Thursday, December 17, 2015

चोराच्या उलट्या बोंबाकाल योगायोगाने सोनी वाहिनीवर क्राईम पेट्रोल १०० नावाच्या मालिकेतील एक सत्यघटना बघितली. पुण्यातली ही अलिकडली सत्यघटना आहे. चाळीस वर्षे पोलिस खात्यात काम केलेला एक अधिकारी आपल्या अविवाहित मुलीसह निवृत्त जीवन जगत असतो. बाजारातून घरी परतल्यावर मुलगी दार उघडत नाही म्हणून तो आपल्या खिशातल्या चावीने दार उघडून घरात जातो आणि मुलीला हाका मारत बेडरूमध्ये पोहोचतो. तिथे मुलगी मरून पडलेली असते. विनाविलंब तो पोलिसांना फ़ोन करतो. एकूण परिस्थितीजन्य पुरावे बघितल्यावर पोलिस मुलीने आत्महत्या केली असावी असा निष्कर्ष काढतात. या मराठी मुलीचा प्रियकर नायर नावाचा केरळी होता आणि दुबईत होता. त्यानेच दिर्घकाळ प्रेमाचे नाटक करून आपल्या मुलीला ठार मारले, असा या पित्याचा दावा असतो. कारण मृत मुलीचे दागिने व मोबाईल गायब असतो. जानेवारीत ही घटना घडते आणि पुढे काही हालचाल होत नाही म्हणून हा पिता पुण्याच्या पोलिस अधिक्षकांना भेटून दाद मागतो. त्याचे समाधन करण्यासाठी हे प्रकरण क्राईम ब्रांचकडे सोपवले जाते. पण तपास करायला त्यांच्यापाशी कुठलाही धागादोरा नसतो. इथून तपास सुरू होतो आणि त्यात प्रगती नाही, म्हणून पिता मात्र अधिकार्‍यांवर डाफ़रत असतो. पण तपास पथक खरेच जंग जंग पछाडत असते. त्यातून अनेक विचित्र गोष्टी बाहेर येऊ लागतात. ममतेने डोळ्याता अश्रू येणारा तो पिता भलताच चमत्कारीक असल्याचे निष्पन्न होते. त्याची पत्नी त्याला सोडून गेलेली असते आणि कौटुंबिक जीवन उध्वस्त झालेले असते. मृत्य़ूचे रहस्य उलगडताना या निवृत्त अधिकार्‍याचे जे रूप उलगडत जाते, त्यातून तपास पथकच नव्हेतर बघणार्‍यालाही थक्क व्हायची वेळ येते. कायद्याशी व तपासाशी लपंडाव खेळण्याचा आत्मविश्वास माणसाला किती भयंकर गुन्हा करायला भाग पडतो, त्याचा हा नमूनाच होता.

त्त्या पित्याचा दावा शंभर टक्के खरा निघतो. त्याच्या मुलीने आत्महत्या केलेली नसते, तर तिचा अतिशय योजनाबद्ध रितीने खुन झालेला असतो. कुठेही धागेदोरे मिळू नयेत की पुरावे सापडू नयेत, याची बारीकसारीक काळजी घेतलेली असते. पण केवळ एक क्षुल्लक योगायोग त्या खुनाला वाचा फ़ोडणारा ठरतो. त्यामुळे आत्महत्या नव्हे तर मुलीचा खुन सिद्ध होतो. पण धक्कदायक बाब म्हणजे त्यातून पिताच त्या हत्येचा सुत्रधार असल्याचे निष्पन्न होते. थोडक्यात आपल्या फ़ाजील आत्मविश्वासाच्या आहारी जाऊन हा पिता पचलेल्या खुनात स्वत:ला पकडून घेतो, असेच म्हणावे लागते. मग माणूस असा चमत्कारीक कशाला वागतो, असाही प्रश्न पडतो. तो पिता गप्प बसला असता तर सर्व काही पचून गेले असते. त्याला खुन पचला असता आणि त्यामागचा त्याचा हेतूही साधला गेला असता. कारण त्याला अपेक्षित असल्याप्रमाणेच पुढल्या घटना घडलेल्या होत्या. मग त्याने पोलिसांनाही कोडे वाटलेल्या वा आत्महत्या भासलेल्या त्या हत्येच्या तपासाचा इतका अट्टाहास कशाला करावा? आपल्याच गळ्यात फ़ास अडकवून घेण्याचा मुर्खपणा कशाला करावा? या प्रश्नाचे उत्तर ती सत्यघटना वा त्यातील तपासातून मिळत नाही. सराईत वा अतिशहाणा गुन्हेगार असे करू शकतो, हेच त्याचे एकमेव उत्तर आहे. लहानसहान गुन्हे पचले, मग मोठे गुन्हे करण्याची बुद्धी होते आणि तेही खपून गेले तर मग गुन्हेतपास करणार्‍यांनाच कोडे घालण्याच्या मोहात गुन्हेगार सापडतो. या पित्याची कहाणी त्यापेक्षा वेगळी नाही. आपण किती योजनाबद्ध रितीने हत्या केली, त्याचा लाभ मिळूनही तो समाधानी होऊ शकला नाही. आपल्या कुशाग्र कुटील बुद्धीने तो पोलिसांना खेळवायला गेला आणि त्यातच फ़सत गेला. सध्या केजरीवाल नावाचा भामटा काहीसा असाच आपणच पसरलेल्या जाळ्यात गुरफ़टताना दिसतो आहे.

