्काळ केजरीवाल यांनी जाहिर कानपिचक्या दिल्या.
दिल्लीत पक्षाला इतके मोठे यश मिळू नये, अशीच यादव यांची अपेक्षा होती आणि ते तसे बोलून दाखवीत. असा आरोप आता होतो आहे. म्हणजेच आपल्याला हरयाणाच्या राजकारणात संधी नाकारणार्या केजरीवालचे यश यादवांना खुपत होते, हे उघड होते. म्हणजेच या दोन प्रमुख नेत्यांमध्ये बेबनाव आणि वितुष्ट आले होते. सर्वेक्षणात पक्षाला ५७ जागा मिळतील सांगणारे यादव, खाजगीत पत्रकारांना मात्र तितक्या जागा मिळू नयेत म्हणायचे. याचा अर्थच छुपेपणाने त्यांनी आतून घातपात केलेला असावा. किंबहूना त्यांच्यावरही केजरीवाल यांनी आपल्या हस्तकांची पाळत ठेवून पुरावे गोळा केले, म्हणजे़च यादवांचा बेत त्यांनी हाणून पाडायचा प्रतिडाव केला असणारच. थोडक्यात हे भांडण अलिकडचे नाही, ते लोक्सभा पराभवानंतरचे आहे आणि अधिकच विस्तारत गेलेले असावे. अशा खेळीत केजरीवाल यादवांपेक्षा अतिशय वाकबगार असल्याने त्यांनी जाळे पसरून त्यात यादवांना चांगलेच गुरफ़टून टाकले होते. त्याची चुणूक शपथविधीच्या भाषणातूनच दिसली होती. ‘काही नेत्यांना अहंकार’ झाल्याचा केजरीवालांनी केलेला इशारा थेट यादवांकडे होता. पण कोणी माध्यमांनी वा पत्रकारांनी तो ओळखलाच नाही. सरकार स्थापन झाल्यावर केजरीवाल यांना शह देण्याची खेळी यादव खेळू लागले आणि केजरीवाल त्यासाठी आधीपासून सज्ज होते. म्हणूनच संयोजक बदलण्याची भाषा होताच त्यांनी पदाचा लगेच राजिनामा दिला आणि आपले विश्वासू सहकारी यादव-भूषण यांच्या अंगावर सोडून दिले. मात्र त्या दोघांची हाकालपट्टी इतरांकडून करून घेताना, केजरीवाल आपण बैठकीपासून संपुर्ण नामानिराळे राहिलेले आहेत. सोनिया गांधींनी १९९९ सालात हेच नाटक रंगवले नव्हते का? शरद पवार, तारीक अन्वर आणि पुर्णो संगमा यांनी तक्रार करताच सोनिया पक्षाध्यक्षपद सोडुन बाजूला झाल्या आणि पक्षातून हाकालपट्टी कोणाची झाली होती?
नव्या राजकीय नितीमूल्याची प्रस्थापना करायला राजकीय क्षितीजावर उगवलेल्या आम आदमी पक्षाची कहाणी वा कर्यकारिणी तरी वेगळ्या दिशेने वाटचाल करताना दिसते आहे काय? तिथे कॉग्रेसमध्ये कुठलाही पेचप्रसंग आला किंवा पक्षाचा दारूण पराभव झाला, मग कार्यकारिणीने एकमताचे नेतृत्वावर विश्वास व्यक्त करायचा, हेच एकमेव काम होत नाही काय? अन्य कुठल्या नेत्याने श्रेष्ठी म्हणजे प्रमुख नेत्यावर वा त्याच्या कामावर शंका घेतली, मग त्याच्यावर शिकारी कुत्र्याप्रमाणे तुटून पडण्यालाच कॉग्रेसमध्ये निष्ठावंत म्हणून ओळखले जात नाही काय? कालपरवा महिनाभर आधी जयंती नटराजन नामक पक्षाच्या प्रवक्त्याने काय तक्रार केली होती? खुप पुर्वीच राहुल गांधींना पाठवलेल्या पत्राची आठवण देऊन त्यांनी आपली बदनामी कशाला चालू आहे, असा सवाल केला होता. त्यांना काय अनुभव आला? तेव्हा तमाम कॉग्रेस नेते प्रवक्ते नटराजन यांच्यावर तुटून पडले नव्हते का? त्यांनाच सोनियानिष्ठ म्हणून ओळखले जाते ना? गेल्या दोन दिवसात केजरीवाल यांचे निकटवर्तिय म्हणून ओळखल्या जाणार्यांनी प्रशांत भूषण व योगेंद्र यादव यांच्याविषयी कोणते गौरवोद्गार काढलेले होते? फ़रक किंचित आहे. पवार वा नटराजन यांच्या हाकालपट्टीसाठी कार्यकारिणीची सभा घेतली जात नाही. आम आदमी पक्षात तेवढा तमाशा केला जातो. बाकी अस्सल कॉग्रेसी व श्रेष्ठींचा कारभार चालू नाही काय? बाकीच्या पक्षात सर्व काही बंद दरवाज्याआड चालते आणि आपला कारभार पारदर्शक व खुला असल्याचा दावा अडीच वर्षे करणार्या या नव्या पक्षाच्या बैठका व त्यातले निर्णय त्याच्याच स्वयंसेवकला कसे कळतात? नेत्यांनी निर्णय घेतले, मग कार्यकारिणीने त्यावर शिक्कामोर्तब करण्यानेच तिथेही निर्णय होतात ना? फ़ार कोवळ्य़ा वयात आम आदमी पक्ष ‘वयात आला’ ना? नाटक जुनेच पण प्रयोग मात्र नव्या संचात खुपच छान रंगला आहे ना?
No comments:
Post a Comment