Wednesday, December 2, 2015

गिरीश कुबेर ‘लिला’ भन्साळीबुद्धीमंत कोणाला म्हणतात त्याचे नमूने हवे असतील, तर काही संपादक व पत्रकारांचे लिखाण नियमित वाचावे. ‘लोकसत्ता’चे गिरीश कुबेर त्यापैकीच एक आहेत. म्हणून मी सहसा त्यांचे वाचत नाही. पण काही प्रसंगी इथे सोशल मीडियातील मित्रांच्या आग्रहामुळे तिकडे वळावे लागते. कुबेरांचा नवा मुर्खपणा अगत्याने सांगणार्‍या अशा मित्रांचा आग्रह नाकारताही येत नाही. कारण भन्साळी वा रामगोपाल वर्मा जर संपादक झाले असते, तर त्यांनी कसे अग्रलेख वा विवेचन केले असते, त्याचा अनुभव काही प्रसंगी कुबेरांच्या बुद्धीचातुर्यातून अनुभवायला मिळत असतो. यातला मजेशीर भाग असा असतो, की कुबेर काय लिहीतात ते सहसा वाचत नाहीत. त्यामुळे काल लिहीले त्याच्या तब्बल उलट्या टोकाला जाऊन तर्कविहीन लिहीण्यात त्यांचा ‘हात’ कोणी धरू शकणार नाही. म्हणूनच क्वचित प्रसंगी असे विनोदी अग्रलेख वाचण्याची मौज काही और असते, हे नाकारता येत नाही. भन्साळीच्या मस्तानी चित्रपटात म्हणे तिच्यासह बाजीरावाच्या पत्नीचा नाच दाखवला आहे. त्यावर खुप चर्चा सोशल मीडियात बघायला मिळाली. नेमका काहीसा तसाच बौद्धीक नाच कुबेरांनी दोन भिन्न अग्रलेखातून रंगवला आहे. एक आहे १६ नोव्हेंबरचा पॅरीसच्या घातपाती हल्ल्यानंतरचा अग्रलेख (फ्रेंच ‘धर्म’क्रांती) आणि दुसरा आहे मुंबईतल्या राष्ट्रगीत घटनेचा (बिनडोकांची राष्ट्रभक्ती) उहापोह करणारा! या दोन्हीतले तर्क व युक्तीवाद व मुद्दे तपासले, तरी भन्साळीलाही कुबेर लाजवू शकतात, याची खात्री पटेल. कारण भन्साळीने तरी मस्तानी व बाजीरावाची पत्नी वेगवेगळ्या दाखवल्या आहेत. पण इथे कुबेर एकाच विषयाला डबल रोल करायला लावून चमत्कारीक बौद्धिक कसरत करताना दिसतात. त्यामुळे यापुढे बहुधा भन्साळी आपल्या पटकथा व डायलॉग लिहीण्याचे आमंत्रणही कुबेरांना देवू शकेल अशी खात्री बाळगावी.