गेल्या चार वर्षात केजरीवाल लोकांना माहिती झाले. जनलोकपाल आंदोलनाच्या निमीत्ताने हे नाव जगापुढे आले. त्यात अतिशय योजनाबद्ध रितीने केजरीवाल आपल्या निवडक सहकार्‍यांच्या टोळीला हाताशी धरून बाकीच्या जगाशी अतिशय कुटील राजकीय डाव खेळत आलेले आहेत. निरागस चेहरा व भाषा यांच्या माध्यमातून त्यानी त्या कालावधीत अनेकांना वापरून कचरा म्हणून नंतर निर्दयपणे फ़ेकून दिले. अण्णा हजारे यांच्यापासून किती लोकांचा या माणसाने आपल्या राजकीय हेतूंसाठी सहजगत्या बळी घेतला, त्याची लांबलचक यादीच तयार होऊ शकते. सराईत गुन्हेगार कसे उपयोग संपला किंवा कोणी फ़ितूर झाला, मग त्याच्याही जीवावर उठायला मागेपुढे बघत नाहीत, तितक्या सहजपणे केजरीवाल यांनी किरण बेदी, योगेंद्र यादव किंवा प्रशांत भूषण यांचे बळी घेतले आहेत. ‘हमे बंगला गाडी नही चाहिये’ म्हणत तेच सर्व उपभोगताना केजरीवालना शरम वाटली नाही. कुठलीही सराईत बनवेगिरी करताना आपणच इतरांचे बळी आहोत, असे दाखवणारा हा माणुस त्या सत्यघटनेतील खुनी पित्यापेक्षा तसूभर वेगळा नाही. आजवर अनेक कुटील बनेल व भामटे राजकारणी भारतीय जनतेने बघितले आहेत. पण सतत आपणच अन्यायाचे बळी आहोत असा आभास उभा करून लोकांची दिशाभूल करणारा इतका सराईत दुसरा सापडणार नाही. पण हे जाळे फ़ार काळ चालत नाही. आजवर जी भामटेगिरी पचून गेली, त्यामुळे केजरीवाल यांना फ़ाजील आत्मविश्वासाने पछाडले आहे. म्हणूनच त्यांनी आता स्वत:भोवतीच चक्रव्युह रचलेला आहे. जितके त्यातून सुटण्याचा आटापिटा ते करतील, तितके त्यात फ़सत जाणार हे स्पष्ट आहे. वास्तविक त्यांनी आपल्या सचिवावर धाडी पडल्यावर साळसूदपणे गप्प बसायला हवे होते. पण आत्मविश्वासाने त्यांना दगा दिलेला दिसतो. म्हणून राजेंद्रकुमार प्रकरणी ते गुरफ़टत चालले आहेत.

