Saturday, December 19, 2015

इंदिराजींची सून कन्येला घाबरली?



दोन दिवस आधीपासून राणा भीमदेवी थाटात सोनिया व राहुल गांधी तुरूंगात जाण्याच्या गमजा करीत होते. नॅशनल हेराल्ड खटल्यात आपण कुठला जामिन मागणार नाही आणि वेळ पडल्यास तुरूंगात जाऊ, अशी भाषा चालू होती. पण एकाच दिवसात कोलांटी उडी मारून जामिन घेण्याची तयारी मायलेकरांनी सुरू केली. त्याला मग बदललेली रणनिती असे साळसूद नाव देण्यात आले. पण तुरूंगात जाऊन आपण अन्यायाचे व सूडाचे बळी असल्याचे नाटक रंगवण्याची अप्रतिम संधी त्यांनी कशाला सोडावी? हे अनेकांना रहस्य वाटणे स्वाभाविक आहे. आपण इंदिराजींची सून आहोत आणि कोणाला व कशालाही घाबरत नाही, अशी दर्पोक्ती सोनियांनी आठवडाभर आधी केलेली होती. मग ती सगळी मर्दुमकी अकस्मात कुठे गाब झाली? त्याचे काहीतरी कारण असायला हवे ना? मुळात सोळा महिन्यापुर्वी त्यांना कनिष्ठ कोर्टाने आपली बाजू मांडण्यासाठी पाचारण केले होते. ज्याला कोर्टाच्या भाषेत समन्स असे म्हणतात. तिथे तेव्हाच हजर होऊन आपली बाजू कशी न्याय्य व निर्दोष आहे, ते मांडता आले असते. पण तमाशा मात्र करता आला नसता. शनिवारप्रमाणेच तेव्हाही त्यांना जामिन घेता आला असता. पण तमाशा अंगातच भिनलेला असल्याने नाटक केल्याखेरीज ही मंडळी समाधानी होऊ शकत नाहीत. म्हणून मग समन्सला हजेरी लावण्यापेक्षा थेट हायकोर्टात समन्सलाच आव्हान देण्यात आले. सोळा महिने त्यात खर्ची पडले आणि सगळे प्रकरणच उलटले. मायलेकरांनी अन्यायाचे परिमार्जन करण्यासाठी कायकोर्टात धाव घेतली होती. पण स्वामी यांच्या आरोपात तथ्य असून एकूण व्यवहारात गुन्हेगारी हेतू दिसत असल्याचा संशय, हायकोर्टानेच व्यक्त केला आणि सोनिया-राहुल तोंडघशी पडले. खरे तर त्यानंतरही सत्याचा स्विकार करून कोर्टात हजर होऊ, असे सांगून निसटणे शक्य होते. पण ती तोंडघशी पडल्याची कबुली ठरली असती.

म्हणून मग कोर्टात हजेरी लावण्याचे नाटक रंगवण्यात आले. आपण बळी चाललो आहोत आणि आपला राजकीय सूडबुद्धीने बळी घेतला जातो आहे, असा देखावा उभा करण्याच उद्योग सुरू झाला. त्यासाठी संसद बंद पाडण्यापासून राजकीय बोंबा सुरू झाल्या. त्याला अधिक फ़ोडणी देण्य़ासाठी, मग आपण कोर्टात जामिन मागणार नाही तर तुरूंगातही जाऊ; अशी अफ़वा सोडून देण्यात आली. हेच आणि असेच नाटक केजरीवाल यांनी वर्षभरापुर्वी रंगवलेले होते. तेव्हा त्यांना गजाआड जाऊन पडावे लागले होते. मग तुरूंगाच्या बाहेर समर्थकांनी धरण्याची नाटकेही रंगवून झाली. पण कोर्टावर त्याचा काहीही परिणाम झाला नाही शेवटी नाक मुठीत धरून केजरीवाल यांना निमूट जातमुचलका देवून बाहेर पडावे लागले. हे उदाहरण समोर असताना गांधी मायलेकरांनी तुरूंगात जाण्याच्या फ़ुशारक्या मारण्यात दम नव्हता. कारण त्यांना कोर्ट गजाआड टाकू शकत नव्हते. फ़क्त कोर्टात तारखेला हजर रहाण्यापुरता मामला होता. अर्थात त्यांनी केजरीवाल यांच्याप्रमाणे नाटक केले असते, तर कोर्टाला तोच निर्णय घ्यावा लागला असता. त्यातून अर्थातच अधिक सहानुभूती वाडग्यात पडली असती. तीच सोनिया व अन्य कॉग्रेस नेत्यांची अपेक्षा होती. पण त्यात एक मोठी अडचण होती. हे मायलेकरू तुरूंगात जाऊन पडले, तर कॉग्रेस पक्षात पुढे काय करायचे, याचे निर्णय कोण घेणार होता? आज पक्षाची अशी दारूण अवस्था आहे, की त्यात कुणाही नेत्याला आपल्यापाशी बुद्धी आहे किंवा नाही, ते आधी गांधी कुटुंबाकडून प्रमाणित करून घ्यावे लागते. तुमचे निर्णय तुम्ही घ्या, असे सोनियांनी सांगितले तरी कोणा कॉग्रेसवाल्याला तसे करण्याची हिंमत वा इच्छा राहिलेली नाही. आपण निर्णय घेऊ शकतो, हा आत्मविश्वासही कॉग्रेसचे बिगरगांधी नेते गमावून बसले आहेत. म्हणून मग गांधी गजाआड गेल्यास पक्ष कोण चालवणार, हा प्रश्न होता.

अर्थात त्याला उत्तर नव्हते, असेही मानायचे कारण नाही. या दोघांखेरीज आणखी एक ‘गांधी’ कुटुंबिय पक्षाची धुरा संभाळू शकते आणि तिकडे कॉग्रेसजनांचा ओढा सुद्धा आहे. ती व्यक्ती म्हणजे प्रियंका गांधी वाड्रा! सोनिया व राहुल गजाआड जाऊन पडले, तर कॉग्रेसची सुत्रे हाती घेऊन प्रियंका पुढले निर्णय घेऊ शकते आणि कॉग्रेसजन ते निमूट मान्यही करू शकतात. किंबहूना लोकसभा पराभवानंतर कॉग्रेसमध्ये प्रियंकाला पक्षात आणण्याची मागणी सतत वाढलेली आहे. पण आपल्या कन्येला पक्षापासून कटाक्षाने दूर ठेवण्याचा प्रयास सोनियांनी सातत्याने केलेला आहे. कारण इंदिराजींची झाक व्यक्तीमत्वात असलेली प्रियंका अतिशय ठाम स्वभावाची आहे. त्यामुळेच तिला किंचित संधी मिळाली, तरी तिच्या प्रभावामुळे राहुल झाकोळला जाऊ शकतो, अशी सोनियांना भिती आहे. इटालीयन संस्कारातल्या सोनियांना घराण्याचा वारसा मुलीने चालवणे मान्य नाही. तो पुरूषाचा राखीव अधिकार असल्याचे संस्कार सोनियांवर आहेत. म्हणूनच त्यांनी प्रियंकाला दूर ठेवले आहे. किंबहूना ज्यांनी ज्यांनी आजवर प्रियंकाच्या बाजुने झुकाव दाखवला, अशांना सोनियांनी परस्पर पक्षातून खड्यासारखे बाजूला केलेले आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरणी गजाआड जाण्यात तोच मोठा धोका होता. पक्षातल्या अन्य कुठल्या नेत्याला सोनिया-राहुलच्या मागे निर्णय घेण्याची क्षमता नसल्याने ते अपरिहार्यपणे प्रियंकाच्या आश्रयाला जाण्याचा धोका होता. आणि एकदा त्यात प्रियंकाने थोडी जरी चमक दाखवली, तरी तिच्या समर्थकांचा गट पक्षात प्रभावी होण्याची शक्यता होती. किंबहूना राहुलमध्ये तितकी कुवत नाहीच, असे मानणारा प्रभावी गट पक्षात असून, तोच प्रियंकाच्या बाजूने गेला तर गजाआड जाण्याने मिळणार्‍या सहानुभूतीपेक्षा मोठे राजकीय नुकसान सोसण्याचा जुगार ठरू शकत होता. म्हणूनच ऐनवेळी ‘इंदिराजींची’ सून गजाआड जायला घाबरली.

