Thursday, December 17, 2015

सौदी राजेशाही कोणाला घाबरलीय?



तीन वर्षे इसिस पश्चिम आशियात धुमाकुळ घालते आहे. त्यातून लक्षावधी नागरिक निर्वासित झाले आणि लाखो मारले गेलेत. पण तेव्हा इराक-सिरीयाच्या आसपास वसलेल्या देशातील मुस्लिम अरबी सत्ताधार्‍यांना त्याविषयी काही करायची बुद्धी झाली नव्हती. युरोपातल कुठलाही समर्थ देश त्याच भागात मनमानी हवाई हल्ले करत होता आणि त्याची साधी दखल सौदी अरेबिया वा अन्य अरनी देशांनी घेतली नव्हती. पण दोन महिन्यापुर्वी त्यात रशियाने नाक खुपसले आणि अचानक त्याच भागातल्या अनेक देशांना इसिस नावाची काही भीषण समस्या असल्याची जाणिव झाली. लागोपाठ पॅरीसमध्ये भीषण घातपाताची घटना घडली, तेव्हा इसिसला धडा शिकवणे ही फ़्रान्सची राष्ट्रीय गरज झाली आणि त्यात पाठोपाठ ब्रिटनलाही उतरावे लागले. या सर्व काळात तिथला सर्वात श्रीमंत व मोठा देश असून सौदी अरेबिया इसिसकडे ढुंकूनही बघायला तयार नव्हता. कारण इसिस नावाखाली उच्छाद मांडलेले तथाकथित जिहादी त्यांचेच अपत्य होते. म्हणून सौदी अरेबिया येमेनच्या परगंदा अध्यक्षाला संरक्षण द्यायला पुढे सरसावला होता. तिथे हवाई हल्ले करणार्‍या सौदीला रशियाच्या हस्तक्षेपानंतर येमेनची लढाई गुंडाळून इराककडे वळणे भाग पडले आहे तर त्याच विषयात गप्प बसलेल्या तुर्कस्थानला रशियाचे विमान पाडण्यापर्यंत मजल मारावी लागली. कारण आता इसिस नावाचा बुडबुडा फ़ुटायची वेळ येत चालली आहे. त्याचे बोलविते धनी उघडे पडायची पाळी आली आहे. म्हणूनच रशियाने माघार घेण्यास नकार दिल्यावर अमेरिकेलाही आपल्या साथीदारांना आवरणे भाग पडलेले आहे. तुर्कस्थानला इराकमधून आपले सैन्य मागे घेण्याचा सल्ला ओबामा सरकारला द्यावा लागला आहे तर सौदी अरेबिया इसिसच्या बंदोबस्तासाठी इस्लामिक देशांची लष्करी आघाडी घोषित करून बसला आहे. ही तारांबळ उडाल्याची लक्षणे आहेत.

