Friday, December 4, 2015

कथा नाट्याच्या शोधातील नानाविध पात्रे //// महायुद्धाची छाया (६)हा सगळा प्रकार एखाद्या मोठ्या महाकादंबरी वा मालिकेसारखा असतो. ज्यात एक एक पात्र आपल्यासमोर पेश केले जात असते. अनेकदा एखादे दुसरे पात्र कथेशी कुठे संबंधित आहे, त्याचा आपल्याला थांग लागत नाही. पण अशी अनेक पात्रे कथानकातून खेळवून आपल्या मनात त्यांच्याविषयी कुतूहल निर्माण केले जाते. पुढे कथानक उलगडत जाते, तेव्हा त्याची योजना कशासाठी होती, हे लक्षात येते. अन्यथा अशी पात्रे कथेत विसंगत वाटत रहातात. तशीच अनेक अनावश्यक वाटलेली पात्रे वास्तव जीवनात महत्वाच्या घडामोडीतून आपल्यासमोर येत असतात वा आणली जात असतात. त्यांचा एकूण सार्वजनिक जीवन वा घडामोडीशी असलेला संबंध आपल्याला तात्काळ संदर्भहीन वाटण्याइतका चमत्कारीक असतो. कुणा अनोळखी वा कधीच नावही ऐकले नाही अशा व्यक्तीला कुठले तरी मोठे सन्मानाचे पारितोषिक मिळते. मग त्याचा माध्यमातून गाजावाजा सुरू होतो. अगदी अलिकडची गोष्ट घ्या. कैलास सत्यार्थी नावाच्या भारतीयाला नोबेल पुरस्कार मिळाला आणि आपण बहुतेक भारतीय थक्क होऊन गेलो ना? कोण हा सत्यार्थी आणि त्यांनी असे कोणते काम केले, की त्यासाठी त्यांना जगन्मान्य असे पारितोषिक मिळावे? त्यांचे इतके मोठे महान कार्य एक टक्काही भारतीयांच्या कानी कधी आलेले नाही. पण त्यांची महत्ता थेट नोबेल पुरस्कार देणार्‍यांपर्यंत जाऊन पोहोचली. मग त्याचा इतका गाजावाजा सुरू होतो, की पुरस्कार मिळाला म्हणजे त्यांचे कार्य महान असणारच, याची खात्री आपल्याला पटते. कारण तात्काळ तमाम माध्यमातून त्यांच्या महान कार्याचा गदारोळ सुरू होतो. खरेच त्यांचे कार्य असे महान होते, तर भारतातल्या कुठल्याच प्रमुख माध्यमांनी त्याची आजवर साधी दखल कशाला घेतलेली नव्हती? कुठल्या वृत्तपत्र वा वाहिनीने त्यांची भारतीयांना ओळख कशाला करून दिलेली नव्हती?

असे प्रश्न क्वचित कुणाच्या मनात येऊ शकतात आणि येतातही. पण ते बोलून दाखवण्याची हिंमत कितीजणांपाशी असते? आणि समजा तुम्ही असा प्रश्न वा शंका उपस्थित केलीत, तरी त्याची कुठलेही प्रमुख माध्यम दखलही घेणार नाही. माध्यमातून इतका धुरळा मग उडवला जातो, की रातोरात सत्यार्थी भारतातले महान सामाजिक कार्यकर्ते होऊन जातात. कुठल्याही बाबतीत मग माध्यमांचे कॅमेरे-माईक त्यांच्या समोर येऊन त्यांना मत विचारू लागतात आणि सत्यार्थी जनमानसाचे खरे प्रतिबिंब म्हणून लोकांसमोर पेश होऊ लागतात. काही महिन्यापुर्वी जी व्यक्ती एक टक्का भारतीयांना माहितीसुद्धा नव्हती, तीच आता जनमानसाचे प्रतिबिंब म्हणून पेश केली जाऊ शकते. त्या्च सत्यार्थी यांच्या सोबत मलाला नावाच्या कोवळ्या पाकिस्तानी मुलीलाही नोबेल पारितोषिक देण्यात आले. दोनतीन वर्षापुर्वीच तिच्यावर पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतामध्ये तालिबानांनी प्राणघातक हल्ला केलेला होता. तिला उपचारार्थ युरोपात आणले गेले आणि तिथून मलाला जगाला ठाऊक झाली. आता तर नोबेल मिळाल्याने जगातल्या कुठल्याही मुली, मुलांचे शिक्षण वा इस्लाम विषयक कुठल्याही शंकेचे समाधान करणारी मलाला ही बुद्धीमंत होऊन गेली आहे. कारण ती नोबेलविजेता आहे. कधी नोबेल तर कधी मॅगसेसे, बुकर अशी पारितोषिके घेतल्यानंतरच महान व्यक्तीमत्वे अवतरली असल्याचा आपल्याला शोध लागत असतो. डॉ. अमर्त्य सेन हे पात्रही तसेच आहे. अमर्त्य सेन कोण, त्यांचे व्यक्तीगत जीवन काय आहे? त्यांनी कोणते पराक्रम गाजवलेत, याविषयी किती लोकांना काय ठाऊक असते? सेन यांच्या अनेक मतांना खोडून काढून खोटे पाडले गेले आहे. पण त्याचा उल्लेखही कधी केला जात नाही. आपल्याविषयीच्या आक्षेपांना उत्तर वा खुलासे देण्याचेही सौजन्य सेन यांनी दाखवलेले नाही. पण आपल्याला त्याचा थांगपत्ता नसतो.

