Saturday, December 5, 2015

उष्ट्या खरकट्यातली पंचपक्वान्ने



सोशल मीडिया शक्तीशाली झाल्यापासून भारतीय माध्यमांची विश्वासार्हता ढासळली असे आपण म्हणतो. पण म्हणून त्याच्याही आधी त्यांची विश्वासार्हता फ़ारशी नव्हती. म्हणूनच सव्वाशे कोटी लोकसंख्या असून आणि त्यापैकी साठ सत्तर कोटी भारतीय साक्षर असूनही, भारतात छापील माध्यमे आपल्या भक्कम आर्थिक पायावर कधी उभी राहू शकली नाहीत. कारण अत्यंत अल्पबुद्धीचे लोक मागल्या दोनतीन दशकात पत्रकारितेत येत गेले. शिवाय सुटसुटीत लिहीता येणे, यालाच बुद्धीमत्ता समजले गेले. त्याचे कारण असे होते, की पूर्वी इंग्रजी वाचणारे कमी होते आणि इंग्रजीत जे छापून आले, त्याचे भाषांतर करू शकणार्‍यांना पत्रकार होणे सहजशक्य झाले. पण त्यातले कितीजण स्वत:ची विवेकबुद्धी वापरून हाती आलेल्या माहितीचा विचार व अभ्यास करू शकणारे होते? परिणामी इंग्रजी वर्तमानपत्रात जे खरकटे पडलेले मिळेल, त्याचे भाषांतर करणे वा त्याचीच नक्कल करून आपली बुद्धीमत्ता सिद्ध करणे, सोपा मार्ग होऊन बसला. पण मुळात इंग्रजी भाषा जाणणारे व त्यातून मिळणार्‍या माहितीला आपल्या चिकित्सा बुद्धीने तपासून बघणार्‍यांचा अभाव प्रादेशिक भाषेत होता, तितकाच दुष्काळ इंग्रजी जाणणार्‍या इंग्रजी पत्रकारांमध्येही होता. म्हणूनच असे लोक पाश्चात्य वा परदेशी खरकट्यावर आपली बुद्धीमत्ता पोसणारे निपजत गेले. आता तर इंग्रजी ही देशातली राष्ट्रीय माध्यमे होऊन बसलीत आणि त्यामध्ये निबुद्धतेचा कळस गाठला गेलाय, असे म्हणायची पाळी आलेली आहे. बरखा दत्त, राजदीप सरदेसाई वा सागरिका घोष असे दिवटे आजच्या नव्या पिढीतल्या उदयोन्मुख पत्रकारांचे आदर्श आहेत. मग आडातच नसेल तर पोहर्‍यात कुठून यायचे? चिकित्सक वाचक वा प्रेक्षक श्रोता कमी असल्याने, त्यांनाही आपली निर्बुद्धता मिरवणे शक्य झाले आहे. त्याचा ताजा नमूना टाईम्स ऑफ़ इडियाच्या शनिवारच्या बातमीत बघायला मिळाला.

नुकत्याच संपलेल्या बिहार विधानसभेच्या निवडणूकीत नितीशकुमार यांच्या महागठबंधन आघाडीला प्रचंड बहूमत मिळवून दिल्यानंतर प्रशांत किशोर या नावाचा गाजावाजा सुरू झाला आहे. त्याआधी त्यानेच मोदींच्या २०१४ च्या लोकसभा विजयाची मोहिम राबवली होती. म्हणून आता त्याच्याकडे भारतीय निवडणूकांचा महान रणनितीकार म्हणून बघितले जात आहे. त्याच संदर्भात त्याला एक पुस्तक लिहायचा आग्रह करण्यात आला आहे. त्या निमीत्ताने त्याची एक मुलाखत सागरिका घोष नामक बेअक्कल महिलेने घेतलेली आहे. त्यातला सगळा तपशील बाजूला ठेवू आणि त्याच मुलाखतीत प्रशांतने भारतीय पत्रकारितेच्या बेअक्कलपणाचा जो दाखला दिला आहे, तिकडे वळू या. नितीशच्या प्रचार मोहिमेचे सुत्रसंचालन करताना त्यांना मुद्दाम गडद काळ्या चष्मा वा गॉगल परिधान करून पेश करण्यात आले. त्यामागे कोणता हेतू होता, असा प्रश्न सागरिकाने विचारला आणि प्रशांतने तिची खिल्ली उडवली. वास्तविक नितीशने तसा गॉगल वापरण्याने जनमानसावर कुठलाही परिणाम होऊ शकणार नव्हता. किंवा त्यामागे कुठलीही योजना नव्हती. निवडणूक काळाच्या दरम्यानच नितीशच्या डोळ्यावर शस्त्रक्रीया झालेली होती. म्हणून त्यांना घरी बसून रहाणे शक्य नव्हते. प्रचाराला फ़िरणे भाग होते आणि कडाक्याच्या उन्हातून फ़िरताना डोळ्यांना इजा होऊ नये, म्हणून गडद रंगाचे चष्मे वापरण्याची सक्ती असते. नितीश त्याच कारणास्तव तसा चष्मा वापरत होते. त्याला ब्रॅन्ड ठरवणे हा सुद्धा मुर्खपणा होता. माध्यमे निकालानंतर नेहमी असे काही तरी फ़ालतू कारण दाखवून निकालाची कारणमिमांसा करतात. वास्तवात तसे काहीही नसते. उमेदवाराचे कपडे पेहराव किंवा नुसत्या दिसण्यावर लोकमत फ़िरवता येत नाही, अशी ग्वाही प्रशांतने दिली आणि तेच वास्तव आहे. पण हे किती भारतीय पत्रकारांच्या मेंदूत शिरणार आहे?

