दोन वर्षापुर्वी ममता बानर्जी यांनी दुसर्यांदा विधानसभा जिंकल्यावर त्यांचा तोल गेलेला आहे. त्या निवडणूकीपुर्वी त्यांच्या यशाविषयी अनेकांना शंका होती. कारण त्याच दरम्यान त्यांच्या पक्षाच्या अनेक नेत्यांविषयी बर्याच भानगडी चव्हाट्यावर आलेल्या होत्या अनेक चिटफ़ंड घोटाळ्याचा गाजावाजा झालेला होता. तरीही त्यांना जीवदान मिळाले. त्याचे खरे कारण त्यांची लोकप्रियता असण्यापेक्षाही विरोधक कमकुवत निघाले होते. तेव्हा पाच वर्षाच्या पराभवातून डावी आघाडी सावरू शकलेली नव्हती आणि कॉग्रेसपाशी राज्यात कोणी नेतृत्वच उभे राहिलेले नाही. सहाजिकच पर्याय नसल्याने लोकांना पुन्हा ममतांच्या तृणमूल कॉग्रेस पक्षाला कौल द्यावा लागला होता. पण तरीही लोक नव्या पर्यायाकडे आशेने बघू लागल्याचा संकेत त्याच विधानसभा निवडणूकीतून मिळालेला होता. सव्वा तीन वर्षापुर्वी प्रथमच बंगालमध्ये भाजपाला लोकसभेच्या दोन जागा जिंकता आल्या होत्या आणि नंतरच्या काही पोटनिवडणूकीतही भाजपाला लोकांचा प्रतिसाद मिळू लागला होता. मोदींच्या उदयापुर्वी बंगालमध्ये कधीही भाजपा इतके यश मिळवू शकला नव्हता. वाजपेयी काळात ममता सोबत असताना भाजपाला काही यश मिळाले होते. पण ममतांनी भाजपाची साथ सोडली आणि त्या पक्षाला कधी स्वबळावर बंगालमध्ये यश मिळू शकले नव्हते. ते लोकसभेत मिळाले आणि नंतर विधानसभेतही काही आमदार स्वबळावर निवडून आले. हे लक्षणिय होते. त्याचे गांभिर्य मार्क्सवादी पक्षाचे आजचे सर्वेसर्वा सीताराम येच्युरी यांनी तेव्हाच बोलून दाखवले होते. पण त्यांनीही डाव्या आघाडीच्या धोरणात वा रणनितीमध्ये त्याचा उपयोग केला नाही. भाजपाला बंगालमध्ये रोखायचे असेल तर डाव्यांनीच राजकीय पर्याय म्हणून लोकांसमोर येण्याची गरज होती. ती गरज पुर्ण झाली नाही आणि आता तर ममताला पर्याय म्हणून भाजपाच आघाडीवर येत चालला आहे. त्याला ममताच हातभार लावत आहेत.
मागली विधानसभा जिंकल्यावर ममतांनी एकदम राष्ट्रीय नेता होण्याची महत्वाकांक्षा जोपासण्याचा हट्ट केला आणि त्यातच त्यांच्या अनेक नेत्यांना चिटफ़ंड घोटाळे उघडकीस येऊन गजाआड जावे लागले. तेव्हा त्यांनी आपल्या नेत्यांची पापे झाकण्यासाठी केंद्रातील भाजपा सरकारवर आगपाखड चालू केली. वास्तविक केंद्रातील मोदी सरकारने तृणमूल नेत्यांच्या मागे चौकशांचे शुल्ककाष्ट लावलेले नाही. चिटफ़ंड घोटाळ्याच्या चौकशा कोर्टाच्या आदेशानुसार सीबीआय करते आहे. त्याचा केंद्र सरकारशी काहीही संबंध नाही. पण मोदींवर खापर फ़ोडून ममता आपल्या नेत्यांची पापे झाकायला धडपडत आहेत. त्या गडबडीत त्यांनी इतके टोकाला जाऊन केंद्रविरोधी धोरण पत्करले आहे, की भाजपाच्या विरोधात जाताना आपण आपल्याच राज्यातील बहुसंख्य हिंदूंना शत्रू करीत आहोत, याचेही ममतांना भान उरलेले नाही. संघाच्या विविध कार्यक्रमांना प्रतिबंध घालणे व नंतर कोर्टाने तो प्रतिबंध रद्द करण्याचे इतके प्रकार झाले, की शेवटी कोलकाता हायकोर्टालाही ममतांनी मुस्लिमांचे लांगुलचालन कमी करावे अशी टिप्पणी करावी लागली. भाजपा वा संघाचा विरोध करताना बंगाली हिंदू शत्रू असल्याप्रमाणे वागवताना ममतांनी त्यांच्याच हिंदू पाठीराख्यांच्या मनात शंका निर्माण केलेल्या आहेत. पुढल्या काळात त्या वाढतच जाणर आहेत. कारण झालेली चुक सुधारण्यापेक्षा ममता अधिकच मुस्लिम धर्मांधतेच्या आहारी जात आहेत. त्यातूनच मग बशिरहाटची दंगल उसळली. मुस्लिम जमावाने हिंदू वस्तीत शिरून जाळपोळ केली आणि घरात घुसून अनेक हिंदूना मारहाण केली. हे दंगेखोर गावातले मुस्लिम नव्हते तर बाहेरून आलेला मुस्लिम जमाव होता. पण इतके होऊनही पोलिसांनी गावकर्यांना संरक्षण दिले नाही, की जमावाचा बंदोबस्त केला नाही. पर्यायाने आता तिथले हिंदू सरसकट या दंगलीसाठी मुस्लिमांपेक्षा ममताला दोषी मानत आहेत.
