Thursday, December 3, 2015

शत-प्रतिशत! अर्थात वाताहतगेल्या वर्षी महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणूका ऐन रंगात आलेल्या असताना मी पुण्यात होतो आणि तेव्हा वृत्तवाहिन्यांच्या चर्चेतही सहभागी व्हायचो. अशाच एका चर्चेत सहभागी होऊन माघारी घरी येत असतानाची गोष्ट! मला तिथून घरी सोडायला एबीपी माझा वाहिनीने गाडी दिलेली होती आणि माझ्यासह आणखी एका पक्षाचे जाणकार अभ्यासक नेतेही सोबत होते. आमच्या गप्पा चालू होत्या. इतक्यात ड्रायव्हर मध्येच म्हणाला, ‘या भाजपावाल्यांना वेड लागले आहे काय? सगळ्यांनाच एकदम अंगावर घेतात ते?’ मी स्तब्ध झालो आणि त्याच्याकडे बघू लागलो. त्या ड्रायव्हऱचे नाव अमोल! तोही आम्ही गप्प झालेले बघून वरमला. सॉरी म्हणू लागला. आपले काही चुकले काय, असेही विचारू लागला. पण मला त्याचा प्रश्न आवडला होता. सोबतच्या नेत्याकडे वळून म्हणालो, बघा, हा खरा मतदार व जागरूक सामान्य माणूस आहे. त्याला जितके राजकारण कळते, तितके आपण विश्लेषणाचे आव आणणार्‍यांना उमगत नाही. अमोललाही म्हटले, ‘तूच बरोबर आहेस’. आम्ही लिहीताना वा बोलताना मोठमोठे राजकीय दाखले देतो, थिअरीज मांडतो. पण वास्तवाशी त्याचा किती संबंध असतो? सामान्य माणूस म्हणजे मतदार कसा विचार करतो वा निर्णय घेतो, त्याचा आमच्यासारख्या शहाण्यांना थांगपत्ता नसतो. मग आम्ही आजवरचा अनुभव आणि समजुती यांच्या आधारावर आपले निष्कर्ष काढत असतो. पण सामान्य माणूस कसा बारकाईने विचार करतो, ते अमोलच्या बोलण्यातून एका वाक्यात व्यक्त झाले होते. महाराष्ट्रात भाजपाने कोणती चुक केली, ते सांगायला त्याला मोजके शब्द पुरेसे होते. जे आम्हाला प्रदिर्घ लेख लिहून वा विवेचन करून सांगता येत नव्हते. आम्हालाच उमजत नसेल, तर भाजपा वा अन्य कुठल्याही राजकीय पक्षाला तरी त्याचा थांग कशाला लागत असेल? ते तशाच चुका करत रहातात.

अमोलसारखा सामान्य ड्रायव्हर काय म्हणाला? ‘या भाजपावाल्यांना वेड लागले आहे काय? सगळ्यांनाच एकदम अंगावर घेतात ते?’ चटकन त्यात काही मोठे वाटणार नाही. पण त्याचा अर्थ समजून घेतला तर गहन आहे. एकाच वेळी अंगावर घेणे, म्हणजे अनेक शत्रू प्रतिस्पर्ध्यांशी एकाच वेळी लढाई सुरू करणे. तसे केले मग आपली तुटपुंजी शक्ती वा बळ विभागले जाते आणि पराभव अपरिहार्य असतो. इंग्रजीमध्ये त्याला ओपनिंग टू मेनी फ़्रंटस, असे म्हटले जाते. अमोलसारख्या सामान्य माणसाने किती नेमक्या शब्दात राजकीय विश्लेषण केले होते ना? अर्थात तेव्हा भाजपा देशभर मोदी लाटेवर स्वार झाला होता आणि शत्रूचे भय सोडा, त्याला मित्रांचीही अडचण भासू लागली होती. लोकसभेत मोठे यश मिळवून चार महिने झाले नाहीत, तर भाजपाने महाराष्ट्रात शिवसेनेशी असलेली पाव शतकाची मैत्री मोडण्याचा पवित्रा घेतला होता. तो योग्यही भासू शकत होता. पण लाट उंच उसळते, तेव्हा चिंता नसते, ती लाट जेव्हा वर जायची थांबते, तेव्हा खरा कसोटीचा प्रसंग असतो. लाटेवर स्वार होण्याचा एक खेळ आपण टिव्हीवर बघू शकतो. त्यात कसरत असते, ती लाटेच्या उंचीवरून खाली येतानाची. तेव्हा तोल सावरता आला नाही, तर जलसमाधी अपरिहार्य असते. म्हणूनच लाटेवर स्वार होणे दुय्यम आणि लाट कोसळू लागली, मग सावरणे महत्वाचे असते. तेव्हा आधार म्हणून तरंगणारी फ़ळी निर्णायक महत्वाची असते. त्याचे भान ठेवले नाही, तर माणूस चढणार्‍या लाटेवर असताना त्याच फ़ळीला लाथ मारण्याचा मुर्खपणा करतो. भाजपाने वर्षभरापुर्वी नेमके तेच चालविले होते. महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष होण्यासाठी स्वबळावर लढण्याच्या हव्यासापायी शिवसेनेला लाथ मारली आणि आपण मित्रांनाही विश्वासाने वागवत नाही, याचीच ग्वाही राजकारणातून दिली. तो संदेश भाजपाविषयी शंका व संशय निर्माण करण्यास पुरेसा होता.

