Wednesday, December 9, 2015

राजकीय सूडबुद्धी म्हणजे तरी काय?



सध्या राजकीय सूडबुद्धी ह्या शब्दाला भलतीच तेजी आलेली आहे. पण सूडबुद्धी वा त्यानुसारची कृती म्हणजे काय, त्याचे फ़ारसे कुठे विवेचन होताना दिसत नाही. मग सामान्य माणसाच्या मनाचा गोंधळ होत असतो. कारण सूड आणि सूडबुद्धी यात फ़रक असतो. सूड म्हणजे एखाद्या कृतीने विचलीत दुखावलेला माणूस भरपाई वा बदला म्हणून उलट कृती करतो. थोडक्यात जशाला तसे असे म्हणतात, त्यातला प्रकार असतो. पण असे काही करताना आपले नुकसान वा समाजाची हानी होऊ नये, याचेही भान राखले जात असते. निदान सूड घेताना आपल्याला वा आप्तस्वकीयांना इजा होऊ नये, याचे तारतम्य सूड घेण्य़ातही असते. पण जेव्हा त्याचे भान सुटते आणि माणूस बेभान होऊन समोरच्याला कुठल्याही मार्गाने धडा शिकवण्यासाठी स्वत:चेही नुकसान करून घ्यायला सरसावतो; तेव्हा त्याला ‘सुडाला पेटला’ असे म्हटले जाते. तेव्हा त्याची बुद्धीही काम करीनाशी होते, त्याला सूडबुद्धी म्हणतात. जेव्हा बुद्धीवादही बुद्धीभेद करण्याच्या धुंदीत तारतम्य सोडतो, तेव्हा त्याला सूडबुद्धी म्हटले जाते. म्हणजे आपले नुकसान वा हानी झाली तरी बेहत्तर, पण समोरच्याचे नुकसान झालेच पाहिजे, अशा विचाराने माणूस बेधुंद कृती करतो, ती सूडबुद्धी असते. जगाच्या किंबहूना भारताच्या इतिहासात त्याची शेकडो उदाहरणे आहेत आणि अशा सूडबुद्धीने बहकलेल्यांनी देश व समाजाचे भयंकर नुकसान करून टाकलेले आहे. आज पुन्हा आपण त्याच सूडबुद्धीच्य आवर्तातून जात आहोत. आपण शेकडो वर्षाच्या जुन्या इतिहासाची पुनरावृत्ती करीत आहोत, असा त्या राजकीय सूडबुद्धीचा अर्थ आहे. मात्र असा आरोप करणारेच त्या सूडबुद्धीच्या कमालीचे आहारी जाऊन दुष्परिणामांचा विचारही न करता वहावत चालले आहेत. म्हणूनच सूडबुद्धी म्हणजे तरी काय, ते तपशीलवार समजावणे आवश्यक झाले आहे.

कालपरवा असंहिष्णूतेविषयी संसदेत बोलताना मार्क्सवादी पक्षाचे सदस्य सलिम महंमद यांनी गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्यावर एक आरोप केला. सातशे वर्षानंतर दिल्लीत पुन्हा हिंदू राज्यकर्ता सत्तेत आला आहे, असे विधान सिंग यांनी केल्याचा आरोप सलिम यांनी केला आणि त्यावर राजनाथ भडकले. त्यांनी तशा विधानाचा साफ़ इन्कार केला. पण हा ऐतिहासिक संदर्भ कुठला आहे? सातशे वर्षापुर्वी असे काय घडले? तर पृथ्वीराज चौहान ह्याला ठार मारून महंमद घोरी नावाच्या मुस्लिम आक्र्मकाने दिल्लीचे सिंहासन बळकावले. त्यानंतर कोणी हिंदू राजाला दिल्लीचे तख्त काबीज करता आले नाही, की तिथे कुणी हिंदू राजा सत्ताधीश होऊ शकला नाही. ते विधान कोणाचे आहे याला महत्व नाही, इतका तो संदर्भ आजच्या घडामोडींसाठी महत्वाचा आहे. पृथ्वीराज चौहान पराक्रमी व न्यायी राजा होता. त्याला घोरीने केवळ पराक्रम गाजवून पराभूत केले नव्हते. तर त्याच पृथ्वीराजच्या आप्तस्वकीयांनी दगाबाजी केल्यानेच घोरी त्याला पराभूत करू शकला होता. ही दगाबाजी म्हणजे काय होते? ऐन स्वयंवरातून जयचंद राजाची बहिण संयोगिता हिचे अपहरण करून पृथ्वीराज तिला घेऊन गेला आणि आपली राणी बनवली. म्हणून जयचंद पिसाळला होता. पण सूड घेऊ शकेल व पृथ्वीराजला संपवू शकेल इतका पराक्रम त्याच्यापाशी नव्हता. म्हणून त्याने परकीय असलेल्या घोरीशी संगनमत केले आणि पृथ्वीराज चौहानला संपवण्याचे कारस्थान शिजवले. त्यात पृथ्वीराज संपला आणि जयचंद राठोडची सुडबुद्धी शांत झाली. पण परिणाम काय होता? त्याला दिल्लीचे सिंहासन मिळू शकले नाही किंवा घोरीने त्याला सत्तेत भागीही दिली नाही. गरज संपल्यावर जयचंदलाही घोरीने संपवले. म्हणजेच पृथ्वीराजाला संपवण्याच्या धुंदीत जयचंद सूडाला पेटला आणि पर्यायाने आपले व हिंदू समाजाचेही ऐतिहासिक नुकसान करून गेला. सूडबुद्धी त्याला म्हणतात.

