Thursday, July 7, 2016

भरती चालू आहे



षण्मुखानंद सभागृहात भाजपाच्या मुंबईतील कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. त्यात विद्यमान प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांची पुनर्नियुक्ती झाली. त्यानंतर खुप जोशपुर्ण भाषणे झाली. मुंबईत ११४ कमळे फ़ुलवण्याची भाषाही झाली. अर्थात इतकी कमळे फ़ुलवायची तर किमान त्याच्या दुप्पट कळ्यातरी पक्षाकडे असायला हव्यात ना? त्याच कळ्या जमवण्याचे आवाहन या सभेतून करण्यात आले. त्यात बोलल्या गेलेल्या शब्दांकडे बघण्यापेक्षा त्यातला मतितार्थ समजून घेतला तर उपयोग आहे. देवेंद्र फ़डणवीस काय म्हणाले? युती होईल किंवा नाही, ते आम्ही नेते बघू. कार्यकर्त्यांनी प्रत्येक जागा जिंकण्याच्या तयारीला लागावे. याचा अर्थ असा, की मुंबई पालिकेच्या प्रत्येक वॉर्डात उमेदवार उभा करण्याच्या तयारीला पक्ष लागला आहे. तो उमेदवार कोण असेल आणि किती असतील, त्याची फ़िकीर कार्यकर्त्यांनी करू नये. पालिकेत भाजपाची सत्ता आणण्याचा आपला हेतू त्यांनी लपवलेला नाही. तो विधानसभेतही लपवला नव्हता. लपवाछपवी झाली ती युती तोडण्याच्या बाबतीत. कल्याण डोंबिवली पालिकेतही तशीच अखेरपर्यंत बोलणी चालू राहिली व फ़िसकटली होती. अखेर दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढले आणि नंतर सत्तेचे गणित जमवायला एकत्र आले. आताही मुंबई व ठाणे महापालिकेच्या बाबतीत वेगळे काहीही घडणार नाही. भाजपाला त्या पालिका स्वबळावर लढवायच्या आहेत आणि तितक्या ताकदीने शिवसेनेला लढायला मिळू नये; म्हणून युती होण्याचे गाजर दाखवत रहायचे, ही खरी रणनिती आहे. त्यात किती फ़सायचे ते शिवसेनेला ठरवावे लागेल. विधानसभेच्या अनुभवानंतर शिवसेना तितकी गाफ़ील राहिल, अशी शक्यता दिसत नाही. पण दुसरीकडे सेनेनेही स्वबळावर सर्व जागा लढण्याची तयारी ठेवली पाहिजे. इतकाच मुख्यमंत्र्यांनी दिलेला संदेश आहे. अर्थात तो फ़क्त सेनेला दिलेला संदेश नाही. अन्य कुठला संकेत त्यात आहे?

