Tuesday, December 15, 2015

चोराच्या मनात चांदणे?अवघी एक आठवड्यापुर्वीची गोष्ट आहे. दिल्ली सरकारचे एक ज्येष्ठ सनदी अधिकारी संजय प्रताप सिंग यांच्या सहय्यकाला सव्वा दोन लाख रुपये लाच घेताना रंगेहाथ पकडले होते. सिंग हे दिल्ली सरकारमध्ये अनुसुचित जातीजमाती व अल्पसंख्यंक मंत्रालयाचे प्रमुख सचिव म्हणून कार्यरत होते. तेव्हाही सीबीआय मोदी सरकारच्याच अखत्यारीत काम करीत होती आणि त्या बाबतीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अजिबात तक्रार केलेली नव्हती. उलट त्या धाडीनंतर केंद्राकडे सिंग यांना बडतर्फ़ करण्याची मागणी केजरीवाल यांनीच केलेली होती. बघायला गेल्यास सिंग यांना कोणी रंगेहाथ पकडलेले नव्हते, तर त्याच्या सहय्यकाला पकडलेले होते. त्याने साहेबांच्याच इशार्‍यावर हा भ्रष्टाचार केला, असा आळ होता आणि त्यानुसार सीबीआयने कारवाई केलेली होती. तेव्हा केजरीवाल ज्या सीबीआयवर विश्वास दाखवत होते. त्याला अवघ्या सहा दिवसात इतकी ओहोटी कशाला लागली? कारण सहा दिवसांनी त्याच दिल्ली सरकारचे दुसरे ज्येष्ठ सनदी अघिकारी राजेंद्रकुमार यांच्यावर त्याच सीबीआयने मंगळवारी धाड घातली आहे. फ़रक थोडासा आहे, हे राजेंद्रकुमार केजरीवाल यांच्या अत्यंत विश्वासातले अधिकारी असून मुख्यमंत्र्यांचे प्रमुख सचिव म्हणून कार्यरत होते. बघितले तर दोन्ही अधिकारी केजरीवाल यांच्याच सरकारचे आहेत. मग सिंग यांना केजरीवाल एक न्याय लावतात आणि राजेंद्रकुमार यांना दुसरा न्याय लावतात, असेच दिसते. कारण घाडी कुमार यांच्या कार्यालयावर पडल्या आहेत. एकूण चौदा धाडी घालण्यात आल्या. त्यापैकी एक धाड मंत्रालयातली आहे बाकी राजेंद्रकुमार यांच्या घरापासून त्यांच्याशी संबंधित अनेक जागी धाडी पडल्या आहेत. तर केजरीवाल इतके कशाला चवताळले आहेत? त्यांनी हा सगळा मामला आपल्या अंगावर ओढून घेण्याचे कारण काय? सिंग व कुमार यांच्यात फ़रक काय आहे?

तर सिंग हे केजरीवाल यांचे कुमारांच्या इतके निकटवर्तिय नव्हते. उलट कुमार हे मुख्यमंत्र्यांच्या सर्वाधिक विश्वासातले अधिकारी होते. म्हणून केजरीवाल त्यांना वाचवायला धावून गेले आहेत काय? त्यासाठी त्यांनी थेट पंतप्रधानांवर सूडबुद्धीचा आरोप केला आहे. अर्थात ही नाटके केजरीवाल यांच्यासाठी नवी नाहीत. आपणच जगातले सर्वात चरित्रवान व स्वच्छ गृहस्थ आहोत आणि आपला ज्याला स्पर्श झाला आहे, तो आपोआपच धुतल्या तांदळासारख स्वच्छ असतो, असा काहीसा केजरीवाल यांचा समज आहे. तसाच अर्थात त्यांच्या अनुयायांचाही समज आहे. म्हणून मग सीबीआयने घाड घातल्यानंतर केजरीवाल यांनी विनाविलंब गदारोळ सुरू केला. त्यांनीच सोशल माध्यमातून मुख्यमंत्री कार्यालयवर धाड पडल्याची अफ़वा पसरून दिली. वास्तविक तसे काहीही झालेले नव्हते, तर त्यांच्या सचिवाच्या कचेरीत धाड पडलेली होती. पण केजरीवाल म्हणतात आपल्याच कागदपत्रांची छाननी करण्यासाठी कुमार यांना बळीचा बकरा बनवण्यात आले. तसे असते तर आणखी तेरा जागी सीबीआयने एकाच वेळी धाडी कशाला घातल्या असत्या? की अन्य तेरा जागीही केजरीवाल यांचीच कागदपत्रे व फ़ायली असतात, असे त्यांना म्हणायचे आहे? माणूस आत्मकेंद्री झाला, मग त्याला अवघे जग आपल्या जीवावर उठले आहे असेच वाटू लागते आणि केजरीवाल यांची मानसिक अवस्था काहीशी तशीच झाली आहे. ज्यांना आपल्या आरंभापासूनचे प्रामाणिक सहकारीही प्रश्न विचारू लागले मग शत्रू वाटतात, त्यांना बाकीचे जग शत्रू वा मारेकरी असल्याचे भ्रम होत असतील, तर नवल नाही. म्हणूनच मग केजरीवाल यांनी कांगावा हेच आता हत्यार बनवले आहे. ताजे प्रकरण त्याचाच उत्तम नमूना आहे. पण वास्तविक केजरीवाल यांनी आजवरच्या आपल्याच प्रतिमेला तडा दिला आहे.

अण्णा आंदोलन चालू असताना प्रत्येक गोष्ट व कारभार पारदर्शक हवा, म्हणून अट्टाहास करणारे हेच केजरीवाल होते ना? मग आतापर्यंत त्यांनी स्वत:च्या कृतीविषयी कधी पारदर्शक असण्याचा प्रयत्न तरी केला आहे काय? मग विषय त्यांच्या पक्षांतर्गत असो किंवा सरकारी कामकाजातला असो. जेव्हा त्यांना त्यांचेच ज्येष्ठ सहकारी पक्षात प्रश्न विचारू लागले, तेव्हा त्यांना बदनाम करून वा अगदी मारहाण करून पिटाळून लावण्यापर्यंत केजरीवाल यांनी मजल मारली होती. त्यांच्याच आमदार वा मंत्री सहकार्‍यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले, तेव्हा केजरीवाल गुन्हे व भ्रष्टाचाराच्या समर्थनाला उभे राहिले होते. आरोपकर्ते वा सरकारी यंत्रणेवर सूडबुद्धीचे आरोप त्यांनी केलेले होते. पण पुढे जेव्हा आरोप खरे ठरू लागले, तेव्हा आपल्या कांगावखोरीसाठी केजरीवाल यांनी एकदाही दिलगिरी व्यक्त केलेली नाही. मागल्या सरकारमधील कायदामंत्री सोमनाथ भारती यांच्या पत्नीने गंभीर आरोप केल्यावर अटकेच्या भयाने भारती फ़रारी झाले होते. यावेळचे कायदामंत्री तोमर खोट्या प्रमाणपत्राच्या भानगडीत फ़सले आणि त्यांनाही वाचवण्यासाठी केजरीवाल हिरीरीने पुढे आलेले होते. पण अगदी सज्जड पुरावे मिळून अटक अपरिहार्य झाली, तेव्हाच केजरीवाल यांनी हात झटकले होते. म्हणजेच भ्रष्ट व गुन्हेगारांना वाचवण्यासाठी केजरीवाल क्षणभरही कचरले नव्हते. जणू पुराणकथेत कुणी साधूसंत पापी व्यक्तीला पवित्र करून घेतात, तसेच काहीसे केजरीवाल यांचे स्वत:विषयी मत असावे. अन्यथा त्यांनी भ्रष्टाचार निर्मूलनाच्या गप्पा मारून स्वत:च भ्रष्टाचार्‍यांचा बचाव मांडला नसता. आताही राजेंद्रकुमार यांच्या बचावाला मुद्दा नसल्याने राजकीय सुडबुद्धीचा प्रत्यारोप करून केजरीवाल कशाला भयभीत झाले आहेत? अशा कुठल्या फ़ायलीत त्यांचे काही गुपित आहे, की सीबीआय ती शोधायला त्यांच्या कचेरीत धाड घायालया पोहोचली, असे केजरीवाल यांना वाटते?