कुठलाही अंधश्रद्ध भक्त जसा आपल्या आयुष्यात वा जगात घडणार्‍या घडामोडींमध्ये देव वा अलौकीक शक्तीची प्रेरणा शोधत असतो. त्यासाठी आवश्यक अशी प्रतिके माथी मारतो, त्यापेक्षा भारतीय पत्रकारांची दुर्दशा अजिबात वेगळी नाही. म्हणून मग मोदींचे कपडे, राहुलचा वेश वा नितीशच्या चष्म्याचे भांडवल केले जाते. त्याचा काहीसा परिणाम असतो, म्हणून त्यामुळेच लोकमत फ़िरवता येत नाही. पण मार्केटींगच्या आहारी गेलेल्या पत्रकारांना व माध्यमांना आजकाल सर्वातच ब्रॅन्डमूल्य महत्वाचे वाटू लागले आहे. याचे कारण तसे पाश्चात्य माध्यमातून अहोरात्र ओरडून सांगितले जात असते. त्याचीच पोपटपंची मग भारतीय माध्यमातून होऊ लागते आणि प्रादेशिक भाषेतील पत्रकार सत्याचा शोध घेण्यापेक्षा इंग्रजीची भ्रष्ट नक्कल करत रहातात. इंग्रजी वा पाश्चात्य माध्यमांच्या उकिरड्यात पडलेले शिळेपाके उचलून इथे आपल्या वाचक श्रोत्यांना पंचपक्वान्ने म्हणून पेश करत असतात. अशीच एक आठवण वाजपेयी पंतप्रधान असतानाची आहे. त्यांनी शिखर परिषदेसाठी पाकिस्तानचे लष्करशहा मुशर्रफ़ यांना आग्रा येथे आमंत्रण दिले होते. तेव्हा पाकचे अनेक जाणकार पत्रकार भारतात आले होते व भारतीय माध्यमातही झळकत होते. त्यात पाकिस्तानच्या ‘द डावन’ या इंग्रजी दैनिकाचे मालक संपादक एनडीटिव्ही वाहिनीच्या कार्यक्रमात होते. मुशर्रफ़ व त्यांचा भारत दौरा कौतुकाचा विषय झाला होता. त्यांनी निवडक भारतीय संपादकांशी संवादही केला. त्याचे इतके कौतुक होते की वाजपेयींनी तसे काही केले नाही, म्हणून इथली माध्यमे हेटाळणी करीत होती. अशावेळी त्या पाक पत्रकाराने बरखा दत्त हिची केलेली निर्भत्सना लक्षात राहिली. कारण भारतीय संपादकांशी संवाद करताना मुशर्रफ़ कुठे फ़सले, त्यावर त्याने नेमके बोट ठेवले आणि बरखाची बोलती बंद झाली. कारण तिचा मुर्खपणा तिच्याच वाहिनीवर स्पष्ट झाला.

काश्मिरचा उल्लेख संयुक्त निवेदनात नसेल तर आपल्याला परत पाकिस्तानात तोंड दाखवता येणार नाही. इथेच दिल्ली आग्र्यात कोठी घेऊन वास्तव्य करावे लागेल, असे मुशर्रफ़ बोलून गेले आणि त्यांच्याच शेजारी बसलेल्या पाक मुत्सद्दी मंडळींचे चेहरे बघण्यालायक झाले होते. कारण काश्मिर ही पाकिस्तानची अगतिकता आहे याची ती कबुली होती. मुत्सद्देगिरीत कधीही आपले दुबळेपण लपवायचे असते. मुशर्रफ़नी ते उघडे पाडले होते. त्याची वेदना पाक संपादकाला झाली होती आणि भारतीय पत्रकार मात्र त्यालाच मुशर्रफ़ची मर्दुमकी ठरवत होते. खेरीज मुशर्रफ़ यांची आई आधी आठवडाभर येऊन दिल्लीत मुक्काम ठोकून होती. कारण दिल्लीतच मुशर्रफ़चा जन्म झालेला होता आणि तिथून ती लाडक्या पुत्राचे जन्म प्रमाणपत्र मिळवायला धडपडत होती. त्याचा कुठे उल्लेख बातम्यातून नव्हता. ते मिळाल्यास मुशर्रफ़ याचे वय कमी ठरून त्यांना अधिक काळ सरसेनापती रहाणे शक्य होते. पण दिल्लीत त्यांची जन्मदाती काय करते आहे, त्याकडे भारतीय पत्रकारांनी ढुंकून बघितले नाही. याचीच निर्भत्सना त्या पाक संपादकाने बरखाच्या कार्यक्रमात केली. भारतीय पत्रकारिता किती उथळ व उडाणटप्पू झालीय, त्याचे त्याने वाभाडेच काढलेले होते. मित्रांनो असा एकूण भारतीय पत्रकारितेचा आज उकिरडा झाला आहे. तिथे कोणीही काहीही शिळेपाके आणून टाकावे. मग हे महान संपादक अभ्यासक ताव मारतात आणि पंचपक्वान्नाची पंगत वाढत असल्याचा आव आणत असतात. म्हणून त्यांना कुठल्याही निवडणूकीचा वा राजकीय घडामोडींचा कुठलाही नेमका अंदाज बांधता येत नाही, की घटना घडून गेल्यावरही त्याचे योग्य विश्लेषण मिमांसा करता येत नाही. त्याचीच लक्तरे मग सोशल माध्यमातून नित्येनेमाने धुतली जातात आणि त्यातलीच चिरगुटे घेऊन अनेकांना ब्रेकिंग न्युज कराव्या लागत असतात.

