Friday, December 11, 2015

टॉलरन्स फ़्लू रोगाचं काय झालं?

 खालीद अल मईना



सप्टेंबरपासून देशात अकस्मात बर्डफ़्लू किंवा स्वाईनफ़्लू या प्राणघातक साथीच्या रोगासारखी असंहिष्णुता पसरली होती आणि एकामागून एक नामवंतांचे त्यात बळी पडत होते. तिचे पुढे काय झाले आहे? कारण संसदेचे अधिवेशन सुरू होण्यापर्यंत या ‘टॉलरन्स फ़्लू’ नावाच्या साथीचा देशात खुप बोलबाला होता. पण संसद सुरू झाली आणि अचानक ती साथ गायब झाली. पोलिटिकल व्हेन्डेटा नावाचा भलताच रोग देशाच्या राजकारणाला भेडसावू लागला आहे. त्याचा उपाय शोधला जाईलच. पण आधीच्या त्या टॉलरन्स फ़्लू रोगाचे काय झाले? अवघा देश त्याला बळी पडण्याच्या चिंतेने भयभीत झाले्ले माध्यमांपासून विचारवंत सगळेच त्याविषयी गप्प कशाला झालेत? बहुधा त्यातला अमिर खान हा शेवटचा बळी! बाकी तिथून मग साथ आटोक्यात आलेली असावी. कारण नंतर कोणी त्यात बळी पडल्याचे म्हणजे एवार्ड वापसीच्या भानगडीत पडलेले कानी आले नाही. की परदेशातून कुठली खास लस आणून इथल्या बुद्धीमंतांना सरकारने टोचली आणि तो आजार आटोक्यात आला आहे? पण जगात तर अन्य कुठल्या देशात हा टॉलरन्स फ़्लू नामक साथीचा आजार असल्याच्या बातम्याही नव्हत्या? मग त्यावरची लस वा उपाय परदेशातून कुठून आणणार? की सौदी अरेबिया नामक देशात जिथे सर्वाधिक असंहिष्णूता नांदते, तिथला कोणी खास हकीम आणून भारतीय सेक्युलर बुद्धीमंतांवर उपचार करण्यात आले? म्हणून ती साथ आटोक्यात आलेली आहे? मला तरी तशीच शक्यता वाटते. कारण त्यातला एक हकीम खलाफ़ अल हरबी मागेच मी वाचकांना सादर केला होता. आता आणखी एक तसाच सौदी हकीम तशीच साक्ष देतो आहे. भारतात अत्यंत प्रतिकुल नैसर्गिक आपत्तीच्या काळातही सेक्युलर संहिष्णुता नांदत असल्याचे त्याने जाहिरपणे लिहून त्याची ग्वाही दिलेली आहे. म्हणून मला तेच टॉलरन्स फ़्लू रोगावरचे खास हकीम वाटतात.

