Saturday, December 26, 2015

फ़ातिमाच्या साहसाचे कौतुक



इसिसचे भूत आता जगाच्या मानगुटीवर पक्के बसले आहे. त्यातून भारताला अलिप्त रहाता येईलच असे नाही. युरोपातील अनेक देशात सुखवस्तू जीवन जगलेल्या व तिथेच जन्म घेतलेल्या अनेक मुस्लिम तरूणांनाही इसिसच्या जिहादचे आकर्षण वाटले असेल, तर भारतासारख्या गरीब व विषमतेने भरलेल्य देशात मुस्लिम तरूण जिहादकडे आकर्षित होणे अशक्य अजिबात नाही. म्हणून तर गेल्या वर्षी प्रथमच मुंबई नजिकच्या कल्याण शहरातले चार तरूण इराकला इसिसच्या युद्धात सहभागी व्हायला गेल्याच्या बातम्या आलेल्या होत्या. अशावेळी युरोप असो किंवा भारत, तिथे वास्तविक समस्येला जाऊन भिडण्यापेक्षा निव्वळ तात्विक व बौद्धिक चर्चेलाच प्राधान्य मिळत राहिले आणि समस्या जशीच्या तशी राहिली. नव्हे अधिकच भीषण रुप धारण करत गेली. पॅरीसमध्ये बॉम्बस्फ़ोटाच्या घटना घडल्या आणि तो देश हादरला, तेव्हाच तिथे हालचाली सुरू झाल्या. पण त्याच्या आधी शेकड्यांनी तरूण जिहादी व्हायला इराक सिरीयाला रवाना झाले, त्याची युरोपियन शहाण्यांनी कधी दखल घेतली नव्हती. त्याची कारणे समजून घेत त्यावरच्या उपायांचा विचारही झाला नव्हता. त्यापेक्षा जिहादींच्या हिंसेशी खेळण्यात व त्याला प्रोत्साहक ठरेल अशा उद्योगात युरोपियन देश रमलेले होते. एका बाजूला मुस्लिम नाराजांच्या मनात विष पेरण्याचा उद्योग कट्टरपंथीय करत होते आणि दुसरीकडे मुस्लिमांच्या दुर्दशेबद्दल बोलून बुद्धीवादी हिंसेला चुचकारत बसलेले होते. भारतातली स्थिती त्यापेक्षा वेगळी नाही. युरोप हल्लीच जिहादचे चटके सोसतो आहे. भारताला मागली दोन दशके त्या अनुभवातून जावे लागते आहे. पण त्यावरच्या वास्तविक उपायांचा कधीतरी विचार झाला काय?

