येत्या मंगळवारी प्रणबदा मुखर्जी यांची कारकिर्द संपुष्टात येणार असून त्यांच्याच उपस्थितीत नव्या राष्ट्रपतींचा सत्तासुत्रे हाती घेण्याचा सोहळा पार पडणार आहे. त्यांनी आपण राजकारणातून निवृत्त होण्याची पुर्वीच घोषणा केलेली आहे. पण हा आणखी एक संकेत आहे. प्रणबदा यांच्या बरोबर राजकारणातली समकालीन असलेली पिढीचीही आता निवृत्त होण्याची वेळ आलेली आहे. ज्यांना ते समजते आहे, त्यांनी आधीच आपल्या्ला स्पर्धात्मक राजकारणातून बाजूला करून घेण्याचा आरंभ केला आहे. मुलायमसिंग हे त्याच काळातले राजकारणी आहेत आणि शरद पवार, शरद यादव त्याच पिढीचे प्रतिनिधीत्व करतात. लालकृष्ण अडवांणी तर त्या पिढीचे ज्येष्ठ आहेत. पंण त्यांनाही अजून राजकारणाचा मोह सोडता आलेला नाही. आपल्या हाताखाली तयार झालेली पुढली पिढी समर्थपणे पक्ष व राजकारण चालवित असताना, त्यातही लुडबुडण्याचा मोह अडवाणी आवरू शकलेले नाहीत. हा काळाचा महिमा असतो. प्रत्येक पिढीचा एक उमेदीचा काळ असतो आणि त्यात काहीही करून दाखवण्याची धमक त्या वयात असते. तो काळ उलटला, मग बाजूला होण्यात मोठेपणा असतो. प्रणबदांनी सर्वोच्चपदी जाऊन ते सत्य स्विकारले. १९७० च्या जमान्यातली तरूण पिढी आता वयोवृद्ध झालेली आहे. त्यांच्या घरातील वा सान्निध्यातील पुढली पिढी कार्यरत झालेली आहे. म्हणूनच या मंगळवारी फ़क्त प्रणबदा निवृत्त होत नसून, त्यांचेच बहुतांश समकालीन राजकीय नेते व दिग्गज निवृत्त होण्याचा संकेत मिळू लागला आहे. मुलायम यांनी पुत्राशी झगडण्यापेक्षा आपला अलिप्तपणा स्विकारला आहे. कारण आता नव्याने काही उभे करण्याची त्यांची वेळ निघून गेलेली आहे. काळ बदलला आहे आणि राजकारणासह निवडणूकीच्या संकल्पनाही पुरत्या बदलून गेलेल्या आहेत. या संदर्भात विक्रमवीर म्हणून गणल्या गेलेल्या सुनील गावस्करच्या निवृत्तीचा प्रसंग आठवतो.
त्याच्या काळात म्हणजे पवार प्रणबदा राजकारणात उमेदीने काम करत होते, तोच कालखंड आहे. १९७१ सालात गावस्करने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि पहिल्या मालिकेतच मोठी धावसंख्या उभारून आपण क्रिकेटचे विश्व गाजवणार असल्याची चुणूक दाखवली होती. पण असा गावस्कर विश्वचषक वा मर्यादित षटकांच्या खेळात कुठल्या कुठे फ़ेकला गेला होता. तेव्हा जगात जिथे म्हणून कसोटी क्रिकेट खेळले जायचे, त्या प्रत्येक देशात व त्याच्या विरोधात गावस्करने शतके ठोकली होती. पण अशा गावस्करला एकदिवसीय क्रिकेटमध्ये चमक दाखवता आली नाही. तो पहिल्या तीन विश्वचषक स्पर्धाही खेळला. पण तिथे त्याचा खेळ फ़िका पडत होता. पहिल्या स्पर्धेत तर गावस्करने साठ षटकात नाबाद राहून केलेल्या ६०-६५ धावांमुळे पहिल्या फ़ेरीतच भारत बाद होऊन गेला होता. अशा गावस्करचे एकदिवसीय क्रिकेटमध्ये शतक करण्याचे स्वप्न राहून गेले होते आणि क्रिकेटची पंढरी मानल्या जाणार्या इंग्लंडच्या लॉर्डस मैदानावरही त्याला शतक ठोकता आलेले नव्हते. १९८७ सालात योगायोगाने एका महोत्सवी सामन्यात त्याच मैदानावर गावस्करच्या दोन्ही इच्छा एका़च डावात पुर्ण होऊन गेल्या आणि त्याच संध्याकाळी त्याने तडकाफ़डकी आपली निवृत्ती घोषित करून टाकली होती. त्याच्या काही महिने आधी शारजा व ऑस्ट्रेलियात मर्यादित षटकांच्या स्पर्धेत त्याने भारताचे नेतृत्व केले आणि विजयही मिळवून दाखवले होते. म्हणजेच आणखी एकदोन वर्षे तो सहज चांगले क्रिकेट खेळू शकला असता. म्हणूनच अनेकांनी त्याच्या निवृत्तीबद्दल हळहळ व्यक्त केली होती. त्यावर गावस्कर म्हणाला होता, ‘आपल्या जाण्याने लोकांना हळहळ वाटते तेवढ्यातच बाजूला व्हावे, हा जात कशाला नाही, असे म्हणायची वेळ आपल्याच चहात्यांवर आणू नये.’