पहिली बाब म्हणजे पुन्हा मुख्यमंत्री झाल्यावर राजेंद्रकुमार यांना विश्वासू सचिव म्हणुन घेण्याचा निर्णयच संशयास्पद होता. कारण दिल्लीच्या नोकरशाहीत त्याची ख्याती अत्यंत भ्रष्ट अधिकारी अशी होती. हे केजरीवाल यांना ठाऊक नसेल असे कोणी म्हणू शकत नाही. आणि नसेल तरी स्पष्ट आरोप व पुरावे असताना धाडी पडल्यावर त्यापासून अलिप्त रहायला हवे होते. पण नेहमी कांगावा करून उलटे आरोप करण्याची चटक केजरीवाल यांना अशी लागली आहे, की राजेंद्रकुमार प्रकरणात खुलासा देण्यापेक्षा आपल्यावरच धाडी घातल्याचा प्रत्यारोप करून राजकीय सुडबुद्धीचा तमाशा त्यांनी सुरू केला. पण तीन दिवसात त्यांनी एकदाही आपला सचिव निर्मळ निरागस व निरपराध असल्याचे ठासून सांगण्याची हिंमत दाखवलेली नाही. मग आळ अंगावर घेण्याचे कारण काय? जुन्याच आरोपांची चौकशी करायची तर आताच्या कार्यालयात छापे कशाला, हा सवाल आणखी थक्क करणारा आहे. छापे कुठेही कोणीही घालावेत. त्यासाठी शुद्ध चारित्र्याच्या केजरीवाल यांना भयभीत व्हायचे कारण काय? राजेंद्रकुमार यांनी केजरीवाल यांच्या संगनमताने काही गफ़लती केल्यात काय आणि त्याच पकडल्या जाण्याच्या भयाने केजरीवाल गडबडले आहेत काय? नसेल तर केजरीवाल ‘इतने क्युं बौखलाये’ है? घाडीचा विषय बाजूला पडून अर्थमंत्री जेटली यांच्या राजिनाम्याची मागणी कशाला? सीबीआयच्या धाडीचाच मामला असेल तर गृहमंत्री राजनाथ सिंग यांचा राजिनामा का नको? जेटली यांच्याविरुद्ध दिल्ली क्रिकेट संघटनेतील भ्रष्टाचारासाठी केजरीवाल कारवाई करणार होते, तर त्याची साधी तक्रारही तीन आठवडे कशाला नोंदलेली नव्हती? सगळा मामला त्या खुनी पित्यासारखा कांगावखोर भासतो. आपण एफ़ आय आर सुद्धा नोंदवायचा नाही, पण थेट राजिनामा मागायचा आणि धाडी एफ़ आय आर नुसार झाल्या तरी बोंब ठोकायची. चोराच्या उलट्या बोंबा यालाच म्हणतात ना?

8 comments:

 1. पटण्यासारखा उलेख
  चोराच्या उलट्या बोंबा यालाच म्हणतात!
  सुंदर...केजरीवाल यांची
  पोल उघडण्याची चिन्ह दिसतात.

  ReplyDelete
 2. केजरीवाल यांच्या ऑफिस मध्येच ते नक्षलवाद्यांसोबत बैठका घेतात असेही आरोप त्यांच्या सहकाऱ्यांनी याआधी केलेले आहेत.

  ReplyDelete
 3. अचूक विश्लेषण भाऊ...!!!


  ब्लॉगिंग (Blogging), वर्डप्रेस (Wordpress),एसइओ (SEO), तंत्रज्ञान (Technology), सोशल मीडिया (Social Media), ऑनलाइन पैसे कमवा (Making Money Online) याविषयी सविस्तर माहिती आता मायबोली मराठी मधून...!!! भेट द्या. http://goo.gl/hTkfGy

  ReplyDelete
 4. क्या बात है! भाऊ किती सुरेखपणे सगळ सांगितलं आहे.

  ReplyDelete
 5. 'भामटा', अगदी सौम्यात सौम्य शब्द वापरायचा झाला तरी तुम्ही वापरलेल 'भामटा' हे विशेषण केजारीवालना अगदी लागू पडत.

  थोडस विषयांतर, गिरीश कुबेर हा माणूस ह्या blog वर उल्लेख करायचा लायकीचा नाही. पण ज्या दिवशी भाऊंनी 'चोराच्या मनात चांदणे'? हा सुंदर लेख लिहिलाय त्याच दिवशी कुबेर साहेबांनी 'राजा भिकारी..' म्हणून अग्रलेख लिहिला आहे. सुमार बुद्धी, कोती/नीच वृत्ती, विषारी भाव आणी प्रचंड माज याचा सुरेख मिलाफ जर कोणाला बघायचा असेल तर एक अभ्यासू म्हणून 'राजा भिकारी..' जरूर वाचवा.

  ReplyDelete
 6. Not a single channel approaches Anna the Salsud ? Hypocrites to the core! Anadi junta!

  ReplyDelete
 7. भाऊराव,

  केजरीवाल आणि राजेंद्रकुमार या दोघांचा बोलविता धनी एकंच असावा. त्यामुळे केजरीवाल यांना नाईलाजाने का होईना राजेंद्रकुमारांच्या समर्थनार्थ मैदानात उतरावं लागतंय.

  आपला नम्र,
  -गामा पैलवान

  ReplyDelete