Monday, March 7, 2016

पत्रकारितेने विश्वासार्हता गमावली

इशरत जहान प्रकरणात जे खुलासे आता होत आहेत, त्यात धक्कादायक असे काहीही नाही. कारण ह्यातले अनेक तपशील खुप आधीपासून उपलब्ध होते आणि तेच सामान्य जनतेपर्यंत जाऊ नयेत, याची काळजी युपीए वा कॉग्रेसने घेतलेली नव्हती. ती लपवाछपवी माध्यमातील काही मुखंडांनी पार पाडलेली आहे. गेल्या मंगळवारी गृहखात्याचे तात्कालीन अवर सचिव आर, व्ही. एस. मणि यांनी आता तोंड उघडले, असे म्हटले जाते आहे. किंबहूना काही कॉग्रेस प्रवक्त्यांनी तसा प्रश्नही विचारला आहे. पण त्यात तथ्य नाही. मणि यांनी आपल्यावर इशरत प्रकरणी प्रतिज्ञापत्र बदलण्यासाठी दबाव आणला गेल्याची तक्रार आज केली असेल. पण आपल्याला विशेष तपास पथकाच्या प्रमुखांनी छळले व मारहाण केली, अशी तक्रार जुनीच आहे. त्यासंबंधी त्यांनी सुप्रिम कोर्टात जे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. ते तीन वर्षापुर्वीचे असून त्याची बातमी कुठल्याच प्रमुख वाहिनी वा वर्तमानपत्राने कशाला दिलेली नव्हती? मोदी वा भाजपाच्या विरोधातल्या कुठल्याही किरकोळ घटनेला देशव्यापी प्रसिद्धी देणार्‍या किंवा इशरतच्या चकमकीला प्रमुख मुद्दा बनवणार्‍या माध्यमांना, त्यात गुंतलेल्या अधिकार्‍याच्या छळवादाची बातमी नगण्य वाटण्याची शक्यताच नाही. मणि यांनी पहिले प्रतिज्ञापत्र तयार केले व कोर्टात तेच दाखल झालेले होते. पण त्यात इशरत तोयबाची हस्तक असल्याचे मान्य करण्यात आलेले होते. ते खोडून इशरतला निर्दोष ठरवण्यासाठी युपीए सरकारने उचापती सुरू केल्या. त्यासाठी ते पहिले प्रतिज्ञापत्र बदलणे आवश्यक झाले होते. त्यासाठी मणि यांच्यावर दबाव आणला गेला. ते राजी होईनात, तेव्हा त्यांना छळण्याचा अतिरेक झाला. त्याविषयी त्यांनी सुप्रिम कोर्टात दाद मागितलेली आहे आणि आपल्या वरीष्ठांनाही कळवलेले आहे. त्या विषयाची माहिती जगजाहिर होती, उपलब्ध होती. कोणी पत्रकाराने तिकडे कशाला ढुंकून बघितले नाही?
मोदी यांची पत्नी कोण? ती कुठे रहाते व काय करते, अशा गोष्टी अगत्याने खोदून, शोधून काढणार्‍या भारतातल्या प्रमुख पत्रकार माध्यमांना गाजणार्‍या इशरत प्रकरणात हेराफ़ेरी चालू आहे आणि त्यासाठी अधिकार्‍याचा छळवाद चालू असल्याचे कोर्टात असलेले प्रतिज्ञापत्र मिळू शकले नाही, यावर कोण विश्वास ठेवू शकेल? आज इशरत लपवाछपवी भानगडीवर प्रकाश टाकू बघणार्‍या पत्रकारांनी तेव्हा मूग गिळून बसण्याचे कारण नव्हते. पण तसे झाले, कारण कॉग्रेस सोनिया गांधी व सेक्युलर राजकारणी जसे मोदींना खच्ची करायला उतावळे झालेले होते, तशीच