गावस्करचे शब्द आज कालबाह्य होत गेलेल्या अनेक राजकीय नेत्यांना लागू आहेत. त्यांचा काळ कधीच संपला आहे आणि त्यांच्या चहात्यांनाही त्यांची केविलवाणी स्थिती बघवत नाही. कुठल्याही समारंभात ओशाळवाण्या मुद्रेने उपस्थित असणारे लालकृष्ण अडवाणी, किंवा अजूनही विविध घडामोडीत लुडबुडणारे शरद पवार, त्यांच्याच पुरस्कर्त्यांना लज्जीत करीत असतात. कारण आता त्यांचा उमेदीचा कालखंड संपलेला आहे. दुसर्या मुदतीची अपेक्षाही न करता परस्पर आपली निवृत्ती घोषित करणारे प्रणबदा, म्हणूनच आदराचे स्थान प्राप्त करून बाजूला होत आहेत. कमीअधिक प्रमाणात मुलायमना तो संकेत उमजला आहे. पण अन्य बरेच नेते आजही केविलवाण्या आशाळभूत नजरेने आपली संधी शोधत वावरताना दिसत असतात. डाव्या आघाडीतले अनेक नेते आता दिसतही नाहीत. त्यांनी आपल्या पक्ष व संघटनांची सुत्रे कुणा व्यवहारी तरूण नेत्याकडे सोपवली नाहीत. त्यामुळे सर्व डाव्या पक्षांमध्ये पुस्तकी किड्यांच्या हाती पक्ष गेले आहेत आणि त्यांना भवितव्य उरलेले नाही. कालबाह्य अशा पुस्तकी भूमिकांत हे गुरफ़टलेले आहेत. याच कालखंडात उदयाला आलेल्या मायावती, ममता अशा नेत्यांना आपल्याच पक्षातले भावी नेतृत्व जोपासता आले नाही. कॉग्रेसने तर मागल्या तीन दशकात नेतृत्व जोपासण्यापेक्षा तोंडपुज्या चमच्यांची फ़ौज जमा केली. त्यामुळे मनमोहन यांच्यासारखा बिगर राजकारणीही त्यांचे सरकार चालवू शकला. पण खेळाचे नियम बदलले, तेव्हा अशा सर्वच पक्षांची तारांबळ उडालेली आहे. कसोटी क्रिकेटचा विक्रमवीर गावस्कर जसा एकदिवसीय खेळात चाचपडत राहिला, तशीच काहीशी आजच्या भारतीय राजकारणातील बहुतांश राजकीय नेत्यांची अवस्था झालेली आहे. त्यांना मोदीलाट व नंतरचे स्थित्यंतर ओळखताच आले नाही. म्हणून ते नेते व त्यांचे पक्ष विद्यमान राजकारणात संदर्भहीन होत चालले आहेत.