जगात लहानमोठे ७० इस्लामिक देश आहेत. पण सौदीच्या या तथाकथित आघाडीत फ़क्त ३४ देश सहभागी झाल्याची घोषणा आहे. त्यातही पाकिस्तानचे नाव असले तरी आपल्याशी कुठलीही सल्लामसलत झालेली नाही, असे पाक परराष्ट्रमंत्र्यांनी जाहिरपणे सांगून टाकले आहे. म्हणजेच सौदीची ही गर्जना किती दिखावू किंवा फ़सवी आहे, त्याचा अंदाज येऊ शकतो. इराक सिरीयातील निम्मे लोकसंख्या निर्वासित होऊन देशोधडीला लागल्यानंतर सौदीला जाग कशाला आलेली आहे? तर आता आपले अपत्य असलेल्या इसिसची खैर नाही, याची जाणिव त्यामागे आहे. रशियासह फ़्रान्सनेही सातत्याने इसिसच्या बालेकिल्ल्यात सतत हल्ले चालविल्याने इसिसचे अस्तित्व धोक्यात आलेले आहे. पर्यायाने तुर्कस्थान व सौदी अरेबियाचा तिथे खेळलेला डाव उलटत चालला आहे. त्यातून आपल्या बगलबच्च्यांना वाचवण्यासाठी हे नवे नाटक सुरू झाले आहे. पण ज्यांची आघाडी घोषित झाली आहे, त्याही देशांना विश्वासात घेतलेले नाही, हे लगेच उघड झाले. कारण पाकिस्तानला आपण अशा लष्करी आघाडीत असल्याची कल्पनाही नसेल, तर ही उरलेल्या देशांचे तरी काय खरे मानायचे? सौदी सुलतान आतापर्यंतच्या जागतिक जिहादचे खरे बोलविते धनी आहेत. पेट्रोलचा जो अतिरीक्त पैसा हाती आला, त्याचा उपयोग जगभर इस्लामला वहाबी पंथ बनवण्यासाठी करण्याचा आगावूपणा सौदीने केला. त्यात आपण अलिप्त राहुन जगभरच्या मुस्लिम तरूणांना व अरबी जिहादींना पडद्याआडून मदत केली. त्याचा एकत्रित परिणाम आता येऊ घातला आहे आणि त्यानेच सौदी राजांना भयभीत केले आहे. एक तर त्यांना मिळणारा तेलाचा पैसा घटतो आहे. कारण जगभर तेलाच्या किंमती घसरलेल्या आहेत आणि तरीही जिहादी उधळपट्टी आखडती घेतल्यास तेच लढवय्ये जिहादी सौदी राजेशाहीवर उलटण्याचा धोका आहे.

शियापंथीय इराण, सिरीया व इराक यांचे रशियाशी झालेले साटेलोटे पश्चिम आशियाच्या बदलत्या परिस्थितीला कारण झाले आहे. त्यात प्रथम रशियाने तुर्कस्थानला शह दिला आणि आता सौदी भयभीत झाला आहे. कारण रशियाचे अध्यक्ष कुठल्याही परिस्थितीत माघार घेण्याच्या मनस्थितीत नाहीत. त्यांनी तुर्कस्थानाला चांगलाच धडा शिकवण्याचा चंग बांधला आहे आणि त्यामुळेच पश्चिम आशियाची महाशक्ती व्हायची सौदी राजांची स्वप्ने धुळीला मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्यातून पळ काढणेही अशक्य आहे. पळ काढला तर सौदी वंशाचे जे जिहादी इराक-सिरीयात पाठवले आहेत तेच उलटतील. तेव्हा त्यांना वाचवणे सौदीला भाग आहे. त्यासाठी उघड काही करणे शक्य नाही. म्हणून मग आम्हीच बंदोबस्त करतो, असे नाटक करून आपले बगलबच्चे सुखरूप मागे घ्यायचा डाव त्यामागे आहे. अफ़गाणिस्तानवर अमेरिकेने हल्ला चढवला, तेव्हा त्यात पाकिस्तान दोस्त राष्ट्र म्हणून सहभागी झाला होता. पण प्रत्यक्षात तालिबानांना संपवण्याच्या त्या लढाईत पाकिस्ताननेच आपल्या हस्तकांना सुखरूप बाहेर काढण्याचा उद्योग केलेला होता. तोच डाव आता सौदी इराक-सिरीयामध्ये खेळू बघते आहे. त्यासाठीच हे संयुक्त इस्लामिक लष्करी आघाडीचे नाटक उभे करण्यात आलेले आहे. मात्र रशिया इतक्या सहज ते नाटक यशस्वी होऊ देण्याच्या मनस्थितीत नाही. म्हणूनच सौदीची चारी बाजुने कोंडी झाली आहे. अमेरिका त्यात उघड सहभागी होणार नाही ते स्पष्ट झाल्यावर आणि रशिया माघार घ्यायला तयार नसल्याने नाटोपेक्षा वेगळी आघाडी दाखवणे भाग आहे. त्यातून ही इस्लामिक देशाची लष्करी आघाडी घाईगर्दीने घोषित झाली आहे. त्यात इसिस विरुद्ध लढण्याची इच्छा दिसण्यापेक्षा येऊ घातलेल्या संकटाची तारांबळ मात्र चव्हाट्यावर आलेली आहे. म्हणून त्यात कोणाचीही नावे घुसडलेली असावीत.

सिरीयाचा नेता असद याने सत्ता सोडण्याचा आग्रह अमेरिकेने सतत धरलेला होता. पण आता त्याबाबतीत अमेरिकाही माघार घेण्याची चिन्हे आहेत. कारण पुतीन यांनी निर्णायक लढाईचा पवित्रा घेतलेला आहे आणि तशी जुळवाजुळव केलेली आहे. ते युद्ध अमेरिकेला परवडणारे नाही. कारण बुश यांच्या युद्धनितीच्या विरोधात ओबामा यांनी सत्ता मिळवली होती. आता पुन्हा त्यात उडी घेण्याची मोकळीक त्यांना नाही. म्हणुनच युद्धजन्य परिस्थिती टाळण्यासाठी ओबामा सिरीयात माघार घेण्याची तयारी करू लागलेत. पण संपुर्ण माघार घेण्यापेक्षा आपल्या सहकार्‍यांवर जबाबदारी सोपवण्याची पळवाट शोधलेली आहे. फ़्रान्स व ब्रिटन इसिसच्या विरोधात रशियाच्या सोबत जायला निघाल्यावर पश्चिम आशियात नाटो संघटनेला स्थानच उरलेले नाही. तेही एक कारण आहे. म्हणून मग येमेनची लढाई गुंडाळून सौदी अरेबिया इसिसचा बंदोबस्त करण्याची चमत्कारीक भाषा बोलू लागला आहे. आघाडी करतो आहे. पाकिस्तान मलेशियासारखे देश त्यात किती उतरतील, याची शंकाच आहे. कारण इसिसचा त्यांना कुठला त्रास नाही आणि सौदी इतका त्यांचा इसिसच्या पापात हातही नाही. थोडक्यात वहाबी पंथाचा विस्तार व प्रसार करण्याच्या नादात सौदी राजांनी सुन्नी देशांच्या भावनांशी आजवर जो खेळ केला, तोच आता उलटला आहे. त्यातून पॅलेस्टाईन संघर्षात इस्त्रायल विरोधातली मुस्लिम एकजुटही मोडून पडली आहे आणि एकूण पश्चिम आशियातील संघर्ष आता शिया विरुद्ध सुन्नी असा होत चालला आहे. मात्र ती समस्या वेळीच आवरली नाही तर सौदी राजेशाहीलाही संपवण्यापर्यंत हा संघर्ष ताणला जाऊ शकेल. किंबहूना तशीच शियापंथीय इराणची इच्छा व आकांक्षा आहे. कदाचित त्याचीच जाणिव झाल्याने सौदीने इसिसच्या भस्मासूराला काबुत आणण्याचे निदान नाटक आरंभलेले असावे. मात्र हा भस्मासूर आपल्यासह सौदी राजेच नव्हेतर इस्लामिक जिहादी चळवळीलाच घेऊन बुडण्याची शक्यता अधिक आहे.

2 comments:

  1. पापाची फळे ही भोगाविच लागणार.मग तो राजा असो किंवा रंक....
    भाई सुंदर विशलेषण...

    ReplyDelete
  2. भाऊ ..............छान माहितीपूर्ण लेख !! शिया आणी सुन्नी यांमधील वैराची तीव्रता इतकी आहे कि .........इराण बरोबर अमेरिकेने करार केल्यावर सौदी आणि इस्रायेल एकच भाषा बोलू लागले होते ...ती म्हणजे इराण वर अमेरिकेने विश्वास ठेवू नये. सौदी राजा तर ' जेरुसलेम ' येथील मुस्लिमांची जगातील २ नंबरच्या मशिदीला भेट देण्याच्या नावाखाली ' इस्रायेल ' च्या प्रतिनिधीना तेथे भेटणार होता. सगळ्याच ' आश्चर्य जनक ' घडामोडी. पुढील सहा महिने यामुळे या बाबतीत ' उत्कंठा वर्धक ' असतील यात शंकाच नाही

    ReplyDelete