Saturday, July 16, 2016

खोडकर मुलाची गोष्ट (जोपासनापर्व -३)



दिड वर्षापुर्वी जानेवारी २०१५ मध्ये परभणी व लातूर असे दोन कार्यक्रम होते. मधला एक दिवस मोकळा होता. तो दोन गावांच्या मध्यंतरी असलेल्या अंबाजोगाई येथे व्यतित करावा असे डोक्यात आले. कारण तिथे माझा तरूण कविमित्र बालाजी सुतार वास्तव्य करतो. फ़ेसबुकमुळे परिचय झालेल्या बालाजीला त्यापुर्वी दोन कार्यक्रमांसाठी लातूरला जाऊनही भेटू शकलो नव्हतो आणि त्याचा आग्रहही होता. म्हणून मधल्या एका दिवशी अंबाजोगाईचा बेत निश्चीत केला. एकच अट बालाजीला घातली होती. तिथे आलो तर त्याच्याच घरी वास्तव्य करणार. बालाजी हा मुळातच त्याने लिहीलेल्या आक्रमक शब्दांपेक्षा व्यवहारात अतिशय संकोची स्वभावाचा. पण दोन खणांच्या घरात मुंबईचा पाहुणा ठेवायला संकोचला होता. पण माझा त्याच्याच घरी व कुटुंबात जायचा हट्ट होता. कारण काही वेगळे होते. तेव्हा बालाजीने आपल्या दोनही मुलांचे छायाचित्र फ़ेसबुकवर टाकलेले आणि त्यातला धाकटा पोरगा माझ्या मनात भरलेला होता. म्हणूनच निमीत्त बालाजीचे, पण हेतू त्या डांबिस मुलाचे निरीक्षण करणे असा होता. पण तो बालाजीला अजिबात कळू दिलेला नव्हता. जन्मदाते आणि त्या धाकट्यातील व्यवहार मला जवळून अनुभवायचे होते. त्यातला कोणीही त्या दृष्टीने सावध असून चालणार नव्हते. झालेही तसेच. बालाजी आणि त्याची सोज्वळ पत्नी प्रतिभा, यांची अपेक्षित तारांबळ बघण्याचा अवर्णनीय अनुभव मला घेता आला. मैत्रेय हा बालाजीचा चारपाच वर्षाचा मुलगा मला खुप आवडला. इतक्या कोवळ्या वयात स्वयंभू स्वतंत्र आणि आपल्या विचारांनी चालणारा. अर्थात मातापित्यांसाठी तो काहीसा हट्टी आहे. पण मला अशीच मुले आवडतात. ती हट्टी नसतात. ती स्वयंभू असतात आणि त्यांना प्रत्येक बाबतीत स्वत:ची ठाम मते असतात. त्या बाबतीत ही मुले अत्याग्रही असतात, म्हणून खोडकर मानली जातात.