नोबेलविजेते म्हणून त्यांचा प्रत्येक शब्द थेट इश्वराची आकाशवाणी असल्याप्रमाणे आपल्यापुढे पेश केले जात असते. तीच कथा बहुतेक पुरस्कारप्राप्त मान्यवर असते. त्यांची खरीखुरी महिती आपल्याला कधी दिली जात नाही वा लपवली जात असते. पण त्यांचे मत म्हणजेच भारताचा वा जनतेचा आवाज, असेच पेश केले जात असते. परंतु वास्तवात सामान्य जनतेपासून अशी माणसे मैलोगणती दुर असतात. जनतेच्या मनातली कुठलीही गोष्ट त्यांना ठाऊक नसते. अरुंधती रॉय, अमर्त्त्य सेन, गिरीश कर्नाड असे शेकडो पुरस्कार विजेते तसे दिसतील. त्याखेरीज भारतातले विविध पुरस्कार मिळवणारेही त्यात आहेत. साहित्य अकादमी कशाच्या आधारावर पुरस्कार विजेत्याची निवड करत असते? आजवर ज्यांना हे पुरस्कार मिळाले, त्यांची जनतेतील वा वाचकातील मान्यता लोकप्रियता किती असते? मग त्यांना कोणत्या निकषावर सन्मान पुरस्कार दिलेले असतात? नोबेलपासून प्रत्येक पुरस्कार त्याच निकषावर तपासण्यासारखा आहे. हे पुरस्कार अशाच व्यक्तींना शक्यतो दिले जातात, ज्यांचा वापर पुढल्या काळात विशिष्ठ राजकीय सामाजिक वा धोरणात्मक व्युहरचनेमध्ये करता येणार असतो. अर्थात प्रत्येक पुरस्कार विजेता तितकाच बोगस नसतो. काही पुरस्कार खरेच योग्य व्यक्तीला दिलेले असतात. पण असे प्रतिभावंत कधी आपल्या क्षेत्राच्या बाहेरच्या घडामोडीविषयी भाष्य करताना दिसणार नाहीत. उलट ज्यांचे कर्तृत्व गुणवत्ता शंकास्पद आहे, तरीही पुरस्कार मिळाले आहेत, ते मात्र अगत्याने अशा राजकीय, धोरणात्मक कसोटीच्या प्रसंगी पुढे आलेले दिसतील. मग अशा बोगस लोकांचा पुरस्कार गुणवत्ता ठरावी, म्हणून काही प्रसंगी खर्‍या प्रतिभावंतांना पुरस्कार दिले जात असतात. अन्यथा बहुतांश बडे पुरस्कार हे माणसे समाजाच्या माथी मारण्याच्या हेतूनेच दिले-वाटले जात असतात. असे पुरस्कार देणार्‍या संस्था, फ़ौडेशन यांच्या हेतूविषयी म्हणूनच शंका घेणे भाग आहे.