पारदर्शकतेचा आग्रह धरणारे केजरीवाल कुठल्याही धाडीला घाबरलेत कशाला? आपला तर सगळा कारभार खुला व पारदर्शक आहे, असाच त्यांचा कायम दावा राहिलेला आहे. त्यात तथ्य असेल तर कोणीही कुठलेही कगद तपासले वा धाडी घातल्या, तर आक्रस्ताळेपणा करायची गरज नाही. उलट केजरीवाल व त्याच्या अनुयायांनी अशा धाडीचे समर्थनच करायला हवे ना? मग ही इतकी आगपाखड कशाला? सिंग जसे आपल्या सहाय्यकाला पकडल्यावर गोत्यात आले, तसे रांजेंद्रकुमार पकडले गेल्यास बॉस म्हणून आपणही गोत्यात येण्याच्या भयाने केजरीवाल घाबरलेत काय? नसेल तर त्यांनी कायदेशीर व प्रशासकीय कृतीचे राजकारण करण्याचे कारणच काय? कर नाही त्याला डर कशाला? सहा दिवसांपुर्वी सीबीआयच्या अशाच कारवाईला समर्थन देणारा माणूस आज अकस्मात उलट्या टोकाला येऊन भलतेसलते बोलत असेल, तर तीच त्याच्या मानसिक आजाराची साक्ष असते. अन्यथा रांजेंद्रकुमारच्या कारवाईने केजरीवाल विचलीत व्हायचे कुठलेही तर्कशुद्ध कारण दिसत नाही. अपशब्द वापरणे हे केजरीवाल यांच्यासाठी नवे नाही. आपले मान्यवर सहकारी प्रशांत भूषण व योगेंद्र यादव यांना कमिने असली शिवी हासडण्यापर्यंत जाऊ शकणार्‍या व्यक्तीकडून कोणी सभ्य सुसंस्कृत भाषेची अपेक्षा करू शकत नाही. मात्र ती भाषाही महत्वाची नाही, इतकी आजची केजरीवाल यांची घबराट सूचक आहे. कुठेतरी पाणी मुरते आहे. भारत सरकार आपल्या विरोधातले पुरावे शोधते आहे, म्हणून केजरीवाल घाबरलेत काय? आपल्या सचिवाला कोंडीत पकडल्यावर तो काही बोलून जाईल म्हणून कजेरीवालांना घाम फ़ुटला आहे काय? काहीतरी नक्की आहे ज्यामुळे केजरीवाल इतके भयभीत झाले आहेत आणि राजेंद्रकुमार यांच्यावरील कारवाई त्यांनी अशी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. चोराच्या मनात चांदणे म्हणतात ना?

9 comments:

 1. भारी आहे , भाऊ ! आणि 'ऑफिस-सील' हा सुद्धा तद्दन फालतू मुद्दा आहे... अगदी मुख्यमंत्री यांच्या ऑफिसची तपासणीसाठी काही तासासाठी नाकाबंदी केली, तरी बिघडले काय ?

  ReplyDelete
 2. आण्णा नावाच्या साधुने राजकारणात हा भस्मासुर निर्माण केला त्यांना काय माहित होते हा मानुस एवढा बिलंदर निघेल की सर्व भ्रष्टाचार मुक्तीचा अंदोलनाला आपल्या महत्वकांक्षी राजकारणासाठी सीडीचा उपयोग करील त्यांनी यांना तथास्तु म्हंटल्या नंतर हा माणुस सर्वांचा डोक्यावर हात ठेवायला निघाला यांचा प्रामाणिकपणा हा दांभीक,दिखाऊ आहे यांचे बोलण्यातुन आणि देहबोलीतुन आगतीकताच जाणवते या मानसाचे कुठल्याच गोष्टींवर नियंत्रण नाही कुणीही गांभिर्याने यांचे आरोपांची दखल घेत नाही राजकारण पहिलेच गलीच्छ होते यांचे राजकारणातील प्रवेशाने ते पारच गलिच्छ झाले आहे कुठलाही झाडू ने ते साफ होणार नाही या पक्षातील सदस्य आम आदमी नसुन परकीय पैश्यांवर चालणारे एन.जी.ओ., मिडीयातील विकाऊ पत्रकार आणि तत्सम कॅन्डल वॉक संस्कृतीतील सदस्य आहेत या भस्मासुराला संपविण्यासाठी कोण विष्णूरूपी मोहीनीचे रूप घेऊन येतो ते भविष्यातच समजेल

  ReplyDelete
 3. या बेताल व्यक्तीची सर्वंकष चौकशी व्ह्यायला पाहिजे याची मुर्वत करण्याचे कारण नाही. या व्यक्तीत काहीतरी गौडबंगाल नक्कीच आहे. कारण पंतप्रधान असलेल्या व्यक्तिविरुद्ध इतकी शिवराळ भाषा वापरण्याचे कारणच नाही.

  ReplyDelete
 4. चोराच्या मनात चांदणे...अगदी खरे आहे भाऊ...!!!


  ब्लॉगिंग (Blogging),एसइओ (SEO), तंत्रज्ञान (Technology), सोशल मिडिया (Social Media) याविषयी सविस्तर माहिती आता मायबोली
  मराठी मधून...!!! भेट द्या. http://goo.gl/hTkfGy

  ReplyDelete
 5. सर मला फेसबुक वरून का काढून टाकलत? केवल तुमचे विचार लेख वाचण्यासाठी फेसबुक ऊघडतो आणि तुम्ही मला कट् केलात! कारण समजले तर बरे होईल

  ReplyDelete
 6. मी तर प्रथमच असे बघत आहे कि सी.बी.आय.ला छापा मारल्या नंतर त्याबद्दल स्पष्टीकरण द्यावे लागत आहे; हद्द झाली केजरीवालच्या कांगाव्याची!!

  ReplyDelete
 7. कांगावेखोर केजरीवालची कमालच आहे!! मी तर प्रथम असे बघत आहे कि सी.बी.आय.ला छापा मारल्यानंतर स्पष्टीकरण द्यावे लागत आहे ?!!

  ReplyDelete