कुठल्याही बाबतीत समस्येचे आकलन करून त्यावरचे वास्तविक परिणामकारक उपाय शोधण्यापेक्षा जगभऱचे शहाणे नुसते कोणाच्या तरी डोक्यावर खापर फ़ोडण्यात धन्यता मानतात, असेच सतत दिसून येत असते. अफ़गाण असो किंवा इराक-सिरीया असो, तिथल्या जिहादी हिंसाचाराचे खापर अमेरिका किंवा अन्य कुणावर फ़ोडून काहूर माजवले जाते. नसेलच तर त्यात सहभागी होणार्‍यांच्या आर्थिक दुर्दशेविषयी गदारोळ केला जातो. पण त्यामुळे जिहादचा भस्मासूर बोकाळत गेलेला आहे. दुसरी बाजू राजकीय आहे. दहशतवादाला धर्म नसतो, असे टुमणे लावले जाते आणि मग तेच सत्य ठरवण्यासाठी शाब्दिक कसरती सुरू होतात. जबाबदार म्हणून राज्यकर्ते वा सरकारवर खापर फ़ोडले जाते. पण सरकारच्या काही मर्यादा असतात. प्रत्येकाच्या घरात जाऊन तिथे काय हालचाली होत आहेत, याकडे सरकार वा पोलिस नजर ठेवू शकत नाहीत. ते जागरुक नागरिकांचे काम आहे. प्रामुख्याने कुटुंब व परिवाराचे काम आहे. उदाहरणार्थ कल्याणचे चार मुस्लिम तरूण इराकला इसिसमध्ये सहभागी व्हायला गेलेले होते, तर त्याची पहिली खबर त्यांच्या कुटुंबियांनीच पोलिसांना दिलेली होती. अर्थात हे तरूण बेपत्ता होईपर्यंत त्यांच्या कुटुंबालाही त्यांच्या हेतूविषयी काही अंदाज नव्हता. पण जेव्हा सत्य उमजले, तेव्हा त्यांनीच पोलिसांकडे पहिली धाव घेतली हे विसरता कामा नये. त्यामागची भावनाही ओळखली पाहिजे. आपल्या मुलांनी चुकीच्या मार्गाने जाऊ नये, म्हणून ते पालक स्वेच्छेने पुढे आलेले होते आणि पोलिस कारवाईत आपलीच मुले तुरूंगात जातील, ह्याची कल्पना असतानाही पालकांनी ते धाडस दाखवलेले होते. पुढल्या वर्षभरात कोणी अशा पालकांना वा कुटुंबियांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला आहे काय? अनेक तरूण मुस्लिम जिहादमध्ये सहभागी झालेही असतील, पण काही कुटुंबियच त्याची माहिती द्यायला पुढे सरसावले, ही देखील वस्तुस्थिती आहे ना?

कुठल्याही विषयाच्या दोन बाजू असतात. त्यात नकारात्मक बाजू असते तशी सकारात्मक बाजूही असते. भारताले मुस्लिम इसिस वा जिहादमध्ये सहभागी व्हायला जातात, ही नकारात्मक बाजू असेल. पण त्यातल्याच काहींचे पालक त्यांना रोखण्यासाठी पोलिसांकडे धाव घेतात, ही त्याचीच सकारात्मक बाजू आहे. पण गेल्या वर्षभरात इसिस संबंधाने झालेल्या चर्चा व आलेल्या बातम्यात, या सकारात्मकतेला कितीशी प्रसिद्धी मिळू शकली? कशासाठी अशी सकारात्मक प्रसिद्धी द्यायला हवी? तर त्यातून अशा सकारात्मक भूमिकेचा प्रसार होतो आणि अधिकाधिक मुस्लिम कुटुंबिय तशा रितीने सकारात्मक कामाला प्रवृत्त होऊ शकतात. पण नकारात्नक प्रसिद्धी अधिक मिळाली, तर चुकीच्या बाजूला वळणार्‍यांची संख्या वाढते आणि एकप्रकारे हिंसक भूमिकेला प्रोत्साहन दिल्यासारखे होते. दुर्दैवाने माध्यमातून किंवा बौद्धिक चर्चांमधून नकारात्मक बाजू इतकी पुढे आणली जाते, की सकारात्मक असलेली बाजू त्याखाली झाकली जाते. आताही एक बातमी तशी आलेली आहे. परंतु त्यातल्या सकारात्मक बाजूला प्रसिद्धी मिळू शकलेली नाही. मुंबईच्या मालवणी उपनगरातील लिंबू विक्रेता असलेला वाजिद शेख नावाचा मुस्लिम तरूण इसिसचा लढवय्या होण्यासाठी निघालेला असताना पकडला गेल्याची बातमी झळकली आहे. पण त्यातली खरी बातमी अशी, की त्याच्याच पत्नीने त्यात पुढाकार घेतला. ही खरी महत्वाची बाब आहे. पण ती बाजू प्रकर्षाने पुढे आणायचा प्रयत्नही झालेला नाही. इसिसची भयानकता किंवा त्याविषयीचे भारतीय मुस्लिम तरूणातील आकर्षण रंगवले जाते. पण त्यापासून त्यांना परावृत्त करण्याचे क्षीण का होईना प्रयास चालू आहेत, त्याचा मागमूस बातम्यातून दिसत नाही. वाजिदची कहाणीही तशीच दुर्दैवी आहे. त्याचा मनसुबा पोलिसांना आपोआप कळला नव्हता, तर पत्नीच्या जागरूकतेमुळे कळला होता.