मैत्रेय हा बालाजीचा धाकटा मुलगा अगदी तसाच असणार, याची मला पक्की खात्री त्याचा फ़ोटो बघून झाली होती. पण माझा अंदाज किती खरा ठरतो, ते अनुभवायचे असल्याने तिथे जाऊन तळ ठोकणे भाग होते. झालेही तसेच. त्याच्या घरी कोणी पाहुणा आलाय, याचे मातापित्यांना असलेले कौतुक मैत्रेयच्या गावीही नव्हते. त्याच्या लेखी पित्याचा आणखी कोणी मित्र आलेला होता. बाकी काही महत्वाचे नव्हते. बिचारा मैत्रेय नेहमीसारखा वागत वावरत होता. पण माझ्यासमोर त्याने थोडे जपून ठिकठाक वागावे, किंबहूना आदर्श बालकाची भूमिका पार पाडावी; अशी बालाजीची अपेक्षा होती. त्यात त्रुटी येत असल्याने पिता व आपोआप माता दोघेही अस्वस्थ होते. बालाजीनेही काहीसे संकोच दाखवत तो हट्टी झाल्याची तक्रार केली. बहुतेक मध्यमवर्गिय घरात हेच अनुभवायला मिळते. पण मला तेच आवडते. इथे मातापित्यांना घरी आलेल्या पाहुण्यांना काय वाटेल किंवा वाटते याची फ़िकीर असते. पण त्यांच्याच बालकाला काय वाटते आहे, त्याची पर्वा नसते. मैत्रेयची भूमिका साफ़ होती. त्याच्या घरी आलेला पाहुणा तात्पुरता होता. काही वेळाने जाणारा होता आणि ते घर त्या पाहुण्याचे नव्हते. ते घर मैत्रेयचे होते आणि त्याच्याच कलाने तिथले सर्वकाही चालले पाहिजे. त्याच्या जगण्यात कुणा पाहुण्याची बाधा त्याने कशाला सहन करावी? आपल्याच घरात मनसोक्त नाही जगायचे, तर घर हवेच कशाला? मैत्रेयची अशी भूमिका नेमकी व रास्त होती. आईबापही त्याचे हक्काचे होते आणि त्यांनी मुलाकडे दुर्लक्ष करून पाहुण्यात किती गुंतून रहावे? मुलांनी लक्ष वेधून घेण्याचा प्रयास केला तर त्यात गैर काय? पण शिष्टाचार म्हणून मुलांनी पाहुण्यांसमोर कसे वागावे याचे ठोकताळे आहेत आणि त्यात बाधा आली मग पालक मुलांना खोडकर ठरवतात. वास्तविक बालकाच्या मनात तसे काहीही नसते. त्याला शिष्टाचाराशी काही कर्तव्य नसते.

दुपारी जेवणाला आम्ही बसलो, तर मैत्रेय आमच्या सोबत समोर होता. पण त्याचे ताट नव्हते. तो आमच्यातच लुडबुडत होता. ताटाखेरीज प्रतिभाने पेरूच्या फ़ोडी असलेल्या बशा मी आणि बालाजीसमोर आणून ठेवल्या. जेवताना पेरू ही कल्पना खास होती. तर मैत्रेयाने आमच्या बशीतला पेरू खायला सुरूवात केली आणि बालाजी अस्वस्थ झाला. त्याने पत्नीला हाक मारून मैत्रेयाला वेगळा पेरू द्यायला आदेश जारी केला. बिचार्‍या प्रतिभानेही त्याचे विनाविलंब पालन केले. पण मैत्रेय कसला बिलंदर. त्याने आपल्यासाठी आणलेली बशी तशीच जवळ ठेवली आणि आमच्याच बशीतल्या पेरूच्या फ़ोडी खात राहिला. वैतागलेल्या पित्याला त्याने विचकट हसून दाखवले. त्यातून इथे घरात मला हवे तेच मी करणार आणि त्यात व्यत्यय कोणी आणू शकत नाही, असा संकेत मैत्रेय देत होता. पण बालाजीला मध्यमवर्गिय शिष्टाचाराने ग्रासले होते. मी त्याची समजूत काढली आणि मला व्यत्यय येत नाही, तर मातापिता कशाला रडकुंडीला आलाय असा, प्रश्न केला. तेव्हा बालाजीचा जीव भांड्यात पडला. मैत्रेयाला पेरू खाण्यापेक्षा आमच्याच बशीतले पेरू खायचे होते. तितके करू देण्यात काय अडचण असते? ज्या पाहुण्याला असले मुल खपत नाही, त्याला आपल्या घरी आणूच नये. घर मातापित्यांचेच नसते तर मुलांचेही असते आणि त्यांचेही अधिकार असतात. मैत्रेय तोच अधिकार सिद्ध करीत होता. दुपारी तो कसलासा गेम मोबाईलवर खेळत पहुडला होता. आई चड्डी बदलण्यासाठी आली. तेव्हा उठून उभे रहाण्यापेक्षा त्याने शरीराची केलेली कसरत साक्षात चमत्कार होता. डोके आणि खांदा जमिनीला टेकवून त्याने कमरेपासूनचा शरीराचा भाग असा उचलला, की चड्डी सहज बदलून झाली. पण त्याच्या खेळात व्यत्यय येऊ शकला नाही. शरीरासह भूमितीचे समिकरण जुळवल्याशिवाय अशी कसरत शक्यच नव्हती. डोके व खांद्याचा काही भाग जमिनीला टेकवून उर्वरीत पायाकडला भाग उचलून चड्डी घालून घेणे व खेळही चालूच ठेवण्याची कल्पकता, अवघ्या चारपाच वर्षाच्या वयात किती लोकांना साध्य झालेली आहे?

