Tuesday, July 26, 2016

खोडकर मुलांचे काय करावे? (जोपासनापर्व - ५)



आपल्या घरात नवे अपत्य जन्माला येते, तेव्हा कुठल्याही जन्मदात्यांचा उत्साह आनंद दुथडी भरून वहात असतो. पुढली दोनतीन वर्षे तरी प्रत्येक क्षणी आपल्या अपत्याचे कौतुक त्यांच्याकडून कुणालाही ऐकावेच लागते. कुठल्याही मात्यापित्यांची अवस्था वेगळी नसते. मग सुखवस्तु सुशिक्षित कुटुंबाची कहाणी वेगळी कशाला असेल? आपले मुल कसे जगावेगळे आहे, त्याचे शेकड्यांनी किस्से मी ऐकले आहेत. पण तो सगळा उत्साह मुल जसजसे वाढू लागते, तसा तसा मावळू लागतो. आधीची माया पातळ होत जाते आणि व्यवहारी पातळीवर आपल्या अपत्याला अद्वितीय बनवण्याची इर्षा कामाला लागत असते. आजवर अन्य कोणी आपल्या अपत्यासाठी केले नसेल, ते सर्व काही आपण आपल्या मुलांना देण्य़ाची आकांक्षा मुळ धरते. पण मजेची गोष्ट अशी असते, की आपले मुल ज्यांना अद्वितीय वाटत असते, त्याच्यासाठी सर्व गोष्टी मात्र नेहमीच्या ठराविक चाकोरीतल्या देण्याचे मनसुबे असतात. आपले मुल जगातले अपुर्व असेल, तर त्याच्या गरजा वा अपेक्षाही अपुर्व असल्याचे किती पालकांना मान्य असते? त्या लाडक्या बाळाच्या गरजा अन्य मुलांसारख्या नसतील याची फ़िकीर किती पालकांना असते? ती फ़िकीर असेल तर मग आपल्या बालकासाठी खास काही जगावेगळे करायला किती पालक राजी असतात? उलट जसजसे मुलाचे वय वाढत जाते, तसतशी त्याला चाकोरीत ढकलण्याची घाई पालक करू लागतात. जगात आज्ञाधारक मानले जाणारे दंडक त्याला लावू बघतात, किंवा कुठलाही हट्ट पुरवून त्याला बिघडवत तरी जातात. पण बहुतांश पालक त्या आपल्या लाडक्याला समजून घेण्याचा प्रयत्नही करीत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. प्रत्येक मुल खरोखरच अद्वितीय असते. त्याच्यासारखे दुसरे मुल नसते. म्हणूनच आपले मुल जगावेगळे आहे, ते समजून घेण्याची गरज असते. तर त्याला जगावेगळे घडवण्याला हातभार लावता येत असतो.

जोवर मुल पाळण्यात असते तोपर्यंत त्याचे अखंड कौतुक चालू असते आणि उपडे पडून रांगू लागते तेव्हा कौतुकाचा भर ओसरू लागतो. जसजसे मुल पायावर उभे राहुन चालू लागते, तसा कौतुकाचा बाजार मंदीत जाऊ लागतो. इतके दिवस अखंड लक्ष वेधून घेणार्‍या बालकाचा आता त्रास जाणवू लागतो. कारण इतके दिवस मुल पाळण्यात असते आणि निर्धास्तपणे आपण त्याला तिथे टाकून आपले उद्योग करायला मोकळे असतो. पण मुलाला पाय फ़ुटले, की त्याच्या सुरक्षेसाठी अखंड पाळत ठेवावी लागते. त्याच्यामागून पळापळ करावी लागत असते. तिथे आपली दमछाक सुरू होते. काही मिनीटे मुल शांत बसत नाही, अशी पालकांची तक्रार असते. खरे तर दोनचार मिनीटे ते मुल आपल्याला विश्रांती घेऊ देत नाही, ही तक्रार असते. क्वचितच मुले वाढत्या वयात शांत पडून रहातात. अन्यथा अखंड चुळबुळ चालू असते. वास्तवात त्याला शारिरीक वाढीचे कारण असते. खाऊ घातलेले पचवण्याची प्रक्रिया शारिरीक हालचालीखेरीज शक्य नसते. मग अशा अखंड हालचाली चुळबुळीला आपण मस्ती असे नाव देतो. प्रत्यक्षात तो बालकाचा व्यायामच असतो. पण त्यात त्याला इजा दुखापत होईल, म्हणून ती हालचाल आपल्याला नकोशी वाटत असते. कारण आपल्यापाशी त्याच्या इतकी उर्जा नसते. आपण नेहमीच्या कामाने जबाबदार्‍यांनी थकलेले असतो आणि वेगळा विचारही करायला आपल्याला सवड नसते. उलट त्या कोवळ्या बालकापाशी प्रचंड सवड असते. भरपूर उर्जा असते आणि जगातली प्रत्येक प्रथमच दिसणारी गोष्ट त्याच्यासाठी कुतुहलाचा विषय असतो. जाणून घेण्याची अतीव इच्छा त्याला नवनवे काही करायला भाग पाडत असते. त्यातले धोके किंवा सुविधा याविषयी बालक पुर्णतया अजाण असते. त्याच्या त्या कुतुहलाचे समाधान निरसन करण्याचा आपला कंटाळा कबुल करण्याचा प्रामाणिकपणा पालकापाशी नसतो. म्हणून आपण त्याला मस्ती, खोडकरपणा अशी नावे देऊन टाकतो.

काही प्रसंगी एक प्रयोग करून पालकांनी बघावा. मुले उपडी होण्याचा प्रयत्न करून रांगू लागतात. मग बसायचा व उभे रहाण्याचा प्रयत्न करतात, किंवा पाऊल उचलून चालू बघतात. त्या वेळी तुम्ही त्यांच्यापासून सुरक्षित अंतरावर थांबा आणि त्यांना त्यांचेच प्रयास करू देऊन बघा. कुठलेही मुल आपला जीव संभाळून इजा होऊ नये याची पुरेशी काळजी घेऊन, त्य कसरती करताना आढळून येईल. कारण प्रत्येक प्राणिमात्राला आपला जीव जपण्याची उपजतवृत्ती लाभलेली आहे. एखादे मुल आगावूपणा करीत असेलही, त्यासाठीच जवळ थांबून त्याला इजा होणार नाही, अशी पाळत ठेवावी. मुले लौकर शिकतात आणि स्वतंत्रपणे शिकतात, असा माझा अनुभव आहे. अनेक मुलांच्या बाबतीतला माझा अनुभव आहे. जी गोष्ट अशा गोष्टीतून अनुभवास येते, तीच पुढल्याही वाढत्या वयात बघायला मिळते. उभे रहाणारे किंवा चालू लागलेले मुल, अनेक वस्तु ओढते पाडते अशी तक्रार सार्वत्रिक आहे. पण त्याला काहीही पाडायचे नसते किंवा मोडायचे नसते. त्याला त्या बाबतीतले कुतुहल तिकडे खेचुन घेत असते. संभाळून अशा वस्तु बालकाला हाताळू दिल्या, तर त्या विषयातले कुतुहल संपते आणि मग मोकळ्या जागी पडलेली वस्तु दिसली. तरी मुले त्याला हात लावत नाहीत. त्यांचे कुतुहल हे शिकणे असते, याचाच आपल्याला विसर पडला आहे. अर्थात प्रत्येक मुलाच्या बाबतीत हे अनुभव वेगवेगळे असतात. इथेच आपले मुल जगावेगळे असते. मात्र जन्मापासून ज्या वेगळेपणाचे कौतुक केलेले असते, ते करणारे पालकच आपल्या मुलातले जगावेगळेपण विसरून जातात. कारण त्यांना मुलाचे जगभर कौतुक व्हायला हवे असले, तरी त्यासाठी कुठलेही कष्ट नको असतात. तिथून बालक-पालक झगडा सुरू होतो. मग खोडकर मस्तीखोर असे शिक्के मारून आपण पळवाट शोधतो. मला म्हणूनच अशी मुले खुप आवडतात. त्यांच्या वेगळेपणासाठी!

अशी मुले हाताळावित कशी, ही प्रत्येक पालकाला सतावणारी गोष्ट असते. त्यासाठीच मग मुलांना कोवळ्या वयात नर्सरी अंगणवाडी अशा कोंडवाड्यात काही तासांसाठी डांबण्याची पळवाट शोधून काढण्यात आलेली आहे. आपोआप त्याचा धंदा होऊन गेला तर नवल नाही. मग अनेक संस्थांनी नर्सरीतच मुलांना प्रवेश देऊन चाकोरीबद्ध करण्याचे कारखाने सुरू केले आहेत. परिणामी आपले जगावेगळे मुल तिथे एखाद्या कारखान्यात उत्पादन होणार्‍या वस्तुसारखे एकसाची बनत जाते. ज्याला जगावेगळे म्हणून कौतुक केलेले असते, त्याला आपणच चाकोरीतले मुल बनवून टाकतो. त्याच्यातल्या उपजत शिकण्याच्या वृत्तीला बोथट करण्याचा उद्योग तिथून सुरू होतो. ज्ञान प्राप्त करण्याची त्याच्यातली इच्छा, अशी कोवळ्या वयातच मारण्यावर आपण पैसे खर्च करतो. कारण आपल्यापाशी पैसे भरपूर आहेत. फ़क्त मुलांसाठी वेळ नाही, की सवड नाही. त्याचा एक आणखी परिणाम असा असतो, की त्या कोंडवाड्यातून मुलाला जेव्हा कधी मुक्ती मिळते; तेव्हा ते मनसोक्त बागडू लागते. तीच आपल्याला मस्ती वाटू लागते. मुक्त विहरण्याचे त्याचे वय असते आणि तसे वागू लागले, तर मुल मस्ती करते अशी आपली धारणा होते. त्याच्यातल्या उर्जेचे निस्सारण अगत्याचे असते. हे आपण विसरून गेलोत, म्हणून आपल्याला मुले खोडकर वाटतात. मुले चिकित्सक असतात, समजून घ्यायला उतावळी झालेली असतात. अंगातली मस्ती म्हणजे उर्जा मोकळी करून घ्यायला धडपडत असतात. त्याला खोडकरपणा असे नाव देणेच त्यांच्यावरचा अन्याय असतो. काही तास मनमोकळे मुलांशी बोलावे, खेळावे आणि त्यांना दमवून टाकावे. पालक एवढे करू शकले, तर खोडकरपणा कुठल्या कुठे बेपत्ता होऊन जाईल. मात्र हे खेळ दमवण्याबरोबर शिकवणारेही असायला हवेत. त्या बालकाच्या वाढत्या बुद्धीची भुक भागवणारे असायला हवेत. कल्पक असायला हवेत. आव्हान असायला हवेत.

3 comments:

  1. Bhau mast..Mahesh Kulkarni la beat kele aaj
    GAMA PAHILWAAN

    ReplyDelete
  2. छान idea दिलीत भाऊ धन्यवाद

    ReplyDelete