खरे तर या इंदिराजी व सोनिया-राहुल यांच्यात मोठा फ़रक आहे. जगासमोर अतिशय कठोर व आत्मकेंद्री असलेल्या इंदिराजींपाशी एक अपुर्व गुण होता. आपल्या अत्यंत विश्वासातल्या मोजक्या जाणकार सल्लागारांचे त्या निमूट ऐकत असायच्या. तिथे त्यांना कधी अहंकाराची बाधा झालेली नव्हती. पी. एन. हकसर, एल. के. झा, टी. एन. कौल यासारखे अतिशय दांडगे अनुभवी सल्लागार इंदिराजींच्या गोतावळ्यात होते आणि त्यांचे कितीही विरुद्ध असलेले मत ऐकण्याचा संयम इंदिराजींपाशी होता. म्हणूनच त्यांना नावडता सल्ला देण्याचेही धाडस हे सल्लागार करू शकत होते. सोनियांभोवती आज असलेले सल्लागार व जाणकार आपल्याला बुद्धीच नसल्याचे मान्य करून जमलेले आहेत. त्यामुळे नावडता सल्ला देण्याची त्यापैकी कोणात हिंमत नाही. सहाजिकच आवडता पण बुडवणारा सल्ला देणार्‍यांचा गोतावळा सोनियांनी गोळा केला आहे. त्यात कोणी शहाणा व धाडसी असता, तर त्याने मुळातच समन्सला हायकोर्टात आव्हान देण्यापेक्षा हजेरी लावून सोळा महिन्यापुर्वीच हे प्रकरण इतके टोकाला जाऊ दिले नसते. समन्स स्विकारून सुनावणी लांबवता आली असती आणि हायकोर्टाचे ताशेरे झेलायची नामुष्की आली नसती. तेही झाल्यावर तुरूंगात जायचे फ़ुसके बार सोडायचा मुर्खपणा झाला नसता आणि अखेरीस निमूट जामिन मागण्याची हास्यास्पद वेळ आली नसती. देशातल्या कित्येक लाख लोकांना याचप्रकारे कोर्टात जाऊन जामिन वा जातमुचलका देता येतो. तेव्हा आज जामिन घेतल्यावर आपण खुप मोठी कायदेशीर बाजी मारल्याचे नाटक पत्रकार माध्यमापुढे रंगवणे सोपे असले, तरी सामान्य माणसाला त्यातला फ़ोलपणा कळतो. कारण ही अतिशय सामान्य माणसाच्या वाट्याला येणारी नित्याची कारवाई आहे. त्यावर युक्तीवाद व शाब्दिक कसरती कामाच्या नाहीत कोर्टाची पायरी कधीतरी चढलेल्या शेंबड्या पोरालाही गांधी मायलेकरांची नाचक्की झाल्याचे कळते.

7 comments:

  1. other journalists specially editors of loksata and Maharastra Times must read this column

    ReplyDelete
  2. भाऊ, खूप जड अंतकरणी आज मी 'जागता पहाराचा' निरोप घेतोय. काही महिन्यांपूर्वी 'जागता पहाराशी' ओळख व्हायच्या आधी मी बऱ्यापैकी आनंदी होतो. अस म्हणतात की मूर्ख, अज्ञानी आणी वेडे कायम आनंदी असतात. मी जरी ह्या कुठल्याच प्रकारात मोडत नसलो, आणी भारतातील बजबजपुरीची पुरेपूर माहिती असली तरी बऱ्यापैकी आनंदी होतो.

    आणी मग 'जागता पहाराशी' ओळख झाली, आणी त्याच व्यसनच लागलं, सकाळी उठल्याउठल्या बाकी काहीही करण्याआधी 'जागता पहारा' वाचण गरजेच होऊन बसलं. प्रत्येक वेळी 'जागता पहारा' वाचल्यावर मन क्षुब्ध तर व्हायचच पण कुठे तरी स्वतःची एक अगतिकता (प्रामाणिकपणे बोलायचं तर नपुंसकता) जाणवायची. माझ्यासारखा सामान्य माणूस राजकारण्यांना दोषी ठरवतो, राजदीप सरदेसाई, बरखा दत्त सारखी media किंवा न्यायसंस्था विकली गेलीय म्हणून बोट मोडतो, आणी भाऊंच्या लेखावर 'छान भाऊ' म्हणून प्रतिक्रिया दिली की आपली जबाबदारी संपली अस प्रामाणिकपणे मानतो.

    आजची सर्व वर्तमानपत्रे वाचताना ह्या सर्वच गोष्टींची शिसारी आली. 'राहुल गांधींचा घणाघात', 'सोनिया-राहुलनी सुनावले', 'रोबर्ट वद्रांचा सोनिया-राहुलना पाठींबा' आणी अशाच अनेक मथळ्यांनी सर्व वर्तमानपत्रे भरली आहेत. प्रश्न असा पडतो की सर्व वर्तमानपत्रे, सर्व पत्रकार विकले गेले आहेत का? निश्चितच नाही. मग गांधी घराण्याचे इतके आकर्षण का?? की खरोकरच आपल्या देशाच्या कुंडलीतच हे दुर्भाग्य आहे??? शतकानुशतकानंतर जशी आफ्रिकेतील सामान्य जनता गरिबी, रोगराई, गुन्हेगारी व जुलूमशाहीपासून मुक्त होऊ शकतच नाही तशी भारतीय जनता ह्या गांधीशाहीतून मुक्त होणार नसेल का????

    मी जरी मूर्ख, अज्ञानी किंवा वेडा नसलो तरी आता ignorance is bliss ह्या उक्तीप्रमाणे स्वतःला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करीन. अर्थात स्वतः सोडून सर्वांना दोषी ठरवण्यात आणी तुमचा लेखांवर 'छान भाऊ' म्हणून प्रतिक्रिया देत स्वतःची भाबडी (नपुंसक) समजूत करण्यात धन्यता तरी मानणार नाही.

    ह्या लांबलचक प्रतिक्रियेबद्धल भाऊ व सर्व इतर वाचकांची मन:पूर्वक क्षमा मागतो आणी निरोप घेतो.

    ReplyDelete
  3. विचारांचा पाया पक्का नसल्याने कोणावर विश्वास ठेवावा हे कळत नाही.

    ReplyDelete