मग गेल्या फ़ेब्रुवारीपासून या नोव्हेंबरपर्यंतच्या लागोपाठ पराभवातून भाजपाला त्याची फ़ळे भोगावी लागली आहेत. पण दिल्ली बिहारचा पराभव समजून घेता येईल. आता गुजरातच्या स्थानिक संस्थांच्या निवडणूकात भाजपाला बसलेला फ़टका गंभीर आहे. कारण ज्या गुजरातने भाजपाला पहिला स्वबळावरचा पंतप्रधान दिला, तिथेच भाजपाला मोठा दणका बसला आहे. त्याकडे कॉग्रेसचे यश म्हणून बघायचे, की भाजपाचे अपयश म्हणून बघायचे; हा प्रत्येकाचा आपापला दृष्टीकोण आहे. पण वास्तविक तो भाजपाने आपल्या कर्माने ओढवून आणलेला पराभव आहे. दिड वर्षापुर्वी जिथे कॉग्रेसला एकही लोकसभा जागा जिंकता आलेली नव्हती, तिथे आज जवळपास बहुसंख्य जिल्हा तालुका पंचायती कॉग्रेसने खिशात टाकल्या आहेत. त्याला भाजपाचे अपयश एवढ्यासाठी म्हणायचे, की मोदींचे नाव व फ़ोटो टाकला की काहीही अधिक करण्याची गरज नाही; अशा भ्रमात भाजपा मागले दिड वर्ष जगतो व वागतो आहे. जिथे कमी पडेल तिथे अन्य पक्षातून आयात उमेदवार नेते आणून गरज भागवावी, अशी चमत्कारीक रणनिती त्याचे कारण आहे. ज्या राष्ट्रवादी विरोधात महाराष्ट्रात चार वर्षे ओरडा केला, त्याच्याशीच जवळीक करण्यापर्यंत ही मस्ती गेली. चुकांवर पांघरूण घालण्याची सवय पडली, मग कपाळमोक्ष अपरिहार्य असतो. गुजरातच्या ताज्या निकालाचा धडा काय आहे? शहरी भागात भाजपा जिंकला ही शुद्ध थापच आहे. शहरी भागात ४६ टक्के म्हणजे कमी मतदान झाल्याचे अब्रु वाचलेली आहे. उलट ग्रामिण भागात ६० टक्केहून अधिक मतदान झाले, तिथे भाजपाचा धुव्वा उडाला आहे. म्हणजेच ज्या बालेकिल्ल्यातून लोकसभेची लढाई मोदींनी सुरू केली आणि जिंकली; त्यालाच खिंडार पडायला आरंभ झाला आहे. त्यासाठी कॉग्रेसला फ़ारसे कुठले प्रयत्न करावे लागले नाहीत. भाजपाच्या आत्महत्येत हस्तक्षेप न करून कॉग्रेसने हे यश मिळवले आहे.