पॅरीस हल्ल्यानंतर कुबेर लिहीतात, ‘इस्लामी दहशतवाद्यांकडून फ्रान्स या देशास वारंवार लक्ष्य केले जाते यामागे कारण आहे आणि ते त्या देशाच्या प्रामाणिक निधर्मवादी विचारांत आहे. सेक्युलर म्हणवून मिरवणाऱ्या आपल्याकडील पुरोगाम्यांसारखे फ्रान्समधील निधर्मवादी भंपक नाहीत. आपल्याकडे ही अशी मंडळी जो काही आहे तो शहाणपणा फक्त हिंदुत्ववाद्यांनाच सांगावयास जातात. अन्य धर्मीयांच्या अतिरेकाबाबत भाष्य करावयाची वेळ आल्यास आपल्या निधर्मीवाद्यांना दातखीळ बसते. फ्रान्समध्ये तसे नाही.’ आता तेच कुबेर दोन आठवड्यांनी काय अक्कल पाजळतात बघा. ‘बिनडोक राष्ट्रभक्ती’ शीर्षकाखाली ते लिहीतात, ‘चित्रपटगृहात राष्ट्रगीत सादर होत असताना बसून राहिले म्हणून मुंबईतील एका कुटुंबाला चित्रपटगृहातून बाहेर काढण्याचे शौर्य आसपासच्या काही मंडळींनी गाजवल्याचे वृत्त सध्या सर्वत्र चर्चेचा विषय बनलेले आहे. या कुटुंबात एक महिला होती. त्यांच्यासह लहान मूल होते. ती महिला आणि तिच्या समवेतचे तिघे हे पडद्यावर राष्ट्रगीत सुरू झाल्यावर उठून उभे राहिले नाहीत. तेव्हा हा देशाचा अपमान आहे असे अन्य आसपासच्यांनी मानले आणि तो करणाऱ्यांची त्यांनी निर्भर्त्सना केली. राष्ट्रभक्ती, नैतिकता ही अशी घाऊक पातळीवर प्रदर्शित करावयाची संधी मिळाल्यावर एरवीच्या मुखदुर्बळांनाही चेव येतो. तसा तो याही वेळी आला. त्यामुळे या अपमानकर्त्यांच्या विरोधात हुल्लडबाजी वाढली. या कुटुंबीयांनी चित्रपटगृहातून काढता पाय घेतल्यानंतरच ती शांत झाली. त्यानंतर चित्रपटगृहातील सर्व राष्ट्रभक्तांच्या भडकलेल्या भावनाही शांत झाल्या.’

दोन आठवड्यापुर्वी आपण ‘दातखिळ बसते’ असा शब्दप्रयोग कोणासाठी वापरला त्याचे तरी स्मरण कुबेरांना राहिले आहे काय? की त्यांचीच आता दातखिळी बसली आहे? की त्यांनी राष्ट्र प्रतिकांचा कायदा सांगून राष्ट्रभक्तीची खिल्ली उडवावी? यासंदर्भाने आणखी काही तपशील महत्वाचा आहे. पॅरीसच्या हल्ल्यानंतर तिथे चालू असलेला सामना सोडून दिला गेला आणि अवघे स्टेडीयम मोकळे करण्यात आले. त्यानंतर जगभर एक चित्रण अगत्याने दाखवले गेले. इतकी भयंकर घटना घडून गेली असतानाही, फ़्रेंच क्रिडारसिक घोळक्याने संथपणे स्टेडीयमच्या बाहेर पडत होते आणि सगळेच्या सगळे एकसूरात फ़्रेंच राष्ट्रगीत गुणगुणत होते. सामुहिक राष्ट्रगीत गायन त्यांनी अशा प्रसंगी गुणगुणण्याचे सार्वत्रिक व जागतिक कौतुक कशासाठी चालले होते? समोरून बंदुका व बॉम्ब वापरले जात असताना, या लोकांना आधार कुठला होता? राष्ट्रगीताचा ना? म्हणून ते राष्ट्रगीत त्यांचे कसले संरक्षण करू शकणार होते का? त्यातच आणखी कोणी अतिरेकी जिहादी असता आणि त्याने उरलेला बॉम्ब फ़ोडला असता, किंवा पुन्हा गोळीबार सुरू केला असता, तर त्यातून हे राष्ट्रगीत वाचवू शकणार होते काय? अजिबात नाही! पण त्यांचे नुसते गुणगुणणे त्याना संकटात धीर देण्याचे काम करीत होते. प्रतिके त्यासाठीच असतात आणि ते सामान्य माणसाला कळते. म्हणून त्या फ़्रेंच घोळक्याने सामुहिक राष्ट्रगीत गायन सुरू केले होते. व्यवहारी विचार केला तर राष्ट्रगीत प्राण वाचवू शकणार नसेल, तर त्याही क्षणी त्याचे गायन हा बिनडोक देशभक्तीचाच दाखला होतो. कुबेरांच्या शब्दात सांगायचे तर, ‘एरवीच्या मुखदुर्बळांनाही चेव येतो’. आणि त्याचीच अशा संकटकाळात गरज असते. जेव्हा देशातले कायदे, सुरक्षा यंत्रणा, बुद्धी व नेते नपूंसक ठरतात आणि सामान्य माणसाला सुरक्षिततेची हमी देवू शकत नसतात, तेव्हा अशीच प्रतिके बुडत्यांना काडीचा आधार वाटू लागतो. त्यातली भ्रामक जादू त्यांना आधार वाटू लागतो आणि असा भ्रम म्हणूनच सतत टिकवावा लागतो. चित्रपटगृहात तीच जादू टिकवण्याचा अट्टाहास झाला. पण कुबेरांसारख्या भंपक बुद्धीवादाच्या तो आवाक्यातला विषय नाही. त्यासाठी सामान्य बुद्धी आवश्यक असते. कुशाग्र बुद्धी कामाची नसते.