अरब स्प्रिंग असो किंवा भारतातील एनजीओ स्वयंसेवी संस्थांचे चाललेले काम असो, त्यामागची प्रेरणा म्हणूनच महत्वाची ठरते. त्यात येणारा पैसा व निधी कुठल्या मार्गाने व कुणाच्या तिजोरीतून येतो त्याचाही शोध म्हणूनच अगत्याचा आहे. एका बाजूला अमेरिकेतील फ़ोर्ड फ़ौंडेशन समाजातली नाराजी अन्यायाची भावना उभारायला मदत करणार आणि दुसरीकडे अशा उफ़ाळलेल्या जनक्षोभाला राजकीय हातभार लावायचे काम अमेरिकन सरकार व त्याचे गुप्तचर खाते करणार. असे असेल, तर त्यामागचे हेतू तपासणे आवश्यक होऊन जाते. इजिप्तपासून भारतापर्यंत भ्रष्टाचारी राजकीय मनमानीच्या विरोधातल्या उठावाला चालना देणार्‍या तमाम स्वयंसेवी संस्थांना पारदर्शक कारभार हवा, असा आग्रह धरला गेला. पण त्याच संस्थांचा कारभार वा आर्थिक व्यवहार कितीसे पारदर्शक असतात? आपल्याला कोणी किती देणगी दिली व कोणत्या हेतूने दिली, त्याविषयी लपवाछपवी कशाला असते? गेल्या एप्रिल महिन्यात अशा दहा हजार संस्थांची बॅन्केतील खाती भारत सरकारने गोठवली. खुद्द फ़ोर्ड फ़ौंडेशनकडे हिशोब मागून रितसर कायद्यानुसार नोंदणी करायला सक्ती केली. तिथूनच भारतात असंहिष्णुता असल्याचा साक्षात्कार अनेकांना होऊ लागला. किंबहूना हा साक्षात्कार भारतीय अभिजनांच्याही आधी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांना झाला होता. ही फ़ोर्ड फ़ौंडेशनवरची सक्ती मोदी सरकारने मागे घ्यावी, म्हणून केरी यांनी रदबदली केलेली होती. त्याला प्रतिसाद मिळाला नाही आणि मगच भारतात असंहिष्णूतेच वातावरण असल्याचे साक्षात्कार एकामागून एक प्रतिभावंतांना होऊ लागला. त्याचा आवाज उठवणार्‍यांची यादी हाती घेतली, तर त्यात बहुतांश फ़ोर्ड फ़ौंडेशनच्या निधीचे बेहिशोबी लाभार्थी असावेत, ह्याला योगायोग मानता येईल काय? याच फ़ौंडेशनच्या आर्थिक कृपेने संशोधन करणारी एक तरूणी (शिमरीत ली) अरब स्प्रिंग व लोकपाल आंदोलनात लुडबुडत असावी ह्यालाही योगायोगच म्हणायचे काय? महायुद्धाला तोंड फ़ुटण्यापुर्वी शत्रू प्रदेशात सुरक्षा पोखरणे आवश्यक असते ना? (अपुर्ण)

6 comments:

 1. अत्यंत तार्कीक विश्लेषण ! सध्या विविध टीव्ही वाहिन्यांवर सामान्य दर्शकांना खिळवून त्यांचे तासनतास खाणाऱ्या धंदेवाईक मालिका हे उत्कृष्ट उदाहरण आहे. मनोरंजनाच्या या लोलीपोप मधून कुठलेही विष लोकांच्या गळी उतरवले जाऊ शकते. मात्र वर्तमान सरकार या इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमांचे उपद्रवमूल्य कमी लेखत असल्याचे जाणवते. या बेलगाम मिडीयाला वेळीच वेसण घातली नाही तर त्यात एका चांगल्या सरकारचा बळी जाईल हे आरश्याप्रमाणे स्पष्ट आहे.

  ReplyDelete
 2. Baap re! Tarich! Sagale media kase sarakarachya virodhat, prashnach padala hota.

  ReplyDelete
 3. भाऊ हे लाेक मिडियाला हा पैसा चारतात का? कारण मिडिया या बाबत काहीच बोलत नाही

  ReplyDelete
 4. अगदी योग्य विश्लेषण केले आहे भाऊ

  ReplyDelete