Monday, July 18, 2016

पुण्यातली चतुर चिमुरडी (जोपासनापर्व -४)



मैत्रेयची गोष्ट गेल्या लेखात सांगितली, त्याच दिवशी त्याच्या पित्याला, बालाजीला फ़ोन केला होता. पलिकडून कल्लोळ ऐकू येत होता. त्यावरून मैत्रेय खेळतोय हे लक्षात आलेच होते. मराठवाड्यातल्या पावसाच्या बातम्या वाचल्या होत्या. त्याचविषयी बालाजीशी बोलत होतो. इतक्यात या बालकाने पित्याच्या हातचा फ़ोन घेऊन विषय पुढे चालू ठेवला. इथे पाऊस नाही पडत, अशी पुस्ती त्यानेही जोडली. याचा अर्थ पिता कोणाशी जे बोलत होता, त्यावर मुलाचे बारीक लक्ष होते. तोच विषय पुढे चालवून आपणही पित्या इतकेच शहाणे असल्याचे त्याला दाखवायचे होते. पलिकडे कोण बोलतोय हे त्याला विचार्‍याला आठवतही नसेल. पंण नाक खुपसण्याचा अट्टाहास त्याला प्रयत्न करायला भाग पाडत होता. बोलताना कमी पडू नये, म्हणून त्याने आमच्या मुळ संवादाचा धागा कायम ठेवला होता. मी सुद्धा त्यात खंड पडू दिला नाही आणि दोन मोठे ढग पाठवून देतो म्हणून उत्तर दिले. तर तो पठ्ठ्या म्हणाला लौकर पाठवा. इथे उन खुप पडलंय. मीही त्याला हमी दिली की विमानानेच ढग पाठवून देतो, मग लौकर आणि भरपूर पाऊस पडेल. तो सुखावला आणि फ़ोन आईच्या हाती देऊन मोकळा झाला. पित्याचा चालू असलेला संवाद तसाच पुढे चालू ठेवण्याची कल्पकता दुर्लक्ष करण्यासारखी आहे काय? अशी अनेक मुले मी बघितली आहेत. ती आगावू, खोडकर, व्रात्य वाटतात. पण त्यांच्यातले प्रसंगावधान, कुशाग्र बुद्धी, निरीक्षणाची क्षमता, आपण उघड्या डोळ्यांनी दिसत असतानाही बघायला तयार नसतो. त्यांची ही उर्जा व क्षमता त्यांच्याच व्यक्तीमत्वाचा विकास करण्यासाठी राबवण्याला शिक्षण म्हणता येईल. पण सहसा पालक त्याला शिक्षण समजत नाहीत आणि कंटाळवाण्या घोकंपट्टीत मुलांना डांबून टाकतात. त्याचे समर्थन करताना मुले खोडकर आगावू असल्याचे शिक्के मारून मोकळे होतात.

अंबाजोगाईच्या मैत्रेयसारखीच एक चिमुरडी पुण्यात आहे. संदेश हा सुद्धा फ़ेसबुकमुळे झालेला तरूण मित्र! पहिलीच्या वर्गात जाणारी त्याची कन्या आगावू खोडकर असल्याची त्याचीही तक्रार होती. एकदा त्यानेच आग्रह करून मला घरी नेलेले होते. तेव्हा नेमके त्याचेही आईवडील पुण्यात आलेले व घरातच होते. आईवडील व आजी आजोबा घरात असताना, मी त्या चिमुरडीच्या निरीक्षणासाठी गेलेला होतो. कुठल्याही मध्यवर्गिय घरात पाहुण्याचे स्वागत व्हावे, तसे माझेही झाले आणि ती चिमुरडी कुतूहलाने काही काळ माझे निरीक्षण करीत खेळत होती. मग वडिलधार्‍यांच्या आग्रहाखातर ती माझ्या पायाही पडली. पण अनिच्छेने लादलेली ती कृती होती. चेहर्‍यावर तिची अनिच्छा स्पष्टपणे दिसत होती. मग आम्ही बोलत गप्पा मारत होतो आणि ती आपला जीव रमवत होती. मधूनमधून आमच्या बोलण्यात तिचा व्यत्यय येत राहिला किंवा तसे तिच्याच पालकांना वाटत राहिले. पण ती नुसते खेळत नव्हती. कान देऊन गप्पा ऐकत होती आणि समजूनही घेत होती. आलेला पाहुणा व पालक आपल्याच विषयी बोलत आहेत, हे ती बालिका पक्के जाणून होती. किंबहूना म्हणूनच तिचे आमच्याकडे बारीक लक्ष होते. खेळणेही आमच्याच अवतीभवती चालू होते. पालकांचे तिला शांत-गप्प करण्याचे प्रयास सुरूच राहिले. दोन अडीच तासांनी जेवण गप्पा झाल्यावर माझी निघण्याची वेळ झाली. मी उठून उभा सुद्धा राहिलो नाही, इतक्यात ती खेळ सोडून धावत आली आणि चक्क माझ्या पाया पडली. अगदी साष्टांग नमस्कार म्हणावा अशी. सगळे हसले. पण त्यातला अर्थ लक्षात घेण्यासारखा होता. तिच्या घरात मी व्यत्यय होतो आणि तिच्या मोकाट स्वातंत्र्यावर माझ्यामुळे गदा आलेली होती. सहाजिकच मी जितक्या लौकर निघेन, तितके तिला हवे होते. झटपट पाया पडून ती कृतीने मला बाहेरचा रस्ता दाखवत होती. या कोंदट वातावरणातून तिला मुक्ती हवी होती.