सेक्युलर माध्यमे लपवाछपवीचे कर्तव्य पार पाडत होती. किंबहूना इशरतला निर्दोष ठरवण्यातून कॉग्रेसच्या युपीए सरकारने देशद्रोह केला असेल, तर इशरतचे गोडवे गात मणि यांचा छळवाद झाकून ठेवणारी माध्यमेही तितकीचे देशद्रोही ठरतात. कॉग्रेसने सत्ता गमावली. पण याच दहा वर्षात भारतीय पत्रकारितेने विश्वासार्हता गमावली आहे. आता इशरत प्रकरणात ज्या गोष्टी समोर येत आहेत, त्यात नवे असे काहीही नाही. तेव्हा कोणा पत्रकाराला जे प्रश्न पडायला हवे होते. ते पडले असते तर सोनिया कॉग्रेसकडून चाललेला देशद्रोह तेव्हाच चव्हाट्यावर आला असता आणि त्याला वेळीच पायबंद घातला गेला असता. दुर्दैवाने आपल्या सामाजिक कर्तव्यापेक्षा तात्कालीन सत्यावर पडदा पाडण्यात सेक्युलर म्हणून मिरवणार्‍या पत्रकार माध्यमांनी सत्याचा अपलाप करण्यात धन्यता मानली. म्हणूनच चिदंबरम वा अन्य कुणा कॉग्रेसी मंत्र्याइतकीच भारतीय माध्यमे व पत्रकारही गुन्हेगार आहेत. कारण इशरतला निष्पाप ठरवण्याच्या स्पर्धेत, त्यांनीही हिरीरीने भाग घेतला होता. इशरतच्या नावाखाली पाकिस्तानच्या इथल्या छुप्या हस्तकांना कांगावखोरी करायला, याच माध्यमांनी सहकार्य दिले होते. त्यामुळे आता अशा लोकांनाही आपले हात झटकता येणार नाहीत.
चकमकीत मारली जाण्यापर्यंत चार दिवस इशरत आपल्या घरातून गायब होती. एका सामान्य मुस्लिम घरातली तरूणी चार दिवस बेपत्ता असताना पालकांनी पोलिसात त्याविषयी तक्रार कशाला दिलेली नव्हती? चार दिवस मुलगी घरातून गायब असणे व नंतर जिहादी लोकांच्या सोबत चकमकीत मारली जाणे, हे निरपराध असल्याचे लक्षण असते काय? जितकी इशरत संशयास्पद होती, तितकेच तिच्या कुटुंबाचे वागणेही शंकास्पद होते. पण कुणाही पत्रकाराने त्याबद्दल एक प्रश्न तिच्या कुटुंबाला विचारला नाही, की इशरत ब्रिगेड म्हणून राबणार्‍या पाकप्रेमी बुद्धीमंतांना विचारला नाही. मुंब्र्याची इशरत गुजरातेत अहमदाबादला कशी पोहोचली वा जिहादींच्या सोबत ती काय करत होती? धर्मांतर केलेल्या प्रणेश पिल्ले उर्फ़ जावेद याच्यासह या अविवाहित तरूणीने विविध शहरांना कशासाठी भेटी दिल्या? कारण तिच्या सोबत़चे पाक जिहादी भले घरच्यांना ठाऊक नव्हते. पण जावेद त्यांच्या परिचयाचा होता. इशरत त्याच्या समवेत होती आणि जावेदचे उपदव्याप तिच्या कुटुंबियांना ठाऊक नव्हते. कुणा परक्या पुरूषासोबत मुस्लिम घरातली मुलगी इतकी बेताल भटकते आणि माध्यमातील पत्रकारांना ती निष्पाप वाटते? ज्याची बुद्धी चौकस चिकित्सक नाही, तो पत्रकार कसा असू शकतो? गुजरात पोलिसांना शेकड्यांनी प्रश्न विचारणार्‍यांची