एखाद्या व्यक्तीने आपल्या व्यक्तीगत त्रास वा वेदनांसाठी काही असे करावे, की त्याची किंमत देश वा समाजाला दिर्घकाळ भोगण्याची पाळी येते. त्याला राजकीय सूड असे म्हणतात किंवा त्यामागच्या मनोवृत्तीला राजकीय सूडबुद्धी म्हणतात. त्याचा अलिकडला नमूना हवा असेल तर आपण युपीएची सत्ता असताना नरेंद्र मोदी नावाच्या गुजरातच्या मुख्यमंत्र्याला पुरोगामी म्हणवणार्‍या तमाम लोकांनी दिलेली वागणूक पहाता येईल. त्यासाठी केलेला प्रत्येक प्रयास राजकीय सूडबुद्धीचा विदारक नमूना होता. तसे करताना आपण आपलेच नव्हेतर अवघ्या देशाचे व समाजाचे किती भयंकर नुकसान करीत आहोत, त्याचे या लोकांना भान उरले नाही. म्हणून भारतात न्यायालये ज्याला दोषी ठरवू शकली नाहीत, त्याला खुनी ठरवून अमेरिकेत प्रवेश देवू नये, असे निवेदन करणारे शेकडो प्रतिष्ठीत जयचंद एकविसाव्या शतकात पुन्हा जन्माला आले. त्यातून देशाच्या प्रतिष्ठेला किती धक्का बसला, त्याची यापैकी कोणाला फ़िकीर होती? शेकडो खटले त्या गुजरात दंगलीच्या निमीत्ताने मोदींच्या विरुद्ध भरले गेले. त्याला कुठली कुशाग्र बुद्धी म्हणतात? त्यापैकी एकाही खटल्यात मोदी दोषी ठरू शकले नाहीत. तरीही त्यांच्यावर हिंसेचे आरोप तितक्याच आवेशात करीत रहाण्याला बुद्धीवाद वा बुद्धीभेदही नव्हेतर सूडबुद्धी म्हणतात. आणि असे आरोप वा आक्षेप केवळ कॉग्रेस वा पुरोगामी पक्षांनीच केलेले नाहीत. तर स्वत:ला शहाणे व प्रतिष्ठीत बुद्धीमंत समजणार्‍यांनी सतत केले व चालविलेले आहेत. त्यांना न्यायाची तरी चाड आहे काय? मोदी सत्तेत आले तर देश सोडून पळून जावे लागेल, असली भाषा मतदानाच्या आधी वर्षभर सुरू झा,ली त्याला सूडबुद्धी म्हणतात आणि मग तीच टोळी असंहिष्णूतेचे नाटक रंगवू लागते, त्याला सूडबुद्धी म्हणतात. आज चालले आहे त्याला चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात.

गुजरात दंगलीच्या निमीत्ताने सूडाचे जे अनेक खेळ झाले, त्यात इशरत जहान हत्येचाही विषय होता. पाकिस्तानची हस्तक असलेल्या या मुलीचा चकमकीत मृत्यू झाला. तेव्हा त्याचे इतके अवडंबर माजवण्यात आले, की त्यासाठी भारतीय गुप्तचर खात्यालाही मारेकरी ठरवण्यापर्यंत सोनियाप्रणित युपीए सरकारची मजल गेली. त्यात गुजरातमध्ये तैनात असलेल्या गुप्तचर अधिकार्‍याला खुनात गोवण्याचा अतिरेक झाला. जगाच्या पाठीवर भारत हा असा एकमेव देश असेल, ज्याने आपल्याच गुप्तचर अधिकार्‍याला गुन्ह्यात गोवण्याचा प्रयत्न करून सुरक्षा यंत्रणाच खिळखिळी करून टाकण्यापर्यंत मजल मारली. ते करताना सत्तेत असलेल्या सोनिया गांधी वा कॉग्रेस पक्षाला आपण देशाची सुरक्षा पणाला लावतोय, याचे भान नव्हते. मोदीला संपवायचा म्हणून त्यांनी देशाची सुरक्षाही देशोधडीला लावण्यापर्यंत कारवाया केल्या, त्याला राजकीय सुडबुद्धी म्हणतात. कारण त्यातून देशाच्या शत्रूंना व शत्रूच्या हस्तकांना कोलित मिळाले. मोदींद्वेष इतका पराकोटीला गेला आहे, की आपला देश बुडाला तरी बेहत्तर, देशाची व समाजाची सुरक्षा नष्ट झाली तरी हरकत नाही. शत्रूशीही हातमिळवणी करायला इथले पुरोगामी सज्ज आहेत. त्याच मनोवृत्तीला राजकीय सुडबुद्धी म्हणतात. मोदी आज सत्तेत असतील व उद्या नसतील. पण देश व समाज कायम टिकला पाहिजे. आणि समाज व देश टिकला तर उद्या तुम्हालाही सत्ता भोगता येईल. पण मोदीला संपवताना देशच संपला तर? तुमचा जयचंद राठोड होऊ शकतो. हे तारतम्य राखणे भाग असते. त्याचे भान सुटलेले आज कुठल्याही थराला जाऊन राजकीय सूडबुद्धीने वागत आहेत आणि उलटे तोच आरोप मोदी सरकारवर करीत आहेत. भारतीय समाज व इतिहासाचे हे दुर्दैव आहे. इथे जयचंद प्रतिष्ठीत असतात. बुद्धीमंतच सूडबुद्धीच्या आहारी जाऊन इतिहसाची पुनरावृत्ती करतात.

9 comments:

  1. सुंदर लेख !! कोर्टात केस नीट उभी राहिली आणि टिकली तर निश्चितच ' माया - लेकरू ' .......' दोषी ' ठरतील. एका राज्याचा ' मुख्यमंत्री '...................९ तास सी बी आय कडून ग्रिल केला जातो............आणि या जोड गोळीला नुसत्या कोर्टात जाण्याच्या कल्पनेने ' घाम ' फुटला आहे. या इशरत जहानला ...........महाराष्ट्राचा एक राष्ट्रीय नेता व त्याचा पक्ष ..........' वीरचक्र ' प्रदान करतो यापेक्षा या देशाचे मोठे ' दुर्दैव ' कोणते ?

    ReplyDelete
    Replies
    1. सोनियाला म्हणावे थोडे सलमानला भेटून घ्या. रोख मनुष्यवध झालेला असूनही खालच्या कोर्टाने ५ वर्षाची स्वस्तातली दिलेली शिक्षाही त्याला रद्द करून मिळू शकते तर सोनियांचा काय इनमिन ५००० कोटींचा मामला आहे. काम हो जायेगा, सेठ्का. खाली थोडा माल बाहर निकालो. शेवटी लोकशाही फुल्ल स्विंगमध्ये आहे हे कोर्टाने ज्या पोलिसाने जीवाची बाजी लावून खरी साक्ष दिली त्याचा जीव गेला तरीही त्याची साक्ष नाकरून सिद्ध केलेच आहे. थोडा खरचां करणा पडेंगा हा राहुलसेठ, लेकीन !

      Delete
    2. खरच असं होऊ शकेल? बघा आजचीच बातमी, मुंबई सत्र न्यायालयाने अभिनेता सलमान खान याला सुनावलेली पाच वर्षांची शिक्षा उच्च न्यायालयाने रद्द करीत त्याची निर्दोष मुक्तता केली. आता चांगल्या वागणुकीसाठी संजय दत्तची शिक्षा कमी करण्याचा प्रस्ताव आलेला आहेच. 'माय-लेकरू' कायद्याप्रमाणे गुन्हेगार आहेत हे खरंच, पण ते दोषी ठरतील?

      Delete
  2. वा! क्या बात है. अप्रतिम. अतिशय सुंदर स्फुट.

    ReplyDelete
  3. very good explanation...धन्यवाद भाऊ !

    ReplyDelete
  4. ही वाटचाल एका दिशेने चालूआहे जनाब भई

    ReplyDelete
  5. An eye opener for all Modi-Haters.

    ReplyDelete