Monday, December 28, 2015

सच्चाई छुप नही सकती, बनवटके असूलोसे



मुंबई प्रदेश कॉग्रेस संघटनेचे मुखपत्र आलेल्या ‘कॉग्रेसदर्शन’ यात प्रसिद्ध झालेला एक लेख कमालीचा वादग्रस्त झाला आहे. क्षणाचाही विलंब न लावता प्रदेशाध्यक्ष संजय निरूपम यांनी माफ़ी मागितली आहे आणि चुकही कबुल केली आहे. पण त्यात चुक कोणती व माफ़ी कशाला, त्याचा कुठेच खुलासा होऊ शकलेला नाही. कारण त्या लेखातून प्रसिद्ध झालेली माहिती वा तपशील खोटा वा चुकीचा असेल, तर माफ़ी मागितलीच पाहिजे. पण त्यात काही खोटे नसेल तर माफ़ी कशाला? खोटेच असेल तर खरे काय, त्याचाही खुलासा व्हायला हवा ना? पण तसेही काही झालेले नाही. पक्षाध्यक्षा सोनियांची बदमानी होते किंवा त्यांचा लपवलेला चेहरा समोर आणला गेला, याला चुक म्हणायचे काय? तसे असेल तर मुळात सोनियांनीच देशाची व पक्षाची जाहिर माफ़ी मागायला हवी. नुसते आरोप झाले तर अर्थमंत्री अरूण जेटली यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर अब्रुनुकसानीचा खटला भरला आहे. मग सोनियांनी ‘कॉग्रेसदर्शन’चे संपादक व लेखक यांच्यावत तसा खटला कशाला भरू नये? त्याऐवजी संपादकच थेट माफ़ी कशाला मागत आहेत? सोनियांनी तशी मागणी केली आहे काय? तसेही दिसत नाही. नुसताच माध्यमातून गवगवा सुरू झाला आहे. पण सोनियांसह कुणी आक्षेप घेतल्याचे वृत्त नाही. उदाहरणार्थ आजच दिल्लीत केजरीवाल यांच्या घरावर भाजपाच्या समर्थकांनी ‘माफ़ी मागा’ म्हणून निदर्शने केली. भाजपानेही केजरीवाल यांच्याकडे माफ़ीची मागणी केलेली आहे. पण आपल्या पक्षाध्यक्षाची इतकी भयंकर मलीन प्रतिमा एका लेखातून उभी केली गेली असूनही, कॉग्रेसने कुठे मोर्चा काढलेला नाही की माफ़ीची मागणी करीत खटला भरलेला नाही. जेटलींप्रमाणे सोनियांनी कोर्टातही खटला भरण्यासाठी धाव घेतलेली नाही. मग ही काय भानगड आहे? अब्रुदार असे चिडीचूप कशाला बसलेत?

त्या लेखाविषयीचे जे तपशील माध्यमातून व वाहिन्यांवर झळकले आहेत, ते सोनिया गांधींची प्रतिष्ठा वाढवणारे किंवा त्यांच्या त्यागाची कथा सांगणारे नक्कीच नाहीत. पण दुसरीकडे तो तद्दन खोटारडेपणा आहे असाही दावा कोणी कॉग्रेसवाला करीत नाही, ही बाब लक्षणिय आहे. म्हणजेच त्यातून लेखातला तपशील खरा व विश्वासार्ह असल्याचीच कॉग्रेस गोटातून ग्वाही दिली जात आहे ना? मग खरे छापले म्हणून संपादक नेता संजय निरूपम माफ़ी कशाला मागतो आहे? तर तेच मोठे धडधडीत सत्य आजपर्यंत झाकून ठेवले गेले, हेच त्यातले सत्य आहे. सवाल इतकाच उरतो, की जे सत्य पक्षाच्या एका मुखपत्रात इतके ठळकपणे छापले गेले आहे, त्यावर भारतीय माध्यमांनी आजवर एकदाही बातमी कशाला दिलेली नाही? कुणाही पत्रकार संपादकाला त्याचा शोध घेऊन उहापोह करण्याची गरज कशाला भासलेली नाही? नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाचे उमेदवार झाल्यावर त्यांची पत्नी कोण, ती कुठे रहाते? त्या पत्नीचे मोदींशी कधी लग्न झाले व कधीपासून ते दोघे विभक्त जीवन जगले, इत्यादी तपशील खेड्यापाड्यापर्यंत जाऊन शोधणारे कुशाग्र बुद्धीचे संपादक पत्रकार आपल्या देशात आहेत. अनेक भामट्यांना छुप्या कॅमेरात गुंडाळणारेही शूरवीर इथे आहेत. यापैकी कोणालाच सोनियांच्या पुर्वेतिहासाविषयी कधीच कुतूहल कशाला वाटलेले नाही? जो तपशील आता पक्षाच्याच एका मुखपत्राने प्रसिद्ध केलेला आहे, तोच आजवर कुठल्याही भारतीय माध्यमाने छापलेला नसेल, तर त्याला लपवाछपवी असेही म्हणावे लागेल. कारण हा तपशील शोधायला फ़ारसे कष्ट पडत नाहीत. सोनियांना विविध खटल्यात गोवणारे डॉ. सुब्रमण्यम स्वामी, यांनी असे तपशील कित्येकदा दिलेले आहेत आणि त्याबद्दल खुप गवगवा केलेला आहे. पण कुठ्ल्याही माध्यमाला वा पत्रकाराला त्यात स्वारस्य असल्याचे दिसलेले नाही.