लोकसभा जिंकल्यापासून भाजपा आत्महत्येच्या वाटेने वेगात धावत सुटला. त्याने नवे मित्र मिळवण्यापेक्षा असलेल्या मित्रांना शत्रूच्या गोटात पाठवण्याचा एक कार्यक्रम हाती घेतला. शिवसेनेशी युती तोडणे, हा जागांपुरता विषय नव्हता. त्यामागची भूमिका मित्राला संपवण्याची होती. म्हणूनच त्यावर मी अतिशय कठोर शब्दात हल्ले केले होते. कारण मला शिवसेनेविषयी आत्मियता असण्यापेक्षा भाजपाची आत्मघातकी दिशेने चालू झालेली वाटचाल स्पष्ट दिसत होती. एकदा तशी वाटचाल सुरू झाली, मग ती प्रत्येक बाबतीत होऊ लागते. तेच मग सर्वत्र होऊ लागले आणि गुजरातमध्ये जी सर्व घटकांनी एकजुट मोदींनी मागल्या दहा वर्षात बांधली होती, तिलाही लाथ मारणे स्वाभाविकच होते. हार्दिक पटेल हा त्याचा प्रासंगिक उद्रेक होता. पण त्यानेच गुजरातमधील राजकीय तोल ढासळून टाकला. दिल्लीत प्रस्थापित असलेली सत्ता नुसती राजकीय नाही, तर विविध संस्था व यंत्रणातून विभागलेली आहे. त्यावर मांड ठोकण्यापर्यंत मोदी वा त्यांच्या पक्षाला स्वबळाचे स्वप्नही बघण्याची गरज नव्हती. आधी वास्तविक अडचणी संपवण्याला प्राधान्य द्यायला हवे होते. नुसता प्रदेश पादाक्रांत करून चालत नाही. त्यातून लूट मिळते, साम्राज्य उभे रहात नाही. साम्राज्य उभे करायचे तर जो प्रदेश जिंकला, तिथे यशस्वी सत्ता राबवावी लागते. लोकांचा विश्वास संपादन करावा लागतो. इथे भाजपा असलेला विश्वासही पायदळी तुडवू लागला. मग यापेक्षा वेगळे काय व्हायचे होते? त्याच काळात मी एक सूचक इशारा दिला होता. ‘मित्रांमध्ये शत्रू शोधणार्‍यांसाठी बाहेरून कोणी शत्रू येत नाही, तशी गरजच नसते, असे लोक स्वत:च आपले शत्रू निर्माण करतात’. महाराष्ट्रात शिवसेनेला शत्रू बनवले आणि गुजरातमध्ये पटेल समाजाला शत्रू बनवले, हे अमोलसारखा सामान्य ड्रायव्हर समजू शकतो. पण भाजपाच्या ‘शहा’णक्यांच्या लक्षात यायला पराभवच आवश्यक असतो ना?

10 comments:

 1. Bhau he tar Vijaynagar samrajya sarkhe hot ahi.tayani 5shahya angavar ghetlya yani sarve paksha

  ReplyDelete
 2. गावागावांमधील राजकारण संपूर्णपणे वेगळे असते. इथे पक्ष वगैरेपेक्षा तेथील पॉवरबाज माणसे आणि स्थानिक व्यापार्‍यांच्या / शेतकर्‍यांच्या गरजा यांवर अवलंबून आहे. जालन्यातही हे बघितले आणि तेथील सामान्य आणि अतिसामान्य लोकांशी बोलल्यावर समजले. तसेच गुजरात मध्येही सामान्य व्यापार्‍यांचे रोजचे व्यवहार ज्या बड्या व्यापार्‍यांवर अवलंबून असतात, त्यांच्या निर्णयावर तेथील राजकारण चालते. या बड्या माशांना विकत घ्यायची आर्थिक ताकद ज्याच्याकडे आहे, तो जिंकतो.