बुद्धी इशरत व तिच्या कुटुंबाच्या शंकास्पद वर्तनाविषयी बधीर कशाला होते? कारण त्यातल्या कोणालाही सत्याशी कर्तव्य नव्हते, तर मोदी खुनाच्या गुन्ह्यात फ़सणार याचाच आनंदातिरेक झाला होता. त्यावेळच्या वर्तमानपत्राच्या वा वाहिन्यांवरील वार्ता आठवल्या, तरी त्याची खात्री होईल. मोदी बुरे फ़से, मोदी गोत्यात; अशाच हेडलाईनी कायम झळकत होत्या. कारण बातम्या देणार्‍या रंगवणार्‍यांना बातमी वा सत्याशी कर्तव्य नव्हते, तर मोदी गजाआड गेलेला बघण्याची स्वप्ने पडत होती.
२००४ सालात ही चकमक घडली, तेव्हा युपीएचे गृहमंत्री शिवराज पाटिल यांनीच इशरत टोळी मोदींची हत्या करायला आल्याचे संसदेत सांगितले होते. मात्र पाच वर्षांनी इशरतला देशप्रेमी व हुतात्मा ठरवण्याचा उद्योग सुरू झाला. त्यातल्या थापा खोटेपणा दिसत होता. समोरही आणला जात होता. पण अशा दुसर्‍या बाजूला प्रसिद्धी मिळू नये, याची काळजी चिदंबरम वा सोनिया गांधींनी घेतलेली नाही. माध्यमातल्या सेक्युलर मुखंडांनी ती कामगिरी पार पाडलेली आहे. स्वयंसेवी संस्था, मानवाधिकार संस्था किंवा तत्सम नावाने कोणाही थापाड्याला समोर आणुन वारेमाप प्रसिद्धी दिली जात होती. कपोलकल्पित कथा रंगवून अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्याच इशार्‍यावर निष्पाप इशरतचा बळी घेतला गेल्याचा डंका पिटला जात होता. पण मणि वा राजेंद्रकुमार अशा अधिकार्‍यांचे साधे निवेदनही लोकांपुढे येऊ नये, याचाठी माध्यमात आटापिटा चालू होता. म्हणूनच इशरत चकमक खोटी ठरवण्याचे कारस्थान शिजले, त्यात केवळ तात्कालीन गृहमंत्री, युपीए सरकारच भागिदार झालेले नाही. माध्यमातले पाक हस्तकही त्याला तितकेच जबाबदार आहेत. ‘स्मार्ट मित्र’ अशी बिरुदावली लावणार्‍या प्रमुख मराठी दैनिकाने तर इशरतला पुर्ण न्याय कधी मिळणार, म्हणून संपादकीयातून रडारड केलेली होती. इतरही अनेक दैनिके वर्तमानपत्रांनी असाच टाहो फ़ोडला होता. आज इशरत प्रकरणातले पितळ उघडे पडले असेल, तर त्यात हे तमाम पत्रकार तितकेच गुन्हेगार आहेत. कारण त्यांनी ह्या पापात हिस्सेदारी केलेली आहे. एकदा ही मानसिकता लक्षात घेतली, मग देशद्रोही घोषणांना अविष्कार स्वातंत्र्याची वस्त्रे का चढवली जातात, त्याचा अंदाज येऊ शकेल. गाफ़ील तरूणीला बलात्कार्‍याच्या हाती सोपवण्याचे पाप करणारा जास्त मोठा गुन्हेगार असतो. मग सामान्य जनतेला इशरत प्रकरणी गाफ़ील ठेवून कॉग्रेसी पापात सहभागी झालेले पुण्यवंत कसे असतील? जनजागृती हेच पत्रकारितेचे व्रत व कर्तव्य आहे ना? मग त्याच्याशीच दगाफ़टका करणार्‍यांना माफ़ करता येईल काय?