गेल्या विधानसभेपुर्वी काही महिने असाच जागावाटपाचा घोळ चालू ठेवला गेला, तेव्हा सेनेचे नेतृत्व युती टिकणार अशा भ्रमात होते. किंबहूना सेनेला त्याच भ्रमात ठेवणे, हीच भाजपाची रणनिती होती. एका बाजूला अशी युती व जागावाटपाची बोलणी व गुर्‍हाळ चालू होते आणि दुसर्‍या बाजूला सेनेच्या पुर्वापार जागा असलेल्या जागी, अन्य पक्षातले इच्छुक उमेदवार भाजपा मोठ्या प्रमाणात भरती करीत होता. त्याचा अर्थ इतकाच होता, की ऐन मोक्याच्या क्षणी युती तोडायची आणि सेनेला सर्व जागी उमेदवार उभेही करायला सज्जता असू नये, याचीही काळजी घ्यायची. आताही वेगळी कुठली रणनिती नाही. मुंबई पालिका जिंकायची असेल तर सेनेला अफ़जलखान, निजाम किंवा औरंगजेब असल्या इतिहासात गुरफ़टून ठेवायचे आणि आपण वर्तमानातले सुर्याजी पिसाळ गोळा करायचे. मुख्यमंत्री नेमके काय म्हणाले त्याचे आकलन म्हणूनच अगत्याचे आहे. कार्यकर्त्यांनी युती होईल किंवा नाही, त्याची फ़िकीर करू नये. आपापले बुथ संभाळावेत. तिथे पक्षाला मजबूत करावे. युतीविषयी नेते निर्णय घेतील. सगळेच बुथ पक्के करायचे म्हणजे काय? जिथे पक्षाचा इच्छुक असतो, तिथेच तो पक्षाला लढण्याला सिद्ध करीत असतो. असा इच्छुक उमेदवारी मिळाली नाही तर बंड करतो. कारण तो आधीपासून निवडणूकीची सज्जता करीत असतो. युती झाली आणि जागा मित्रपक्षाला सोडली गेली, तरी तो बंडखोरी करतोच. म्हणजे युती झाली तर आपल्यापाशी बंडखोर उमेदवार असायला हवेत आणि युती झाली नाही, तर अधिकृत म्हणून लढणारेही उमेदवार हवेत; असा मुख्यमंत्र्यांचा संकेत आहे. सेनेने तो ओळखला तर तिला प्रसंगाला तोंड देता येईल. निजामाचे राज्य असली भाषा लिहून बोलून कोणाशी लढता येत नाही. उलट आपल्यावरच कात्रजचा घाट बघायचा प्रसंग येत असतो. हे सेनेला उमजेल, तर उपयोग आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणविस यांनी युती होईल किंवा न होईल, असे म्हटले. याचा अर्थ युती करण्याची आपली इच्छा नाही, असेच स्पष्ट केले आहे. शिवसेनेला युती हवीच असेल, तर भाजपाच्या अटीवर करावी लागेल. इतका हा स्पष्ट इशारा आहे. त्यामुळे शिवसेनेने आपल्याला स्वबळावर लढायचे आहे याची खुणगाठ आतापासून बांधावी. दुसरी गोष्ट अशी, की त्यातूनच फ़डणविसांनी अन्य पक्षातील इच्छुकांना भाजपात येण्याचे आमंत्रण दिलेले आहे. भाजपा मुंबई पालिका एकहाती जिंकण्याच्या तयारीला लागला आहे. त्या वहात्या गंगेत ज्यांना हात धुवून घ्यायचे आहेत, त्यांनी आतापासून भाजपात दाखल होऊन, आपापले उमेदवारीचे दावे पेश करावे, असेच फ़डणविस यांनी सुचवलेले आहे. आमच्यापाशी प्रत्येक वॉर्डात लढणारे पुरेसे उमेदवार नाहीत, पण मतदार आमच्या बाजूला उभा आहे. ज्याचे आपापल्या क्षेत्रात प्राबल्य आहे, अशा इच्छुकांसाठी भाजपा हाच विजयाकडे जाणारा पक्ष आहे, असेच मुख्यमंत्र्यांनी सुचवलेले आहे. अर्थात ते त्यांचे वा त्यांच्या पक्षाचे आकलन आहे. तसे नसते तर मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी राक्षस बाटलीत बंद करण्याची भाषा केली नसती. पक्षाचे आपले आकलन असते आणि त्यानुसार प्रत्येक पक्ष रणनिती आखत असतो. भाजपाला लोकसभा विधानसभेतील यशामुळे मोदींच्या नावावर कुठल्याही एटीएम यंत्रातून हवी तितकी मते निघतात, अशी समजूत झाल्याचा तो परिणाम आहे. त्यात गैर काहीच नाही. १९८५ सालात तसेच मुरली देवरा यांना वाटले होते आणि २०१२ मध्ये तेच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि कृपाशंकर सिंग यांचे मत झालेले होते. मग आज तशाच अवस्थेत आशिष शेलार बोलत असतील, तर दोष त्यांचा नसतो. त्यांच्या दिल्लीकर नेत्यांनी आधीच्या लढाईत मिळवलेल्या यशाचा तो प्रभाव असतो. काय होऊ शकेल ते आपण बघायचे असते.