जेव्हा भारतातले तमाम बुद्धीवादी सेक्युलर ‘टॉलरन्स फ़्लू’ नावाच्या आजाराने बाधीत झाले होते; तेव्हा खलाफ़ नावाच्या सौदी अरेबियन मुस्लिम अरबाने इथे शंभरावर भाषा व शंभरावर विभिन्न धर्म कसे गुण्यागोविंदाने नांदतात, त्याचे कथन केलेले होते. आता तसाच एक सौदी अरब मुस्लिम भारताचे गुणगान कसा करतो आहे? भारतातील सर्वात प्रेक्षणिय वा सुंदर गोष्ट कोणती असेल तर सेक्युलॅरीझम, असे मेडीकल सर्टीफ़िकेटच त्याने दिलेले आहे. खालीद अल मईना नावाचा हा सौदी अरब मुस्लिम तिथल्या सौदी गॅझेट नामक नियतकालिकाचा एक प्रमुख संपादक आहे. त्याने बातम्या, सोशल मीडिया व वाहिन्यांवरच्या निव्वळ बातम्या बघून लिहीलेला लेख हेच भारताला सतावणार्‍या टॉलरन्स फ़्लू नामक आजारावरचे सर्वात जालीम औषध आहे. ‘सेक्युलॅरीझम: ब्युटी ऑफ़ इंडिया’ अशा शिर्षकाचा त्याचा लेख गेल्या रविवारी प्रसिद्ध झाला आहे. तो मुळातच वाचण्यासारखा आहे. इतक्या दूर राहुन त्याला भारत कळतो आणि भारतात वास्तव्य करणार्‍या भारतीय बुद्धीमंत पत्रकार संपादकांना असला भारत दिसतही नाही, याचे नवल वाटते. खालीद त्यासाठी इथे आलेला नाही किंवा त्याने कोणाला खास स्टींग ऑपरेशन करायला पाठवलेले नाही. इथल्याच बातम्या व चित्रण बघून त्याने आपले मत बनवले आहे. म्हणजेच आपण जे चित्रण वाहिन्यांवर बघतो, तेच खालीदने बघितले आहे. पण त्या चित्रणासोबत भारतीय पत्रकार वा बुद्धीमंत जाणते काय बरळतात, तेवढे ऐकायचे त्याने टाळलेले दिसते. म्हणूनच त्याला टॉलरन्स फ़्लू या आजाराची बाधा झालेली नसावी. त्यापासून खालीद बचावलेला असावा. कारण हा असा आजार आहे, की त्याची बाधा झाल्यावर डोळ्यांना दिसते, त्याचा योग्य बोध होऊ शकत नाही. आपल्याकडे बहुतांश माध्यमांना व पत्रकारांना त्याचीच बाधा झालेली असावी.

म्हणून भारतीय माध्यमांनी चित्रीत केलेले वास्तविक प्रसंग बघून खालीदला त्यातून योग्य बोध होऊ शकला. पण त्याच घटनास्थळी उभे राहून त्यावर भाष्य करणार्‍या वा स्टुडिओत बसून त्यावर शेरेबाजी करणार्‍यांना मात्र तेच चित्रण म्हणजे काय, त्याचा बोध होऊ शकला नाही. जे पाहून आपले पत्रकार वार्ताहर वा बुद्धीजिवी जे काही सांगत होते, त्याच्या एकदम विपरीत खालीदचे कथन आहे. खरे सांगायचे तर तेच चित्रण इथे बघणार्‍या सामान्य जनतेलाही तोच बोध झाला. फ़क्त बुद्धीमंतांना त्याचा योग्य ाकलन होऊ शकले नाही. तर त्याचे कारण काय असेल? अर्थातच टॉलरन्स फ़्लू! चेन्नई वा तामिळनाडूच्या पट्ट्यात जे चक्रीवादळ आले, त्याने जी वाताहत करून टाकली; त्यानंतर भारतीय कसे वागत होते, त्याचे खलीदने केलेले वर्णन बघा. ‘चक्रीवादळाने अपुर्व अशी नैसर्गिक आपत्ती तामिळनाडू व चेन्नईवर आणली. पण त्याच आपत्तीने लोकांना जवळ आणण्याचेही मोठे काम केले. झोडपणारे वारे आणि बुडवणारा महापुर यांनी लोकांच्या इच्छा व आत्मा कमजोर केला नाही. निसर्गाच्या रौद्ररूपाशी सामना करण्यासाठी सामान्य माणसांनी एकमेकांचे हात धरून संधान साधले आणि एक लोक चळवळच उभी राहिली. मंदिरे, मशिदी आणि चर्चची दारे उघडली आणि त्यांनी कुणाला धर्माचे नाव विचारल्याशिवाय आडोसा व आश्रय देण्यात पुढाकार घेतला. महापुरातून बाहेर येणार्‍या प्रत्येकासाठी घरे कचेर्‍या शाळा वा कुठलीही सुरक्षित जागा खुली होती. माणूस माणसासाठी सज्ज होता. राम, रहिम वा जोसेफ़ अशी नावेही न विचारता माणसे एकमेकांच्या मदतीला धावली आणि जे काही तुटपूंजे आपल्यापाशी होते, ते दुसर्‍या गरजूला देण्यासाठी पुढे झाली. हेच भारताचे सौंदर्य आहे. अनेक धर्म वा वंशाची वस्ती असलेल्या अफ़ाट भूमीवरची लोकसंख्या! कुठल्याही विपत्तीच्या प्रसंगी त्यांच्यातले भारतीयत्व उफ़ाळून बाहेर येते.’