3 comments:

  1. भाऊराव,

    मुशर्रफ यांना दिल्लीच्या जन्ममृत्यू नोंदणी कार्यालयाचे एखादे कोरे वा नकली जन्मप्रमाणपत्र मिळवणे अजिबात अवघड नव्हते. भारतात एव्हढा भ्रष्टाचार माजलेला आहेच. मग त्यांच्या आईने त्यासाठी दिल्लीत येऊन धडपड करण्याची संगती कशी लावावी? मला एकंच शक्यता वाटते. ती म्हणजे मुशर्रफनी जर नकली प्रमाणपत्र दिले असते तर 'दिल्लीतल्या कार्यालयात तशी नोंद नाही' म्हणून पाकिस्तानी विरोधकांनी गोंधळ घातला असता. पाकिस्तानही पोखरला गेला आहे याचीच ही पावती तर नव्हे? हां, काँग्रेसचे सरकार असते तर ही बनवाबनवी खपून गेली असती. भाजपचे केंद्र शासन असल्याने खऱ्या प्रमाणपत्राची गरज भासली असावी. असा आपला माझा तर्क.

    असो.

    बाकी, भारतातली इंग्रजी पत्रकारिता उष्ट्या खरकट्यावर मातली आहे हे निरीक्षण शंभर टक्के अचूक आहे. इंग्रजी वृत्तपत्रसृष्टीसारख्या निम्नस्तरीय वातावरणात राहूनही आपली अभ्यासू वृत्ती टिकवून धरणारा एक पत्रकार होता. तो म्हणजे गिरीश कुबेर. 'एका तेलियाने' किंवा 'युद्ध जिवांचे' या पुस्तकांतून त्यांचा सखोल अभ्यास दिसून येतो वा येत असावा (मी दोन्ही पुस्तके वाचलेली नाहीत). पण वर्तमानपत्राच्या अग्रलेखात त्यांच्या बुद्धीचे प्रतिबिंब पडंत नाही याचे सखेद आश्चर्य वाटते. एकंदरीत, आजच्या घडीला वृत्तपत्रासाठी काम करणे म्हणजे आपली बुद्धी गहाण टाकणे झाले आहे.

    आपला नम्र,
    -गामा पैलवान

    ReplyDelete
  2. भाऊ, तुम्ही म्हणल्याप्रमाणे अल्पबुद्धीचे लोक मागल्या दोनतीन दशकात पत्रकारितेत येत गेले यात काही शंकाच नाही. इथे अजूनही काही factors नमूद करावेसे वाटतात. सागरिका घोसचे (राजदीप सरदेसाईची पत्नी) वडील भास्कर घोस हे (१९६० च्या batch चे IAS) दूरदर्शनचे Director General तसेच प्रसार भरतीचे Chairman होते. सागरीकाची एक आत्या अरुंधती घोस ही Indian Foreign Service मध्ये celebrity status असणारी अधिकारी व भारताची राजदूत होती. तिची दुसरी आत्या रुमा पाल ही Supreme Court of India ची Justice होती. नेहरू-गांधींच्या भारतात अशा पदांवर पोहोचण्यासाठी competence पेक्षा contacts जास्त महत्वाचे होते. सागरिका घोस आणी राजदीप सरदेसाई यांच्या उगमात आणी प्रगतीत भास्कर घोस यांचा मोठा वाटा आहे.

    बरखा दत्तच्या बाबतीत आपल्याला असेच आढळेल. 2G spectrum घोटाळा असो की BJP-PDP चे काश्मीर मधील गठबंधन यात बरखा दत्तने मोठी भूमिका बजावली आहे. ही मंडळी अल्पबुद्धी असली तरी political contacts व पैशाचे बळ ह्यावर काहीही शकतात. एखादा प्रामाणिक, हुशार पत्रकार ह्यांच्यापुढे कुठे टिकणार?

    ReplyDelete