वाजिदची पत्नी फ़ातिमा हिनेच आपला पती इसिसमध्ये सहभागी होण्याचा धोका ओळखून त्याची माहिती पोलिसांना देण्याची तत्परता दाखवली आहे. म्हणूनच कर्नाटक येथे वाजिदला पोलिस रोखू शकले आहेत. गेले काही दिवस वाजिद विविध मार्गांनी इसिसविषयी माहिती मिळवत होता आणि जिहादमध्ये सहभागी व्हायचे विचार त्याच्या मनात घोळत होते. त्याने तशा लोकांशी संपर्कही साधला होता. संधी मिळताच पत्नीलाही अंधारात ठेवून वाजिदने घर सोडले होते. बेपत्ता झालेल्या पतीच्या हालचालीवर फ़ातिमाचे लक्ष होते. पण त्याला बिथरू देण्याचा धोका तिने पत्करला नाही. मात्र स्थिती हाताबाहेर जाताच तिने पोलिसांची मदत घेतली, वाजिदची नेमकी माहिती पोलिसांना दिली. ही बाब सर्वात महत्वाची आहे. फ़ातिमा दोनचार दिवस गप्प बसली असती, तरी वाजिद देशाबाहेर निघून जाण्यात यशस्वी झाला असता. मग त्याला परत आणणे कायद्याच्या हातचे राहिले नसते. म्हणजेच फ़ातिमाने एकीकडे त्याच्या हालचालीवर लक्ष ठेवून उपयुक्त महिती मिळवली, कदाचित त्याला परावृत  करण्याचाही प्रयत्न केला असेल. पण तो निष्फ़ळ ठरल्याचे जाणवताच तिने पोलिसांना नेमकी माहिती दिली. हे महत्वाचे पाऊल आहे. कल्याणच्या पालकांना त्यांचीच मुले कुठल्या मार्गाने चालली आहेत, त्याची माहिती नव्हती. त्यांच्यापेक्षा फ़ातिमा जागरूक होती. तिने योग्यवेळी पोलिसांना तक्रार दिली. किती मुस्लिम कुटुंबिय असे करत असतील? जर करत नसतील, तर त्यांना त्यासाठी प्रोत्साहन देण्याची गरज आहे. कारण त्यातूनच अधिकाधिक तरूणांना इसिसच्या आहारी जाण्यापासून रोखणे शक्य आहे. आणि कुठल्याही सरकारी यंत्रणेपेक्षा मुस्लिम समाजच ती जबाबदारी पार पाडू शकतो. कारण घातपाती जिहादी आपल्याच आसपास वावरत असतो किंवा घडवला जात असतो. त्याचा पहिला सुगावा जवळच्या लोकांना लागू शकतो ना?