4 comments:

  1. काही पत्रकार याबद्दल बोलू लागले कि त्यांना लगेच मोदीभाट ठरवून मोकळे होतात ही विचारजंत मंडळी.
    सुजाण जनता या ढोंगी उदारमतवाद्यांना कधीच माफ करणार नाही.

    ReplyDelete
  2. भाऊ खरतर प्रमुख वाहिनी मिडीया सेल्यूलर पञकार हे नक्की वेस्याहून जायल आहे ती तरी आपल्या पेशा सोबत इमानदारीने वागते ह्यांनी तर जनतेला गाफील ठेवले मण्हून यांना दिसताक्षणी गोळ्या घाला

    ReplyDelete
  3. भाऊ एकदम बरोबर. .
    मिडिया हा लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखला जातो व त्याची विश्वासार्हता पत्रकार व संपादक यांच्या निष्पक्ष, सत्य संशोधनातमक व निरभीड पत्रकारीते वर अवलंबुन असते. नेमकी हिच गोष्ट हेरून विदेशी व विकाऊ देशी मिडीयाने देश गेली तिस पसतीस वर्षे पोखरला आहे. आणि आता TV मुळे हे काम अधिक सुलभ व परिणामकारक झाले आहे. हे सर्व थांबवायचे असेल तर कडक निरबंध घालणे व न्यायालयीन प्रक्रियेत अशा देशद्रोही ना देहदंडाची शिक्षा केली पाहिजे. गेली 30 वर्षे ठराविक पक्षाला व ठरावीक घराण्याला या सर्वानी साथ का दिली याची पण चोकसी करणे आवश्यक आहे. सुजलाम सुफलाम देशाला कायम सुमार दर्जाचे नेतृत्व राहील याची काळजी मिडीयाने घेतली.
    रोहितच्या आत्महत्येचा विषय असो वा दादरिचा विषय असो केंद्र सरकारला बदनाम करण्याचा एकच अजेंडा मिडीयाने केन्द्र सरकार बदललेल्या पासून सुरू केला आहे. प्रतिक्रियेवर पुरोगाम्यांना साथीला घेऊन सरकारला बदनाम करण्याचा एकच अजेंडा मिडीयाने घेतला आहे. त्यात आरणव गोस्वामी व राजदीप सरदेसाई आघाडी वर आहेत. आधी हे विरोधी पक्षाला टारगेट करत सरकारी पक्षाची पठराखण केली आता सरकार वर हल्ला करणाऱ्याला उचलून धरले आहे. शोषकच शोषीतांचे पुढारी झालेत
    JNU Hydrabad university आणि Ishrat issue हयावर media channel वर जोरदार चर्चा सुरू आहे. .
    Times Now वर सराईतपणे अरणब गोस्वामी सारखे जणु आपणच देशाचे कैवारी राष्ट्रभकत असे दाखवत आहे....
    परंतु गेले दोन आठवडे काँग्रेस पक्षाचा एकही प्रतिनिधी Times Now News Hour वर उपस्थित नाही. .
    परंतु आरणव गोस्वामी ने नेहमी प्रमाणे cover दिले आहे व पारसिलीटी करतो आहे पण JNU व इतर काही वक्तव्या मुळे सर्वसामान्याना तो देशाचा कैवारी वाटतोय. खरच या मुळे देश असाच शतकानुशतके गुमराह दिशाभूल झालेल्या अवस्थेत भरकटत आहे. आपल्या देशातील विचारवंत अशा कारस्थानात सामील होतात व देशबांधव दिशाभूलीचे बळी होत आहेत...
    Amool Shetye

    ReplyDelete
  4. मी तर आता काही ठराविक वृत्तपत्रात मोदींविरोधात लेख आला की त्या प्रकरणात मोदी हे बरोबरच असेल पाहिजेत असा निष्कर्ष डोळे उघड़े ठेवून काढतो आणि प्रत्येक वेळी तो बरोबरच येतो. आता काही मंडळी ही सुद्धा एक प्रकारची विश्वसारहताच म्हणतील परंतु आपण अशा विचारजंताकड़े दुर्लक्ष केलेले बरे.

    ReplyDelete