जगभरच्या सामान्य बुद्धीच्या अब्जावधी लोकांना ‘पिगी बॅन्क’ म्हणजे एक डुकराचे व्यंगचित्र किंवा त्याचे प्रतिक असलेली पैशाची पेटी हे कळते. त्यासाठीच हे प्रतिक बनवलेले आहे. म्हणून असे चित्र वा आकार म्हणजे नाणी जमवण्याचे साधन असल्याचे चटकन उमजते. त्यासाठी त्यावर पैसा साठवण्याची जागा असे लिहावे लागत नाही. ते नुसते प्रतिक आहे. आणि त्याच प्रतिकाचा वापर सरसकट जगभरच्या कुठल्याही भाषेत होत असतो. ‘लोकमत’ नावाच्या मराठी दैनिकातही एका चित्रकाराने आयसिस या जिहादी संघटनेचा पैसा कुठून कसा जमा होतो, त्याचे आशयचित्र बनवताना त्याचाच वापर केला. ते अधिक स्पष्ट व्हावे म्हणून त्यावर उर्दू वा अरबी दिसणारी काही अक्षरे टाकली. त्यातून काय चमत्कार झाला आपल्या महाराष्ट्रात? तर ओवायसी यांच्या एम आय एम नामक पक्षाच्या गुंड कार्यकर्त्यांनी लोकमतच्या अनेक कार्यालयात घुसून मोडतोड केली. लोकमतचे अंक जाळले. त्यामागे कोणती बुद्धी काम करत होती? तर डुक्कर हे इस्लाममध्ये अत्यंत निषिद्ध मानलेले प्रतिक आहे. डुक्कर आणि त्यावर अरबी अक्षरे बघून आपल्या धर्माचा अपमान व अवमान झाल्याचा दावा करीत हे गुंड वर्तमानपत्राच्या कार्यालयात घुसले आणि त्यांनी प्रचंड घुडगुस घातला. त्यालाही निव्वळ प्रतिकच कारण होते ना? त्याला बुद्धीचे कुबेर काय म्हणणार? ‘बिनडोक भक्ती’ म्हणायचे तर त्यावर आपली अक्कल पाजळायला काय हरकत होती? पण तिथे या कुशाग्र बुद्धीमत्तेच्या कुबेराची ‘दातखिळ’ बसली. अविष्कार स्वातंत्र्यावर हल्ला झाला आणि प्रतिकासाठीच झाला. प्रतिक वापरले एका अर्थाने होते आणि अर्थ भलताच घेतला गेला, त्याला निर्बुद्धतेचा कळस म्हणायला हवा. पण ते काम डोके ठिकाणावर असेल तर होऊ शकते, बिनडोक संपादक असो किंवा बुद्धीमान बिनडोक असो, त्याला प्रतिके कळत नाहीत की त्यामागचा आशय कळत नाही. म्हणून छापणार्‍या संपादकाने चित्रकाराची हाकालपट्टी केली आणि हल्ला करणार्‍या गुंडांची जाहिर माफ़ी मागून शरणागती पत्करली. दुसरीकडे बुद्धीचे कुबेर असलेल्यांना खरा बिनडोकपणा लपवायचा असल्याने आपली दातखिळ बसली आहे हे झाकण्यासाठी त्यांनी तोंडाला कुलूप लावले आणि लेखणी हाती घेऊन आपल्या बिनडोकपणाची साक्ष दिली. पत्रकारितेवर झालेला असंहिष्णू हल्ल्यावर लिहायची हिंमत नव्हती. ती अगतिकता झाकण्याचा उत्तम उपाय म्हणजे हिंदूत्ववादी वा तथाकथित राष्ट्रभक्तांची खिल्ली उडवणे. याला म्हणतात गिरीश कुबेर ‘लिला’ भन्साळी!


13 comments:

 1. अप्रतिम लिहिलंय !! तो लेख वाचून हतबुद्ध व्हायला झाला . तुम्ही अतिशय उतृक्ष्ठ शब्दात भावना व्यक्त केल्या आहेत. त्या मुर्खांनी हे वाचवा हीच अपेक्षा !!

  ReplyDelete
 2. या भिकार "कुबेराची पिगीबॅंक" कोण भरतंय कुणास ठावुक? तुमचा "भंपक" हा शब्द अंगावर माप घेतल्यासारखा फिट्ट बसतोय कुबेरास! :-D

  ReplyDelete
 3. अप्रतिम ....

  ReplyDelete
 4. भाऊ, खरच सुंदर लिहिलय. या कुबेराला असं वाटतं कि जगाचे ज्ञानाचे कुबेर पण आपणच आहोत पण तो तर डोक्यावर पडलाय.
  छान आरसा दाखवला त्याला...

  ReplyDelete
 5. किशोर कुबेर प्रौढ कधी होतील ?

  ReplyDelete
 6. नमो गिरीश ओवेसी

  ReplyDelete
 7. त्या लोकमत पेपर वर पिग्गी बँक च्या प्रतीकावरून शांती दूतांनी हल्ला केला (शनिवार ची मंथन पुरवणी,विषय-ईसीस चा पैसा).मिडीया को जैसे सांप सुंघ गया….ना टीव्ही वर,ना पेपर मध्ये….कुठेच बातमी ही बातमी नाहीये.
  विषयाला वाचा आणी मिडीया च्या तोतयागिरी ची मुस्काड फोडल्या बद्दल धन्यवाद भाऊ….

  ReplyDelete
 8. Great Bhau. Sundar aani sapraman lihilat. Kuber ha Hindudharmdweshi samajwadi aahe. Swatachya pustakacha Tatyan cha ha udo udo karat asato. Tondane samajwad aani paise kamawayala bhandwalshahanchi hujaregiri! Alonikaka

  ReplyDelete
 9. Completely agree with you, and echo the same thoughts. Here's my blog post criticizing the same editorial.
  http://gmarathi.blogspot.in/2015/12/blog-post.html

  ReplyDelete
 10. विषयाला वाचा आणी मिडीयाच्या तोतयागिरीची मुस्काड फोडल्या बद्दल धन्यवाद भाऊ….
  Milind Revalkar

  ReplyDelete
 11. ढोगीपणा उघडकीस आणल्याबद्दल धन्यवाद

  ReplyDelete
 12. bhau ya kuberacha varcha majla khali jhalay

  ReplyDelete
 13. हाल में सभी राष्ट्रवाद को बहुत बढ़ावा दे रहे पर ये भूल रहे है की राष्ट्रवाद की सोच एक दूसरे को अलग करती जा रही है. सभी को साथ में रहना है किन्तु पूरी दुनिया में ये राष्ट्रवाद इतना हावी हो रहा है की सभी को एक दूसरे से अलग कर रहा है। शांति के लिए राष्ट्रवाद की नहीं सभ्य , वैचारिक, सुधार करनेवाले समाज की जरुरत है।

  ReplyDelete