कसोटी क्रिकेटमध्ये धावा जमवणे व नाबाद राहून कितीही वेळ फ़लंदाजी करण्याला प्राधान्य असते. पण मर्यदित षटकांच्या एकदिवसीय खेळात वेगाने धावा काढताना बळी गेला तरी बेहत्तर, असा बेताल खेळ करणेही भाग असते. ते गावस्करला साधलेले नव्हते. तसेच आज राजकारणाचे व निवडणूका जिंकण्याचे नियम व निकष खुप बदलून गेले आहेत. मोदींनी तेच बदलून टाकले आहेत. त्यामुळे जुन्या व कालबाह्य डावपेचांनी निवडणूका जिंकणे, अशक्य झाले आहे आणि मोदींना रोखणे हाताबाहेरचा खेळ होत चालला आहे. आपल्याच पक्षातील जुन्या खोडांना बाजूला करून, नव्या नेतृत्वाला संधी देताना मोदी तजेलदार चेहरे पुढे आणत आहेत. आपल्या लोकप्रियतेवर स्वार होऊन निवडणूका काही काळ जिंकता येतील. पण पुन्हा जिंकण्यासाठी भक्कम संघटना हाताशी हवी, याचे भान ठेवून त्यांनी संघटनात्मक बांधणीला प्राधान्य दिले आहे. आपल्या विरोधातले पक्ष एकजुट झाले, तर मतांच्या टक्केवारीत बेरजेने आपल्या लोकप्रियतेवर मात होऊ शकते. अशा सर्व दुबळ्या बाजू मोदींनी लक्षात घेतल्या आहेत. म्हणून त्यांनी आपला विश्वासू सहकारी संघटनात्मक कामाला जुंपला आहे आणि मतांच्या बेरजेवर मात करण्यासाठी मतदान वाढवण्याचा जबरदस्त पर्याय उभा केला आहे. दिल्ली बिहारच्या पराभवानंतर मोदी-शहांनी प्रत्येक निवडणूकीत अधिकाधिक संख्येने मतदान होईल, यासाठी खुप कष्ट उपसले आहेत. होईल त्या मतदानात विविध पक्षांना मिळाणारी मतांची संख्या कायम राहिली, तरी टक्केवारीत घट झालेली दिसते. मायावती व मुलायम यांची आधीच्या कालखंडातील मतसंख्या व पराभूत होतानाची मतसंख्या तेवढीच दिसेल. त्यांचा पराभव मतदान वाढण्यातून झाला आहे.
आपल्या अनुयायी व समर्थकांना मतदानाच्या दिवशी अधिकाधिक संख्येने बाहेर काढणारी सुसज्ज बुथवार संघटना, हा मोदी-शहा यांनी निवडणूकीच्या राजकारणात उभा केलेला नवा नियम आहे. पण त्याचा थांगपत्ता नसलेले कालबाह्य विचारांचे नाऊमेद नेते विरोधातले पक्ष चालवित आहेत. तिथेच त्यांवा केविलवाणा पराभव निश्चीत झाला आहे. कारण मोदींनी नुसता सत्ताबदल केलेला नाही. त्यांनी राजकारणाचे, निवडणुकांचे व स्पर्धेचे नियमही बदलून टाकलेले आहेत. पण त्याकडे ज्यांना वळूनही बघता आलेले नाही, असे अनेक नेते निवृत्त व्हायला राजी नाहीत. त्यांनी १९८०-९० च्या जमान्यातील डावपेचांवर मोदींना पराभूत करण्याचे रचलेले मनसुबे म्हणून हास्यास्पद होत चाललेले आहेत, गावस्करच्या नंतर विक्रमवीर झालेल्या सचिनच्या अखेरच्या कालखंडात २०-२० असे नवे क्रिकेट आले. त्यात सचिनला आपली चमक फ़ारशी दाखवता आली नाही. आपला मैदानातील प्रतिसाद तितका तत्पर नसतो, हे मान्य करण्याचा त्याचा प्रामाणिकपणा किती राजकीय नेते दाखवू शकतील? इतरांचे नेते फ़ोडणे वा मतांच्या बेरजेची गणिते मांडणे, आता कालबाह्य झालेले आहे. मात्र त्याच जमान्यात आजही जगू बघणार्यांना नव्या युगाची चाहुलही लागलेली नाही. मग त्यांची डाळ कशी शिजणार आहे? आपला उमेदीचा काळ संपल्याचे सत्य स्विकारून भूमिका बदलणारा अमिताभ, आजही वयाला व काळाला योग्य अभिनय करत टिकू शकला आहे. त्याचे कोण समकालीन शिल्लक उरलेत? प्रणबदा यांची निवृत्ती म्हणूनच काळाची चाहुल आहे. प्रत्येक पक्षाने आपल्या नव्या पिढीला पुढे आणून वा त्यांच्यातल्या होतकरूंना संधी देऊन, यातून मार्ग काढावा लागेल. अशा वार्धक्यात पाय अडखळलेल्यांनीच आपल्या पुढल्या पिढीचा मार्ग रोखून धरला तर त्यांच्या पक्षाला भवितव्य नाही. कारण अशा नेत्यांनाच भविष्य राहिलेले नाही.
देवर्षि नारद पुरस्कार मिळाल्याबद्दल तुमचे मन:पूर्वक अभिनंदन!
ReplyDeleteखूपच चांगले विश्लेषण
ReplyDeleteLast Century by Sunil Gavaskar
ReplyDeleteODI 31 oct, 1987. 103(83), VCA Nagpur