मुले किती निरागस असतात असे आपण मानतो. पण ती किती विचारी, धुर्त व हुशार असतात, त्याकडे आपण बघायला तयार नसतो. या चिमुरडीचे मला खुप हसू आले. किती सहजगत्या तिने मला निघायला सुचवले होते ना? चटकन त्याला कोणी आगावूपणा म्हणू शकणार नाही, की खोडकर असा शिकाही मारू शकणार नाही. पण मला ती खुप आवडली. मैत्रेय असो किंवा ही चिमुरडी, त्यांच्यापाशी मेंदू असतो आणि तोही आसपास घडणार्‍या घटनाक्रमाचे विश्लेषण करून अर्थ लावत असतो, हे आपण समजून घ्यायलाच तयार नसतो. लहान अजाण म्हणून मुले अनवधानाने काहीही करीत असतात, ही आपली समजूत असते. पण त्या बालकाच्या पातळीवर जाऊन विचर करा, अर्थ लावा; मग लक्षात येईल की त्यांनीही त्याच्या स्तरावर विचारपुर्वकच काही कृती केलेली असते. काही मुले आग्रही असतात, म्हणून त्यांची कृती हट्टी वाटते. जसा मैत्रेय हट्टी वाटेल आणि ही चिमुरडी संयमी वाटेल. पण दोघांमध्ये तितकीच विचारशक्ती होती. मात्र त्यांच्या प्रतिसादात फ़रक पडतो. ही मुले पाहुणे घरी आले असताना किंवा तुम्ही त्यांचे प्रदर्शन मांडू बघता, तेव्हा पालकांना दाद देत नाहीत. ती आपलीच मनमानी करतात. म्हणजे असे पालकांनाच वाटत असते. पण वस्तुस्थिती वेगळीच असते. पाहुण्यासमोर तुम्ही त्याला दमदाटी करू शकत नाही किंवा धपाटे घालू शकणार नाही, याची त्या हुशार मुलांना खात्री असते. थोडक्यात तुम्ही अगतिक स्थितीत असता आणि पाहुण्यासमोर आक्रस्ताळेपणा करण्याची शक्ती गमावलेले असता, त्याचा मुले लाभ उठवत असतात. शिष्टाचार तुम्हाला स्वाभाविक रुद्रावत्रार धारण करू देत नाही. हे ओळखण्याची बुद्धी त्या मुलांपाशी असेल, तर ती मुले खोडकर कशी म्हणता येतील? ती बुद्धीमान व हुशारच मुले असतात ना? त्यांच्या त्या बुद्धीला चालना देऊन मार्गी लावण्याचे आपले काम असते.

तुम्ही सतत मुलांची काळजी घेत असाल किंवा उठताबसता त्याच्यावर नजर ठेवून असाल, तर मुले बेछूट वागतात. त्याला कुठे कधी इजा होईल, म्हणून तुम्ही अतिशय चिंतेत राहू लागता. पण शक्य असेल तर एक प्रयोग करून बघा. तिरक्या कटाक्षाने मुलांवर नजर ठेवावी. पण आपण पाळत ठेवली आहे, त्याची मुलाला जाणिव होऊ द्यायची नाही. त्याला मोकाट काही करायला संधी आहे, असे वाटू द्यावे. मग तेच मुल किती जपून हालचाली करते, हे लक्षात येईल. कुठल्याही जीवामध्ये आपली सुरक्षा करण्याची उपजत वृत्ती असते. आपले मुल निरोगी बालक असेल, तर त्याच्यातही तीच वृत्ती पुरेपुर असते. त्यामुळे अथक त्याच्यावर पाळत ठेवण्याचे काहीही कारण नाही. जसजशी समज येत जाईल, तसे बालक आपली सुरक्षा करण्यास शिकत असते. अनुभवातून त्याला शिकायचे असते आणि त्यात अडथळा आणला, मग मुले हट्टी वा आग्रही बनत जातात. तुम्ही अमुक नको म्हटले, की त्याचसाठी हट्ट करू लागतात. त्यापेक्षा अशा मुलांना सतत नवनव्या आव्हानात गुंतवून त्यांच्यात असलेल्या उर्जेला व बुद्धीला गुंतवून ठेवावे लागते. नेहमीपेक्षा वेगळ्या वाटणार्‍या भासणार्‍या गोष्टी घटनेविषयी मुलांना खुप कुतूहल असते. नवे अनुभव घेण्याची उपजतवृत्ती म्हणजेच शिकणे असते. त्यातून बालकाला रोखण्यापेक्षा त्याच्या कुतूहलाला सामोरे जाणे किंवा तो अनुभव सुरक्षितपणे घेण्यास मदत करणे अगत्याचे असते. आपण त्याचा कंटाळा करतो किंवा नकारात्मक भूमिका घेऊन त्याच्यातली उपजत वृत्तीच मारू बघतो. ‘खेळण्यापेक्षा अभ्यास कर’ हे तसे नकारात्मक वर्तन होय. मग मुल तुमची नजर चुकवून काही उचापती करू बघते आणि संकट ओढवून आणते. अशा वागण्याचे सरसकट आकडे नाहीत, म्हणून त्यावरचे सरसकट उपायही नाहीत. त्यावरचा उपाय म्हणजे मुलांवर धाक वचक असावा, पण भिती अजिबात नसावी. ते कसे साधता येईल?  (अपुर्ण)

1 comment: