Wednesday, March 30, 2016

भारतमाताकी जय? क्रिकेटमध्येही?

रविवारी मोहाली येथे भारत ऑस्ट्रेलिया यांच्यात टी-२० स्पर्धेतला निर्णायक सामना झाला. त्यातले दोन्ही संघ अटीतटीची लढाई करीत होते. कारण त्यात बाद होणारा थेट स्पर्धेतूनच बाद व्हायचा होता आणि जिंकणारा बादफ़ेरीत समाविष्ट व्हायचा होता. त्यामुळे दोन्ही संघांवर सारखेच दडपण होते. वास्तविक त्य दोन्ही संघातल्या खेळाडूंपेक्षा त्या सामन्याचे सर्वाधिक दडपण भारतीय क्रिकेटशौकिनांवर आलेले होते. कारण स्पर्धा भारतात खेळवली जाते आहे आणि यापुर्वीची प्रत्येक लढत अटीतटीची झालेली होती. पहिल्याच सामन्यात न्युझिलंडकडून भारताचा पराभव झाला होता आणि पुढला प्रत्येक सामना स्पर्धेत टिकून रहाण्याचा संघर्ष भारताला करावा लागला होता. पण याच दरम्यान देशातली राजकीय सामाजिक स्थिती अशी झाली होती, की क्रिकेटलाही राजकीय सामाजिक रंग चढला होता. ‘भारतमाताकी जय’ ही घोषणाही सेक्युलर पुरोगाम्यांनी प्रतिगामी ठरवल्याने सर्वसामान्य माणूस कमालीचा विचलित होता. त्याचेही प्रतिबिंब या क्रिकेट स्पर्धेवर पडलेले होते. सहाजिकच पाकिस्तानशी होणारा दुसरा सामना अंतिम म्हणावा इतका उधाण आणणारा ठरला. त्यातला विजय स्पर्धा जिंकल्यासारखा साजरा झाला. त्यानंतरचा सामना बांगलादेशाच्या संघाशी होता आणि त्या होतकरू खेळाडूंनी भारताला झुंजवले. परिणामी धावगतीच्या तुलनेत भारत मागे पडला होता. म्हणूनच साखळीतला चौथा सामना ऑस्ट्रेलियाशी असला तरी प्रतिष्ठेचा व उत्सुकता शिगेला पोहोचवणारा ठरला. तो अर्थातच भारताने जिंकला. पण त्यानंतरचा देशभरातील जल्लोष थक्क करणारा होता. बहुतेक जागी विजयानंतर लोकांनी जयघोष केला तो, भारतमातेचा! आजवर भारताने अनेक क्रिकेट स्पर्धा व सामने जिंकले आहेत. पण त्यानंतर कधी भारतमाताकी जय असा जयघोष होत नव्हता. यावेळी क्रिकेटशौकीनांना भारताच्या विजयाने त्या जयघोषापर्यंत कसे व कोणामुळे आणले?
विविध वाहिन्यांवर आणि प्रामुख्याने प्रतिभावंतांचा मेळा समजल्या जाणार्‍या इंग्रजी वाहिन्यांवर जी चर्चा चालते, त्यांना ‘भारतमाताकी जय’ असा जयघोष कशासाठी आवश्यक आहे, असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. कारण त्यांना आयुष्यात कशाचीही ददात पडलेली नसते. दुष्काळ असो किंवा घातपात असो, त्यापासून अतिशय सुरक्षित जीवन जगणार्‍या अशा लोकांची मनस्थिती, त्या फ़्रेंच राजकन्येसारखी असते. जिला पाव आणि केक यातला फ़रकच ठाऊक नसतो. तमाम पुरोगामी वा उदारमतवादी राजकीय इतिहासाचा हवाला देताना फ़्रेंच राज्यक्रांतीच्या गप्पा जरूर मारतात. कारण तिथून लोकशाहीचा उदभव झाला, असे त्यांना अक्कल येण्याच्या वयापासून पढवलेले असते. सहाजिकच पढवलेले शब्द पोपटपंची केल्यासारखे बोलण्यापलिकडे त्यांना काडीची स्वयंबुद्धी नसते. म्हणूनच त्यांना फ़्रेंच राज्यक्रांतीचा गाभाही कधी उमजलेला नसतो. पाव हे सर्वात स्वस्त असे गरीबाचे खाणे आणि तेच मिळत नसल्याने राजवाड्यावर चाल करून आलेली गरीबांची भुकेकंगालांची गर्दी काय म्हणते, तेच त्या राजकन्येला उमजले नाही. तिला वाटले पावाची टंचाई आहे. तर मग भुक भागवायला केक खावा असे तिने सांगितले. त्यातून भडकलेल्या जमावाने राजवाड्यावर हल्ला केला. त्यांचा राग त्या राजकन्येवर नव्हता, तर तिच्या तद्दन मुर्खपणावर होता. भुकेची व्याकुळताही जिला समजत नाही, तिच्या शहाणपणाने आगीत तेल ओतले होते. आज भारताची अवस्था त्यापेक्षा तसूभरही वेगळी नाही. अन्यथा तथाकथित पुरोगामी बुद्धीमंतांनी ‘भारतमाताकी जय’ घोषणेची अशी टवाळी केली नसती. जे लोक शहरी जीवनातल्या सर्वोत्तम ऐषारामी सुविधांनी पोसलेले आहेत, त्यांनी लोकशाहीची फ़िकीर रोजच्या रोज करावी आणि एकदही मतदानाला जाऊ नये, याचा अर्थ आपण कधी तरी तपासून बघितला आहे काय?
किती चमत्कारीक गोष्ट आहे बघा! ही मंडळी मुंबईच्या अतिश्रीमंत मानल्या जाणार्‍या दक्षिण मुंबईत प्रामुख्याने वास्तव्य करतात आणि तिथेच शंभर पावलावर मतदान केंद्र असूनही सहसा मतदानाला जात नाहीत. मात्र लोकशाहीच्या चर्चेत त्यांनाच मतस्वातंत्र्याचे उमाळे येत असतात. याच्या उलट आपण दूर विदर्भातल्या वा झारखंड, छत्तीसगडच्या नक्षलप्रभावित भागाकडे बघू शकतो. तिथे जंगल परिसरात वसलेल्या खेड्यापाड्यातल्या गरीबांना प्रतिकुल परिस्थितीत काही मैल तुडवून मतदान केंद्रात पोहोचावे लागते. पण तिथे गरीब अर्धपोटी लोक ९० टक्के मतदान करतात. उलट कुलाबा दक्षिण मुंबईतल्या सुखवस्तु श्रीमंत वस्तीमध्ये ३० टक्क्याहून कमी मतदान होते. म्हणजेच लोकशाही वा मतदानाविषयी सर्वात उदासिन असलेला तोच श्रीमंत वर्ग आहे. मात्र त्याच लोकशाहीचे सर्वाधिक लाभ या़च वर्गाने उकळलेले आहेत. दुसरीकडे एकही मतदान न चुकवणारा तो गरीब आदिवासी लोकशाहीच्या सर्व लाभांपासून आजवर वंचित राहिला आहे. तरीही वाहिन्यांवर बघाल, तर तेच तथाकथित श्रीमंत बुद्धीजिवी लोकशाहीची फ़िकीर करताना मगरीचे अश्रू ढाळताना दिसतील. तो नक्षलप्रभावित भागातला मतदार जीवावर उदार होऊन पायपीट करून मतदान करतो, तेव्हा एक लढाईच लढत असतो. कारण त्या भागात नक्षल्यांनी मतदानावर बहिष्काराचे आवाहन केलेले असते आणि मतदान केंद्रावर बॉम्बहल्ला होण्याचा धोका असतो. म्हणजेच एका बाजूला वंचित आदिवासी जीव धोक्यात घालून लोकशाही जगवतो आहे आणि दुसरीकडे सर्व सुविधा असूनही मतदानाकडे पाठ फ़िरवणारा श्रीमंत सुखवस्तु बुद्धीमान लोकशाहीची प्रवचने देत असतो. म्हणूनच त्याला ‘भारतमाताकी जय’ याचा अर्थ वा गरज उमगत नाही. वंचित माणूस जगण्याचे निमीत्त शोधत असतो, ते त्याला अशा जयघोषामध्ये सापडत असते. कारण जगण्याच्या साध्या गरजाही कधी भागत नसतात.
किडामुंगीसारखे जीवन कंठणार्‍यांना जगण्याचा मोह असण्यासारखे काही नसतेच. त्यातून आपल्या जगण्याला अर्थ प्राप्त करून देणारी ओळख-अभिमान त्याला जगायला हिंमत देत असतात. असे अभिमान पोट भरत नाहीत की भूक भागवत नाहीत. पण जगण्याची जिद्द प्रदान करत असतात. सगळीकडुन पराभूत गांजलेल्या माणसाला जगण्याची इच्छाच उरणार नाही. अशावेळी कृत्रीम वा काल्पनिक आशाही त्याला झुंजायला प्रवृत्त करीत असतात. आपणही कोणीतरी दखलपात्र आहोत, असली धारणा माणसाला कृतीसाठी प्रवृत्त करीत असते. साधे मतदान वा मतदार असल्याचे ओळखपत्रही त्या वंचितासाठी एक अभिमानाची गोष्ट होऊन जाते. त्यासाठी आपला जीव धोक्यात घालून तो मतदानाला मैलोगणती दूर येतो. पण सुखवस्तु माणसांना पैशाने वा प्रतिष्ठेने मिळालेल्या ओळखीपुढे मतदार म्हणून असलेली ओळख तुच्छ वाटत असते. म्हणूनच मग त्याला ‘भारतमाताकी जय’ यातली चेतना उमजणार नाही. कालपरवा बेल्जमच्या राजधानीत घातपात झाले. काही महिन्यांपुर्वी तसेच फ़्रान्सची राजधानी पॅरीसमध्ये घडले होते. एका स्टेडीयममध्ये फ़ुटबॉलचा सामना चालू असताना स्फ़ोट झाले आणि त्यानंतरही शांतपणे बाहेर पडणार्‍या जमावाने काय केले होते? कोणीतरी सुरूवात केली आणि सगळाच तो जमाव स्टेडीयममधून बाहेर पडताना राष्ट्रगीत गुणगुणू लागला. कशासाठी? त्याक्षणी त्या देशाची फ़ौज, पोलिस व कायदाही पराभूत झाला होता आणि अशावेळी सामुहिक राष्ट्रभावना इतकाच आधार उरला होता. म्हणून एकाने सुरू केलेल्या राष्ट्रगीताला सार्वत्रिक प्रतिसाद मिळत गेला आणि त्या परिसरात स्फ़ोटाच्या आवाजाला उत्तर म्हणून फ़्रेंच राष्ट्रगीत दुमदुमले. तो जयघोष राष्ट्रभावनेचा होता आणि जिथे हत्यारे शस्त्रे तोकडी पडली तिथे नुसत्या जयघोषाने राष्ट्राला सावरून उभे रहायला प्रेरणा दिली.
भूमीवरच्या सीमारेखांनी कुठला देश आकार घेत नाही, की राष्ट्र जन्माला येत नाही. राष्ट्र ही सामुहिक भावना असते आणि म्हणूनच तिची काही प्रतिके असतात. ती प्रतिके जीवापाड जपण्यातून राष्ट्र समर्थ होते आणि पर्यायाने समाजही राष्ट्र म्हणून एकजिनसी होत जातो. शंभर वर्षाहून अधिक काळ ह्या खंडप्राय देशाला कुठल्याही राजकीय नेत्याने, पक्षाने वा विचारसरणीने एकत्रित एकजीव राखलेले नाही. ती किमया ‘भारतमाताकी जय’ या सात अक्षरांनी केलेली आहे. अशी घोषणा देताना हिंदी असूनही तामिळी माणसाची जीभ अडत नाही की आसामी बंगाली भाषिकाच्या अहंकाराला ठेच लागत नाही. कारण ती घोषणा वा सात अक्षरे कुठल्याही भाषेतली नसतात किंवा कुठल्या प्रांत जात धर्माशी निगडीत नसतात. ती अवघ्या खंडप्राय देशाला एकजुट करून एकजिनसी बनवणारी असतात. अर्थात अशा शब्दांनी प्रेरीत होण्याइतके तुम्ही भारतीय असायला हवे. जसे स्फ़ोटानंतर सामुहिक राष्ट्रगीत गायला पॅरीसच्या त्या क्रिडाशौकीनांना कोणी आदेश देवून सांगितले नव्हते. पण तो सामुहिक उद्गार आपोआप सुरू झाला. कोलकात्याच्या इडन गार्डन मैदानावर अमिताभने राष्ट्रगीत म्हटल्यावर ‘भारतामाताकी जय’ हा जयघोष दुमदुमला, त्याला कोणाच्या आदेशाची प्रतिक्षा नव्हती. कारण राष्ट्र ह्या संकल्पनेची तीच ओळख आहे. देशावर हल्ला झाला, देशाला आव्हान उभे राहिले, किंवा कुठलेही राष्ट्रीय संकट आले, मग आपोआप अंगात प्रतिकाराचे स्फ़ुरण चढण्याची प्रेरणा तीच सात अक्षरे देतात. अशी घोषणा वा जयघोष कुठल्या देशाच्या राज्यघटनेत नमूद करण्याची गरज नसते. कारण ती कुठल्याही भारतीय बालकाला उपजतच प्रदान होत असते. तो जयघोष कशाला करावा असा प्रश्न ज्याला प्रश्न पडतो, त्याचे भारतीयत्व किंवा राष्ट्रीयत्व म्हणूनच संशयास्पद असते. त्याचे माणूस असणेही तितकेच शंकास्पद असू शकते. कारण अशा प्राण्याला आपली अशी ओळखच नसते. माणूस आणि प्राण्यातला हा फ़रक ज्यांना उमजलेला नाही, त्यांना राष्ट्रीय जयघोष कशाला व कुठला ते समजावण्यात अर्थ नसतो. भारतमाताकी जय म्हणारे, असा आग्रह आपण हत्ती, कुत्रा किंवा अन्य प्राण्यांकडे धरतो का? ते नुसते सजीव प्राणी असतात. त्यांना राष्ट्र, प्रांत किंवा कुठलीच ओळख नसते ना?

3 comments: