Tuesday, December 29, 2015

राजकीय आत्महत्या अशी करावीसध्या मार्कसादी कम्युनिस्ट पक्षाचे महाअधिवेशन कोलकाता येथे चालू आहे. त्याच्या आरंभीच पक्षाचे सर्वोच्च नेते सीताराम येचुरी यांनी आगामी विधानसभा निवडणूकीत कॉग्रेसशी आघाडी करण्याचे संकेत दिले आहेत. त्यामागे अर्थातच त्यांचे राजकीय तर्कशास्त्र उभे आहे. आजच्या राजकारणात भाजपाला रोखणे वा थोपवणे हे त्यांच्या पक्षाचे प्राधान्य आहे. एकदा ही मानसिकता स्विकारली, मग राजकीय विचारसरणी वा त्यानुसार चालणार्‍या पक्षाला भवितव्य शिल्लक उरत नाही. कारण कुणाला थोपवणे वा संपवणे ही कुठल्याही संघटनेची दिशा असली, तरी उद्दीष्ट असू शकत नाही. कारण वैचारिक उद्दीष्ट घेऊन एखादा पक्ष वा संघटना उभी रहात असते, तेव्हा आपल्या कृती व कार्यक्रम धोरणातून प्रतिपक्षाला नामोहरम करणे, असे दिर्घकालीन उद्दीष्ट असते. त्यात तात्पुरत्या तडजोडीही करणे गैर नसते. परंतु त्या तडजोडी करताना आपल्या अस्तित्वाला किंवा वैचारिक भूमिकांना तिलांजली देवून चालत नाही. तसे केले, मग आपलेच अस्तित्व धोक्यात येते आणि पर्यायाने आपली विचारसरणीच नामशेष होण्याचा धोका संभवतो. किंबहूना भारतातील पुरोगाम्यांची हीच मागल्या तीनचार दशकातील शोकांतिका झाली आहे. मात्र त्यापासून पुरोगामी शहाणे कुठलाही धडा शिकू शकलेले नाहीत. १९९८ सालात शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातल्या ‘प्रतिगामी’ शिवसेना-भाजपा युतीला संपवण्याचा निर्धार करण्यात आला व लोकसभा निवडणूकीत त्याला चांगली फ़ळेही येताना दिसली. पण त्यात स्वत:ला पुरोगामी म्हणवणार्‍या पक्षांचा मात्र कायमचा बळी गेला. त्यातले कोणी पक्ष आज नाव घ्यायलाही महाराष्ट्रात शिल्लक उरलेले नाहीत. उलट त्यांना ज्या प्रतिगामी पक्षांना संपवायचे होते, तेच शिवसेना भाजपा आज राज्यातले पहिले दोन पक्ष म्हणून पुढे आलेत. तोच प्रयोग मग २००४ सालात सोनियांनी देशव्यापी पातळीवर केला.

तेव्हा भाजपाप्रणित एनडीए नावाची आघाडी दिल्लीत सत्तेवर होती आणि भाजपाला संपवण्यासाठी सोनियांनी विविध पुरोगामी पक्षांना एकत्र आणले. ज्यांची ख्याती आपापल्या राज्यातले बिगर कॉग्रेस पक्ष अशी होती, त्यांनी कॉग्रेसशी हातमिळवणी केली. तरीही त्यांना युपीए म्हणून लोकसभेत बहूमत मिळवता आले नाही. कॉग्रेसला आपली शक्ती वा संख्याबळ वाढवणे शक्य झाले नव्हते. पण सत्ता हाती आली आणि पारंपारिक प्रादेशिक विरोधकांचे पितळ उघडे पडले. म्हणून २००९ सालात कॉग्रेसचे पुनरुज्जीवन होऊ शकले. पण त्यात भाजपाचे नुकसान झाले नव्हते, तर युपीए म्हणून भाजपा संपवायला पुढे सरसावलेल्या पुरोगामी पक्षांचेच बालेकिल्ले उध्वस्त होऊन गेले होते. त्यांनाच खाऊन कॉग्रेस बळावली आणि त्यात बंगालच्या डाव्या आघाडीलाही जबर फ़टका बसला होता. अवघ्या दोन वर्षात मग मार्क्सवाद्यांनी आपला सात निवडणूका जिंकलेला बंगालचा बालेकिल्ला गमावला. त्याला नवख्या तृणमूल कॉग्रेसने उध्वस्त केले. मात्र कॉग्रेस तिथे तृणमूल सोबत गेली आणि मार्क्सवाद्यांना नेस्तनाबुत करायला कॉग्रेसनेच हातभार लावला होता. त्या लागोपाठच्या पराभवाने मार्क्सवादी आपला आत्मविश्वास कायमचे गमावून बसले. मागल्या वर्षी लोकसभेच्या मतदानात डाव्यांचे पुरते पानिपत झाले. ममताच्या विरोधात त्यांना स्वबळावर लढणे शक्य राहिलेले नाही. कारण ममताच्या विरोधातल्या भावनांचे भांडवल करीत आता तिथे प्रथमच भाजपा आपले पाय रोवून उभा रहातो आहे. तर त्याच्यासह ममताला रोखण्यासाठी मार्क्सवाद्यांनी कॉग्रेसशी पुन्हा हातमिळवणी करण्याचा विचार सुरू केला आहे. त्यामागे अर्थातच बिहारच्या निकालांची प्रेरणा आहे. पण तिथे नितीश वा लालू यांच्यासारखे प्रभावी पर्यायी नेतृत्व होते. संघटनात्मक बळ होते. बंगालची अवस्था तशी नाही. म्हणूनच बिहारची पुनरावृत्ती बंगालमध्ये होऊ शकत नाही.