हा प्रकार बशीरहाट पुरता मर्यादित नाही, तीनचार जिल्ह्यात अशा घटना वर्षभर सातत्याने होत आहेत. मालदा जिल्ह्यातील कालिचक येथे तर अशाच मोठ्या मुस्लिम जमावाने वहाने व दुकाने जाळलीच. पण पोलिस ठाण्यावर हल्ला करून ते जाळून टाकले. पण अशा घटनांच्या बातम्या येऊ नयेत म्हणून ममतांनी तिकडे पत्रकारांना फ़िरकायलाही प्रतिबंध घातला. पण हळुहळू त्या बातम्या झिरपत राहिल्या आणि आता तो राष्ट्रीय विवाद होऊ घातला आहे. बशिरहाटच्या घटनेला सोशल माध्यमातून मोठी प्रसिद्धी मिळाली आणि मग ती बातमी मुख्यप्रवाहातील माध्यमांनाही झळकवणे भाग झाले. त्याची दखल घेऊन केंद्राने अधिक पोलिस व सुरक्षा दलाची कुमक पाठवली. तर सत्याचा बभ्रा होईल म्हणून ममतांनी ती मदत नाकारली आणि आता काट्याचा नायटा झालेला आहे. अवघ्या बंगालमध्ये हिंदू समाज कमालीचा अस्वस्थ झाला आहे आणि मगच ममताना चुक जाणवली आहे. तेव्हा त्यांनी कांगावा सुरू करून राज्यपालावरही आरोप करण्यापर्यंत मजल मारली आहे. पण ज्या कारणास्तव राज्यपालांनी कारवाईची मागणी केली. ते कारण जर बहुसंख्य हिंदूंना बोचणारे असेल, तर तो प्रत्येक मतदार ममतापेक्षाही राज्यपालांचेच आभार मानणार ना? त्यातून भाजपाचीच शक्ती वाढणार ना? अलिकडेच मोदी सरकारची तीन वर्षे झाल्याच्या निमीत्ताने दोनतीन वाहिन्यांनी देशभरची मतचाचणी घेतली होती. त्यात भाजपाची दोन राज्यात नव्याने ताकद वाढली असल्याचे दिसून आलेले होते त्यातला एक प्रांत बंगालचा आहे. तिथे ममतांना ३९ टक्के तर भाजपाला ३२ टक्के मते मिळताना दिसत आहेत. कदाचित त्यामुळेच ममता अधिक विचलीत झालेल्या आहेत. पण भाजपाची ती वाढ रोखण्यासाठी त्यांनी पत्करलेला मार्ग मात्र भाजपालाच अधिक बलवान करणारा आहे. कारण ममता आपल्या कृतीतून अधिकाधिक हिंदूंना भाजपाच्या गोटात ढकलत आहेत.
कालीचक, बदुरीया वा बशिरहाटच्या घटना ममताला मुस्लिमाचे नुसते लांगुलचालन करताना दाखवत नाहीत. मुस्लिम जमावाला पाठीशी घालताना सर्व पोलिस प्रशासन मुस्लिम दंगेखोरांना पाठीशी घालून हिंदूंच्या जिवावर उठलेले आहे, असेच चित्र तयार केलेले आहे. भाजपाला वा त्याची खरी संघटना असलेल्या संघाला अशीच परिस्थिती हवी असते आणि आहे. जितके हिंदू अस्वस्थ व भयभीत होतील, तितके त्यांना संघ व भाजपाच आपले तारणहार असल्याची खात्री पटू शकते. मग त्यातून हिंदू व्होटबॅन्क तयार होत असते. गेल्या तीन वर्षात अखिलेश व आझमखान यांनी नेमके हेच काम उत्तरप्रदेशात केले आणि परिणामी भाजपाला हक्काची हिंदू व्होटबॅन्क निर्माण करून दिली. पुढले काम भाजपासाठी सोपे असते. आताही ममता हिंदूंना भयभीत करीत आहेत आणि मुस्लिम गुंड जमावाला मोकाट रान दिल्यामुळे अधिकाधिक हिंदूंचा ममताविषयी भ्रमनिरास होत चालला आहे. त्याचा परिणाम भयभीत हिंदूंना कोणी वाली राहिलेला नाही. सेक्युलर बुरख्यात गुरफ़टून गेलेल्या डावे पक्ष व कॉग्रेसलाही मुस्लिम जमावाच्या दंग्यांच्या विरोधात बोलण्याची हिंमत राहिलेली नाही. ते बोलणारा एकच पक्ष भाजपा असेल, तर बंगालच्या हिंदूंना अन्य कुठला पर्याय शिल्लक उरतो? संघ व भाजपाला हिंदू व्होटबॅन्क बनवायची आहेच. पण त्या हिंदूला डावे पक्ष व कॉग्रेसने अशावेळी दिलासा दिला व त्याच्या समर्थनाला येऊन मुस्लिम दंगेखोरांच्या बंदोबस्ताची ठामपणे मागणी केली, तर बंगालचा हिंदू भाजपाच्या गोटात जायचा थांबवला जाऊ शकतो. तो ममताकडून पुन्हा डावे वा कॉग्रेसकडे येऊ शकतो. पण तसा पर्यायच उपलब्ध नसेल तर त्याला भाजपाच तारणहार वाटणे स्वाभाविक आहे. थोडक्यात ममताचा सेक्युलर अतिरेक आणि डाव्यांसह कॉग्रेसचे सेक्युलर मौन, हिंदूंना भाजपाच्या गोटात नेवून सोडते आहे.
No comments:
Post a Comment