त्याच्याआधी मला बालाजी एक अंगणवाडी शाळा दाखवायला घेऊन गेला होता. तिथे इतर शाळांची मुले आणुन त्यांना खेळ शिकवण्याचे प्रयोग केले जातात. तेव्हाही मैत्रेय आमच्या सोबत होता. पण तो इतर मुलात रमला नाही. मी शाळा बघत असताना व मुलांशी गप्पा करत असताना मैत्रेय बाहेर मोकळ्या रानात भरकटला आणि अंगवर कुसळे घेऊन परतला. त्याची कुसळे बाजूला करताना बालाजी वैतागला होता. ह्याला कोणीही खोडकरपणाच म्हणेल यात शंका नाही. पण त्याच्याच वयाची इतर मुले भोवती असताना, मैत्रेय त्यांच्यापेक्षा वेगळा आपलाच जीव रमवू बघत होता आणि त्याने उचापती केलेल्या होत्या. रात्री घरी परतल्यावर त्याचा माझ्याशी थोडाला परिचय झाला होता. मग त्याने विश्वासाने मला त्याचा मोबाईल गेम शिकवला. अर्थात मी काहीच शिकलो नाही किंवा मी कितपत शिकतोय याच्याकडेही मैत्रेयाचे लक्ष नव्हते. त्याला किती येते आणि किती सहजगत्या तो गेम खेळू शकतो, ह्याचे प्रदर्शन त्याला करायचे होते. त्याखेरीज त्याचीच एक व्हिडिओ क्लीप होती. कुत्र्याचे पिलु ओरडतानाची एक क्लीप होती. ती त्याने जगातले आश्चर्य दाखवावे तशी मला दाखवली. मी त्याच्याशी सहकार्य करीत होतो. तासभर त्यात कसा गेला उमजले नाही. घरी आलेल्या पाहुण्याला आपले असे काही विश्वासाने दाखवण्याला, शिष्टाचार नाही तर काय म्हणायचे? त्या वयातल्या बालकाला समजून घेण्याची प्रौढाला अक्कल व समज नसेल; तर तो बालकाचा दोष नाही. मलाही शिकायला सहजशक्य नसलेला मोबाईल गेम मैत्रेय लिलया खेळत असेल, तर तो खोडकर कसा? कोणी न शिकवता त्याने असा गेम अवगत केला असेल, तर तो मुलगा तल्लख नाही, हा दावा मी कशाला मान्य करू? अशी मुले तल्लख असतात आणि त्याच्या बुद्धी व प्रतिभेला अधिकाधिक गुंतवून ठेवणारी आव्हाने पालक देऊ शकले नाहीत, तर त्यांना अभ्यासाचा तोचतोचपणा कंटाळा आणतो. मग ती बुद्धी उचापती करण्यातून व्यक्त होऊ लागते. मुलांना समजून घेण्यातली कंजुषी अशा मुलांवर अन्याय करीत असते. पुढे मी घरी कशासाठी राहिलो ते कळल्यावर बालाजीलाही धक्का बसला. असो.

2 comments:

  1. छान भाऊ मस्त

    ReplyDelete
  2. अप्रतिम .....मोठी माणसे वागताना आपण कधी लाहान होतो हेच विसरतात...

    ReplyDelete