दहशतवादाला धर्म नसतो अशी पोपटपंची आपण नित्यनेमाने ऐकत असतो. अगदी मुस्लिम धर्ममार्तंडांपासून सेक्युलर बुद्धीमंतांपर्यत सगळेच असे शब्दांचे बुडबुडे उडवित असतात. पण त्यांच्या वास्तविक कृतीतून त्याची कधीतरी साक्ष मिळते काय? उलट झालेल्या गुन्ह्यांवर पांघरूण घालण्यातच त्यांची बुद्धी खर्ची पडत असते. आणि दुसरीकडे काही कट्टर इस्लामी पंथाचे लोक धर्माचेच नाव पुढे करून या मुस्लिम तरूणांची माथी भडकवत असतात. लिंबूविक्री करून आपल्या संसाराचा गाडा ओढणारा वाजिद आप्तस्वकीयांच्या आशाआकांक्षांवर निखारे ठेवून अशा आत्मघातकी मार्गावर निघाला. तो गुन्हेगार नव्हता वा नाही. पण आपण धर्मासाठी काही उदात्त कार्य करायला निघालो आहोत, अशा भ्रमाने त्याला पछाडलेले असणार. किंबहूना कोणीतरी त्याच्या डोक्यात असा भ्रम भरवित असतो आणि भारावलेल्या अवस्थेत धर्मकार्य म्हणून त्याच्यासारखे तरूण दहशतवादाला स्विकारत असतात. पर्यायाने उर्वरीत सामान्य मुस्लिमांनाही धर्मकार्य म्हणून त्याविषयी आस्था वाटू शकते. म्हणून त्यांना अशा भ्रमातून बाहेर काढण्याला प्राधान्य असले पाहिजे. धर्म जगण्यासाठी असतो आणि आप्तस्वकीयांच्या आनंदातच जगणे असते, याची जाणिव निर्माण केली पाहिजे. ती नुसत्या पोपटपंचीतून येत नाही. ती फ़ातिमासारख्या विवेकी व समजूतदार महिलेच्या जागरूक कृतीतून निर्माण होत असते. आपला पती धर्मविषयक विषारी अपप्रचाराचा बळी झाला आहे, हे लक्षात आल्यावर त्याला रोखण्यासाठी फ़ातिमाने उचललेले पाऊल वा त्यापुर्वी घेतलेली सावध भूमिका, म्हणूनच अनुकरणिय आहे. दहशतवादाला धर्म नसतो हे फ़ातिमाने कृतीतून सिद्ध करून दाखवले आणि आपल्याच पतीला रोखण्यासाठी पोलिसांची मदत घेतली. हेच काम बहकण्याच्याच मार्गावर असलेल्या मुस्लिम तरूणांच्या कुटुंबियांनी आरंभले तर किती उपकारक ठरू शकेल?

देशाच्या कानाकोपर्‍यात, गावागावात किंवा प्रत्येक वस्तीमध्ये पोलिस तैनात केला जाऊ शकत नाही, किंवा प्रत्येक संशयितावर नजर ठेवणे पोलिस खात्याला जमणारे काम नाही. पण आपल्याच घरातला, परिवारातला किंवा परिसरातला कोणी अशा चुकीच्या मार्गाला जात असेल, तर त्याची पहिली कल्पना आसपासच्या लोकांनाच येत असते. त्याला रोखण्याचा व परावृत्त करण्याची पहिली जबाबदारी त्यांचीच असते. त्यानीच त्यात पुढाकार घेतला पाहिजे. कारण त्यातच त्यांचे व परिसराचे हित सामावले आहे. फ़ातिमाने नेमके तेच केलेले आहे. म्हणून फ़ातिमाला प्रोत्साहन म्हणजे मुस्लिम समाजाला धर्मविषयक गैरसमजुतीतून बाहेर काढण्याला प्रोत्साहन देणे होत. जर फ़ातिमाने काय केले व कसे केले, त्याविषयी सार्वत्रिक चर्चा झाल्या; तरच हे काम सोपे होऊ शकते. दहशतवादाला धर्म नसतो आणि मुस्लिम हिंसाचारी जिहादचे समर्थक नाहीत, याची कृतीने साक्ष देणार्‍या फ़ातिमाची महत्ता त्यातच आहे. पण त्याची कितीशी चर्चा माध्यमातून झाली? वाजिद इसिसमध्ये सहभागी व्हायला निघाला असताना वाटेतच पकडल्याच्या बातम्या आल्या. त्या निमीत्ताने इसिसची भयंकर प्रतिमा रंगवली गेली. पण फ़ातिमाच्या सावध व जागरूक कृतीचे कोडकौतुक मात्र कुठे फ़ारसे होताना दिसले नाही. यातून एक गोष्ट लक्षात येते, की स्वत:ला सेक्युलर म्हणवणारी माध्यमे व पत्रकार प्रत्यक्षात मुस्लिमांविषयी गैरसमज पसरवण्यात पुढे असतात. पण मुस्लिमांविषयी विश्वास निर्माण करण्याचा प्रसंग आला, मग हात आखडता घेतात. वाजिद, याकुब, अफ़जल यांना खुप प्रसिद्धी मिळते. पण फ़ातिमाने दाखवलेली हिंमत, समयसूचकता किंवा विवेकबुद्धीला कोणी दाद देत नाही. त्यातून मुस्लिम समाजाचे प्रबोधन करण्यात रस घेत नाही. समस्या भेसूर करून मांडली जाते. पण सकारात्मक उपाय योजणारे फ़ातिमासारखे मुस्लिम मात्र झाकोळून ठेवले जातात.