इतके कौतुक झाल्यावर खालीद पुढे धोक्याचा इशाराही देतो. हे भारताचे सौंदर्य उर्वरीत भारतासाठी व प्रांतांसाठी मार्गदर्शक आहे, जिथे काही वांशिक धार्मिक माथेफ़िरू त्याच सौंदर्याला विटंबित करू बघतात, द्वेष आणि विभाजनाची बडबड करतात. त्यांची बाधा भारताला होऊ नये. कारण भारत सर्वांसाठी आहे. त्यांच्या राज्यघटनेनेच तशी ग्वाही सेक्युलर विचाराने भारताला दिलेली आहे. भारतात जातियवाद किंवा धार्मिक तेढ नाही, असे खालीद म्हणत नाही. पण त्यामुळे भारताचा आत्मा बदलत नाही. कठीण प्रसंगी त्यातले भारतीयत्व उफ़ाळून येते. ही बाब इथल्या बुद्धीमंतांना कशाला दिसत नाही? त्यांना बिघडणारी स्थिती दिसते. पण त्यातही सकारात्मक गोष्टी असल्याचे कसे दिसत नाही? कारण त्यांना ते बघायचे नाही. बघणार्‍याला दिसू शकते. पण डोळे मिटून बसलेल्यांना समोर सूर्य आणून ठेवला तरी अंधारलेलेच दिसणार ना? त्यालाच टॉलरन्स फ़्लू नावाच्या रोगाची बाधा म्हणतात, ती ठराविक परिस्थितीत होते. कधीकधी तो आजार झालेलेच लपवाछपवी करून आपणच सेक्युलर असल्याची तोतयेगिरी करू लागतात. अन्यथा भारताच्या सेक्युलर संहिष्णूतेविषयी शंका घेण्याला जागा नाही. खालीद असो किंवा खलाफ़ असो, ते जिथे रहातात किंवा जगतात, तिथे संहिष्णूतेला अजिबात स्थान नसल्याने त्यांना भारतातली अर्धपोटी संहिष्णुता उमजू शकते. पण इथल्या भरपेट सेक्युलर विचारवंताना मात्र भितीदायक स्वप्नांनी पछाडलेले आहे. मग त्यांच्यावर कुठल्याही वैद्यकीय मेडीकल मार्गाने उपचार होऊ शकत नाहीत. म्हणून मग त्यांच्यासाठी खालीद वा खलाफ़ अशा हकीमांची मदत घ्यावी लागते. किंवा दर्गेपीर शोधून गंडेदोरे आणावे लागतात. काळेपांढरे दोरे बांधून नवस करावे लागतात. अन्यथा भारत संहिष्णु देश असतो आणि सेक्युलॅरीझम हे त्याचे सौंदर्यस्थळ असते. असे म्हणतात सौंदर्य वस्तू वा चेहर्‍यात नसते, तर बघणार्‍यांच्या नजरेत असते.

6 comments:

  1. उत्तम लेख...!!!

    ReplyDelete
  2. सर्वात जास्त असहिष्णू वातावरण देशात कुठे असेल तर ते देशातील संसद भवनात काहीही काम न करता दिवसभर गदारोळ करून कामका ज बंद पाडून पैश्यांचा अपव्यव होतांना आता बघवल जात नाही परंतु हताश होण्यापलीकडे आपल्या हातात काही नाही या ची बोचणी मनात कायम राहते

    ReplyDelete
  3. भाऊ चंद्रावर पण डाग आहेत समजुन घेतले पाहिजे

    ReplyDelete
  4. भाऊराव,

    खलिद अल मईनाचा लेख इथे आहे :
    http://saudigazette.com.sa/world/secularism-the-beauty-of-india/

    आपला नम्र,
    -गामा पैलवान

    ReplyDelete
  5. BHAU PAN ATA ASHI PARISTHITI AHE KI

    बुढिया सच कहती पर सुनता कौन

    ReplyDelete