Monday, December 28, 2015

पेकिंगचे बिजींग झाले, त्याची गोष्ट१९६८ सालात मी नव्याने पत्रकार म्हणून उमेदवारी करीत होतो. आजच्यासारखा तेव्हा माध्यमांचा प्रचंड विस्तार झालेला नव्हता, की पत्रकारिता शिकवणार्‍या शिक्षणसंस्था उदयास आलेल्या नव्हत्या. होतकरू पत्रकारांना अनुभवातून जाणत्यांचे फ़टकारे सहन करत पत्रकारिता शिकावी लागत होती. अशा वेळी कुठला शब्द लिहीला व त्याचे प्रयोजन काय असेही वरीष्ठ बातमी तपासून विचारीत असत. अशा काळात आम्ही चीनविषयक बातमी असेल तर जे शब्द योजायचो, ते आज कालबाह्य झाले आहेत. उदाहरणार्थ तेव्हा चीनची राजधानी म्हणून आम्ही पेकिंग असे लिहीत असू. आता त्याचा सर्वभाषिक उल्लेख बिजींग असा होतो. चीनचे नेते व पहिले अध्यक्ष चेअरमन माओ होते आणि आम्ही त्याच्या उल्लेख माओ त्से तुंग असा करीत असू. आज ते सगळे बदलले आहे. हा बदल १९७४ नंतरच्या काळात झाला. तो अकस्मात झाला नाही, अमेरिका चीन यांच्यात संबंध सुधारले आणि त्यानंतर चीनचा समावेश राष्ट्रसंघात व्हेटो वापरणारा सदस्य म्हणून झाला. तोपर्यंत चीन नव्हेतर तैवान व्हेटोचा अधिकारी होता. कारण कम्युनिस्ट चीनला अमेरिकेची मान्यता नव्हती आणि म्हणूनच त्या देशाला त्याचे रास्त अधिकार नाकारले जात होते. शिवाय त्याच दोन देशात एक अपरोक्ष युद्धही जुंपलेले होते. कंबोडीया, व्हिएतनाम अशा अतिपूर्वेकडील देशात कम्युनिझम येऊ नये म्हणून अमेरिका तिथल्या हुकूमशहा वा लष्करशहांना हाताशी धरून शीतयुद्ध खेळत होती, तर तिथल्या बंडखोरीला चीन व रशियाचा आधार होता. त्यातल्या चीनला अमेरिकेची मान्यता नव्हती की दोन देशात औपचारिक संबंधही नव्हते. ती कोंडी १९७३-७४ साली फ़ुटली आणि चीन व्हेटो अधिकार असलेला राष्ट्रसंघाचा महत्वपुर्ण सदस्य बनला, त्यामुळे माओ त्से तुंगचा माओ झेडॉंग होऊन गेला तर पेकिंगचे बिजींग झाले.

हा चमत्कार कसा घडला, ते आजच्या तरूण पिढीला कदाचित ठाऊक नसेल. तेव्हा अमेरिकेचे अध्यक्ष रिचर्ड निक्सन होते आणि त्यांच्याच काळात व्हिएतनामच्या लढाईत अमेरिकेला लज्जास्पद पराभव स्विकारावा लागला होता. ती माघार चीन-अमेरिका मैत्रीपासून सुरू झाली. पण या दोन देशात मैत्री होण्यासाठी कोणी तिसर्‍या देशाने मध्यस्थी वा प्रयत्न केले नव्हते. त्यांनीच एकमेकांशी थेट संवाद साधून ती कोंडी फ़ोडली होती. निक्सन यांचे सुरक्षा सल्लागार व नंतरचे परराष्ट्रमंत्री डॉ. हेन्री किसींजर होते. १९७३ च्या सुमारास ते भारतभेटीला आलेले होते आणि तसेच पुढे पाकिस्तानच्या दौर्‍यावर गेले. भारतापेक्षा त्यांचा पाकिस्तानातला मुक्का्म अधिक काळ होता. पण तिथे त्यांनी काय केले, त्याचा फ़ारसा तपशील माध्यमातून आला नाही. मात्र तिथून ते अमेरिकेला माघारी परतले आणि अमेरिका-चीन यांच्यातल्या मैत्री वा संबंधांना वेग आला. तशा हालचाली सुरू झाल्या. लौकरच अमेरिकेचे अध्यक्ष निक्सन थेट पेकिंगला पोहोचले. दोन देशांनी एकमेकांना मान्यता दिली व त्यांचे दूतावास सुरू झाले. जगाचे राजकारण व राजकीय समिकरण त्यातून बदलले गेलेले होते. त्याची सुरूवात कुठे आणि कशी झाली होती? तर पाकिस्तानात दौर्‍यावर आलेले डॉ. हेन्री किसींजर तीन दिवस पाकिस्तानातूनही गायब झालेले होते. मात्र त्याचा कुठेही गवगवा होऊ दिलेला नव्हता. तेव्हा ते गुपचूप चीनमध्ये गेले होते. त्यांनी अतिशय गुपचूप माओ त्से तुंग यांची भेट घेऊन बोलणी केली होती. त्यांना भेटवण्य़ात पाकिस्तानने मध्यस्थी केलेली असणार हे उघड आहे. कारण किसिंजर पाकिस्तानातून गुपचूप तिकडे गेलेले होते. बाकी सर्व काही अमेरिका व चीन यांनीच आपसात ठरवले किंवा केलेले होते. पण त्यामुळे जगाचे राजकीय गणित बदलून गेले, ही वस्तुस्थिती आहे. पेकिंगचे बिजींग झाले हेही खरे आहे.

आजच्यासारखा तेव्हा माध्यमांचा पसारा नव्हता किंवा इतकी सुसज्ज साधने नव्हती. गल्लीबोळात कॅमेरे लावलेले नसायचे, की जिकडे बघाल तिथे पत्रकर बातमीदारांचा ससेमिरा लागलेला नसायचा. म्हणून किसिंजर यांची ती पेकिंगभेट गोपनीय राहू शकली. अर्थात आज तसे झाल्यास त्याचा किती गाजावाजा झाला असता, याची नुसती कल्पना करता येईल. किसिंजर कुठे आहेत? त्यांचे काय झाले? ते कुठे जाऊन लपलेत? त्यांचे बरेवाईट काही झाले काय? अशा शेकडो प्रश्नांनी अमेरिकनांना भंडावून सोडले असते आणि पाकिस्तानी नेतेही प्रश्नांच्या भडीमारांनी घायाळ झाले असते. पण मुददा तो नाही. त्या आकस्मिक व गोपनीय भेटीने जगाचा इतिहास व राजकीय गणिते बदलली, हे वास्तव आहे. तेव्हाही माध्यमातून त्याविषयी चर्चा झाल्या, लेख लिहीले गेले. पण त्यातून काय साधले जाईल वा जाऊ शकते, त्याचा फ़ारसा उहापोह होऊ शकला नव्हता. कारण सरळ आहे, मुत्सद्देगिरी हा जाहिर चर्चेचा विषय नसतो आणि राजनैतिक निर्णय पत्रका्री बातम्यांच्या माध्यमातून होत नसतात. संभवनीय परिणाम विचारात घेऊन त्याबाबत निर्णय घेतले जातात. म्हणूनच त्यातले मुद्दे व तपशील याविषयी गोपनीयता पाळली जात असते. चंद्रावर गेलेला आम्रस्ट्रॉग यापेक्षा किसींजर यांच्या पेकींगभेटीबद्दल गोपनीयता म्हणूनच पाळली गेली होती. त्याची कारणे व प्रयोजन सामान्य माणूस वा पत्रकार यांच्या आवाक्यातली गोष्ट नसते. याचे भान सुदैवाने तेव्हाच्या संपादक पत्रकारांना होते. म्हणून बातमीच्या पलिकडे त्याची चिवडाचिवड तेव्हा झाली नाही. परिणामी दोन देशात सलोखा झाल्याचे उघड झाल्यावरच माध्यमांनी त्याचे अर्थ शोधले गेले वा उलगडण्याचा प्रयास केला होता. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाहून माघारी येताना अकस्मात लाहोर येथे थांबा घेतला, म्हणून उखाळ्यापाखाळ्य़ा काढण्याची जी स्पर्धा झाली. त्यामुळे हा जुना इतिहास आठवला.