  ReplyDelete
 3. महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप घडवणाऱ्या सिंचन
  घोटाळ्याप्रकरणी जनहित याचिका दाखल
  करणारे ज्येष्ठ वकील
  श्रीकांत खंडाळकर यांच्या गूढ मृत्यूने
  खळबळ उडाली आहे.
  श्रीकांत खंडाळकर हे शनिवारपासून
  बेपत्ता होते. याबाबत
  सीताबर्डी
  पोलीस ठाण्यात तक्रारही
  दाखल करण्यात आली
  होती. त्यानंतर पोलीस
  त्यांचा शोध घेत होते. दरम्यान, आज जिल्हा व सत्र
  न्यायालयाच्या मागच्या बाजूस त्यांचा मृतदेह आढळून
  आल्याने सगळ्यांनाच धक्का बसला आहे. खंडाळकर
  यांनी अनेक महत्त्वाच्या जनहित
  याचिकांसाठी काम केलं होतं. सिंचन
  घोटाळ्याप्रकरणी त्यांनी
  दाखल केलेल्या जनहित याचिकेने अनेक बडे नेते गोत्यात
  आले होते.
  दरम्यान, खंडाळकर यांच्या मृत्यूमागचं नेमकं कारण
  अद्याप उघड होऊ शकलेलं नसून खंडाळकर परिवाराने
  या गूढ मृत्यू प्रकरणी नागपूर पोलिसांकडे
  चौकशीची
  मागणी केली आहे.
  भाजप सरकार असताना त्यांचा असा मृत्यू व्हावा ही शरमेची बाब आहे ....
  की भाजप सरकर काकाच्याच सल्ल्याने चालतय .....
  आता मात्र भाजपची शत प्रतिशत कॉंग्रेस झाली याची खात्री झाली ..........

  व्यापम घोटाळ्याचा महा राश्ट्रिअयन आवतार

  ReplyDelete
 4. भाऊ मला तर हार्दिक पटेल कॉंग्रेस चा एजेंट वाटतो , त्याच्या वडिलांनी कॉंग्रेसला सपोर्ट जाहीर केला होता.
  आणि दुसरी गोष्ट कॉंग्रेस तरी थोडीच पटेलांना आरक्षण देणार आहे.महाराष्ट्रात जसे मराठ्यांना आरक्षणासाठी खेळवले तसेच ते पटेलांना सुद्धा खेळवणार.वापर करून घेणार.
  बिहार व गुजरात निवडणुकीपासून तर त्यांचा cast politics खूप विश्वास निर्माण होईल.

  ReplyDelete
 5. Bhai lekh faar awadala. Maharashtrathi Brahman samajachya mattancha adhar ghewun jinkin aaleli bjp tyaanach vosarali. NCP shi julawun ghene,Sharad Pawarranwar stutisumane udhalane,Brigade made kanadola karane,Babasaheb Purandarenna Bahuman jahir Karun nantar tyanna waryawar sodane aani Brigade la poorn Maharashtrat Brahmandweshacha dhumakul hhalu dene,Senene Savarkarrana Bharatratn dhya mhantale mhanoon tyanchya vicharanchya virudh tokachya Jyotiba Phullenche naav tya rashtriy bahumanakarita Kendra sarakarala suchavine ,KDMC chya election madhye gundgirichi bhasha karane ase Anek pramad bjp ne ahankarat jawun kele aahet.War Meghana Apte yaani lihilya pramane jar mothya mashanna vikat ghreun nivadnuk jinkata aali asati tar Cong/NCP harale nasate. Alonikaka

  ReplyDelete
 6. Time time chi bat ahe....vel konacha mohtaj nasato.... 2019 madhe Kay honar he tar velach sangnar..

  ReplyDelete
 7. भाऊ मी तुम्हाला एक विनंती करतो कि महाराष्ट्रात शिवसेना हा पक्षच मोठा होणार आहे त्याप्रमाणे श्री उद्धव ठाकरे साहेबांचे राजकारण सुरु आहे आज जरी उद्धव साहेब यांचे राजकारण आपल्यायला धर सोड वाटत असेल पण शिवसेना पक्षाचा काळ पुढे चांगले आहे उद्धव साहेब यांचा राजकारणावर आपण भाऊ आपले विचार मांडा आपले विचार हे योग्य असतात.

  ReplyDelete
 8. २०१४ च्या यशानंतर भाजपच्या विचारसरणीत झालेला बदल, फाजील आत्मविश्वास व इतर अनेक त्रुटींवर आपण अचूक बोट ठेवले आहे पण शिवसेनेच्या बाबतीत मात्र ते फार चुकलेत अस वाटत नाही.

  तस बघायला गेल तर उद्धव ठाकरे या माणसाची लायकी काय? राहुल गांधी, तेजस्वी यादव यांच्यापेक्षा हा माणूस कितपत वेगळा? एका विशिष्ट कुटुंबात जन्माला आला याशिवाय दुसरे काहीही कर्तुत्व नाही. साधी मुन्सिपालटीची निवडणूक जिंकायची लायकी नसलेला हा माणूस निवडणुकांच्या आधीच मुख्यमंत्रीपदावर आपला हक्क सांगायला लागला, आपल्याच मित्रपक्षाबद्धल अर्वाच्य भाषा वापरू लागला. आज सरकारात सामील झाल्यावरसुद्धा भाजपवर हा एखादा दिग्विजय सिंग सुद्धा लाजेल असे वर करण्यात धन्यता मानतो. 'ठाकरी भाषा' बाळासाहेबांना शोभायची कारण जोडीला कर्तुत्व होत, पण उद्धवच्या तोंडात हि भाषा हास्यास्पद दिसते. अशा माणसाबाबत भाजपला दोष देणे कितपत योग्य आहे?

  ReplyDelete
 9. भाऊ, तुम्ही सतत पेशंटच्या मनगटावर हात ठेवून बसलेले खरे डॉक्टर आहात. त्यामुळे तुमचे निदान अगदी नेमके असते. पण पेशंटला भयंकर व्यसन लागले आहे, अफुचे. त्याला काहीच कळणार नाही. तो २०१९ ला "डिस्चार्ज अगेन्स्ट मेडिकल एद्व्हाइज", घेऊन घरी जाणार हे पक्के. लिहून ठेवा तुम्ही डायरीत. फार मर्यादित आकलनाचे लोक आहेत ते. मुळातच त्यांच्या संपूर्ण परिवारावर सरळ किंवा अप्रत्यक्षपणे विशिष्ट कोत्या आणि संकुचित समाजाचे नेतृत्व आहे तोवर त्यांना मोठे भविष्य नाही हेच पुन्हा पुन्हा सिद्ध होते आहे.

  ReplyDelete
 10. त्यांच्यानंतर इथे पुन्हा चंबळच्या डाकूंचे राज्य नको असेल तर शिवसेनेला तुमच्या सल्ल्याची खरे तर जास्त गरज आहे. कारण भाजपमध्ये सगळेच 'त्रिकालदर्शी बाबा' असतात. लोकांना आशा शिवसेनेकडूनच आहे. सेनेने आक्रस्ताळेपणा सोडून आणि थोडे 'आर्थिक डायेटींग' करून प्रतिमा सुधारली पाहिजे. सत्तेची जी मिळाली आहे त्या संधीचा फायदा घेऊन मागे बाळासाहेब असताना जशी कायमस्वरूपाची चांगली कामे (उदा. पूल रस्ते) केलेली होती तशी आहे त्या खात्यातील टिकाऊ कामे करून घेतली पाहिजेत. मग२०१९ ला सेनेनेच 'शत-प्रतिशत' बाजी लावावी. नक्की विजय मिळेल. आणि जसे तमिळ नाडू, किंवा प.बंगालमध्ये होते तसे महाराष्ट कायमचे प्रादेशिक पक्षाचे राज्य होईल. त्यात राज्याचे नक्की चांगलेच होईल. त्यांना जरा चार शब्द आणि मोठे डायेटिंग सांगा भाऊ. आधी सामनाच्या प्रवाहातून जे सांडपाणी सोडले आहे आणि त्याचे गटार करून टाकले आहे ते बंद व्हायला हवे.

  ReplyDelete