सवाल इतकाच, की स्वामी सतत ज्याविषयी बोलत आले, त्याबद्दल मौन धारण करणार्‍या माध्यमांना आताच जाग आली आहे काय? ही माहिती सोनियांनी लपवून ठेवली म्हणायचे काही कारण नाही. त्यांनी लपवलेलीच असणार. पण तशी बरीच व्यक्तीगत माहिती अनेकजण जगजाहिर करीत नाहीत. लोकसभा निवडणूकीपुर्वी कधी मोदींनी आपल्या विवाहाविषयी जाहिर वाच्यता केलेली नव्हती. पण सुप्रिम कोर्टाने त्याबद्दलचा तपशील अर्जात घालण्याची सक्ती केली म्हणून मोदींनी जशोदाबेन मोदी यांच्या नावाचा उल्लेख अर्जात केला. त्यानंतर मोदी लपवाछपवी करीत राहिले, म्हणून किती कल्लोळ माजवला गेलेला होता. त्या पुढला तपशील उकरून काढण्यासाठी भारतातले किती शूर अविष्कार स्वातंत्र्यवीर लढवय्ये दिवसरात्र एक करून राबत होते ना? मग सोनियांच्या बाबतीत आज समोर आलेली धक्कादायक माहिती स्वामी देत असताना तिकडे संपुर्ण माध्यमांनी पाठ कशाला फ़िरवली होती? ही माहिती एकट्या सोनियांनी लपवलेली नाही, भारतीय सेक्युलर माध्यमांनी व पत्रकारांनी सुद्धा लपवलेली माहिती आहे. म्हणूनच वाटते ह्या ताज्या लेखाततून झालेला गौप्यस्फ़ोट, भारतीय सेक्युलर माध्यमांना खुद्द कॉग्रेसच्याच मुखपत्राने मारलेली एक सणसणित चपराक आहे. कारण त्यातला तपशील नवा नाही की फ़ारसा गोपनीय नाही. तो लोकांपर्यंत पोहोचू नये म्हणून सोनियांनी केलेले प्रयास समजू शकतात. ती माहिती त्यांची वैयक्तिक आहे. पण शोधपत्रकार व ब्रेकिंग न्युजचा खेळ करणार्‍यांसाठी त्यात गोपनीय असे काय होते? की कुठल्याही कॉग्रेस समर्थकाप्रमाणे सेक्युलर माध्यमातील संपादक पत्रकारांनाही सोनियांचा शंकास्पद इतिहास, ही आपापली व्यक्तीगत अब्रु वाटते काय? नसेल तर ही लपवाछपवी कशाला? किंबहूना कॉग्रेसच्या मुखपत्रात असा लेख छापणार्‍यांनी माध्यमांचेच नाक कापले म्हणायचे.



अशीही शक्यता आहे, की कुठल्याही वर्तमानपत्र वा माध्यमात जाऊन ही माहिती जगापुढे येणार नाही, अशी खात्री असल्यानेच हा ‘डाव खेळला’ गेला असेल काय? कारण थेट कोणी काही बोलणार छापणार नाही. पण कॉग्रेसच्याच मुखपत्रात असे काही छापले मग हलकल्लोळ माजेल आणि त्याची बातमी माध्यमांना लपवता येणार नाही. परिणामी आजवर लपवलेल्या गोष्टी मुख्य माध्यमातूनच जगापुढे येतील, वाजतगाजत आणाव्या लागतील. म्हणून जाणिवपुर्वक हा लेख त्या मुखपत्रात छापला गेलेला असावा. अन्यथा जी माहिती त्यात आलेली आहे ती गोपनीय नाही की उकरून काढावी इतकीही लपवलेली नाही. फ़क्त माध्यमे त्याविषयी मौन होती. शिवाय आज त्या जुन्या गोष्टी उकरण्याचे कॉग्रेसच्या मुखपत्राला कारण काय, तेही उलगडत नाही. माहिती महत्वाची नसून ती कॉग्रेस मुखपत्रात येण्याला महत्व आहे. कारण त्यातून काही हेतू साधायचा असावा. नेहरू खानदानाचा देशासाठी त्याग किंवा हौतात्म्य आपण नेहमीच ऐकत असतो. त्याहीपेक्षा नेहरू खानदानाच्या हातून कधी कुठली चुक होत नाही, अशीही एक सेक्युलर अंधश्रद्धा आहे. म्हणूनच अशा गोष्टी सराईतपणे लपवल्या जातात. त्यालाच शह देण्यासाठी हा लेख मुखपत्रात छापून आणला गेलेला आहे. त्याच्याविरुद्ध कुठला खटला होण्याचा धोकाही नव्हता. सवाल फ़क्त गाजावाजा होण्याशी आहे. सोनियांनाच नव्हेत तरा अवघ्या भारतीय माध्यमांनी पाळलेल्या मौनव्रताला नागडे करण्याचा हेतू त्यामागे असावा. अन्यथा डिसेंबर २०१५ सालात हा जुना तपशील येण्याचे काहीही राजकीय, वैचारिक वा ऐतिहसिक प्रयोजन दिसत नाही. म्हणूनच खरा प्रश्न लेख कुठे आला वा कोणी लिहीला असा नसून, तो कॉग्रेस मुखपत्रातच छापून येण्यासाठीचा कुटील डाव कोणी कसा खेळला आहे? ज्याचे उत्तर निरूपम वा सोनियाही देवू शकणार नाहीत.

6 comments:

  1. झाले ते बरेच झाले. पण लाचार संपादक हे छापणार नाहीतच. त्यांना आशा आहे भविष्याची. त्यांना फक्त २०१९ पर्यंतच कळ काढायची आहे. नंतर राज्य त्यांच्या शेठानीचेच येणार आहे. शिवाय आता संघाच्या एकापेक्षा एक ग्रेट विद्वानांनी त्यांना सहकार्य देणे सुरु केले आहे, आरक्षणाच्या पुनर्विचाराच्या आयडीये तून बिहार घालवला, नंतर मंदिराचे खूळ पुन्हा काढलेय. त्यात अजून दोनतीन राज्ये घेण्यात संघ कॉंग्रेसला मदत करणार. परवा जीवाची बाजी लावून पंतप्रधानांनी दिलेल्या पाक भेटीची माती त्यांनी आधीच करून टाकली आहे. एका भेटीत हे विद्वान लगेच अखंड भारताचा नकाशा काढ्यलाच बसले. म्हणजे हे लवकरच त्या शरीफलाही त्याच्या देशात जगणे मुश्कील करून ठेवणार. त्याचीही उचलबांगडी घडवून आणणार. मग पत्रकारांच्या आशा पल्लवित होणार नाहीत का? कि बुवा, खुद्द संघाच्या "विद्वानांच्या" मदतीनेच आपले पपुसेठ परत सत्तेत येणार म्हणून !!

    ReplyDelete
    Replies
    1. Ekdum perfect analysis. Apan ardhya halkundane pivle honarech vatatoy!! Daiv dete ani karm / bolne nete ase hot ahe!!
      Kunitari ya ati vachal lokanchya tondala avar ghala re!!!

      Delete
    2. भाऊ Shri Belsare यांचे बरोबर आहे जय कांग्रेस पार्टी 2019

      Delete
  2. अप्रतिम मांडणी रोज नविन शैली
    सेक्युलर अंधश्रद्धा पुर्ण नग्न ...
    आपल्या देशाचे दुभाग्य आहे पहिले पंतप्रधान नेहरू.
    आंधारी रात्र गेली आली प्रभात...

    ReplyDelete
  3. भाऊ खरा इतिहास कायमच लपवला जातो

    ReplyDelete