भाजपाला अशा भाषेतून शिवसैनिकांना डिवचायचे असा हेतू आहे आणि असण्यात गैर काहीच नाही. पण असे शब्द व भाषा वापरली जाते, तेव्हा शिवसेनेच्या पलिकडे कोणी दुखावतो काय, त्याकडेही बघायला हवे. निदान ज्यांना महापालिका जिंकायची असते, त्यांना तरी अन्य परिणाम बघणे आवश्यक असते. कृपाशंकर यांनी त्याची कधी फ़िकीर केली नाही की मुरली देवरांना त्याची गरज भासली नाही. मग शेलार यांच्याकडून काय वेगळी अपेक्षा बाळगता येणार? शिवसेनेने त्यातून कोणता धडा घ्यायचा, याला महत्व द्यायला हवे. युती होणार या आशेवर जगण्याचे दिवस संपलेले आहेत. हा नवा शेलारमामा शिवसेनेला काय सांगतोय ते ओळखले पाहिजे. त्या इतिहासातल्याच शेलारमामाचा इशाराच हा आजचा मामा देतोय. युतीचे दोर कापलेले आहेत. आता जिंकण्यासाठी व टिकण्यासाठी लढावे लागेल आणि आपल्या बळावरच सत्ता मिळवावी लागेल. मुंबई महापालिकेची सत्ता हाच शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि तो टिकवण्यापुढे सरकारमधली दोनचार मंत्रीपदे नगण्य आहेत, हे ओळखण्याची गरज आहे. रुसवेफ़ुगवे करून लढाया जिंकता येत नाहीत. कंबर कसून लढावे, तेव्हाच विजय संपादन होत असतो. मग डिवचणारे आरोप करण्यापेक्षा वा तशा आरोपांना उत्तर देत बसण्यापेक्षा, लढायला सिद्ध होणे इतकाच सेनेसमोर पर्याय आहे. कारण मुख्यमंत्र्यांनी षण्मुखानंद सभागृहातून जाहिरपणे ‘उमेदवार भरती चालू आहे’ अशी दवंडी पिटली आहे. कॉग्रेस, राष्ट्रवादी, वा अन्य कुठल्याही पक्षातल्या वॉर्ड पातळीवरील प्रभावी नेते उमेदवारांना भाजपात येण्याचे आवाहन त्यांच्या विधानात सामावलेले आहे. ती अप्रत्यक्षपणे युती होणार नसल्याची घोषणा आहे. १९८५ सालात स्वबळावर एकाकी लढताना सेनेने प्रथमच सत्ता कशी व कुठल्या ताकदीवर मिळवली, त्याचे स्मरण करण्यातच सेनेचे भले असेल.

6 comments:

  1. Bhau Sena nahi yenar ya veli Mumbai ta karana ajache sena pamukh kadavya shiv sainikana visarle ahet...

    ReplyDelete
    Replies
    1. मुंबईत सेना नाही आली तर मुंबई बिल्डर अन गुजराती लोकांच्या ताब्यात जाईल... असलेला मराठी माणूसही हद्दपार होईल! कृपया खालील link वरील लेख वाचा http://latenightedition.in/wp/2015/06/20/blog-post_20/

      Delete
  2. भाजप अजून मोदी पुराणात आहे... मुंबईत मते मिळावीत म्हणून हेच भाजप नेते एकेकाळी राज ठाकरे यांच्या घराचे उंबरठे झिजवायचे... वक्त वक्त की बात है!

    ReplyDelete
  3. Udhaw Thakrey is all ability of great political leaders has. So don't worry he will be tackle them. But sainik I don't know what they are thinking. But this may be last elections for MNS. Bhau you must view on Raj Thakrey. Lets understand him before views.

    ReplyDelete
  4. गुजरात मधे अमित शहांची सभा उधळल्याबद्दल पाटीदार समुदायाला देशद्रोही ठरवा ना , भाऊ !

    ReplyDelete