मुळात मार्क्सवादी आपण बंगालमध्ये बालेकिल्ला कशाच्या पायावर उभा केला तेच विसरून गेले आहेत. ज्योती बसू व त्यांच्या समकालीन सहकार्‍यांनी बिगर कॉग्रेसी राजकारणाचा आधार घेऊन पक्ष उभा केला होता. अर्धशतकापुर्वी तिथल्या लहानसहान बिगर कॉग्रेसी पक्षांना सोबत घेऊन आघाडीचे राजकारण केले आणि सत्ता हाती आल्यावर स्वबळ वाढवण्याचा पद्धतशीर प्रयत्न केला. सत्ता मिळाली म्हणून मित्रांना झिडकारले नाही, की आपला कॉग्रेस विरोध सोडला नाही. पण पुढल्या पिढीत जे पुस्तकी नेतृत्व प्रकाश कारत व येचुरी यांच्य रुपाने पुढे आले, त्यांना वास्तविक राजकारणापेक्षा पुस्तकी ज्ञानाने पछाडलेले आहे. त्यातून मग जनमानसात वावरणारे कार्यकर्ते आणि नेतृत्व यांची नाळ तुटत गेली. पर्यायाने जनतेच्या भावनांशी नेतृत्वाची फ़ारकत होत गेली. म्हणून मग जनतेला न पटणारी बेछूट धोरणे राबवली जाऊ लागली. तीच नाराज जनभावना आपल्या बाजूला ओढून ममतांनी मार्क्सवाद्यांना शह दिला. तर त्यावर मात कशी करायची, हे नव्या नेत्यांना न सुटलेले कोडे आहे. म्हणूनच मग सोपे मार्ग शोधणे सुरू झाले. केजरीवाल किंवा नितीश-लालुंच्या विजयात नवे मार्क्सवादी प्रेरणा शोधत आहेत. पण त्यांना ज्योती बसू, सोमनाथ चॅटर्जी वा भूपेश गुप्ता अशा पुर्वजांचे कर्तृत्व आठवतही नाही. मतविभागणी टाळून निवडणूका जिंकता येतात हे सत्य नाकारता येत नाही. पण त्यासाठी सहकारी पक्षांकडे काही पक्की मतांची संख्या असावी लागते आणि त्यांची विजयी बेरीज करायची असते. कॉग्रेस व डावी आघाडी यांची बेरीज तितकी मजल मारू शकेल काय, हा पहिला प्रश्न आहे. तर या दोन्ही पक्षातली खालच्या पातळीवर असलेली वैरभावना, मतांची बेरीज कितपत करू शकेल हा तितकाच महत्वाचा प्रश्न आहे. त्याचे उत्तर नकारातक आहे. कारण ममताविषयी नाराजांना गोळा करण्याचे काम भाजपाने हाती घेतले आहे.

गेल्या पाच वर्षात आपण पस्तीस वर्षाची पुण्याई कुठे गमावली, याचे आत्मपरिक्षण केले तरी पराभवातून सावरणे मार्क्सवाद्यांना अशक्य नाही. पण आत्मपरिक्षण करताना आपल्याच कृतीतले दोष व चुका शोधाव्या लागतात. त्यात दुरूस्ती करावी लागते. इथे मार्क्सवादी नेतृत्वाला आपल्या चुका झाल्यात असेच वाटत नाही. पुस्तकातली गणिते सोडवल्याप्रमाणे ते समाजातील मानवी भावनांचे आकलन करू बघतात. आपल्यापासून लोक दुरावलेत त्याची कारणे शोधण्यापेक्षा तत्वज्ञानात त्याची उत्तरे शोधण्याचा मुर्खपणा चाललेला आहे. मग सोपी पुस्तकी उत्तरेच मिळणार. तीच उत्तरे मागल्या दोन तीन दशकात बहुतेक पुरोगामी पक्षांनी शोधली आणि राजकीय आत्महत्या केल्या. त्यांच्या असल्या आत्महत्येतून कॉग्रेसला काही काळ जीवदान मिळू शकले. पण तथाकथित प्रतिगामी संपले नाहीत. उलट पुरोगाम्यांनी मोकळी केलेली बिगर कॉग्रेसी राजकारणाची जागा भाजपा व्यापत गेला. हेच गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तरप्रदेश वा बिहारमध्ये होऊन भाजपाचा विस्तार झाला. त्याला अपवाद होते तमिळनाड, ओडीशा, बंगाल, केरळ अशी राज्ये. तिथे कॉग्रेसपासून दूर राहून विरोधी पक्षांनी आपले स्थान निर्माण केले व टिकवले. मार्क्सवाद्यांनीही तेच केलेले होते, म्हणून बंगाल केरळ राज्यात त्यांचे बस्तान पक्के होते. पण २००४ च्या युपीए प्रयोगाने त्यांचे ब्रह्मचर्य संपले आणि आता अस्तित्वाची लढाई करण्याची नामुष्की आलेली आहे. भाजपाला रोखण्याचा मार्ग कॉग्रेसशी आघाडी असा नसून पक्षाची संघटना मजबूत करून जुन्या चुका सुधारणे असाच असू शकतो. भाजपला रोखणे हा पक्षाचा कार्यक्रम वा उद्दीष्ट नसते. आपली शक्ती वाढवणे हाच उपाय असतो. कॉग्रेसशी आघाडी ही राजकीय आत्महत्या असते आणि मार्क्सवादी तेच करायला निघाले आहेत. भाजपासाठी त्यामुळे बंगाल मुलूखगिरी करायला नवा प्रांत मोकळा होतो आहे.

6 comments:

 1. भाऊ छान लेख !!......... कम्युनिस्ट नेते हे ' स्वयंघोषित ' विद्वान असून इतर सर्व उर्वरित जगाला ' तुच्छ ' समजतात. हेच लोक वर्षानुवर्षे ' नेताजी सुभाष चंद्र बोस ' यांना ते ' देशभक्त नेता मानतच न्हवते. अचानक ' प्रकाश करात ' यांना ३ वर्षांपूर्वी साक्षातकार जाहला आणि त्यांनी ती कम्युनिस्तांची चूक असल्याचे मान्य केले होते. ........................यांच्या विचारसरणीच्या अनेक कलाकार / साहित्यिकयांनी दिल्ली येथील मोक्याच्या जागेवर बंगले बळकावले असून वर्षानुवर्षे ते तेथे ' खान्ग्रेस ' च्या कृपेने राहत आहेत. अशा अनेक लोकांना बंगले मोकळे करण्यसाठी / उचकटण्याची मोहीम आत्ताच्या केंद्र सरकारने सुरु करताच याच सर्व ' चोरांची ' ..........' असहीष्णुता ' मोहीम सुरु करण्यात आली होती. ज्या दिवशी या सर्व बंगले बळकावू ' कम्युनिस्ट ' लोकांना बंगल्या बाहेर हाकलून देतील तो दिवस मोठा ' भाग्याचा ' असेल.

  ReplyDelete
  Replies
  1. बिलकुल 100 % परखड सत्य आहे

   Delete
 2. "कॉग्रेसशी आघाडी ही राजकीय आत्महत्या असते!!"
  AGREE 👍

  ReplyDelete
 3. भाऊ सर्व मुद्दे अगदी बरोबर. या शिवाय मुस्लिमांसदर्भात सर्वच पक्षांच्या भुमिकांचा कसा कसा परिणाम झाला याबद्दलचे आपले विश्लेषण वाचायला आवडेल.

  ReplyDelete