10 comments:

  1. अत्र,तत्र,सर्वत्र जगाच्या काण्या कोपर्‍या सर्वत्र जिहादचा थोका आहे.तरीही दहशतवादाला धर्म नसतो

    ReplyDelete
  2. दहशतवादाला( दुसरा) धर्म नसतो.हे त्रिवार सत्य आहे

    ReplyDelete
  3. नमस्कार,
    अतीशय सुन्दर लेख आहे.
    आपण सकारात्मकतेचा प्रचार खुप केला पाहिजे.
    असे केल्याने समाजामध्ये चांगले करण्याची ईच्छा वृद्धिंगत होत राहील.
    डॉ कलाम साहेबांनी सांगीतलेली आठवण येथे उद्धृत कराविशी वाटते.....
    ते एकदा तेल अवीवमध्ये गेलेले असताना तिथे बॉम्बस्फोट झालेला होता आणि काही लोक मृत्युमुखी पडले होते, तरीही दुसरया दिवशीच्या वर्तमानपत्रांमध्ये त्या बातमीला खुपच नगण्य महत्व दिले होते आणि वर्तमानपत्राची हेडलाईन कमीतकमी पाण्याचा वापर करुन तेल अवीव मधल्या एका शेतकर्याने आपले शेत कसे फुलवले यासंबंधीच्या बातमीची होती.
    याचा संदर्भ देउन कलामसाहेबांनी आपल्या देशातील प्रसारमाध्यमांना सकारात्मकतेचे महत्व कधी पटणार असे विचारले होते.
    ता.क. भाऊ आपले ब्लॉग्ज म्हणजे माझ्यासाठी पर्वणी असते.
    आपण असेच लिहित रहा. परमेश्वर आपणास उदंड आयुष्य देवो.

    ReplyDelete
    Replies
    1. भाऊ तोरसेकर हा एकच आवाज मला दिसतो सत्याच्या बाजूने बोलणारा. बाकी सगळे पेड मार्केटिंग एक्झीक्युटीव्ह !

      Delete
  4. खूप छान !!
    "दहशतवादाला धर्म नसतो हे फ़ातिमाने कृतीतून सिद्ध करून दाखवले"
    येथे शोभते आहे हे वाक्य कारण कृतीची जोड आहे.

    ReplyDelete
  5. भाऊ, अतिशय महत्वाचा मुद्दा आपण मंडळात. वृतपत्रसृष्टी कडून आशा नाही पण निदान आकाशवाणी आणि दूरदर्शन ने आपल्या ह्या लेखावर विचार आणि कृती करणे देशहिताचे होईल. मोदिभक्त अशा गोष्टी वाचतात की नाही देव जाणे.
    पण त्यांनीही वाचले तर चांगलेच होईल. नाकात आवाज काढून भाषण देणा-या इतरांच्या १००० पट अधिक बुद्धी असल्याचा दावा असलेल्या भाजपच्या उपाध्यक्षाने ही वाचले तर बरे होईल. नाहीतर भाजपकडे मराठी खासदारांची मारामारच आहे म्हणा...

    ReplyDelete
  6. Really superb article.

    ReplyDelete