रशियाहून माघारी मायदेशी येताना भारताचा पंतप्रधान अकस्मात शेजारी पाकिस्तानच्या पंतप्रधानांना भेटायला जातो आणि त्याविषयी दोन्ही देशातील बहुतेक महत्वपुर्ण यंत्रणाही गाफ़ील असतात, ही बाब लक्षात घेण्यासारखी आहे. नवाज शरीफ़ यांना पाक सेनेच्या अपरोक्ष राजकारण करता येत नाही, की गुप्तचर खात्याला अंधारात ठेवून काही करणे शक्य नाही. तेच ताज्या मोदी भेटीतून शक्य करून दाखवण्यात आलेले आहे. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्रीच नव्हेतर भारताचे तिथले राजदूतही याविषयी संपुर्ण गाफ़ील होते. पण मोदीभेटीची पुर्वकल्पना शरीफ़ यांना होती आणि त्यासाठी गुप्तपणे त्यांनी सर्व सज्जता केलेली होती. मग त्यांच्यात काय शिजले हा दुय्यम विषय आहे. कदाचित कुठल्याही गंभीर विषयावर त्यांच्यात संवाद झालेला नसेल. पण पाक सेना व गुप्तचर विभागाला अंधारात ठेवून शरीफ़ पाकिस्तानात मोदीभेटीची सज्जता करू शकतात, हे सिद्ध झाले. किंबहूना सेना व गुप्तचर विभागाला डावलून शरीफ़ काही करू शकतात, ह्याचा आत्मविश्वास त्यांच्यात निर्माण होऊ शकला. ही मोदींनी वाढदिवशी शरीफ़ यांना दिलेली मोठी भेट आहे. ज्याला मुत्सद्देगिरीच्या भाषेत (आत्मविश्वास निर्माण कार्य) कॉन्फ़िडन्स बिल्डींग मेजर असे म्हणतात. मागल्या पंधरा वर्षात हेच प्रयत्न दोन्ही देशातील राजकारण्यांकडून होत आले. पण त्याला कधी गोड फ़ळ आलेले नव्हते. पाक सेना वा हेरखात्याने असे प्रयास हाणून पाडण्यासाठी माध्यमातील आपल्या हस्तकांचा कौशल्याने वापर केला होता. त्यांनाही मोदी भेटीचा सुगावा लागू शकला नाही. म्हणूनच मोदींची लाहोर भेट हा उथळ चर्चेचा विषय होऊ शकेल. पण हाती काहीही लागणार नाही. चुकीचे संदर्भ घेऊन मुत्सद्देगिरीचा उहापोह होऊ शकेल. पण आकलन किंवा विश्लेषण होऊ शकत नाही. गेल्या आठवडाभरात त्यापेक्षा अधिक काहीच होऊ शकलेले नाही.

5 comments:

 1. छान भाऊ १९४७ आधिचा J&K वर १ लेख please

  ReplyDelete
 2. मोदी-शरीफ भेटीचे मार्मिक विश्लेषण खूपच छान !

  ReplyDelete
 3. सुपर भाऊ!
  याचाच अर्थ भारतीय गुप्तचर विभागाचे हात पाकिस्तानात किती खोलवर गुंतलेले आहेत हे अतिसमर्पकपणे दाखवून देतानाच, 'पण आम्हाला काही विध्वंसक करायचे नाही ... अन् गरज पडली तर करूही' अशी हूलही देण्यात आली आहे. या भेटीतून आतल्या बाहेरच्या अनेकांना अनेकविध संदेश गेले हेच खरे.
  एक वेगळा प्रश्न. सन ७३ पर्यंत चीनला मान्यताही न देणाऱ्या अमेरिकेला तत्पश्चातच्या काहीच वर्षांत थेट व्हेटोचा अधिकार वापरणारा चीन युनोत बसवून घेण्याची अशी कुठली मजबूरी निर्माण झाली? हे घडलेच कसे?

  ReplyDelete
 4. पाकिस्तान ने दिलेलेल रिटर्न गिफ्ट अजुनही सलतंय. सात्त जीव गेले, अजून किती जाणार कोणास ठाऊक.

  ReplyDelete
 5. नरेंद्र मोदी पाकिस्तान ला व्हिजिट करा म्हणाव आणि विचारा जाब की पठाणकोट ला हल्ला का म्हणून केला ते?

  ReplyDelete